शाळेत असताना मजा असायची खूप. सायनहून दादरला ‘राजा शिवाजी विद्यालयात’ बेस्ट बसने जायचं आणि यायचं. आल्यावर दप्तर, चपला भिरकावून, कपडे बदलून कधी एकदा शाखेत पळतोय, असं व्हायचं. कधीतरी गेलं नाही, उगाच इकडे तिकडे टिवल्याबावल्या केल्या तर शिक्षक घरी येऊन सांगतील आणि मग बाबा हजामत करतील बिनपाण्याने, अशी साधार भीती वाटायची. पण कधीकधी व्हायचं असं की, आल्यावर दमल्यासारखं वाटायचं, शाखेत जायची इच्छा नाही व्हायची. अगदी मलूल झाल्यासारखं वाटायचं. चेहेरा उतरलेला असायचा. आपल्याला नेमकं काय होतंय, ते नाही कळायचं, पण काहीतरी वेगळं होतंय, हे जाणवायचं. आईला पण कळायचं, की काहीतरी बिनसलंय. काळजी वाटायची तिला आणि येऊन हलकेच कपाळावर हात ठेवायची… “अगं बाई, ताप आहे की रे अंगात,” असे उद्गार निघायचे आणि मग मी अचानक अतिमहत्त्वाची व्यक्ती बनायचो.
“आज अजिबात जायचं नाहीये खेळायला किंवा शाखेत,” अशी तंबी मिळायची आणि मला अंथरुणावर आडवं करून अंगावर चौघडीचं मऊशार आवरण यायचं. “झोप, थोड्या वेळाने जाऊया डॉक्टरांकडे,” असं म्हणून आई कामाला लागायची. ‘संध्याकाळची वेळ आहे, तिन्ही सांजेला भरल्या घरात कोणी झोपतं का?’ वगैरे डायलॉग त्या दिवसापुरते बाद असायचे. खरं सांगतो, अशी गाढ झोप लागायची, की ज्याचं नाव ते!
थोड्या वेळाने आई उठवून म्हणायची, “चला, जाऊन येऊ डॉक्टरांकडे.” घसा कोरडा पडायचा तो injectionच्या चाहुलीने. हातापायांच्या काड्या, त्यामुळं त्यातल्या त्यात मांसल भागावर म्हणजे ढुंगणावर सुई टोचली जाणार, या भीतीनेच जीव अर्धा व्हायचा. हातात काचेची बाटली घेऊन मग आमची वरात डॉक्टरांकडे.
‘आ कर’, केला. ‘जीभ (हातभर) बाहेर काढ’, काढली. विजेरीच्या उजेडात निरीक्षण व्हायचं आणि “गार काय खाल्लं होतं?” याची विचारणा व्हायची. आई असायचीच शेजारी. “गोळा खाल्ला होता काल,” कबुली द्यावीच लागायची आणि मग डॉक्टर मिश्कीलपणे हसून म्हणायचे, “घाबरू नकोस आम्ही पण खायचो शाळेत!” जीव भांड्यात पडायचा. “Injection नाहीये आज,” असं ते म्हणाल्यावर तर जोरात ओरडावंसं वाटायचं टारझनप्रमाणे… ‘हलकं खायला द्या,’ असं सांगून बाटलीत लाल औषध, त्यासोबत पिवळ्या, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या गोळ्यांच्या पुड्या आदी सामग्री घेऊन आम्ही परत यायचो.
हेही वाचा – एका केरसुणीची कहाणी…
‘जेवण झाल्यावर औषध द्या,’ अशी सूचना असायची. तोंडाची चव आधीच गेलेली असायची, पण मग आईच्या भात्यातला रामबाण बाहेर पडायचा. आजीने नुकतीच पाठवलेली ‘मेतकूट’ नामक एक चीज फडताळातून खाली उतरायची. गॅसवर एका पातेल्यात भात शिजवायला सुरुवात व्हायची. मुद्दाम आंबेमोहोर काढलेला असायचा आईने. भात शिजताना त्याचा मंद सुवास हळूहळू पसरायला लागायचा आणि तोंडाची चव गेलेली असूनसुद्धा जठराग्नी खुणावायला लागायचा. थोडासा मऊसर असा भात, त्यात सोन्यासारखं पिवळं घरचं मेतकूट आणि गायीच्या तुपाची धार… असं मिश्रण मग आई कालवायची. शेजारीच लालचुटूक, लिंबाच्या गोड लोणच्याची रसरशीत फोड असायची आणि हे नुसतं बघूनच जेवावंसं वाटायचं. इतर दिवशी कधीकधी हा भात न्याहारीला पण असायचा, पण आजाराच्या दिवशी त्याची खुमारी काही वेगळीच असायची.
“आई, भरव ना,” असा लाडीक हट्ट पण आई न कुरकुरता पुरवायची आणि तापाच्या निमित्ताने आईच्या हातानं तिनेच कालवलेलं ते नामी मिश्रण, एक एक घास असं पोटात जायचं… लिंबाच्या फोडीला जोडीस घेऊन! खूप छान वाटायचं. उदरभरण झाल्यावर मग अत्यंत कष्टाचं असं लाल औषध आणि गोळ्या घ्यायचं कडूजहर काम कसंबसं मार्गी लावलं जायचं. “झोपा आता” अशी तंबी यायची आणि तापाची ती आनंदी संध्याकाळ संपून मी निद्रादेवीच्या अधीन व्हायचो. रात्री कधीतरी मधेच आईच्या हाताचा, मायेचा स्पर्श जाणवायचा कपाळावर आणि अंगावरचं पांघरूण हलकेच नीट करून ती परत जायची.
हेही वाचा – आमचे आबा आणि त्यांची कुंभकर्णी झोप…
साधा ताप तो, सकाळपर्यंत उतरलेला असायचा, पण शाळेला दांडी अगदी ठरलेली. तापाचं कवित्व ओसरायचं एखाददोन दिवसात आणि नेहेमीची वाजंत्री सुरू व्हायची. तरीही, ‘पडू आजारी, मौज ही वाटे भारी’ ही कवी भानुदासांची कविता मी जगलेलो असायचो ते दोन दिवस! आपण सगळेच जगलेलो असतो… नक्कीच.


