Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जगावेगळी ‘चिंधी’

    November 1, 2026

    Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान

    November 1, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, November 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » जगावेगळी ‘चिंधी’
    फिल्मी

    जगावेगळी ‘चिंधी’

    विशाल कुलकर्णीBy विशाल कुलकर्णीNovember 1, 2026No Comments9 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, विशाल कुलकर्णी, लेखक विशाल कुलकर्णी, जैत रे जैत, गोनिदा, स्मिता पाटील, ना धो महानोर, चिंधी, चिंधीची प्रेमकथा, चिंधी नाग्याची प्रेमकथा, नाग्याची सूडकथा, जगाशी झुंजणारी चिंधी, पंडित हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, रवींद्र साठे कोरस,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नेहमीप्रमाणे युट्यूबवर सर्फ करत असताना एका व्हिडीओपाशी थबकलो. झी मराठीच्या सारेगमपचा कुठलासा एपिसोड होता… तिथे थबकलो, कारण गुप्त्यांच्या ‘वंदनाताई’ सांगत होत्या…

    “अमृता, तू गाणं छानच गायलंस. मुळातच हे गाणं अतिशय गोड आहे. खरेतर, ‘हाँटिंग’ आहे…” त्यांनी अजून एक-दोन उदाहरणे दिली, त्यात ‘या डोळ्यांची दोन पाखरे…’ हेही होतं. पण ज्या गाण्याबद्दल त्या बोलत होत्या ते गाणं होतं ‘जैत रे जैत’मधलं…

    ‘मी रात टाकली, मी कात टाकली…’

    मी बावळटासारखा त्या गाण्याचा संबंध ‘या डोळ्यांची दोन पाखरे…’शी लावला आणि मनातल्या मनात आश्चर्य करायला लागलो. या गाण्यात वंदनाताईंना ‘हाँटिंग’ असं काय आढळलं असावं? ब्रेक संपेपर्यंत कसाबसा दम धरला आणि ‘सारेगम’ सुरू झालं. समोर आधी ‘जैत रे जैत’मधले त्या गाण्याचे दृश्य झळकले. स्मिताचे ते ओझरते दर्शन आणि कॅमेरा वर्तमानात आला. अमृता सुभाष ‘मी रात टाकली, मी कात टाकली’ गात होती, पण माझे मन वर्तमानात यायला तयारच नव्हते. मी कुठेतरी तिथेच लिंगोबाच्या डोंगरावर, कदाचित स्मिताच्या त्या गहिर्‍या डोळ्यांत हरवलो होतो. लताबाईंचा दैवी आवाज, बाळासाहेबांचं धुंद करणारं संगीत आणि त्यावर स्मिताची ती मुक्त, थोडीशी स्वैर भासणारी, नाग्यासाठी वेडी झालेली, त्याच्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावत म्हणत बेभान होणारी ‘चिंधी’… आणि महानोरांचे ते अप्रतिम शब्द!

    मी रात टाकली, मी कात टाकली

    मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली…

    मला क्षणभर वाटले की ते स्वर, ते सूर, ते संगीत, ते शब्द, स्मिताच्या चेहर्‍यावरचे ते उन्मुक्त, स्वैर भाव नकळत एखाद्या तीराप्रमाणे माझ्यावर झेपावताहेत, माझ्याही नकळत मी त्यांच्या आहारी जातोय. त्यांची शिकार बनतोय. त्याच क्षणी जाणवले ‘आपण वंदनाताईंच्या हाँटिंगचा अर्थ मूर्खासारखा ‘हाँटेड’ असा लावला होता चुकून… ते शब्द, ते सूर खरोखर हाँटिंग होते. प्रचंड गर्दीतही बरोबर तुमचा वेध घेण्याची, झपाटून टाकण्याची ताकद त्या सुरात होती. यापूर्वीही खूप वेळा ऐकलेय हे गाणे मी. पण वंदनाताईंनी त्या गाण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी दिली. भानावर आलो तेव्हा अमृताचा परफॉर्मन्स संपला होता. हो, मी त्याला परफॉर्मन्सच म्हणेन, कारण ते अमृताचे स्वर कानावर पडत असताना माझ्या डोळ्यांसमोर मात्र ‘जैत रे जैत’मधली ‘स्मिता’ होती आणि स्मिताच्या त्या रापलेल्या (चित्रपटातील) चेहर्‍यावरच्या अवखळ निरागसतेला अमृताचे स्वर कुठेच योग्य वाटत नव्हते. मला वाटले आता नेहमीप्रमाणे कौतुक करून दोन्ही गुप्ते अमृताला ‘नी’ नाहीतर ‘वरचा सा’ असे काहीतरी गुण देणार. पण वंदनाताईंनी धक्काच दिला. मला खटकलेल्या गोष्टीच, म्हणजे नको त्या ठिकाणी शब्दांवर दिलेला जोर, शब्दांचे चुकीचे उच्चार, काही ठिकाणी घसरलेला सूर याबद्दल सांगत वंदनाताईंनी अमृताला शुभेच्छा दिल्या.

