मेष
- राशीस्वामी मंगळ सुखस्थानात आणि गुरूबरोबर आहे. नोकरदारांच्या बाबतीत वाहन खरेदी-विक्रीचा योग आहे. परदेशी किंवा कामानिमित्त लांब राहणारे घरी येण्याची शक्यता आहे. कामात सुलभता असेल. व्यावसायिक वर्ग जागेत बदल किंवा जागेचे नूतनीकरण करून घेईल. शनि व्ययात असल्याने काही अचानक अडचणी येतील. गरजेपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो. कामात बदल होण्याची शक्यता आहे. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक काळजीपूर्वक करावी. विद्यार्थ्यांनी आळस करू नये; एकाग्रता ठेवून अभ्यास करावा. यश नक्की मिळेल.
वृषभ
- राशीस्वामी शुक्र तुळ राशीत आहे, 7 तारखेला वक्री होत आहे. नोकरदारांना सहकारी उत्तम साथ देतील. कामानिमित्त लहान-मोठे प्रवास होतील. व्यावसायिक वर्गासाठी बुध पंचमात आहे; शेअरमार्केटमध्ये नफा मिळू शकेल. मोठ्या, लांबच्या ट्रिपचे नियोजन कराल. महिलांना संततीविषयी काळजी वाटेल. घर आणि नोकरी यात समतोल साधताना खूप धावपळ होईल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करू शकतील; स्पर्धेत बक्षीस मिळवू शकतील.
मिथुन
- राशीस्वामी बुध तुळ राशीत आहे. 7 तारखेला बुध-शुक्र यांची युती होत आहे. नोकरदारांसाठी शनी कर्मस्थानी आहे, म्हणून जबाबदारी वाढेल. जागेत बदल आणि प्रवास घडेल. सहकारी वर्गाशी सलोख्याने वागा. व्यावसायिक वर्गाला ग्रहांची उत्तम साथ मिळेल; व्यापार उत्तम चालेल. जुनी येणी वसूल होतील; धनसंचय वाढेल. महिलांसाठी गुरू धनस्थानी आहे; बोलताना सांभाळून बोलावे, अपशब्द वापरू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर इतर परीक्षा द्याव्यात; वक्तृत्व स्पर्धेत यश मिळू शकेल.
कर्क
- या आठवड्यात संगत चांगली असेल, याकडे लक्ष द्या. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठ आणि सहकारी मदत करणार नाहीत. अशा परिस्थितीत कामाचे नियोजन करा; शॉर्टकट वापरू नका. व्यावसायिक वर्गाने आर्थिक नियोजन करावे; मोठी गुंतवणूक करण्याचे टाळावे. वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवा; कोर्ट-कचेरीत जाऊ नका. गैरसमजामुळे महिलांची कुटुंबात भांडणे होतील; काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी मेहनतीने पुढे जावे; चांगले यश मिळेल.
सिंह
- राशीस्वामी रवी कन्या राशीत आहे. केतू बराच काळ सिंह राशीत आहे. नोकरदारांना कुठली तरी चिंता सतत वाटत असेल; आत्मविश्वास कमी वाटेल. रवी धनस्थानात आहे, म्हणून आर्थिक बाजू मजबूत राहील. व्यावसायिक वर्गाला पैशाअभावी जी कामे राहिली होती, ती आता पूर्ण करता येतील. भागीदारीत व्यवसाय करताना नेहमी सतर्क रहा; कागदपत्रे सांभाळून ठेवा. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी; पथ्य पाळावे आणि नियमित व्यायाम करावा. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून लांब रहावे; कुसंगत टाळावी.
हेही वाचा – नवमांश आणि विवाह
कन्या
- राशीस्वामी बुध तुळ राशीत आहे. नोकरदारांनी तातडीने निर्णय घेऊ नयेत; विचारपूर्वक निर्णय घ्या. हितशत्रू त्रास देतील; राजकारण आणि गटबाजीपासून लांब रहावे. व्यावसायिक वर्गासाठी गुरू लाभस्थानी आहे, म्हणून संभाव्य धोक्यांपासून त्रास होणार नाही. महत्त्वाचे निर्णय घेताना तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्यावा. महिलांना घरात कामाचा ताण जाणवेल; धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. विद्यार्थी नवीन गोष्टी शिकू शकतील; आनंदी राहतील.
