अध्याय चौदावा
तरी होय ऐसें मन । जैसें रविचंद्रहीन । रात्रींचें कां गगन । अंवसेचिये ॥245॥ तैसें अंतर असोस । होय स्फूर्तिहीन उद्वस । विचाराची भाष । हारपे तैं ॥246॥ बुद्धि मेचवेना धोंडीं । हा ठायवरी मवाळें सांडी । आठवो देशधडी । जाला दिसे ॥247॥ अविवेकाचेनि माजें । सबाह्य शरीर गाजे । एकलेनि घेपे दीजे । मौढ्ये तेथ ॥248॥ आचारभंगाचीं हाडें । रुपतीं इंद्रियापुढें । मरे जरी तेणेंकडे । क्रिया जाय ॥249॥ पाही आणिकही एक दिसे । जे दुष्कृतीं चित्त उल्हासे । आंधारी देखणें जैसें । डुडुळाचें ॥250॥ तैसें निषिद्धाचेनि नांवें । भलतेंही भरे हावे । तियेविषयीं धांवे । घेती करणें ॥251॥ मदिरा न घेतां डुले । सन्निपातेंवीण बरळे । निष्प्रेमेंचि भुले । पिसें जैसें ॥252॥ चित्त तरी गेलें आहे । परी उन्मनी ते नोहे । ऐसें माल्हातिजे मोहें । माजिरेनि ॥253॥ किंबहुना ऐसैसीं । इयें चिन्हें तम पोषीं । जैं वाढे आयितीसी । आपुलिया ॥254॥ आणि हेंचि होय प्रसंगें । मरणाचें जरी पडे खागें । तरी तेतुलेनि रिगे । तमेंसीं तो ॥255॥ राई राईपण बीजीं । सांठवूनियां अंग त्यजी । मग विरूढे तैं दुजी । गोठी आहे गा ॥256॥ पैं होऊनि दीपकलिका । येरु आगी विझो कां । कां जेथ लागे तेथ असका । तोचि आहे ॥257॥ म्हणोनि तमाचिये लोथें । बांधोनियां संकल्पातें । देह जाय तैं मागौतें । तमाचेचि होय ॥258॥ आतां काय येणें बव्हें । जो तमोवृद्धि मृत्यु लाहे । तो पशु कां पक्षी होये । झाड कां कृमी ॥259॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : सांग पां धनुर्धरा, रावो रायपणें डोंगरा
अर्थ
तर जसे अमावास्येच्या रात्रीचे आकाश, सूर्य व चंद्र यांनी रहित असते, तसे त्याचे मन होते. ॥245॥ त्याचप्रमाणे अंत:करण पूर्णपणे विचारशून्य व रिकामे असते व तेव्हा त्या अंत:करणात सारासारविवेकाची गोष्ट नाहीशी होते. ॥246॥ बुद्धि जडपणात धोंड्यालाही दाद देत नाही. (मागे सारते). तेथपर्यंत तिने मऊपणा टाकलेला असतो आणि त्याची स्मरणशक्ती तर देशोधडी झालेली दिसते. ॥247॥ शरीराच्या आतबाहेर अविवेकाचा अतिरेक ढळढळीत दिसतो व त्या तमोगुणाच्या ठिकाणी एकट्या मूर्खपणाची देवघेव होते. ॥248॥ (ज्याप्रमाणे महारवाड्यापुढे हाडे रोवलेली पाहून पहाणारा जसा हा महारवाडा आहे असे समजतो, त्याप्रमाणे) या तमोगुणी पुरुषाच्या इंद्रियरूपी महारवाड्यावर आचारभ्रष्टतारूपी हाडे रोवलेली असतात. (त्यावरून हा तमोगुणी आहे, असे समजले जाते). व हा तमोगुणी पुरुष मरेपर्यंत त्याच्या क्रिया आचारभ्रष्टतेकडे जातात. (म्हणजे तो मरेपर्यंत भ्रष्टाचरण करतो.) ॥249॥ पाहा, आणखी (त्याच्या) ठिकाणी एक लक्षण दिसते. ते हे की जसे घुबडास अंधारातच दिसते, त्याप्रमाणे या तमोगुणी पुरुषास वाईट कर्मे करण्यात चित्ताला स्फुरण चढते. ॥250॥ त्याप्रमाणे निषिद्ध कर्म म्हटले की वाटेल त्या निषिद्ध कर्म करण्याच्या उत्कट इच्छेत तो सापडतो व ती निषिद्ध कर्माविषयीची इच्छा पूर्ण करण्याकरिता त्याची इंद्रिये धाव घेतात. ॥251॥ हा तमोगुणी पुरुष दारू न पिता झोकांड्या खातो, सन्निपात वायुशिवाय बरळतो आणि वेड्या मनुष्याप्रमाणे प्रेमावाचून हा भुलतो.॥252॥ त्याचे चित्त तर नाहीसे झालेले असते. पण ती उन्मनी अवस्था नाही. याप्रमाणे जे उन्मत्तकारक मोहाकडून वश केले जातात. ॥253॥ फार काय सांगावे, जेव्हा तमोगुण आपल्या सामग्रीने (पूर्णपणे) वाढतो, तेव्हा तो अशी ही चिन्हे पोसतो. ॥254॥ आणि ह्याच तमोगुणाच्या उन्नतीचा प्रसंग असतांना जर मरणाचे ठिकाण प्राप्त झाले, तर तो तमोगुणी पुरुष तितक्या तमोगुणासह पुढला जन्म घेतो. ॥255॥ मोहोरीचे झाड जर आपला मोहोरीपणा बियात साठवून मग जर आपले अंग टाकील (ते मोहोरीचे झाड मरेल) व त्या बीजापासून जो अंकुर फुटेल, त्याला मोहोरीपणाशिवाय दुसरी गोष्ट आहे काय? ॥256॥ अग्नी हा दिव्याची ज्योत होऊन (अग्नीपासून दिवा लावल्यावर) मग तो (पहिला) अग्नी जरी विझला, तरी विझेना का? कारण की, ज्या ठिकाणी त्या दिव्याची ज्योत लागेल, त्या ठिकाणी तो पूर्वीचाच सगळा अग्नि आहे. ॥257॥ म्हणून तमाच्या मोटेत संकल्पाला बांधून (म्हणजे तामस संकल्प करीत असतांना) ज्याचा देह पडतो, त्याला पुन्हा तमाचाच देह मिळतो. ॥258॥ आता असे हे पुष्कळ बोलून काय करावयाचे आहे? जो तमाच्या उत्कर्षात मरण पावतो, तो पशू अथवा पक्षी अथवा झाड किंवा किडा होतो. ॥259॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नगरेंचि रचावीं, जळाशयें निर्मावीं


