|| श्री स्वामी समर्थ ||
अष्टम भाव किंवा अष्टमेश ग्रह म्हटले की, आपल्या चेहऱ्यावर आणि मनात एक अनामिक भीती दाटून येते. आता अष्टम भावाची दशा आहे का…? म्हणजे झाले संपलेच आता, अशा विविध प्रतिक्रिया समोर येतात आणि त्यानुसार प्रश्न देखील. पण खरंच तसे आहे का? आज याच अष्टम भावाचा ऊहापोह करूया.
पत्रिकेतील कुठलाही भाव, ग्रह, नक्षत्र हे मानवी कल्याणासाठी आहेत, ते आपले भलेच करणार! हा विश्वास ठेवला पाहिजे. अर्धवट वाचन, ज्ञान यामुळे आपण अनेकदा चुकीचा विचार आणि निष्कर्ष काढतो, अर्थात त्याला जबाबदार कोण, तर आपण स्वतः. असो.
हा मोक्ष त्रिकोणातील महत्त्वाचा भाव. ज्याला आयु भाव सुद्धा म्हटले जाते. इथे कालपुरुषाच्या कुंडलीतील वृश्चिक राशी येते. 6, 8, 12 हे भाव संपूर्णतः वाईट नाहीत, हे लक्षात घ्या. प्रत्येक भाव आणि ग्रह पूर्णतः चांगली किंवा वाईट फळे कधीही देत नाही. संशोधन करणारा, गूढ विद्येमध्ये प्रगती करवणारा, समाधी सुखाचा अनुभव देणारा हा अष्टम भाव वाईट कसा असू शकतो? लग्नेश अष्टम भावात म्हणून वाईट फलित देणार नाही. त्रिकोणाचे स्वामी अष्टम भावात वाईट फळणार नाहीत. अष्टम भाव मंत्रसिद्धी देणारा आहे. प्रत्येक भावाचा अत्यंत सखोल अभ्यास, त्या त्या भावाचा वेगवेगळा अविष्कार आपल्यासमोर आणेल.
अष्टम भाव हा पैतृक संपत्ती, विमा, आयुमर्यादा, रिसर्च, संशोधन, मेडिटेशन, ध्यान, जोडीदाराचे धनस्थान असल्यामुळे आपली सासुरवाडी… अशा अनेकविध गोष्टी दर्शवतो. अष्टम भावातील ग्रह नसल्यास, अष्टमेश कुठे आहे ते बघितले तर, या प्रश्नांची उकल होईल. आत्म्याचा कारक रवी जो राजा आहे, त्याचे वागणे, राहणे राजासामान असताना तो अष्टम भाव आपलास कसा करणार? तसेच, इथे तिथे सतत हुंदडणारा चंद्रसुद्धा अष्टमात मोकळा-ढाकळा कसा वागू शकेल? त्याची फळे इथे शुभ कशी बरे मिळतील?
हेही वाचा – नवमांश आणि विवाह
चतुर्थ भाव हा मोक्ष त्रिकोणाची सुरुवात आहे, हे अभ्यासकांना माहिती आहेच. चतुर्थ भाव हा आपला सुखभाव किंवा सुखस्थान, म्हणजे आपले घर आणि आपले मन. मोक्षाकडे जायचे असेल तर, सर्वात आधी सुरुवात घरापासून केली पाहिजे. जो संसारातून विरक्त होईल प्रपंचात असूनही प्रपंचात नसेल, अशी तन-मनाची वृत्ती धारणा होईल, तेव्हाच तो मोक्षाकडे खऱ्या अर्थाने वाटचाल करू शकेल.
म्हटले आहेच की, 50 नंतर एकावन्न, बावन्न म्हणजे वानप्रस्थाश्रम… तेव्हा मुलांच्या संसारात बोलायचेच नाही आणि विचारल्याशिवाय सल्ले द्यायचे नाहीत. आयुष्यभर आपण आपला संसार केला आणि संसार करण्यास त्यांच्यावर उत्तम संस्कार केले, आता त्यांचा त्यांना संसार करू देत. पटतंय का?
