“काय साहेब…!! सध्या काय चालू आहे..?” फोनवर मुलाचा आवाज ऐकताच बापाचा चेहरा आनंदाने फुलला.
“काही नाही सर… तुमच्यासारखाच आघाडीवर आहे मी इथे,” त्यानेही हसत-खेळत नेहमीच्या आवाजात उत्तर दिले.
ते दोघे बाप-लेक. बाप पोलिसांत कॉन्स्टेबल, तर मुलगा सैन्यात कमांडो तुकडीत. बाप सध्या कोरोनाग्रस्त असलेल्या एका भागात ड्युटीवर, तर मुलगा काश्मीरमध्ये सीमेवरील आघाडीवर होता. दोघेही महाराष्ट्रातील एका छोट्या गावातील. यांचे पूर्वज पिढ्यानपिढ्या सैन्यात आणि पोलिसांत देशसेवा करत आले होते. पोराचा आजोबा तर चीनच्या लढाईत शहीद झालेला. आज हे दोघेही आपापल्या परीने देशाची सेवा करत होते. वेळ मिळेल तेव्हा ते न चुकता एकमेकांना फोन करायचे. बापाची बायको म्हणजेच पोराची आई तीन वर्षांपूर्वीच वारली होती आणि पोराचे अजून लग्न झाले नव्हते; त्यामुळे दोघेच एकमेकांचे सवंगडी आणि मित्र बनले होते.
आजही तसाच त्यांचा फोन चालू होता. “काळजी घ्या साहेब… साधे पोलीस आहात तुम्ही, काय सुरक्षितता आहे तुमच्याकडे? तो कोरोना आहे, वय झालेल्यांना तो जास्तच त्रास देतो. तसे तुम्ही तरुण आहात म्हणा, पंचावन्न हे काही वय नाही! पण मास्क नसेल तर, रुमाल तरी बांधा आणि मी मागे ठेवून गेलो होतो ते ग्लोव्हज घाला आणि हो… तो युनिफॉर्म रोजच्या रोज धुवा. म्हातारी गेल्यानंतर तुम्ही खूप आळशी झाला आहात…” पोरगा हसत-हसत म्हणाला.
“साल्या, बापाचीच खेचतोय का रे? समोर असतास तर एक कानशिलात लगावली असती… मी माझी काळजी घेतो रे. मास्क, सॅनिटायझर सगळे व्यवस्थित चालू आहे. युनिफॉर्मचा त्रास आहे थोडा… तुझी म्हातारी गेली आणि माझे कपडे मीच धुतो. पण आता या कोरोनामुळे घरी जाण्याची निश्चित वेळ नाही. मग ड्युटी संपवून घरी गेल्यावर हा युनिफॉर्म पाण्यात टाकतो आणि दुसरा घालून येतो. पुन्हा ड्युटीवर जाताना तो बाहेर काढतो,” असे बोलून बाप खो-खो हसू लागला.
“काय पिताजी… तेव्हाच म्हटले होते गावातल्या आरती काकूंशी लग्न करा; पण ऐकलेत का तुम्ही? किती दिवस नुसते त्यांना बघत बसणार आणि व्हॉट्सॲपवर चॅटिंग करणार…?” तो अजूनही मस्करी करत म्हणाला.
“अरे, किती खेचशील बापाची? तुला काही काळ-वेळ आहे का रे? इथली परिस्थिती किती गंभीर आहे, लोक किती घाबरले आहेत…” बाप काळजीच्या स्वरात म्हणाला.
“बाबा, मला परिस्थितीचे काय सांगता? इथे आम्ही रोज मरणाच्या दारात असतो. इथल्या रहिवाशांचे चेहरे बघा. रात्री आठनंतर कोणाच्या घरावर थाप मारली आणि त्यांनी दरवाजा उघडला, की मरणाची भीती काय असते ते कळते. तिथे तर फक्त एक रोग आहे, पण इथे रोगही आणि बंदुकीच्या गोळ्याही आहेत! पण जाऊ द्या हो, आपण असे गंभीर बोललो तर परिस्थिती पालटणार आहे का? त्यापेक्षा हसत-खेळत बोलूया… काय माहीत, आपली पुन्हा कधी भेट होईल!” तो थोडा गंभीर होत म्हणाला.