    हेही वाचा – पल भर में ये क्या हो गया…

    मी लगेचच पुन्हा युट्यूब सर्फ करू लागलो. पण आता त्या खेळण्यात अजिबात मजा येत नव्हती, कारण डोळ्यासमोरच्या विस्तृत कॅनव्हासवर चिंधी आणि कानावर हळूवारपणे येत मनावर कब्जा करणारे ना. धों. महानोरांचे शब्द पीच्छा सोडायला तयारच नव्हते.

    कसं होतं ना, बर्‍याच वेळा आपली अवस्था ‘देता किती घेशील दो कराने’ अशी होऊन जाते. म्हणजे बघा ना, मी म्हणतो – मी लताबाईंच्या आवाजाचा भक्त आहे, तेवढ्यात मला जाणवतं की, अरे, याला बाळासाहेबांचं संगीत आहे, जी आपल्यासाठी नेहमीच एक पर्वणी वाटत आलेली आहे, त्या संगीतात रमतोय न रमतोय, तोवर लक्षात येतं की, अरे, हे आपल्या आवडत्या कवीचे शब्द आहेत. आपण नकळत त्या शब्दांत गुरफटायला लागतो आणि तेवढ्यात डोळ्यांसमोर उभा राहतो तो जिवंत, नैसर्गिक अभिनयाचा मूर्तीमंत आविष्कार… साक्षात स्मिता पाटील! जरा कुठे स्मिताच्या डोळ्यांत हरवून जायला बघावं, तर मागे स्क्रीनवरची लिंगोबाची हिरवीगार झाडी, निसर्गाचं ते मनोहारी, नयनरम्य दृश्य खुणावू लागते…

    अरे, माझी झोळी एवढी मोठी नाहीये रे परमेश्वरा! तू देता है, तो छप्पर फाडके देता है ये तो सुना था, पण सगळ्या जाणिवांना भेदूनही असं काही हवंहवंसं देऊन जातोस, हे पहिल्यांदाच अनुभवतोय. मग अलगद मन हळूहळू मागे जायला लागतं. ‘जैत रे जैत’बद्दल संबंधित दिग्गज कलावंतांकडून ऐकलेल्या, वाचलेल्या अनेक गोष्टी डोळ्यांसमोर फेर धरायला लागतात.

    गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळचा अनुभव सांगताना रवींद्र साठे यांनी सांगितलं होतं…

    पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या चालींचं वैशिष्ट्य म्हणजे ती चाल कितीही अवघड वाटली, तरी गाण्याच्या गाभ्याशी किंवा गाण्याच्या भावाशी कधीच हटकून नसते. पण त्यांनी केलेलं प्रत्येक गाणं हटकेच आहे. मी ‘जैत रे जैत’ या चित्रपटासाठी त्यांच्याकडे पहिल्यांदा गायलो. मी आणि चंद्रकांत काळे आम्ही ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकात गात असू आणि जब्बार पटेल यांनी आमचं नाव पंडितजींना सुचवलं. ‘मी रात टाकली…’ या गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं, त्यावेळी माझं वय 27 वर्षे आणि अनुभवही कमीच. पण ते गाणं झाल्यानंतर खुद्द लतादिदींनी सांगितलं की, खूप दिवसांनी एवढा सुरेल कोरस ऐकला. ‘जैत रे जैत’ या एका चित्रपटातील गाणी ऐकली, तरी पंडित हृदयनाथांच्या श्रेष्ठत्वाबद्दल कल्पना येते.