तेव्हा चतुर्थ भाव हा अष्टम भावाला हातभार लावणारा आहे. ऐहिक भौतिक सुखापासून विरक्त होणे, ही अध्यात्माकडे ओढ लागल्याची खूण समजावी. इच्छा हळूहळू कमी होत जातात आणि योग, साधना, नामस्मरण यात मन गुंतायला लागते. ही अवस्था प्राप्त होते, म्हणजेच गुरू तत्वाशी आपले सूत जमले, असे समजायला हरकत नाही. जेव्हा कसली आसक्ती उरत नाही, माणसात असून नसल्यासारखे वाटते, तेव्हा अध्यात्माची प्रथम पायरी चढता येते.
मोक्षाकडे जाण्याचे अनेक मार्ग अष्टम भाव दाखवतो. मेडिटेशन, ध्यान, समाधी अवस्था म्हणजे गुरू तत्वाशी एकरूप होणे… या भावातील ग्रह आणि अष्टम भावातील राशीचा अधिपती यांचा विचार करायला हवा. त्यातून आपल्या अध्यात्माच्या पायऱ्यांवरचा प्रवास कसा असणार, ते समजेल. हे स्थान अपघात, सर्जरी सुद्धा दाखावते; म्हणून या भावातील ग्रहांचा आणि ते ज्या नक्षत्रात आहेत त्यांचा अभ्यास करावा लागतो. उगीचच अष्टम भावाची दशा आली की, आता माझा अपघात होईल, असे गृहीत धरणे धोक्याचे ठरेल.
चंद्रासारखा भटकंती करणारा ग्रह इथे खूश राहणार नाही. मनाचे संतुलन तितक्या सहजासहजी होणे कठीण होईल. मनाची एकाग्रता एकदम होणार नाही. मनावर ताबा मिळवण्यासाठी त्यांनी प्राणायाम करावे. मंगळासारखा तामसी ताकदीचा ग्रह इथे इंद्रियावर ताबा सहज मिळवून देणार नाही. या व्यक्तींनी व्यायाम करावा, म्हणजे ही एनर्जी तिथे वापरली जाते. नियमित साधना, एकाग्रता, एका जागी बसून पारायण करणे, या गोष्टी येथील गुरूच देऊ शकतो. मंत्रसाधना देणारा शुक्र असेल, तर मंत्राच्या माध्यमातून मोक्षप्राप्ती होईल.
हेही वाचा – पत्रिकेतील ग्रह आणि वास्तू
शनी असेल तर, सहनशीलता आहे… संयम आहे. मेडिटेशन, सातत्य ठेवून नाम घेणे, ठरलेल्या वेळी ठरलेली साधना येथे करता येयील. राहू कुठल्याही विषयाचा गूढ अभ्यास उत्तम करवून घेतो, उत्तम साधक होऊ शकतो. राहू, केतू साधकांसाठी उत्तमच. नेपच्युन आपल्या अंतर्मनाचा ठाव घेणारा आहे त्याची ओढ मानस पुजेकडे अधिक जाईल. हर्शल हा रिसर्च करवेल, आपल्या संशोधनात समर्पित करणारा आहे.
अष्टम भाव हा सखोल अभ्यास करण्याचा विषय आहे. वरवर दिसणारी गोष्ट तशीच असेल असे नाही. ग्रह राशी, एकापेक्षा अधिक ग्रह आणि त्यांचा लग्नेशाशी असलेले योग तसेच नवमांश या सर्वांचा एकत्रित सारासार विचार करून आपण ईश्वरी तत्वाकडे कुठल्या मार्गाने जाता येयील हे समजू शकेल.
मुळातच आपली पाळेमुळे ही अध्यात्माशीच जोडली गेली आहेत आणि म्हणूनच मोक्ष मिळवण्याची धडपड आपल्या प्रत्येकात असतेच असते. आयुष्यभर प्रपंच करताना काही प्रमाणत केलेल्या परमार्थाची शिदोरी आयुष्याची अखेरी उपयोगात येतेच येते. अध्यात्माच्या मार्गातून आपल्याला गुरुतत्वाशी जोडणारा हा अष्टम भाव आहे, हे समजण्यासाठी हे लेखन प्रपंच.


