अध्याय चौदावा
तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम् । प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत ॥8॥
व्यवहाराचेहि डोळे । मंद जेणें पडळें । मोहरात्रीचें काळें । मेहुडें जें ॥174॥ अज्ञानाचें जियालें । जया एका लागलें । जेणें विश्व भुललें । नाचत असे ॥175॥ अविवेकमहामंत्र । जें मौढ्यमद्याचें पात्र । हें असो मोहनास्त्र । जीवांसि जें ॥176॥ पार्था तें गा तम । रचूनि ऐसें वर्म । चौखुरी देहात्म- । मानियातें ॥177॥ हें एकचि कीर शरीरीं । माजों लागे चराचरीं । आणि तेथ दुसरी । गोठी नाहीं ॥178॥ सर्वेंद्रिया जाड्य । मनामाजीं मौढ्य । माल्हाती दाढ्र्य । आलस्याचें ॥179॥ आंगें आंग मोडामोडी । कार्यजाती अनावडी । नुसती परवडी । जांभयांची ॥180॥ उघडियाची दिठी । देखणें नाहीं किरीटी । नाळवितांचि उठी । वो म्हणौनि ॥181॥ पडलिये धोंडी । नेणे कानी मुरडी । तयाचि परी मुरकुंडी । उकलूं नेणें ॥182॥ पृथ्वी पाताळीं जांवो । कां आकाशही वरी येवो । परी उठणें हा भावो । उपजों नेणें ॥183॥ उचितानुचित आघवें । झांसुरता नाठवे जीवें । जेथींचा तेथ लोळावें । ऐसी मेधा ॥184॥ उभऊनि करतळें । पडिघाये कपोळें । पायाचें शिरियाळें । मांडूं लागे ॥185॥ आणि निद्रेविषयीं चांगु । जीवीं आथि लागु । झोंपीं जातां स्वर्गु । वावो म्हणे ॥186॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आपणचि ज्ञानस्वरूप आहे, तें गेलें हें दुःख न वाहे
अर्थ
तमोगुण तर अज्ञानापासून उत्पन्न होतो असे जाण व तो सर्व प्राण्यांना मोह पाडतो. हे भारता, प्रमाद (दुष्कृत्य), आळस आणि निद्रा यांनी (या तीन पाशांनी) तो (प्राण्याला) बद्ध करतो. ॥8॥
व्यवहाराचीही दृष्टी ज्या पडद्याने मंद होते (असा तमोगुणाचा पडदा आहे) व जो तमोगुण मोहरूपी रात्रीतील काळा ढग आहे. ॥174॥ त्या तमोगुणाला केवळ अज्ञानाचा जिव्हाळा आहे व ज्या तमोगुणाच्या योगाने सर्व जीव भ्रमिष्ट होऊन वाटेल तसे कर्म करतात. ॥175॥ अविचार हाच या तमोगुणाचा महामंत्र आहे व तो तमोगुण मूर्खपणारूपी दारूचे भांडे आहे. हे राहू दे. जो तमोगुण जीवाला मोहनास्त्र (भूल पाडणारे अस्त्र) आहे. ॥176॥ अर्जुना तो तमोगुण अशा प्रकारे युक्ति तयार करू देह हाच आत्मा असे समजणार्याला जखडून बांधतो. ॥177॥ आणि चराचरात कोणत्याही शरीरामध्ये हा खरोखर एकच माजू लागला की, मग तेथे तमोगुणाशिवाय दुसरी गोष्टच नसते. ॥178॥ सर्व इंद्रियांच्या ठिकाणी जाड्य येते, मनामधे मूर्खपणा उत्पन्न होतो व ती दोघे (मन आणि इंद्रिये) आळसाच्या दृढपणाचा आश्रय करतात. ॥179॥ तो अंगाला आळेपिळे देतो व कोणतेही काम करण्याविषयी त्याला कंटाळा असतो व एकामागून एक अशा एकसारख्या नुसत्या जांभया देतो. ॥180॥ अर्जुना, त्याचे डोळे जरी उघडे असले, तरी त्याला दिसत नाही व कोणी हाक मारली नाही तरी ‘ओ’ म्हणून उठतो. ॥181॥ जमिनीवर पडलेल्या धोंड्याला जसे एका बाजूहून दुसर्या बाजूला फिरणे माहीत नसते, त्याप्रमाणे तो मारलेली मुरकुंडी केव्हाही सोडत नाही. ॥182॥ पृथ्वी पाताळात जावो अथवा आकाश अंगावर कोसळून पडो, परंतु उठावे हा विचार मनात येण्याचे त्यास माहीत नसते. ॥183॥ आळसामुळे सुस्त पडले असता योग्य काय अथवा अयोग्य काय, हे सर्व तो अंत:करणात आठवत नाही व जेथे पडला असेल तेथे लोळावे, अशी त्याची बुद्धी असते. ॥184॥ तो दोन्ही तळहात वर करून गाल धरतो आणि दोन्ही गुडघ्यात डोके घालतो. ॥185॥ आणि निद्रेविषयी त्याच्या अंत:करणात चांगली आवड असते आणि झोप यावयास लागली म्हणजे स्वर्गसुखही तुच्छ आहे, असे तो म्हणतो. ॥186॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : घृतें आंबुखूनि आगियाळें, वज्राग्नीचें सादुकलें


