नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
काय दिवस आलेत, चार दिवस झाले नाना काकांना जाऊन आणि सोमवारी (12 ऑक्टोबर 2026) बातमी आली की, मधूताई गेल्या! मधूताई म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर. पूर्ण सिनेमाच जणू डोळ्यांसमोर येत गेला… किती त्या आठवणी, स्मृती… त्यांच्या जाण्याचं दुःख आहेच, पण दीर्घ आजारातून त्या सुटल्या म्हणून निःश्वास सोडावा??
एका मराठी सीरियलचं शूटिंग होतं, मढमध्ये शक्ती कपूरच्या बंगल्यात. दुपारचा कॉलटाइम होता. मी पोहोचले तिथे तेव्हा एक सीन सुरू होता. बंगल्यामधली एक बेडरूम आम्हाला मेकअप रूम म्हणून दिली होती. मी तिथे जाऊन बसले. लंच-ब्रेक झाला, सगळे जण आले. साधी साडी, डोक्यावर पदर अशी संपूर्ण वातावरण व्यापून टाकणारी मध्यम वयाची सुंदर, सोज्वळ रूपाची बाई आत आली. मी आपसूकच उभी राहून त्यांना अभिवादन केलं. कित्ती गोड हसल्या होत्या. जेवणाच्या टेबलवर बसल्या आणि मानेनीच मला त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसायचा इशारा केला. मी पण खूश होऊन त्यांच्या शेजारी जाऊन बसले. जेवताना ओळख परेड झाली. गप्पा झाल्या… मी शूटसाठी तयार झाले, सीन सुरू झाला…
हेही वाचा – दोन वेण्या अन् रीमा दिदी…
मुलाच्या अपघाती निधनाचा सीन होता… राष्ट्रीय पारितोषिक विजेता कलाकार… सीन जो काय चोपलाय, शहारून आले होते मी! ज्यांच्याकडून सहज अभिनय कसा करावा, हे शिकावं, अशा त्या सुद्धा एक संस्थाच होत्या. तशी मी नशीबवानच. उषा नाडकर्णी, रीमा लागू, स्वाती बोवलेकर, वंदना मराठे, सुकन्या कुलकर्णी, मधूताई कांबीकर… या आणि अशा कितीजणी माझ्या आयुष्यात आल्या अन् माझ्यासह माझ्या अभिनयाला समृद्ध बनवत गेल्या!
त्या सेटवर संध्याकाळी टी-ब्रेकमध्ये दिग्दर्शक मला विचारते झाले की, तुम्ही दोघी एकमेकींना किती वर्षांपासून ओळखता? आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि हसत सुटलो. म्हटलं, “वर्षं कुठली, काही तास झालेत! लंच-ब्रेकमध्ये तर पहिल्यांदा भेटलो…” सगळ्यांसाठी आश्चर्य होतं. मधूताई आणि मी स्वभावानं सारख्याच होतो. फार पटकन दोस्ती झाली आमची. अगदी त्या आजारी पडेपर्यंत…
रंगमंचावर सक्रिय असताना त्यांना पक्षाघात झाला आणि सगळंच संपलं. ताई अंथरुणाला खिळल्या. एक-दोन वेळा त्यांना वाढदिवसासाठी फोन केला होता. बोलणं नाही झालं. नंतर तो नंबर बिहारमध्ये कोणाकडे तरी गेला. तरी, मी आशेने त्यांच्या वाढदिवसाला त्याच नंबरवर फोन करायचे. तो मला दरवर्षी तेवढ्याच ‘प्रेमाने’ शिव्या द्यायचा.
हेही वाचा – एक असंही वाचन…
तमाशाच्या मंचावर अत्यंत देखणे रूप असलेली शालीन अदाकारा, पदार्पणात ‘शापित’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळवून चित्रपटसृष्टीत पाय घट्ट रोवले. जरासुद्धा माज नाही. डोक्यावरचा पदर कधी ढळला नाही… प्रत्येकाशी आब राखूनच, अदबीन बोलणं. पंजाबी ड्रेस घातला तर अंगभरून ओढणी घेऊन वावरायच्या. किती ती शालीनता! बरं, वयानं लहानांशी सुद्धा अहो-जाहो करूनच बोलणं… त्यांचा नातू ओम. त्याच्यावर त्याचं खूप प्रेम. बोलताना फक्त त्याचंच नाव कायम यायचं.
एक अतिशय अदबशीर, देखण्या, उत्तम अभिनेत्रीचं आयुष्य शेवटाला शापित ठरलं. रंगमंचावर नृत्याविष्कार करताना त्या ज्या पडल्या, त्या परत उठल्याच नाहीत… सूर्य केव्हाच मावळला होता. सोमवारी अस्ताला गेला!
मधूताई आता पुढे काय लिहावं सुचत नाहीये. तुम्हाला सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…


