अनुग्रह कानात सांगितलेला एक मंत्र! पण ती एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्याला दिलेली प्रकाशाची भेट असते. अनुग्रह देताना गुरू आपल्या अनेक वर्षांच्या तपश्चर्येचे पुण्य शिष्याच्या झोळीत टाकतात. जेव्हा गुरुमंत्र दिला जातो, तेव्हा शिष्याची सर्व पापे, त्याचे प्रारब्ध आणि त्याच्या साधनेची संपूर्ण जबाबदारी गुरू स्वतःच्या खांद्यावर घेतात. शिष्याकडून साधना नीट व्हावी, त्याच्या मार्गातील अडथळे दूर व्हावेत, यासाठी गुरू स्वतः पडद्यामागे राहून शिष्यासाठी तपश्चर्या करत असतात. अनुग्रह दिल्यावर गुरूंचे काम संपत नाही, तर ते खऱ्या अर्थाने सुरू होते. शिष्याच्या प्रत्येक नामाचा, कृतीचा हिशोब गुरूंना परमेश्वराला द्यावा लागतो.
गुरूशिष्यांच्या या अलौकिक नात्याची आणि गुरूंच्या व्याकुळतेची ही एक अतिशय भावपूर्ण कथा आहे. ही कथा आपल्याला सांगते की, जेव्हा शिष्य अडतो, तेव्हा साक्षात परमात्मा गुरूचे रूप घेऊन धावून येतो.
तपोवनात एक सिद्ध ऋषी राहत होते. त्यांचे तेज सूर्यासारखे प्रखर आणि मन गंगेसारखे पवित्र, निर्मळ होते. अनेक साधक त्यांच्याकडे भक्तीच्या मार्गदर्शनासाठी येत असत. खूपजण अनुग्रहासाठी येत असत.
एके दिवशी एक वृद्ध आजीबाई मोठ्या आशेने ऋषींकडे आल्या… वय झाले होते, शरीर तसे थकले होते, पण मनात देवाला भेटण्याची तीव्र ओढ होती. त्यांनी ऋषींना विनंती केली, “महाराज, मला असा काहीतरी मार्ग दाखवा की, ज्यामुळे माझे हे उरलेले आयुष्य सार्थकी लागेल.”
हेही वाचा – कान्होपात्रेचे समर्पण
ऋषींनी आजींची तळमळ पाहिली. स्नान केले, ईश्वराची प्रार्थना केली, आणि ईश्वराला स्मरून त्यांच्यावर अनुग्रह केला, यावेळी त्यांनी आजीबाईंना नामस्मरणासाठी एक पवित्र गुरुमंत्र दिला आणि हातामध्ये तुळशीची माळ देऊन साधनेची पद्धत समजावून सांगितली.
आजीबाई मोठ्या आनंदाने आपल्या घरी आल्या. पण काही दिवसांतच एक विचित्र अडचण निर्माण झाली. आजींनी कितीही प्रयत्न केला तरी, त्यांच्या ओठी तो मंत्र काही नीट येत नव्हता. सतत चित्त विचलित व्हायचे. कुठली तरी शंका मनाला छळत राहायची. मन कुठेतरी भलतीकडेच भटकत राहिलेय, हे जाणवायचे. माळ हातात घेतली की, मन आणखीच संशयाने भरकटायचे, जीभ जणू जड व्हायची. मंत्राचा उच्चार करणे त्यांना अशक्य होऊ लागले.
आजी पुन्हा ऋषींकडे आल्या. डोळ्यांत पाणी आणून म्हणाल्या, “महाराज, माझ्याकडून जराही नामस्मरण होत नाही. हा मंत्र माझ्या ओठी का येत नाही? मी खूप प्रयत्न करते, पण माझे मन आणि माझी जीभ मला साथ देत नाही.”
