दोन-अडीच वर्षांनंतर ललिताचं कुटुंब घराबाहेर पडलं होतं. तसं पाहिल्यास, कोरोना महामारी काळात घरातील तरुणाई आवश्यक ती खबरदारी घेऊन अधेमधे जवळपास जाऊन आली होती. पण त्या दिवशी घरातील तीन पिढ्या बाहेर पडल्या होत्या. वडिलोपार्जित घराला भेट देण्याची ललिताची आणि बाबांची इच्छा होती, ती पूर्ण झाली.
संध्याकाळी निवांतपणे अंगणात बसले असताना घरासमोर पसरलेल्या रिकाम्या जागेकडे पाहात बाबा आपल्या डॉक्टर मुलगा आणि सुनेला म्हणाले, “हॉस्पिटल काढायची तुमची इच्छा आहे ना? इथे काढा!”
ललिता म्हणाली, “शाळा, कॉलेज पण काढता येईल बरं का! प्राथमिकपासून सुरुवात करायची; दरवर्षी एक एक इयत्ता वाढवत जायची!”
“दोन्ही कल्पना चांगल्या आहेत…” सून अनूने अनुमोदन दिलं.
अनूला कल्पना पसंत पडल्यावर ललिताचा उत्साह मध्य रेल्वेच्या डब्यासारखा गचागच भरून वाहायला लागला…
“जे काही काढाल ना त्याला नाव आमचं दे! म्हणजे कसं असतं… कोकिलाबेन हॉस्पिटल, सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल, श्रीपतराव कदम कॉलेज… मुलं आपल्या आई-वडिलांचं नाव देतात की नाही वास्तूला, तसंच! ललितादेवी हायस्कूल…!” ललिता म्हणाली.
ललिताचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत नातू म्हणाला, “…आणि ‘बाबादेव कॉलेज’ असंच ना!”
हेही वाचा – पित्याचा निर्णय!
त्याच्या ‘बाबादेव’मुळे हसण्याची ढगफुटीच झाली. पण तो मात्र गंभीर होता. त्याच्या मनात खळबळ चालली होती… “असं काही नसतं हं… आपलं स्वत:चं नाव पण देतात. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, संजय घोडावत इंडस्ट्रीज… असे कितीतरी आहेत. आई-वडिलांचं नाव न देता स्वत:चं दिलंय! आपणही अनूदेवी हॉस्पिटल काढू शकतो की!”
ललिताला मनातून खूप हसू येत होतं. आजी-आजोबा त्याचे पण लाडकेच होते, पण गंमतीत का होईना, त्यांच्या नावाची वास्तू असणार आणि आपल्या आईपापांच्या नावाची मात्र नाही, ही वस्तुस्थिती त्याला नाराज करीत होती.
ललिता गंभीरपणाचा आव आणून मिस्कीलपणे म्हणाली, “हे बघ असंच असतं! मुलांनी आई-वडिलांच्या नावाच्या वास्तू उभारायच्या असतात. तुझे पापा आमचं नाव देणार… तुझ्या आई-पापांच्या नावाच्या वास्तू तू उभारायच्या…”
छोटू आणखीनच गंभीर झाला. “सगळ्या शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल तुमच्या नावाचं झाल्यावर माझ्यासाठी काय उरलं? हां, मी असं करतो मी पापादेव बार आणि आईदेवी डिस्कोथेक काढतो.”
आता मात्र प्रतिक्रिया संमिश्र झाली होती. ललिता कावरीबावरी झाली. त्याच्या आई-पापाची प्रतिक्रिया कशी असेल; मस्करीची कुस्करी तर नाही ना होणार? या कल्पनेने ती अस्वस्थ झाली. बाबा हसावं की, हसू नये, अशा अवस्थेत म्युट झाले. अनू गांगरली… तिला कसं व्यक्त व्हावं, तेच कळेना… “माझ्या नावाचं डिस्कोथेक?” ती पुटपुटली.
त्याच्या पापाने मात्र खोखो हसत, “माझा बच्चा तो!” म्हणत त्याला मिठीत घेऊन कुरवाळलं… “आपण नक्कीच तुझ्या आईपापाच्या नावाची पण एखादी वास्तू उभारूया हं!” त्याच्या पप्या घेत त्याने त्याला दिलासा दिला.
हेही वाचा – वाकडं बोट
काळ बदलतोय. मुलं उघड्या कानांनी, उघड्या डोळ्यांनी सगळीकडे वावरत असतात. कधीकधी ते सगळ्यांची दांडी उडवतात… हादरून नाही जायचं. आपल्या पालकत्वावर आणि पाल्याच्या आकलनशक्तीवर विश्वास ठेवायचा… प्रतिक्रियावादी न होता समजून घ्यायचं.
शितावरून भाताची परीक्षा होते, पण हा नियम सर्वत्र लागू नाही होत. एका प्रसंगातून व्यक्ती म्हणून संपूर्ण मुलाची किंवा कुटुंबाची परीक्षा नाही करता येत. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व बहुआयामी असतं. निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या प्रसंगी, निरनिराळ्या वयात त्याचे वेगवेगळे पदर दिसून येतात. मुलांच्या प्रत्येक वागण्या-बोलण्यावर गंभीर होऊन, हादरून जायला हवं असं नाही. आपली विनोदबुद्धी आणि सारासारविचार जागृत ठेवून त्यांना समजून घ्यायला हवं.


