भाग – 45
दिवाकर आणि दादांनी सगळं इतकं योजून ठेवलं होतं की, कोणतीही त्रुटी राहिली नव्हती. माधवसारख्या माणसाला कोणतीही पळवाट न मिळावी, यासाठी हा निर्णय अचानक घेतला गेला होता — पण त्यामागे दृढ निर्धार आणि दूरदृष्टी होती.
त्या क्षणी आराध्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज आलं. शर्वायने तिचा हात हातात घेतला आणि दोघेही जणू गूढ, गुंतागुंतीच्या खेळात उतरण्यापूर्वी, एकमेकांच्या डोळ्यांत विश्वासाची आणि साथीची गाठ घट्ट करत होते…
“आता… आपण एक आहोत. कायदेशीर, सामाजिक, आणि आत्मिक!” शर्वाय म्हणाला…
गुरुजींचा आशीर्वाद घेतल्यानंतर आश्रमाच्या त्या दिव्य, शांत परिसरात वाऱ्याची एक शांत झुळूक वाहत होती… प्रत्येकाच्या मनात समाधान होतं, पण त्याबरोबरच नव्या मार्गाच्या वाटेवर उभं राहिल्याचंही स्पष्ट भान होतं.
हेही वाचा – अमृतसिद्धी योगावर गुरुजींचा शर्वाय-आराध्याला आशीर्वाद
गुरुजींनी सर्वांना एकत्र बोलावलं, त्यांच्या हातात अक्षता होत्या. त्यांनी प्रेमाने सर्वांवर अक्षता टाकत म्हटलं…
“आजपासून फक्त दोन जीव नव्हे, दोन कुटुंबं एकत्र आली आहेत. शंका, संघर्ष, वाद येतीलच, पण प्रेम आणि विश्वास टिकवणं हीच खरी साधना आहे. पुढच्या मार्गावर सत्याची तलवार आणि प्रेमाची ढाल तुमच्याकडे असू द्या…” म्हणत त्यांनी आशीर्वाद दिला.
गुरुजींच्या चरणी वाकून नमस्कार केल्यावर शर्वाय आणि आराध्या उठले, शर्वायच्या चेहऱ्यावर आता आत्मविश्वास होता, तर आराध्या आता पूर्णतः एक भूमिका स्वीकारल्यासारखी वाटत होती.
दिवाकर यांनी सगळ्यांना एकत्र जमवलं आणि म्हणाले, “आपण इथून वेगवेगळ्या दिशेने जातोय, पण आपली दिशा एकच आहे – माधवच्या प्रत्येक चुकीचं उत्तर शोधणं आणि सगळ्यांना सुरक्षित ठेवणं.”
प्राजक्ता आणि सुशांत यांनी आराध्याच्या डोक्यावरून हात फिरवत तिला आलिंगन दिलं. शांता बाईंच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान लपलं नव्हतं.
गाड्यांचे दरवाजे उघडले… कोणी मुंबईकडे, कोणी आपल्या गावातल्या घरी, तर शर्वाय-आराध्या दिवाकरांसोबत त्यांच्या तात्पुरत्या निवासाकडे, व्हिलाकडे निघाले.
गाडीत बसण्याआधी आराध्याने एकदा मागे वळून त्या मंदिराकडे पाहिलं… गुरुजी अजूनही तिथे उभे होते, डोळ्यांत शब्द रूप न झालेला आशीर्वाद होता.
टेकडीवरील व्हिल्यात आराध्याचं स्वागत
संध्याकाळच्या गार वाऱ्याच्या झुळुकीत, टेकडीवर वसलेला तो व्हिला एक वेगळाच जादुई देखावा घेऊन समोर उभा होता. आराध्या गाडीमधून उतरली तेव्हा, तिचं मन थोडं गोंधळलेलं होतं… पण त्या क्षणी समोरचं दृश्य बघून तिच्या चेहऱ्यावर एक हळवं हसू उमटलं…
मुख्य गेटपासून व्हिल्याच्या दरवाजापर्यंत दोन्ही बाजूंनी ट्युलिप्स, मोगरा आणि चाफ्यांच्या फुलांनी सजलेला छोटासा वेलकम पाथ होता. पायखालची वाळू अगदी नाजूक आणि सुगंधी गुलाबपाकळ्यांनी भरलेली… वाऱ्यावर फडफडणारा शुभेच्छाचा फलक…
आराध्या हळूहळू आत आली… दरवाज्याजवळ शर्वायने हात पुढे केला… त्याला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा थोडासा तणाव निवळला… त्याने पुढे येत आणि तिच्यासमोर एक छोटसा फलक धरला…
“स्वागत आहे… या घरात आणि या नात्यात!”
