देवीचा नवरात्रौत्सव आला आला म्हणता म्हणता संपला सुद्धा… दिवस कसे भुर्रकन उडून गेले. किती तयारी आणि गडबड चालली होती… माती आणायची, सप्त धान्य पेरायचं आणि मग ती वर उगवून आलेली हिरवीगार लुसलुशीत पात… त्याचा अलवार स्पर्श… तो सुंदर असा सृजनाचा सोहळा डोळे भरून पाहायचा… घट बसवायचे… कडकण्या करायच्या… रोज एक माळ अर्पण करायची… श्री सूक्ताची सोळा आर्वतनं… सप्तशतीचा पाठ… घागरा घालून केलेला गरबा… भोंडल्याची गाणी म्हणत धरलेला फेर… नंतर खिरापतींची मजा… भजनाचे कार्यक्रम… त्यात गोंधळ, जागरण हवेच… कुंकूम् आर्चन, सवाष्णींच्या ओट्या… कुमारीपूजन… रोज रंगीबेरंगी जरीच्या साड्या, दागिने… बाहेर जाणं… सर्वांना भेटणं, गप्पा… टाळ घेऊन आरत्या म्हणायच्या… घरी गोंधळी बोलवायचा… डफ तुणतुण्यावर म्हटलेली देवीची गाणी ऐकायची.. निरनिराळे उपवासाचे पदार्थ… आरास, रांगोळ्या… नऊ दिवस रोज देवी दर्शनाला जायची गडबड… नवरात्रीची सांगता, देवीला पुरणावरणाचा नैवेध दाखवून…!
कसं भारल्यासारखंच वातावरण असतं नाही का? दसरा झाला आणि आज बघ… सगळं कसं शांत शांत झालं.
अगं लक्षात घे…
नवरात्रीपुरतीच देवी आई आली होती का? ती जगत् जननी आहे, ती इथेच असते! प्रतीकात्मक रूपात इथल्या अनेक देवळांत आपली वाट बघत उभीच असते… आपण त्या सणांपुरते, त्या दिवसांपुरते जातो तिच्याकडे… गर्दीत, गोंधळात, हारा-फुलांच्या राशीत… एक मिनिट गडबडीत आईला बघतो…
आता एक कर… शांतपणे उद्या परवा जा तिच्याकडे… देऊळ रिकामं असेल. कुठलाही भपका नसेल. आई तिच्या नेहमीच्या रूपात समोर दिसेल. मग शांतपणे बसावं तिच्यासमोर. इतर वेळेस पण भेटावं गं देवी आईला… नवरात्र नसताना सुद्धा! सहज आठवण आली म्हणून अचानक पण जावं… किती बरं वाटेल तिला… आणि आपल्यालाही!
हेही वाचा – नवरात्री… आत्मिक शक्ती जागृत करण्याचे पर्व
मध्यंतरी फोनवर आई पण हेच म्हणत होती…
“सवड काढून येत जा बाळा… बघावंस वाटतं तुला!”
वाट बघणाऱ्या आई, आजी, मावशी, काकू आहेत, तोपर्यंत भेटत जा त्यांना… खूप वेळा असं होतं की, आपण आपल्याच विश्वात दंग राहतो. आईला तर गृहीतच धरतो! आपल्या वाढत्या पसाऱ्यात, संसारात, नोकरी करण्यात, अनेक उद्योगात, अगदी मित्र-मैत्रिणींमध्ये सुद्धा हरवून जातो. काही वेळेस घरी जाऊनही आईशी निवांत बोलणं होतंच, असं नाही… खरंच, मनात याचा शांतपणे विचार करा…
हेही वाचा – गौरीमायला निरोप…
आईची तर तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही. तिला स्वतःसाठी काहीही नको आहे. तुमचे दोन हात गळ्यात पडले आणि तिच्या मिठीत सामावलं की, ती तृप्त असते… स्पर्शाचं सुख वेगळंच असतं… आईला ती जवळीक मनातून फार सुखावते… तिचा आशीर्वादाचा हात तुमच्या पाठीवरून फिरू दे. मनातल्या सुखदुःखाच्या गोष्टी तिला बोलायच्या असतात…
आता आईला लेकीकडून फक्त एवढच तर हवं असतं… सुखी लेकीला डोळे भरून बघावं, हेच तिचं मागणं आहे. आठवणीनं तुमच्या आईला आणि वडिलांनाही भेटायला जाऊन या. बापाची माया आतल्या आत असते, ती वर दिसत नाही. मनानेच ओळखून घ्या!
नाहीतरी देव अजून वेगळा कुठे असतो गं? त्याला इथे तिथे हुडकत बसू नका… आता कुठे आणि कशात देव, देवी पाहायची, हेही लक्षात घ्या…
बाकी तुम्ही सुज्ञ आहातच!