“अरे मित्रा, बस कर आता… माहीत आहे आम्हाला, किती कठीण परिस्थितीत काम करतोयस तू!” बाप जुन्या आठवणींनी हळवा झाला.
“माझे जाऊ द्या हो, आर्मी मला खूप काही देते; पण तिथे तुमची काय परिस्थिती आहे?” त्याने पुन्हा विषय बदलत विचारले.
“इथे परिस्थिती खूप बिकट आहे. लोक काही ऐकत नाहीत रे, वेड्यासारखे बाहेर फिरतात. हात जोडून सांगावे लागते, ‘बाबांनो, घरात राहा!’ पण नाही ऐकत. त्यांना समजावताना मारले तर कोणीतरी व्हिडीओ काढतो आणि तो व्हायरल करतो. आमची दोन्ही बाजूंनी फरफट होतेय. रस्त्यावर किती लोकांच्या संपर्कात येतो आम्ही! तरी बरे, जेवणखाण्याची फारशी चिंता नाही… पण तरीही किती काळजी घेणार?” बाप पुन्हा भावनिक झाला.
हेही वाचा – टिपिकल
“म्हणजे बाबा, आपण दोघे जण आता युद्धभूमीवरच आहोत तर! हो, पण आता आपल्याला शहीद व्हायचे नाही हा! नाहीतर अंत्ययात्रेला कोणीच यायचे नाही. आजोबांच्या वेळी आख्खा गाव अंत्ययात्रेला आलेला, काय ती गर्दी आणि काय तो जयजयकार! साला, मरणही खूश झाले असेल तेव्हा, अशी प्रसिद्धी मिळाली म्हणून! आपणही तसेच देशासाठी लढायचे आणि घराण्याचे नाव राखायचे,” पोरगा म्हणाला.
“ए, भानावर ये! चल, मी निघतो राऊंडला, आज थोडे थकल्यासारखे वाटतेय…” बाप जड आवाजात म्हणाला. दोघांनी फोन ठेवला आणि ते आपापल्या कामाला लागले.
0000
दुसऱ्या दिवशी सकाळी, एका घरात काही अतिरेकी लपल्याची पक्की बातमी त्यांना मिळाली. तिथे निघण्याची तयारी करत असतानाच, बापाच्या निधनाचा फोन आला. अचानक मिळालेल्या या बातमीने त्याला प्रचंड धक्का बसला.
“शेवटी शाहिदाची परंपरा कायम राखलीच तर…” तो स्वतःशीच पुटपुटला.
हेही वाचा – गोष्ट दोन प्रवाशांची…
“जवान, दो मिनिट में तय्यार होकर रिपोर्ट करो!” कॅप्टनचा करडा स्वर कानावर पडताच तो पटकन उठला. खिशातून बापाचा फोटो काढून त्याने एक कडक सॅल्युट ठोकला आणि एके-47 (AK-47) हातात घेऊन बाहेर पडला.
0000
दोन दिवसांनी, त्या छोट्या गावात सैन्यदलाची एक गाडी येऊन उभी राहिली. चार सैनिकांनी त्यातून एक शवपेटी बाहेर काढली. संपूर्ण गावात लॉकडाऊन असल्यामुळे सामसूम होती आणि गावात एकही माणूस बाहेर दिसत नव्हता. गावाचा सरपंच पुढे आला आणि त्याने जवानांना स्मशानभूमीचा रस्ता दाखवला. चारही सैनिकांनी लष्कराला साजेशा इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. त्या अंत्यसंस्काराला गावातून फक्त सरपंचच हजर राहू शकला होता.
दोन दिवसांपूर्वीच त्या जवान मुलाचा कॉन्स्टेबल बाप कोरोनामुळे शहीद झाला होता. त्याचे प्रेत थेट विद्युत दाहिनीत नेण्यात आले होते, जिथे त्याच्यासोबत फक्त त्याचे दोन सहकारी उपस्थित होते… आणि योगायोग म्हणजे, त्याच दिवशी हा त्याचा मुलगा काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढता लढता वीरगती प्राप्त करून शहीद झाला होता. आपले अंत्यसंस्कार आपल्याच गावी व्हावेत, ही त्याची अंतिम इच्छा होती. सरपंचाने संपूर्ण गावाच्या वतीने त्या वीर जवानाला अश्रूपूर्ण श्रद्धांजली वाहिली.