    गंमत बघा हे गाणं अजरामर झालं त्यात लताबाईंचा वाटा सिंहाचा होता. पण त्यांना मात्र कौतुक गाण्यातल्या कोरसचं. ही सगळी मोठी माणसं इतकी साधी, विनम्र कशी काय राहू शकतात बुवा?

    चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल सांगितलं होतं…

    काही दिवसांच्या अंतराने बाळासाहेबांचा पुन्हा फोन आला, “तुम्ही गो. नी. दांडेकरांची ‘जैत रे जैत’ ही कादंबरी वाचली आहे काय? नसल्यास जरूर वाचा. त्या कथानकात संगीताला उत्तम वाव मिळेल, असं मला वाटतं. हवं तर आपण अप्पासाहेब दांडेकरांशी बोलू या.”

    मी कादंबरी वाचली. चित्रपटाच्या दृष्टीनं मला ती आवडली. पण मला ही कादंबरी जशीच्या तशी पडद्यावर आणायची नव्हती. मी मुळात नाटकातला माणूस असल्यामुळे त्याचा फॉर्म बदलावा, असं मला वाटलं. त्या आधी केलेल्या ‘घाशीराम’, ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकांमुळे या चित्रपटाला पाश्चात्य देशातील संगीतिकेचा फॉर्म देता येईल काय, यावर मी विचार केला. ‘जैत रे जैत’ ची कथा आदिवासी ठाकर समाजात घडते. पाश्चात्य संगीतिकांमध्ये ज्याप्रमाणे सूत्रधार असतो, त्या धर्तीवर या चित्रपटात ठाकर समाजातल्याच दोघांना सूत्रधार म्हणून ठेवावं, असा विचार झाला. दिदी आणि उषाताई यांनादेखील ही कल्पना आवडली, त्यांनी काम सुरू करायला सांगितलं.

    संगीतिकेचं रूप चित्रपटाला द्यायचं असेल, तर किमान वीसएक गाणी तरी चित्रपटात घ्यावी लागणार होती. गीतलेखनासाठी ना. धों. महानोर यांना सांगायचं ठरलं. त्यानंतर महानोर आणि बाळासाहेबांसोबत बैठका सुरू झाल्या. ‘प्रभूकुंज’मधल्या छोट्याशा खोलीत बाळासाहेब हार्मोनिअम घेऊन बसायचे. महानोर झराझरा गाणी लिहून द्यायचे. बाळासाहेब गाण्याच्या ओळीवर विचार करत डोळे मिटून बसलेयत… मधूनच त्यांची बोटं हार्मोनिअमवर फिरतायत आणि एकेक चाल ते गुणगुणतायत… अधूनमधून दिदी, उषाताई याही लक्षपूर्वक ऐकतायत… चहाचे कप, खाण्याचे पदार्थ यांच्या साथीनं तासनतास कसे निघून जातायत, हे कळत नाही. मधूनच बाळासाहेबांनी दुसऱ्या एखाद्या अल्बमसाठी केलेल्या चाली ऐकविल्या, की मला हेवा वाटायचा आणि ती चाल आपल्याला वापरता येईल का, असं मी विचारायचो. पण बाळासाहेबांचं उत्तर असे, ‘नाही नाही, तुम्हाला या चालींवर मी तुम्हाला डल्ला मारू देणार नाही.’ तरीदेखील एक चाल मी अक्षरश: ‘ढापली’च.

    दिदींसाठी केलेल्या ‘मी रात टाकली’ या गाण्यात एक कोरसचा तुकडा आहे, ‘हिरव्या पानात, हिरव्या पानात…’ ही चाल बाळासाहेबांनी दुसऱ्या एका अल्बमसाठी राखून ठेवली होती, पण ती या गाण्यात वापरावी असा हट्टच मी धरला. अखेर ते राजी झाले…

