अध्याय चौदावा
ब्रह्मायु होईजे । मा निजलेयाचि असिजे । हें वांचूनि दुजें । व्यसन नाहीं ॥187॥ वाटा जातां वोधें । कल्हातांही डोळा लागे । अमृतही परी नेघे । जरी नीद आली ॥188॥ तेवींचि आक्रोशबळें । व्यापारे कोणे एके वेळे । निगालें तरी आंधळें । रोषें जैसें ॥189॥ केधवां कैसे राहाटावें । कोणेसीं काय बोलावें । हें ठाकतें कीं नागवें । हेंही नेणें ॥190॥ वणवा मियां आघवा । पांखें पुसोनि घेयावा । पतंगु पां हांवा । घाली जेवीं ॥191॥ तैसा वळघे साहसा । अकरणींच धिंवसा । किंबहुना ऐसा । प्रमादु रुचे ॥192॥ एवं निद्रालस्यप्रमादीं । तम इया त्रिविधीं । बांधे निरुपाधी । चोखटातें ॥193॥ जैसा वन्ही काष्ठीं भरे । तैं दिसे काष्ठाकारें । व्योम घटें आवरे । तें घटाकाश ॥194॥ नाना सरोवर भरलें । तैं चंद्रत्व तेथें बिंबलें । तैसें गुणाभासीं बांधलें । आत्मत्व गमे ॥195॥
सत्त्वं सुखं संजयति रजः कर्मणि भारत । ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत ॥9॥
रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत । रजः सत्त्वं तमश्चैव तमः सत्त्वं रजस्तथा ॥10॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : घृतें आंबुखूनि आगियाळें, वज्राग्नीचें सादुकलें
अर्थ
ब्रह्मदेवाचे आयुष्य मिळावे आणि मग निजूनच राहावे यावाचून त्याला दुसरा नादच नाही ॥187॥ सहज वाटेने जात असता कलंडून जरी पडला तरी त्याचा डोळा लागतो आणि जर त्यास झोप आली तर तो अमृतसुद्धा घेत नाही. ॥188॥ जसा एखादा आंधळा रागावून कामाला निघाला म्हणजे तो कोणीकडे जाईल व कोठे पडेल याचा नेमच नसतो, त्याप्रमाणे हा तमोगुणी पुरुष त्वेषाच्या आवेशात कोणत्या एखाद्या वेळी काम करण्यास निघाला असता, काय करील याचा नेम नाही. ॥189॥ केव्हा कसे वागावे, कोणाशी काय बोलावे, अमुक एक गोष्ट साध्य आहे की असाध्य आहे, हेही त्य़ास कळत नाही. ॥190॥ अरे, ज्याप्रमाणे पतंग हा सर्व वणवा मी आपल्या पंखानेच पुसून घ्यावा, या उत्कट इच्छेने वणव्यात उडी घालतो. ॥191॥ त्या पतंगाप्रमाणे हा तमोगुणी पुरुष एखाद्या धोक्याच्या कामाकडे वळतो व जे काम करू नये, ते करण्याची त्यास प्रबळ इच्छा असते. फार काय सांगावे! याप्रमाणे त्यास भलतेच करणे आवडते. ॥192॥ याप्रमाणे तमोगुण हा निद्रा, आळस व प्रमाद या तीन प्रकारांनी निरुपाधिक व शुद्ध अशा आत्म्याला बांधतो. ॥193॥ ज्याप्रमाणे अग्नीने लाकूड व्यापिले असता, अग्नि हा लाकडाच्या आकाराचा दिसतो अथवा पोकळी घटात सापडली असता तिला घटाकाश म्हणतात ॥194॥ अथवा (ज्यावेळी) सरोवर पाण्याने भरलेले असते, तेव्हा त्यात चंद्राचे बिंब प्रतिबिंबित होतो (व त्यामुळे चंद्र सरोवरात बांधला गेल्यासारखा वाटतो), तसे आत्मत्व हे गुणात भासल्यामुळे आत्मा हा गुणांनी बांधल्यासारखा वाटतो. ॥195॥
हे भारता, सत्वगुण सुखाच्या ठिकाणी व रजोगुण कर्माच्या ठिकाणी आसक्ति उत्पन्न करतो. आणि तमोगुण तर ज्ञानाला झाकून प्रमादाच्या ठिकाणी आसक्ति उत्पन्न करतो. ॥9॥
हे अर्जुना, रज व तम यांना जिंकून सत्त्व बळावतो. सत्त्व व तम यांना जिंकून रज आणि रज व सत्त्व यांना जिंकून तम वाढतो. ॥10॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : अविवेकमहामंत्र, जें मौढ्यमद्याचें पात्र