अनुग्रह देणारे ऋषी हे ऐकून हवालदिल झाले. त्यांना प्रश्न पडला की, ज्या नामाच्या बळावर जग चालते, ते नाम या माऊलीच्या मुखात का येत नाही? अशी कोणती पापे आडवी येत आहेत? आजींच्या अस्वस्थतेने ऋषींनाही ग्रासले. त्या रात्री ऋषींना झोप लागली नाही. ते रात्रभर आपल्या आराध्यासमोर, प्रभू रामासमोर करुणा भाकू लागले… “हे रामा, मी दिलेला मंत्र जर या माऊलीला घेता येत नसेल, तर माझ्या तपश्चर्येत काहीतरी उणीव आहे का? की तिचे प्रारब्ध इतके कठीण आहे?”
दुसऱ्या दिवशी ऋषी आजींना म्हणाले, “माऊली, आता तू तुझा हा प्रश्न थेट त्या प्रभू रामालाच विचार. त्यालाच सांग की, माझ्याकडून नाम का होत नाही? माझ्या साधनेत काय अडथळे आहेत? तोच तुला मार्ग दाखवेल.” ऋषींनी कशीबशी वेळ मारून नेली खरी, पण त्यांच्या मनातील अस्वस्थता काही कमी होत नव्हती. शिष्याची साधना थांबणे, हा गुरूसाठी सर्वात मोठा पराभव असतो.
ऋषींनी अन्नत्याग केला. त्यांनी ठरवले की, जोपर्यंत या आजींचे नामस्मरण आनंदाने, सुखाने, समाधानाने सुरू होत नाही, तोपर्यंत मी काहीही ग्रहण करणार नाही. ते दिवसभर आजीबाईंसाठी, आपल्या शिष्यासाठी साकडे घालत बसले. अखेर ती व्याकुळता असह्य झाली. ऋषींना वाटले की, आपण स्वतः आजींच्या घरी जाऊन पाहावे, की नेमकं काय घडतंय. ते आपल्या काही शिष्यांसह तातडीने आजींच्या निवासस्थानी पोहोचले.
ऋषींना दारात पाहून आजींच्या घरातील मंडळी चपापली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. ऋषींना वाटले की, आपल्याला पाहून यांना आनंद व्हायला हवा होता, पण हे सर्व घाबरलेले आणि गोंधळलेले का दिसत आहेत?
आजींच्या मुलाने पुढे येऊन विचारले, “ऋषीराज, आपण आताच तर जेवण करून विश्रांती घेण्यासाठी नुकतेच निघून गेलात, मग पुन्हा इतक्या लवकर, इतक्या घाईने परत येण्याचे कारण काय? काही विसरलेय का?”
हेही वाचा – चिंचेच्या पानावर देऊळ रचिले
ऋषी चक्रावून गेले. ते म्हणाले, “असं काय म्हणताय? आम्ही सगळे तर आताच आश्रमातून आजींना भेटायला आलो आहोत. मी इथे कधी आलो होतो?” असं विचारताच, घरातील लोकांनी सांगितले की, “महाराज, थोड्या वेळापूर्वीच आपण इथे आला होता. आपण आल्या आल्या थेट आजींच्या खोलीत गेलात. आजी निद्रावस्थेत होत्या, आपण त्यांना उठवून बसवलेत. आपल्या झोळीतून एक नवीन, सुगंधी वैजयंती माळ काढलीत आणि ती आजींच्या गळ्यात घातलीत. मग आपण स्वतः आजींचा हात हातात घेतलात आणि त्यांच्यासोबत मोठ्याने नामस्मरण सुरू केलेत. नंतर आजींच्या मुखातून तो मंत्र इतक्या सहजपणे बाहेर पडू लागला की, पाहता पाहता त्यांची समाधी लागली. आम्ही विनंती केली म्हणून आपण आनंदाने सुग्रास जेवण केलेत आणि आताच तर बाहेर पडलात!”
हे ऐकल्यावर ऋषींच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांच्या लक्षात आले की, आजीबाईंनी नामासाठी जी व्याकुळता दाखवली, ती व्याकुळता पाहून प्रत्यक्ष प्रभू रामच आपले रूप घेऊन इथे आले होते. शिष्याकडून नाम वदवून घेण्यासाठी देवाला स्वतः यावं लागलं.