    गाणं जर नीट ऐकलं असेल तर त्या कोरसची जादू तुम्हालाही नक्कीच जाणवली असेल. हे गाणं ऐकता ऐकता आपण नकळत त्या सुरात, स्मिताच्या त्या गावरान रुपात स्वतःला हरवत जातो आणि मग त्यातल्या एका एका शब्दाची ताकद आपल्याला कळायला लागते. इथे तर पंडित हृदयनाथजींच्या हाताशी महानोरांसारखा शब्दप्रभूच होता. काही म्हणा, पण काही काही योग असे जुळूनच यावे लागतात आणि ते जेव्हा जुळून येतात तेव्हा इतिहास घडतो. ‘जैत रे जैत’च्या गाण्यांनी असाच इतिहास घडवला. गोनिदांनी जेव्हा ही कादंबरी लिहिली, तेव्हा त्यांना वाटले तरी असेल का, की ही कादंबरी पुढची कित्येक दशके चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना विलक्षण आनंद आणि तृप्ततेची जाणीव देत राहणार आहे! असे म्हणतात, की या चित्रपटासाठी महानोरांनी एकूण 19 गाणी लिहिली होती. मला खात्री नाही, पण यापैकी प्रत्यक्ष चित्रपटात बहुदा बाराच गाणी वापरली गेली. निदान माझ्या माहितीत तरी तेवढीच आहेत.

    मुळात हा चित्रपट म्हणजे एक छान प्रेमकथा आहे. त्याबरोबरच ती एक सूडकथाही आहे, याशिवाय, ती एक सामान्य माणसाच्या जिद्दीचीही कथा आहे. राणीमाशीला नमस्कार केल्यानंतरही ती नाग्याचा डोळा फोडते म्हणून राणीमाशीला उद्ध्वस्त करायच्या जिद्दीने पेटलेला नाग्या, मला पुण्यवंत व्हायचंय, या इच्छेन पछाडलेला नाग्या, लग्न करीन तर स्वतःला आवडलेल्या पुरुषाशीच म्हणून जिद्द करणार्‍या, त्यासाठी ठरलेल्या नवर्‍याला सोडून येणार्‍या, राणीमाशीने डोळा फोडल्यावरही कुरुप झालेल्या नाग्यासाठी आपले सर्वस्व शेवटी प्राणही पणाला लावणार्‍या चिंधीची कथा!

    असो, थोडा भरकटलोच मी. आपण बोलत होतो… चिंधीबद्दल, खरेतर ‘मी रात टाकली..’ या अजरामर गाण्याबद्दल!

    शब्द अर्थातच ना. धों. महानोरांचे, संगीत पंडित हृदयनाथ, स्वर साक्षात कोकिळेचे पण या गाण्यात आपल्याला वेड लावतो तो रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यांचा कोरस!

    मी रात टाकली, मी कात टाकली

    मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली

    लताबाई बेधुंद करत गात असतात… आपल्या डोळ्यांसमोर असते चिंधी. मुक्त आणि मनस्वी स्त्रीचा एक मूर्तीमंत आविष्कार. मला आवडेल त्या पुरुषाचीच होणार, अशी ठामपणे सांगणारी चिंधी. आपल्या नवर्‍याला सोडून आपल्या प्रियकराच्या शोधात निघालीय. आपला भूतकाळ तिने मागेच कुठेतरी सोडून दिलाय. जो कधी आपला वाटलाच नाही, त्या मोडक्या संसाराबद्दलची आसक्ती, लाज कधीच सोडून दिलीय. जुनाट झालेली कात टाकून देऊन नागीण जशी नव्या रसरशीतपणाने पुढचे आयुष्य जगायला सिद्ध होते, तशी तिने आपली जुनी जिंदगानी त्यागलीय. तिला जगाची फिकर नाही, तथाकथित रुढी परंपराची भीती नाही. या क्षणी ती फक्त एक प्रिया आहे, आपल्या प्रियकराकडे मिलनाची मागणी करणारी एक प्रेमवेडी प्रेयसी!

    इथे आपण लताबाईंच्या सुरात गुंतत जात असताना अचानक कानावर कोरसचे सूर घुमायला लागतात. स्पेलबाऊंड म्हणजे नेमके काय असते, त्याचा जिवंत अनुभव देणारी ती जाणीव असते. ‘जैत रे जैत’ हा संपूर्ण चित्रपट पटेलांनी सूत्रधाराच्या नजरेतून आपल्यासमोर मांडलाय. हे सूत्रधारच आपल्यालाच नाग्या आणि चिंधीची कथा गाण्यांमधून सांगत जातात. एखाद्या संगीतिकेसारखी ही कथा आपल्यापुढे उलगडत जाते.

