अध्याय चौदावा
मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः । सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते ॥25॥
ईश्वरबुद्धी पूजिला । कां चोरु म्हणोनि गांजिला । वृषगजीं वेढिला । केला रावो ॥362॥ कां सुहृद पासीं आले । अथवा वैरी वरपडे जाले । परी नेणें राती पाहालें । तेज जेवीं ॥363॥ साहीं ऋतु येतां आकाशें । लिंपिजेचि ना जैसें । तेवीं वैशम्य मानसें । जाणिजेना ॥364॥ आणीकही एकु पाहीं । आचारु तयाचां ठायीं । तरी व्यापारासि नाहीं । जालें दिसे ॥365॥ सर्वांरंभा उटकलें । प्रवृत्तीचें तेथ मावळे । जळती गा कर्मफळें । ते तो आगी ॥366॥ दृष्टादृष्टाचेनि नांवें । भावोचि जीवीं नुगवें । सेवी जें स्वभावें । पैठें होये ॥367॥ सुखे ना शिणे । पाषाणु कां जेणें मानें । तैसी सांडीमांडी मनें । वर्जिली असे ॥368॥ आतां किती हाचि विस्तारु । जाणें ऐसा आचारु । तया तोचि साचारु । गुणातीतु ॥369॥ गुणांतें अतिक्रमणें । घडे उपायें जेणें । तो आतां आणिकु आईक म्हणे । श्रीकृष्णनाथु ॥370॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : येवढे गा प्रतीती, तो देहा आलासे वस्ती
अर्थ
मान व अपमान समान मानणारा, मित्र व शत्रु दोन्ही समान (बुद्धी ठेवणारा), सर्व (प्रकृति सर्व करते अशा बोधावर आल्यामुळे बर्यावाईट कोणत्याही) कर्मांचा आरंभ न करणे हे ज्याचे शील, असा जो असतो त्याला गुणातीत म्हणतात. ॥25॥
तो ईश्वर आहे, या बुद्धीने त्याची पूजा केली अथवा तो चोर आहे, म्हणून त्यास छळले, तो बैल व हत्ती यांनी वेढला गेला (अथवा) त्याला राजा केला ॥362॥ अथवा मित्र जवळ आले, अथवा शत्रु अंगावर प्राप्त झाले, तरी पण ज्याप्रमाणे सूर्य हा रात्र व उजाडले जाणत नाही, त्याप्रमाणे तो ते जाणत नाही. ॥363॥ आकाशामध्ये जरी सहा ऋतु येतात, तरी आकाश जसे त्यांच्याकडून लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो मनाने भेदभाव जाणत नाही. ॥364॥ आणखी एक आचार त्याच्या ठिकाणी आहे, पहा. तो हाच की त्याच्या ठिकाणी कर्ममात्राचा अभाव झालेला दिसतो. ॥365॥ सर्व कर्मारंभ त्याच्यापासून दूर होतात, प्रकृतीचे त्याच्या ठिकाणी मावळणे असते (संसाराची त्याच्या ठिकाणी वार्ताही नसते). अथवा (ज्या अग्नीत) कर्मफळे जळतात, तो अग्नि तो गुणातीत पुरुष आहे. ॥366॥ आपल्याला इहलोकीचे अथवा परलोकीचे भोग मिळावेत, अशी इच्छाच त्याच्या अंत:करणात उत्पन्न होत नाही. प्रारब्धाने जे सहज प्राप्त होईल, त्याचे सेवन करून तो असतो. ॥367॥ ज्याप्रमाणे दगड सुखावत नाही व दु:खही पावत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनाने त्याग (अमूक एक कर्म करावयाचे नाही) व स्वीकार (अमूक एक कर्म करावयाचे) टाकलेला असतो. ॥368॥ आता ह्या बोलण्याचा किती विस्तार करावा? ज्या पुरुषाचे असे आचरण असेल तोच खरोखर गुणातीत आहे, असे समज. ॥369॥ ज्या उपायांनी गुणांचे उल्लंघन करता येते, तो प्रकार आता यापुढे ऐक. असे श्रीकृष्ण म्हणाले. ॥370॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : रात्रि तैसें पाहलें, हें धारणा जेवीं एक जालें