ऋषी धावत आजींच्या खोलीत गेले. पाहतात तर काय, आजी खरोखरच समाधी अवस्थेत होत्या, त्यांच्या गळ्यात ती दिव्य वैजयंती माळ चमकत होती आणि त्यांच्या मुखातून अखंडपणे नामाचा गजर सुरू होता. ऋषींनी मनोमन प्रभू रामाचे आणि आजीबाईंचेही पाय धरले आणि कळवळून म्हणाले,
“हे रामा! काय तुझे हे चातुर्य? इकडे मी तुझ्यासाठी उपवास करत बसलो होतो, आजींची काळजी करत होतो आणि तू मात्र माझेच रूप घेऊन इथे आलास! शिवाय, माझ्या नावाने तू इथे भरपेट सुग्रास जेवलास ना? अरे, किमान एवढे तरी लक्षात ठेवायचे होते की, तुझा हा भक्त उपवास करतो आहे! मी येण्याआधी निघून जायचेच होते, तर किमान उपवासाचे तरी काहीतरी खाऊन जायचे, माझा उपवास कशाला मोडायचास?”
ऋषींचे ते शब्द ऐकून तिथले वातावरण भक्तीने ओथंबून गेले. गुरूंच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्यांना जाणीव झाली की, जेव्हा गुरू आपल्या शिष्यासाठी स्वतःला पणाला लावतात, तेव्हा परमेश्वरही त्यांचा ऋणी होतो. गुरूबळ हेच शिष्याचे खरे बळ असते.
शिष्यस्य भारं गुरुदेव कर्षति
तपस्विनः स्वां तपसा ददाति।
यदा निरुद्धं भवति हि नाम
स्वयं विधाता गुरुवद् विभाति ॥1॥
– गीताव्रत
जेव्हा शिष्याचे नाम थांबते, तेव्हा गुरू आपली तपश्चर्या खर्च करून त्याचा भार उचलतात. शिष्याच्या कल्याणासाठी प्रसंगी विधाताही गुरूचे रूप घेऊन धावून येतो.
अनुग्रहः केवलं मन्त्रो न भवति
हृदयस्य स्पन्दनं गुरुशिष्ययोः।
यत्र कारुण्यं तत्र परमात्मा
सत्यं वदामि गीताव्रत रूपतः ।।
– गीताव्रत
अनुग्रह म्हणजे केवळ मंत्र नसून, तो गुरू आणि शिष्याच्या हृदयाचे एकच स्पंदन असतो. जिथे करुणा असते, तिथेच परमात्मा निवास करतो.
गुरुबळमहो दिव्यं
शिष्योद्धारकारकम्।
भक्तिप्रवाहे विमले
मज्जनं कुरु सर्वदा ॥
– गीताव्रत
गुरूंचे बळ हे शिष्याचा उद्धार करणारे असते. या निर्मळ भक्तीच्या प्रवाहात स्वतःला झोकून द्यावे, तिथेच सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात.
हेही वाचा – हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन
गुरूमंत्र सिद्ध होण्यासाठी शिष्याची श्रद्धा आणि गुरूंची व्याकुळता या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. अनुग्रह म्हणजे गुरूंच्या काळजाचा तुकडा शिष्याला मिळणे होय. गुरू आपल्या शिष्याला कधीही अर्ध्या वाटेत सोडत नाहीत. जर शिष्याची पापे आडवी येत असतील, तर गुरू स्वतःच्या तपश्चर्येने ती पापे जाळून टाकतात आणि शिष्याचा मार्ग मोकळा करतात.
आपल्याही जीवनात जेव्हा नामाचा अडथळा येईल, तेव्हा समजावे की आपले गुरू आपल्यासाठी कुठे तरी तप करत आहेत. आपण फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवून नामाचा प्रयत्न करत राहायचे, बाकी सर्व जबाबदारी त्या सद्गुरूंची असते.


