‘कुब्जा’ या कवितेनं खूप वेडं केलं होतं. प्रेमराधा नि प्रेमकृष्ण खूप आवडतात… कृष्णप्रेमाच्या कथा खूप आवडू लागतात. खरंतर, या कवितेचा अर्थ तेव्हा सहज नाही समजला. पण कधीतरी तो समजला हीच धन्यता. ही कविता मला आधी नव्हती आवडत, पण जेव्हा अर्थ समजला, तशी ही कविता सर्वाधिक आवडू लागली…
कुब्जा
– इंदिरा संत
अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतीरावर
आज घुमे का पावा मंजुळ
मावळतीवर चंद्र केशरी
पहाटवारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकून अपुले तनमन
विश्वच अवघे ओठ लावून
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यामधूनी थेंब सुखाचे….
हे माझ्यास्तव… हे माझ्यास्तव
तिचं थोडं वय जास्त होतं. जख्ख म्हातारीच म्हणानात का ती! पण ती वेडी अखंड कृष्णप्रेमात असायची… अर्थात प्रेम हे अखंडच करावं… आणि प्रेमाचं का कधी वय असतं? पण ही कुब्जा! या बिचारीवर कोण प्रेम करणार? पण हवं असतं प्रेम! प्रत्येकालाच ती ओढ निसर्गदत्त दिलेली आहे.
हेही वाचा – एकटं टाकून…
कुब्जा हे व्यंगावरुन आलेलं तिचं नाव. कुब्जा म्हणजे कुबड. म्हणजे तिला कुबडी, थेरडी याच नावानं सारे हाक मारत असत… किती वाईट ना? तिचा मृत्यू आता जवळ आलाय, पण पहा ना, अजून तिचा सखा, प्रियकर, कृष्ण नाही आलेला! तरीही, आज नेहमीप्रमाणं ती पहाटे उठलीय. त्याच्यासोबतच ती उठायची. त्याच्याच स्मरणात ती झोपायची.
तर, आज ती तशाच पहाटेच्या अंधारात नदीवर आंघोळीला पाण्यात उतरली. का कुणास ठावूक तिला आताच तिचा सखा, कृष्ण हवा होता. स्मरणात सदोदित तो कृष्ण होताच! पण थोडा दुष्टही होता… त्याचं किंवा तिचं थोडंसं दुष्ट असणं प्रेमात असल्यानं शक्य असतंच. तर तसाच तो कृष्ण दुष्ट होता. अर्थात, त्यानं का प्रेम कमी होईल? तर, ती त्या दुष्टाची वाट पाहतेय, वेडं होऊन… तेच तिचं जीवनध्येय… तो हवाच, तो दिसावा एवढंच तर मागणं! प्रेम हे असंच असतं, प्राणप्रियाकडून खूप कमी अपेक्षा असतात…
सगळीकडे कसं शांत. अजून पक्षी जागे व्हायचेत. राधेलाही अजून जाग नाही आलेली. गोकुळात गवळणी अजून जाग्या व्हायच्यात…
इतक्यात,
ती कृष्णधून ऐकू लागली. हो, कृष्णाचीच ती बासरी… समोर पश्चिमेला लाडका केशरी रंगाचा गोड चंद्र दिसतोय… अंग ओलं आहे. कोणतंच वस्त्र नाही अंगावर… आणि पहाटेचा गार बोचरा वारा झोंबतोय अंगाला… पण त्याची तेवढी जाणीव होत नाहीये. त्या नदीपात्रात आता कृष्णमय झालेली कुब्जा, वेडी, शरीर थरथरतंय हे विसरून गेलीय… भान हरपलंय… एक गोड शिरशिरी अंगभर पसरलीय… ओठ तृप्त होताहेत… सारं शरीर तृप्त होतंय…
हेही वाचा – भय
हो, कुणीच जागं नसताना तो बासरी कुणासाठी वाजवेल? तिला समजली त्याची हाक… ती बेभान, आता जणू तिनं बासरीच्या स्वरातून कृष्णाला आलिंगन दिलंय. डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले… तृप्त झाली ती! ती समजून गेली, ही बासरी आज फक्त माझ्यासाठीच आहे… फक्त माझ्यासाठी… फक्त माझ्यासाठी…!
कृष्ण भेटतोच! खरंच, त्याला मनापासून हाक दिली तर! तो भेटतोच, पण मनामध्ये त्याच्याविषयी संशय नसेल तर! आणि आपल्याला ठाऊक आहे की, ती कुब्जा त्यानंतर आपलं व्यंगच गमावून बसली. मनाची मरगळ गेली. ती सुंदर दिसू लागली… खरंच आहे ते! प्रेमात पडताच गालही गुलाबी होतात… तसंच काहीतरी असणार ते! तिचं तर त्याक्षणी कुबडही गेलं. प्रेमात एवढी शक्ती तर सहजच असते. हो ना?
जर कृष्ण कुब्जेला मिळाला तर, तो सुंदर राधेला, का नाही मिळणार बरं? हे कृष्णरूप हे प्रेमाचंच प्रतिक! ‘अनय’ देखील मला आपल्या नशीबाचं प्रतिकच वाटतं…! कृष्ण केवळ बासरीच्या स्वरातूनही भेटतो. ते त्याचं रूप समजलं पाहिजे आणि तेही माझ्यास्तव, हेसुद्धा!