    हिरव्या पानांत, हिरव्या पानांत

    चावंळ चावंळ चालती…

    भर ज्वानीतली नार

    अंग मोडीत चालती…

    खुपदा कसं होतं ना… काही गोष्टी अगदी अलवारपणे आपल्याला येऊन भिडतात. त्या आपल्याला येऊन भिडेपर्यंत आपल्याला त्यांची जाणीवही होत नाही. हिरव्या गवतात नाही का, कसली तरी सळसळ कायम जाणवत असते, कुठलीतरी चाहूल कानावर येत असते, पण दिसत मात्र काहीच नाही. एखादी नागीण आपल्या शरीराला नागमोडी झोके देत सळसळ करत गवतातून निघून जाते, आपल्याला दिसत नाही… पण तिचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवत राहते. इथे महानोरांना चिंधीच्या चालण्यात तीच अदा, तीच नजाकत तर जाणवली नसेल. खरेतर गाण्याचे बोल पाहता हा प्रसंग खूप मादक करता येऊ शकला असता. स्मितासारखी देखणी, रुपगर्विता त्यात अभिनयसम्राज्ञी जब्बारजींच्या दिमतीला हजर होती. पण जब्बारजींनी तो मोह आवरलाय. इथे स्मिता ‘चिंधी’च वाटते. तिच्या चालण्या-बोलण्यातून चिंधीची गावरान तरीही अवखळ अदाच समोर येत राहते. त्यामुळे चिंधी कुठेही मादक वाटली, तरी अश्लील वाटत नाही. हे जब्बार पटेलांच्या दिग्दर्शनाचे आणि स्मिताच्या अभिनयाचे यशच म्हणावे लागेल.

    ह्या पंखांवरती, मी नभ पांघरती

    मी मुक्त मोरनी बाई, चांदन्यात न्हाती

    हेही वाचा – जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें…

    सगळे पाश मागे सोडून चिंधी निघालीय आपल्या प्रियकराला भेटायला. जणू चांदण्याचे पंख लावून त्यावर नीळेशार आभाळ पांघरून. आता त्या संसाराच्या चार भिंतींची बंधने नाहीयेत, उंबरठ्याचा अडसर नाहीये. एखाद्या मुक्त मोरणी (लांडोरी) किंबहुना आनंदाने बेधुंद होऊन नाचणार्‍या मोरासारखी ती आपल्या प्रियाशी मिलनाच्या आनंदाच्या शीतल चांदण्यात न्हातेय. विरहाचे उन्ह कधीच ओसरलेय, आता फक्त त्याच्या मिठीत लाभणारी गोड, आश्वासक शीतलता!

    अंगात माझिया भिनलाय ढोलिया

    मी भिंगर भिवरी, त्याची गो माल्हन झाली

    मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली…

    तिच्या तना-मनात, गात्रा-गात्रात तिचा साजण भिनलाय. इथे नाग्या हा ठाकरवाडीचा ढोलिया आहे. म्हणजे देवाचा प्रतिनिधी. चिंधी पूर्णपणे नाग्यामय झालीय. स्वतःचे असे काही अस्तित्वच उरलेले नाहीये. गंमत बघा, स्वतःच्या नवर्‍याला, स्वतःच्या संसाराला सोडून येण्याची प्रचंड हिंमत असलेली ही भिंगर भिवरी प्रत्यक्षात मात्र आपल्या प्रियकरासाठी सर्वस्व सोडायला निघालीय. जणूकाही त्याची सावलीच बनून गेलीय. चिंधीचं हेही एक वैशिष्ट्य आहे. प्रत्यक्षात ती अतिशय स्वतंत्र मनोवृत्तीची, बंडखोर स्वभावाची स्त्री आहे. आपल्या विचारांसाठी, आवडीनिवडीसाठी सगळ्या जगाशी झुंजण्याची ताकद तिच्यात आहे. पण ही सगळी ताकद, हे सामर्थ्य तिला तिच्या नाग्यावरच्या प्रेमाने दिलेले आहे. त्याच्या प्रेमासाठीच ती एवढी हट्टी, मनमानी करणारी झाली आणि आता त्याच्याच प्रेमामुळे ती स्वतःला विसरून त्याच्यात सामावून जाऊ पाहतेय.

