ती नुकतीच अनाथाश्रमात सेविका म्हणून रुजू झाली होती. आश्रमाच्या दारात आली, तेव्हा ती अतिशय अशक्त दिसत होती. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. मॅडमना तिची दया आली आणि त्यांनी तिला आश्रमात ठेवून घेतले. तसेही, शेवटी तो अनाथाश्रमच होता. दर चार दिवसांनी दाराजवळ ठेवलेल्या पाळण्यात कोणीतरी नुकतेच जन्मलेले मूल ठेवून जातच असे. आश्रमात मुलांची नव्हे, तर सेवकवर्गाची कमतरता होती. चार दिवसांपूर्वीच कोणीतरी एक नुकतीच जन्मलेली मुलगी ठेवून गेले होते, आणि आता ही आली.
दुसऱ्या दिवसापासूनच तिने सर्व बाळांचा ताबा घेतला. त्यांचे खाणे, आंघोळ, औषधपाणी, सगळ्याची ती मनापासून काळजी घेऊ लागली. विशेषतः, तिच्या आधी दोन दिवसांपूर्वी पाळण्यात सापडलेल्या मुलीकडे तिचे जास्त लक्ष असे. कदाचित, दोघीही तिथे नवख्या असल्यामुळे असेल…. त्या छोटीलाही तिचा लळा लागलेला स्पष्ट दिसत होता. ती तिच्याशिवाय राहतच नसे.
दोन वर्षे कशी सरली, ते तिला कळलेच नाही. ती छोटीला फारच जपत असे. एखादे सधन दाम्पत्य मूल दत्तक घ्यायला आले की, ती तिला लपवून ठेवी आणि बाकीच्या मुलांना पुढे करी. हे कोणाच्या लक्षात आले नाही, कारण मुलांची संख्या आणि दत्तक घ्यायला येणारी कुटुंबे यांचा मेळ बसत होता. कोणी ना कोणी दत्तक जातच होते.
हेही वाचा – टिपिकल
एकेदिवशी ती बाजारहाट करायला गेली आणि नेमकी तीच वेळ साधली गेली. आश्रमात आली, तेव्हा तिला कळले की, आज दत्तक म्हणून छोटीचा नंबर लागला होता. ती हादरली. छोटी निघून जाईल, याचा ती विचारही करू शकत नव्हती. दोन दिवस ती आपल्या खोलीत सुन्न होऊन बसून राहिली. आश्रमाच्या नियमानुसार कोणी दत्तक घेतले, हे सांगण्याची परवानगी नव्हती. शेवटी, मनात काहीतरी निश्चय करून ती उठली. एके दिवशी कोणाचे लक्ष नसताना ती ऑफिसमध्ये शिरली आणि त्यांचा पत्ता शोधून काढला.
दुसऱ्या दिवशी यात्रेला जाण्याचे निमित्त काढून ती आश्रमाबाहेर पडली आणि त्या पत्त्यावर पोहोचली. पत्ता दुसऱ्या शहरातला असल्यामुळे शोधायला वेळ लागला, पण शेवटी तो सापडला. एक छान, एकमजली छोटा बंगला होता तो. ती धडधडत्या अंतःकरणाने आत शिरली. समोर एक तरुण पेपर वाचत बसला होता. तिला अचानक समोर पाहून तो हादरला, आणि तिनेही तोंडावर हात ठेवून येणारी किंकाळी दाबून धरली.
“तू…!!” आश्चर्याने तो ओरडला.
“तुम्ही…!!” तीही आश्चर्यचकित होऊन म्हणाली.
हेही वाचा – गोष्ट दोन प्रवाशांची…
“तू परत माझ्या आयुष्यात येशील, असे वाटले नव्हते. आपल्यात जे काही झाले, ती फक्त मजा होती. तुझ्यापासून मूल होणे मला कधीच मान्य नव्हते. मी आता सुखी आहे. बायकोची प्रचंड इस्टेट आहे, तिचा पूर्ण उपभोग घेतोय मी. आम्हाला एक मुलगीही झाली आहे. तू इथून निघून जा,” तो चिडून म्हणाला.
काही न बोलता ती वळली. दारात जाताच ती हळूच हसली. छोटीचे परिचित रडणे तिला तिथपर्यंत ऐकू येत होते. शेवटी तिच्या मुलीला तिचे घर मिळाले होते.