दिवाकर स्वतः पुढे झाले त्यांनीच दोघांना ओवाळायला ताम्हण आणले… काही झालं तरी आज विधीवत लग्न झाले होते त्यांचे आणि त्यांना ओवाळून घरात घ्यायला शर्वायची आई नव्हती, म्हणून हे त्यांनी स्वतःच केले.
घरात प्रवेश करताच आराध्याला जाणवलं… जेवढं व्हिल्याचं बाह्यसौंदर्य मोहक, तेवढंच आतलं वातावरण उबदार होतं.
कालही ती तिथे आलेली होती, पण कसं कोणास ठाऊक आज व्हिला तिला वेगळा जाणवला… एक वेगळा आपलेपणा… जणू तोही तिचं स्वागत करत होता आनंदाने!
दारातून आत जाताच मंद प्रकाशात मृदंग आणि वाद्यांची सुरावट वातावरणात घुमत होती… व्हिल्यातले सर्वच नोकरी तिच्या स्वागतास आले होते… सर्व स्टाफ विश्वासू आणि सर्वार्थाने प्रशिक्षित होता… सगळ्यांच्या स्वागताचा स्वीकार करून ते पुढे निघाले…
शर्वाय आराध्याला सरळ त्या ग्रीनहाऊस रूममध्ये घेऊन गेला — जिथे तिच्यासाठी खास गार्डन तयार केलेलं होतं.
एका बाजूला त्यांचं एकत्रित असलेलं एक चित्रपटासारखं चित्र — दोघे पावसात, हातात हात… त्यावर लिहिलं होतं :
“कधी वाटलं नव्हतं, आयुष्य इतकं सुंदर होईल… जेव्हा तू हात धरलास.”
ते पाहून क्षणभर आराध्या हळवी झाली… ती काही क्षण शांत राहिली… तिचा हात त्याच्या हातात ठेवत हळूच म्हणाली…
“तुम्ही म्हणाला ना, हे घर केवळ तुझं नाही… आजपासून हे घर आपलं आहे. ही जागा नाही, ही आठवण आहे — आणि मी कायमसाठी इथे राहायला आलेय… तुमच्या मनाच्या घरात.”
शर्वाय फक्त हसला. शब्द नकोसे वाटले जणू… त्या क्षणाला, त्या शांततेला आणि त्या सहवासाला, कोणताही आवाज ओलांडू शकत नव्हता.
आता दोघंही शर्वाय च्या खास खोलीत आले, जिथे काही क्षण फक्त त्यांचे असणार होते. शर्वायने दरवाजा बंद केला… आणि एक निःशब्द शांतता त्यांच्यात उतरली. शर्वाय फक्त तिला पाहत राहिला.
“काय पाहताय असं?” ती खुदकन हसून म्हणाली.
“तुला…” तो शांतपणे म्हणाला, “मी खूप वेळ वाट पाहिली या क्षणाची… तुला माझं म्हणण्याची.”
ती हळूच त्याच्याजवळ आली. त्याने तिचे केस मोकळे केले, कपाळावरचं कुंकू अगदी स्वप्नासारखं भासत होतं. त्याने तिला अलगद तिच्या मानेतून जवळ ओढलं… दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या होत्या… एकमेकांचे उष्ण श्वास चेहऱ्यावर जाणवत होते… एक अनामिक ओढ होती… या क्षणासाठी जणू किती वाट पाहिली होती त्यांनी… तिचा चेहरा आपल्या हातांच्या ओंजळीत धरून तो तिलाच पाहत होता… दोघातलं अंतर कमी होतं गेलं आणि… आसूसले होते ते जीव त्या प्रेमाला… किती काळानंतरचं हे मिलन होतं कुणास ठाऊक… अन् पुन्हा कधी इतकी शांतता मिळणार होती कुणास ठाऊक… दोघंही एकमेकांच्या कुशीत विरघळले.