    ना. धों. तुम्ही खरोखरच महान आहात! मुळात चिंधीचे हे जगावेगळे पात्र उभे करणारे गोनिदा महान. त्या चिंधीला तिचा खराखुरा चेहरा देण्यासाठी धडपडणारे जब्बार पटेल महान, तिला तिचं अस्तित्व मिळवून देणारी स्मिता महान… ‘जैत रे जैत’च्या माध्यमातून ही संगीतमय मेजवानी आपल्याला देणारे मंगेशकर कुटुंबीय महान!

    तुम्ही लेख कसा वाटला ते सांगा, मी जातोय पुन्हा एकदा झपाटून जायला…

    Avatar photo
    विशाल कुलकर्णी

    विशाल विजय कुलकर्णी राहणार - मु.पो. चिंचवड, पुणे - 33. शिक्षणाने इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, व्यवसायाने विक्री आणि विपणन (Sales & Marketing) क्षेत्रातील अनुभवी. साहित्य आणि सर्जनशील लेखन ही माझी खरी ओळख आहे. शब्दांशी असलेली नाळ जपत मी कथा, कविता, ललित लेख, सामाजिक विषयांवरील लेखन आणि वैचारिक अभिव्यक्ती अशा विविध साहित्यप्रकारांत सातत्याने लेखन करत आलो आहे. माझ्या ‘Beyond Thresholds’ या इंग्रजी पुस्तकासह ‘यलगार’ आणि ‘ओलेत्या ओळी पावसाच्या...’ ही ई-पुस्तके (अमेझॉन केडीपी) आहेत. काही वेबसाइट्स तसेच फेसबुक सारखी विविध सामाजिक माध्यमे, वृत्तपत्रे, मासिके आणि ‘ऐसी अक्षरे मेळवीन’, ‘कविता माझी सखी’, ‘माझी भटकंती’ या माझ्या वैयक्तिक ब्लॉग्सवर नियमितपणे लेखन करतो. लेखन ही केवळ आवड नसून संवाद घडवण्याचे, विचारांना दिशा देण्याचे आणि ब्रँड्सना प्रभावी शब्दांची ताकद देण्याचे माध्यम आहे, या विश्वासातून मी VKS Storycraft Media या मालकी हक्काच्या (Proprietary) संस्थेची स्थापना केली आहे. VKS Storycraft Media ही संस्था कॉपीरायटिंग, कंटेंट रायटिंग, ब्रँड स्टोरीटेलिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि व्यवसायाभिमुख आशय निर्मिती (Business Content Creation) या क्षेत्रात व्यावसायिक सेवा प्रदान करते.

    Related Posts

    एक चुटपुट लावून गेलेली मैफल…

    October 25, 2026 फिल्मी

    तारिणी सीरियल अन् मी!

    October 19, 2026 फिल्मी

    परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…

    October 18, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    एक चुटपुट लावून गेलेली मैफल…

    By विशाल कुलकर्णीOctober 25, 2026

    काही वर्षांपूर्वी एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने दिल्लीत तीन-चार दिवस मुक्कामाचा योग होता. दरवर्षी दिल्लीत हॉटेल ग्रॅंड…

    तारिणी सीरियल अन् मी!

    October 19, 2026

    परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…

    October 18, 2026

    अभिनय अन् नृत्याचा सूर्य अस्ताला गेला…

    October 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    जगावेगळी ‘चिंधी’

    November 1, 2026

    Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान

    November 1, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : येवढें एक सौभग, वळघे वाचेचें आंग

    November 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 01 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026

    मिता आवडत होती, पण…

    October 31, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 490
    • अवांतर 217
    • आरोग्य 167
    • पंचांग आणि भविष्य 657
    • फिल्मी 77
    • फूड काॅर्नर 263
    • मैत्रीण 34
    • ललित 1031
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जगावेगळी ‘चिंधी’

    November 1, 2026

    Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान

    November 1, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.