टाकी अर्धीच भरली
” भाऊ, आमच्याकडचे पाणी संपले. जरा तुमचे बोरिंग चालू करता का? मी माझ्याकडची नळी लावून थोडी टाकी भरून घेतो.”
दहा मिनिटांनी…
“भाऊ, अजून तर टाकी अर्धीच भरली आणि तुम्ही बोरिंग बंद केली.”
“दादा, मी तुम्हाला वापरण्यासाठी पाणी देत होतो. तुम्ही तर त्या पाण्याने पोर्च धुतला, तुमची गाडी धुतली. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई असताना असे पाणी वाया घालवणे, मला चालत नाही. तुम्हाला राग आला तरी चालेल.”
0000
प्रेम
“हॅलो वहिनी, या सुट्टीत मी आणि मुले येणार होतो ना? ते कॅन्सल केले.”
“का हो वन्स? तुम्ही आणि मुलं दरवर्षी येतात. छान धमाल येते. यावर्षी काय झाले? आमच्यकडून काही चूक झाली का?”
“काहीही काय वहिनी! पण गावाकडच्या बातम्या येतात इकडे… खूप पाणीटंचाई आहे तिकडे. मिळणाऱ्या पाण्यात तुमचेच भागत नाही, तर आमच्या तीन जणांची अजून कशाला भर? पुढच्या वर्षी नक्की येऊ… आणि एक वर्ष न येण्याने आपल्यातले प्रेम थोडे कमी होणार?”
हेही वाचा – असेही काही तर्काच्या पलीकडचे!
0000
जल पुनर्भरण
“हॅलो, नमस्कार बाबा. तुम्ही सारखे बोलवत आहात ना? अधिक महिन्याचे या जावईबापू… तर या शनिवार, रविवार येतो आम्ही दोघे. ”
“जरूर जरूर. आम्ही वाट पाहू.”
“बरं… ते अधिक महिन्याचे काय देणार?”
“रितीप्रमाणे सगळे! 33 अनारसे… तुमच्यासाठी शर्ट, पॅन्ट… पोरीसाठी साडी… चांदीची थाळी…”
“बस्स एवढेच.”
“अजून काही लागत असेल तर सांगा जावईबापू… नक्की व्यवस्था करू?”
“ठीक आहे. आम्ही दोघे येतो, पण तुम्ही जे देतायेत त्यातले काहीच नको. आम्हाला फक्त एक आमरसपुरीचे जेवण द्या आणि अनारसे स्टीलच्या डब्यात द्या. जेवढे पैसे माझ्या मानपानावर खर्च करणार ते बाजूला ठेवा… आपली बोरिंग चालू आहे?”
“हो. पण आता उन्हाळ्यात पाणी कमी झाले आहे.”
“मी येताना माझ्या एका मित्राला घेऊन येतो. तो जल पुनर्भरणाचे काम करतो. यावर्षी ते करून टाकू. म्हणजे दर उन्हाळ्यात पाण्याचा जो त्रास होतो, तो कमी होईल. चालेल ना?”
“चालेल काय पळेल…”
हेही वाचा – दारू सोडली… कायमची!
0000
वॉशिंग मशीन
“अगं शांता… एक विचारायचं होतं?
“बोला ना ताई. काही जास्तीचे काम करून द्यायचे आहे का? कोणी पाहुणेराऊणे येणार आहेत का? ”
” नाही गं. तू आमच्याकडे भांडी घासायला येतेच, धुणे धुवायला पण येशील? तुझे जे काही पैसे ते मी देऊन टाकेन.”
“येईन की ताई… त्यात काय? पण तुम्ही तर वॉशिंग मशीन लावतात ना?”
“हो. पण यावर्षी पाणीटंचाई आहे ना. मशीन लावले के खूप पाणी वापरले जाते आणि बरेचदा आवश्यकता नसताना जास्तीचे कपडे टाकले जातात. तू कामाला येशील, तर मोजकेच कपडे धुवायला टाकू… आणि पाणीही जपून वापरता येईल.”
0000