बाहेर पावसाच्या हलक्याशा थेंबांचा आवाज येत होता… त्याच पावसात दोघांची सावली एक झाली होती… ते एकमेकांना स्पर्श करत होते, पण त्यामागे कुठलाही वासना नव्हती, ते फक्त ‘आपलं’ असण्याच्या भावनेत हरवले होते.
आराध्या त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली, “आपण खूप काही गमावलं आहे शर्वाय… पण आता जे आहे ते मला जपायचं आहे… काळजीपूर्वक, प्रेमाने.”
शर्वायने तिच्या केसांतून हात फिरवला…. “हे क्षण कायमचे असावेत असं वाटतंय… पण मला माहितीये — उद्यापासून खेळ सुरू होणार आहे. तिथे तू फक्त माझी पत्नी नाहीस — तू माझी ताकद आहेस.”
तो क्षण फक्त प्रेमाचा नव्हता… तो होता विश्वासाचा, सामर्थ्याचा आणि एकमेकांना दिलेल्या वचनांचा.
त्या रात्रीच्या त्या शांत खोलीत, एक प्रेमकथा नव्याने सुरू झाली होती — नवे वादळं झेलण्याची तयारी करत… एकमेकांच्या हातात हात देऊन.
तर, इथे त्याच संध्याकाळच्या वेळेत… माधवच्या डेस्कवर पेपरचे ढीग आणि लॅपटॉपचा उजेड दिसत होता. पण त्याचं लक्ष मात्र तिथं नव्हतं… आराध्या आणि शर्वाय दोघंही कुठं गायब आहेत, हे त्याला सलत होतं. त्यांच्या नसण्यामागे काहीतरी गुपित आहे, याची त्याला ठाम शंका होती.
त्याने चटकन फोन उचलला आणि एका ओळखीच्या नंबरवर कॉल लावला – फोन वाजत होता… आणि तिथून फोन उचलला गेला…
“हॅलो, आनंदी…”
आनंदी गोड आवाजात… “हॅलो, माधव बोलतोय का?”
हेही वाचा – शर्वाय आणि आराध्याचा झाला विवाह, पण…
माधव आपलं कसलेलं स्मित करत… “हो आनंदी… तू ठीक आहेस ना? शर्वाय कुठे आहे? बऱ्याच दिवसांनी घरी आलाय म्हणालीस… मग काय, स्थळ पाहण्याचा काही विचार पुढे सारलायस का?”
आनंदी थोडीशी गोंधळून गेली… “हो… म्हणजे, तो भेटला होताच काही दिवसांपूर्वी… पण त्याने काही ठोस सांगितलं नाही.”
माधव काहीसा कुरकुरत…
“असं कसं आनंदी? मी अन्वीचं स्थळ किती विश्वासाने सुचवलं होतं. तूच सांगितलं होतंस ना की, तो ‘हो’ म्हणाला होता?”
आनंदी गोंधळलेली होती, पण स्वतः सावरत म्हणाली…
“हो म्हणाला होता स्थळ पहायला, पण नंतर कामात फार गडबड आहे म्हणाला… आणि त्यानंतर त्याचा फोनही काहीसा दुर्लभ झाला.”
माधवचं मन चुकचुकत होतं. शर्वायचा हेका, आराध्याचं गायब होणं, अन्वीच्या भेटीची अनिश्चितता – या सगळ्या गोष्टी आता त्याच्या मनात गोंधळ माजवत होत्या.
माधव जरा आपला आवाज कठोर करत म्हणाला…
“याचा अर्थ काय घ्यायचा? आपण मूळ विषयावर परत यायला हवं. मी थांबणार नाही, आनंदी. शर्वायनं जर अन्वीला नाही म्हणायचं ठरवलं असेल, तर त्यानं सरळ सांगावं. उगीच असा खेळ मांडू नको.”
आनंदी थोडी अस्वस्थ झाली… “मी त्याच्याशी बोलते पुन्हा… काही कळालं तर तुला सांगते.”
आणि फोन कट करते…
“शर्वाय स्थळ पाहण्यासाठी हो म्हणाला होता… अन्वीशी लग्नाला नाही. त्याला हे जर काही कळलं, तर मग काही खरं नाही… त्याच्या निर्णयात त्याला लुडबूड चालत नाही… उगाच पुन्हा चिडायचा आणि इथे यायला टाळाटाळ करायचा…” आनंदी स्वतःशीच पुटपुटत होती.


