अध्याय चौदावा
समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः । तुल्यप्रियाप्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः ॥24॥
तरी वस्त्रासि पाठीं पोटीं । नाहीं सुतावांचूनि किरीटी । ऐसें सुये दिठी । चराचर मद्रूपें ॥349॥ म्हणोनि सुखदुःखासरिसें । कांटाळें आचरे ऐसें । रिपुभक्तां जैसें । हरीचें देणें ॥350॥ एऱ्हवीं तरी सहजें । सुखदुःख तैंचि सेविजे । देहजळीं होईजे । मासोळी जैं ॥351॥ आतां तें तंव तेणें सांडिलें । आहे स्वस्वरूपेंसीचि मांडिलें । सस्यांतीं निवडिलें । बीज जैसें ॥352॥ कां वोघ सांडूनि गांग । रिघोनि समुद्राचें आंग । निस्तरली लगबग । खळाळाची ॥353॥ तेवीं आपणपांचि जया । वस्ती जाली गा धनंजया । तया देहीं आपसया । सुख तैसें दुःख ॥354॥ रात्रि तैसें पाहलें । हें धारणा जेवीं एक जालें । आत्माराम देहींआतलें । द्वंद्व तैसें ॥355॥ पैं निद्रिताचेनि आंगेंशीं । सापु तैशी उर्वशी । तेवीं स्वरूपस्था सरिशीं । देहीं द्वंद्वें ॥356॥ म्हणोनि तयाचां ठायीं । शेणा सोनया विशेष नाहीं । रत्ना गुंडेया कांहीं । नेणिजे भेदु ॥357॥ घरा येवों पां स्वर्ग । कां वरिपडो वाघ । परी आत्मबुद्धीसि भंग । कदा नव्हे ॥358॥ निवटलें न उपवढे । जळीनलें न विरूढे । साम्यबुद्धी न मोडे । तयापरी ॥359॥ हा ब्रह्मा ऐसेनि स्तविजो । कां नीच म्हणोनि निंदिजो । परी नेणें जळों विझों । राखोंडी जैसी ॥360॥ तैसी निंदा आणि स्तुती । नये कोण्हेचि व्यक्ती । नाहीं अंधारें कां वाती । सूर्याघरीं ॥361॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मोहाचां अवसरीं, ज्ञानाची चाड न धरी
अर्थ
सुखदु:खांच्या ठिकाणी समान (दृष्टी ठेवणारा) स्वस्वरूपी स्थित मातीचे ढेकूळ, दगड व सोने ही सारखीच समजणारा, प्रिय अथवा अप्रिय दोन्ही समान मानणारा, ज्याची आत्मबुद्धी अभंग आहे असा, स्वत:ची निंदा किंवा स्तुति समान मानणारा ॥24॥
तर अर्जुना, वस्त्राच्या आतबाहेर जसे सुताशिवाय काही नसते त्याप्रमाणे हे चराचर सर्व विश्व मद्रूप आहे असे तो पाहतो. ॥349॥ म्हणून ज्याप्रमाणे देवाचे देणे भक्तांना व शत्रूंना सारखे असते, तसे तो सुखदु:खाला सारख्या ताजव्यात घालून (सारखे मानून) वागतो. ॥350॥ एऱ्हवी देहरूपी जळामध्ये जेव्हा मासोळी होऊन राहावे (पूर्णा देहतादात्म्य घ्यावे) तेव्हाच सुखदु:ख भोगावे लागते. ॥351॥ ज्याप्रमाणे मळणी झाल्यावर दाणे हे कोंड्यापासून वेगळे काढावे, त्याप्रमाणे आता त्याने ते देहतादात्म्य टाकले आहे व तो आपल्या आत्मस्वरूपाने स्थिर राहिला आहे. ॥352॥ अथवा गंगेच्या पाण्याने गंगेच्या पात्राला सोडून आणि समुद्राच्या पात्रात प्रवेश करून आपली खळखळ वाहाण्याची लगबग नाहीशी केली ॥353॥ अर्जुना, त्याप्रमाणे ज्याची वस्ती आपल्या ठिकाणी (आत्मस्वरूपी) झाली, त्याला सहजच, देहामधे जसे सुख, तसेच दु:ख असते. ॥354॥ जशी रात्र तसेच उजाडणे, हे खांबाला जसे (एकसारखे) असते, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालेल्या गुणातीतास देहाला व्यापून असणारी (सुखदु:खादि) द्वंद्वे आहेत. ॥355॥ ज्याप्रमाणे निजलेल्या पुरुषाच्या शेजारी जसा साप तशीच उर्वशी (समान असतात) त्याप्रमाणे आत्मस्वरूपी ज्याची वस्ती झाली आहे, त्यास देहात द्वंद्वे सारखी आहेत. ॥356॥ म्हणून त्याच्या ठिकाणी शेण व सोने यात कमीअधिकपणा नाही व रत्न आणि दगड यामध्ये त्यास काही फरक वाटत नाही. ॥357॥ स्वर्ग (त्याच्या) घरी येवो अथवा त्याच्या अंगावर वाघ उडी घालो, परंतु त्याच्या आत्मबुद्धीला केव्हाही भंग होत नाही. ॥358॥ ज्याप्रमाणे मेलेला मनुष्य जागा होत नाही, अथवा जळलेल्या बीजाला अंकुर फुटत नाही, त्याप्रमाणे त्याची आत्मैक्यबुद्धी मोडत नाही. ॥359॥ ‘हा ब्रह्मदेव आहे’ असे म्हणून त्याची स्तुती केली अथवा ‘नीच’ म्हणून त्याची निंदा केली पण राख जशी जाळणे अथवा विझणे जाणत नाही ॥360॥ त्याप्रमाणे निंदा अथवा स्तुती ही (खेद आणि संतोष अशा) कोणत्याच रूपाने व्यक्त होत नाहीत. सूर्याच्या घरी अंधार व उजेड ही कल्पना नाही, तशी त्याच्या ठिकाणी सुखदु:खाची कल्पना नाही. ॥361॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : येवढे गा प्रतीती, तो देहा आलासे वस्ती


