अध्याय चौदावा
आणि आड पडलिया । उद्यमजातां भलतेया । प्रवृत्ती धनंजया । हातु न काढी ॥231॥ तेवींचि एखादा प्रासादु । कां करावा अश्वमेधु । ऐसा अचाट छंदु । घेऊनि उठी ॥232॥ नगरेंचि रचावीं । जळाशयें निर्मावीं । महावनें लावावीं । नानाविधें ॥233॥ ऐसैसां अफाटीं कर्मीं । समारंभु उपक्रमीं । आणि दृष्टादृष्ट कामीं । पुरे न म्हणे ॥234॥ सागरुही सांडीं पडे । आगी न लाहे तीन कवडे । ऐसें अभिलषीं जोडे । दुर्भरत्व ॥235॥ स्पृहा मना पुढां पुढां । आशेचा घे दवडा । विश्व घापे चाडा । पायांतळीं ॥236॥ इत्यादि वाढतां रजीं । इयें चिन्हें होतीं साजीं । आणि ऐशा समाजीं । वेंचे जरी देह ॥237॥ तरी आघवांचि इहीं । परिवारला आनी देहीं । रिगे परी योनिही । मानुषीचि ॥238॥ सुरवाडेंसिं भिकारी । वसो पां राजमंदिरीं । तरी काय अवधारीं । रावो होईल ॥239॥ बैल तेथें करबाडें । हें न चुके गा फुडें । नेईजो कां वऱ्हाडें । समर्थाचेनी ॥240॥ म्हणोनि व्यापाराहातीं । उसंतु देहा ना राती । तैसयांचिये पांती । जुंपिजे तो ॥241॥ कर्मजडाच्या ठायीं । किंबहुना होय देहीं । जो रजोवृत्तीच्या डोहीं । बुडोनि निमे ॥242॥ मग तैसाचि पुढती । रजसत्त्ववृत्ती । गिळूनि ये उन्नती । तमोगुण ॥243॥ तैंचि जियें लिंगें । देहींचीं सबाह्य सांगें । तियें परिस चांगें । श्रोत्रबळें ॥244॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : धाराधरकाळें, महानदी उचंबळे
अर्थ
आणि अर्जुना, कोणाताही धंदा समोर आला असता (करण्याचा प्रसंग आला असता) तो धंदा करण्याविषयीचा मनाचा कल तो मागे घेत नाही. ॥231॥ त्याचप्रमाणे एखादे मंदिर बांधावे अथवा अश्वमेध यज्ञ करावा, असा अघटित नाद घेऊन तो उठतो. ॥232॥ शहरेच वसवावीत, जलाशय वगैरे पाण्याचे साठे बांधावेत, नाना प्रकारचे मोठे बगीचे लावावेत ॥233॥ अशा अचाट कर्मांना आरंभ करतो आणि इहलोकीचे व परलोकीचे भोग मिळण्याच्या कामात पुरे म्हणत नाही. ॥234॥ समुद्र दुर्भर खरा, पण तो या रजोगुणी पुरुषाच्या अभिलाषापुढे हार खाईल. अग्नीला कितीही जळण घातले तरी, त्याची तृप्ती होत नाही, असा तो दुर्भर आहे खरा, परंतु त्या पुरुषाच्या अभिलाषाच्या दुर्भरत्वापुढे अग्नीची तीन कवड्या किंमत नाही, असे त्याच्या अभिलाषाच्या ठिकाणी दुर्भरत्व असते. ॥235॥ त्याची विषयतृष्णा ही मनाच्या पुढे पुढे आशेची धाव घेते व तो सर्व विश्व इच्छेच्या पायाखाली घालतो. ॥236॥ याप्रमाणे रजोगुणाचा उत्कर्ष झाला म्हणजे ही लक्षणे टवटवीत (व्यक्त) होतात. व अशा लक्षणांच्या समुदायात जर देह पडला तर ॥237॥ तर या सर्व लक्षणांनी युक्त असा तो रजोगुणी पुरुष दुसर्या देहात प्रवेश करतो परंतु (ती) मनुष्याचीच योनी असते. ॥238॥ हे पहा, एखादा भिकारी चैनीने राजवाड्यात वसेना का? तर तेवढ्यावरून तो राजा होईल का? ॥239॥ बैलाला जरी श्रीमंताच्या लग्नाबरोबरच्या मंडळींनी (गाडीला जोडून) नेला, तरी त्याच्या कपाळाचा कडबा खरोखर चुकत नाही. ॥240॥ म्हणून व्यापारामुळे ज्यांना रात्रंदिवस विसावा मिळत नाही, अशा प्रकारच्या लोकांच्या पंक्तीस तो जुंपला जातो. (तशांच्या कुळात तो जन्मतो). ॥241॥ फार काय सांगावे? जो रजोगुणाने बनलेल्या वृत्तींच्या उत्कर्षरूपी डोहात डुंबून मरण पावतो, तो कर्मठांच्या कुळात जन्मतो. ॥242॥ त्याचप्रमाणे जेव्हा पुढे रजोगुण व सत्त्वगुण नाहीसे करून तमोगुण उन्नतीला येतो. ॥243॥ त्या वेळची जी लक्षणे देहाच्या आतबाहेर असतात, ती आता आम्ही सांगतो. ती चांगल्या श्रोत्रबळाने (लक्षपूर्वक) ऐक. ॥244॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : सांग पां धनुर्धरा, रावो रायपणें डोंगरा