तुळ
- राशीस्वामी शुक्र स्वतःच्या राशीत आहे, 7 तारखेला तो वक्री होत आहे. नोकरदारांवर कामाचा ताण असेल, मेहनत करावी लागेल. नोकरदारांवर वरिष्ठ खूश राहतील. सहकारी आणि इतर स्टाफकडून चांगली मदत मिळेल. मेहनतीचे फळ लवकर मिळेल. व्यावसायिक वर्गाने कुणाला जामीन राहू नये; कोणत्याही कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी. खर्च आणि जमा यांचा ताळमेळ बसवताना त्रास होईल. महिलांमध्ये वाताचे विकार बळावतील, वेळेवर उपचार करा. तसेच, कोणाला पैसे उधार देऊ नका. विद्यार्थ्यांनी मोहात पडू नये; अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
वृश्चिक
- राशीस्वामी मंगळ कर्क राशीत आहे. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठ आणि सहकारी मदत करणार नाहीत. तरीही, स्वतःहून सगळे निर्णय घेऊ नका. महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांची संमती घ्या. व्यावसायिक वर्गाने स्पर्धकांपासून सावध रहावे. तुमचे नियोजन आणि कल्पना सगळ्यांना सांगू नका. मोठी गुंतवणूक करण्याचे टाळावे. घर आणि नोकरी सांभाळताना महिलांची तारांबळ उडेल; मदतनीस बायकांना जोडून ठेवा. परिश्रमाशिवाय यश मिळणार नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे.
धनु
- राशीस्वामी गुरू कर्क राशीत आहे. नोकरदारांसाठी चतुर्थ स्थानात शनी आहे; घराचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण असेल; हितशत्रू त्रास देतील. व्यावसायिक वर्गाला जुनी कर्जे फेडता येतील; तथापि, नवीन कर्ज सध्या घेऊ नका. स्पर्धकांबरोबर असलेले वाद मिटवून टाका. महिलांना आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल; वेळ आणि पैसा खर्च होईल. विद्यार्थ्यांचे भावंडांबरोबर भांडण होण्याची शक्यता आहे.
मकर
- राशीस्वामी शनी मीन राशीत आहे. नोकरदारांना पगारात वाढ मिळण्याची शक्यता आहे; मनासारखे पैसे खर्च करू शकाल. गुंतवणूक कराल; विम्याचे पैसे मिळतील. व्यावसायिक वर्गाला भागीदारीतून चांगला फायदा आहे; ओळखीतून कामे पटापट होतील. आवश्यक तो खर्च करू शकाल; मात्र, खोटी आश्वासने देऊ नका. महिला धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील; दानधर्म करतील. धनस्थानात राहू असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कमी बोलावे; शक्यतो मौन बाळगावे.
कुंभ
- नोकरदारांनी भविष्याचे आर्थिक नियोजन व्यवस्थित करावे. कामाची प्रशंसा होईल; बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत मानसिक अस्वस्थता असेल. अपरिचित व्यक्तींशी व्यापार करू नका; अहंकार बाजूला ठेवून काम पूर्ण करून घ्या. महिलांनी पोट आणि पचनाशी संबंधित आजारांपासून काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांचा मित्र-मैत्रिणींबरोबर सहलीला जाण्याचा योग आहे.
हेही वाचा – घरातील देवघरात पूजा करताना तोंड कोणत्या दिशेला असावे?
मीन
- राशीस्वामी गुरू कर्क राशीत आहे. नोकरदारांच्या बाबतीत कामाचा ताण नसला तरी, हितशत्रू आणि राजकारण यांच्यापासून सावध रहावे. कोणाला मदत करायला जाऊ नका; स्वतःचे काम आधी पूर्ण करा. व्यावसायिक वर्गाने निराशा आणि अतिविचार टाळावा. स्वतः लक्ष देऊन काम पूर्ण करून घ्या. पैसा तसेच वेळ जास्त खर्च होईल. महिलांनी आजारपण अंगावर काढू नये; नियमितपणे व्यायाम करा, पथ्यं पाळा. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल; चांगली प्रगती करू शकाल.


