माझी बायको मला वेंधळा म्हणते, हे तर सर्वश्रुत आणि जगजाहीर आहे… आणि मी आहे तसा, हे मी मान्यही केलेलं आहे. असतात काही जण तसे जन्मतःच, त्याला कोण काय करणार? बायको मात्र टेंभा मिरवीत असते… ‘आम्ही गोखले म्हणजे सर्वगुणसंपन्न. इथे गोडबोल्यांकडे येऊन, माती झाली माझ्या गुणांची. कोणाला कौतुकच नाही मुळी आमच्या चटपटीतपणाचं…’ वगैरे वगैरे.
आता आयुष्याची जास्त वर्षे अलीकडच्या बाजूला काढूनही, पलीकडचंच कुरण जर अजूनही हिरवंगार भासत असेल, तर कोण काय करणार त्याला? अर्थात, तिच्या वेंधळेपणाचे बरेचसे किस्से आहेत माझ्या पोतडीत, पण ते सांगून, हात दाखवून अवलक्षण कोण करून घेणार उगाचंच!
पण कधीकधी माझीही सहनशक्ती संपुष्टात येते आणि मग तिच्या वेंधळेपणाचे किस्से फेकतो मी तिच्या तोंडावर. तेवढ्यापुरती बाजी मी जिंकलेली असते, कारण परत लवकरच मी तिच्या तावडीत सापडतोच सापडतो. असा उंदीर मांजराचा खेळ कायम सुरू असतो आमचा.
अलीकडेच असंच झालं. एका मैत्रिणिकडे गेल्या होत्या बाईसाहेब. तिथे कुलकर्णी ब्रदर्सचं, थंडगार पीयूष ढोसून आल्या ग्लासभर आणि मग परिणाम व्हायचा तोच झाला. सकाळी उठल्यावर गले में खिचखिच, बदन में कणकण वगैरे वगैरे. मग डॉक्टरकडे धाव आणि दोन दिवसांच्या लाल-पिवळ्या गोळयांसाठी पाचशे रुपयांची आहुती, विनाकारणच. म्हणजे ते पीयूष केवढ्याला पडलं बघा!
हेही वाचा – स्कूटी, बायको आणि मी…
तर, बाईसाहेब स्कूटीवर मांड ठोकून, गेल्या डॉक्टरकडे आणि येताना स्कूटी तिथेच विसरून, आल्या घरी चालत चालत… वाटेत भेटलेल्या मैत्रिणीशी गप्पा छाटत. आल्यावर किल्लीही लावली जागेवर, नेहेमीप्रमाणे!
ती आल्यावर मलाही जायचं होतं, म्हणून मी किल्ली घेऊन बाहेर पडलो. आमच्या पार्किंगमध्ये जिथे स्कूटी विराजमान असते, तिथे जाऊन बघितलं तर गाडी नाही जागेवर. कुठेतरी दुसरीकडे लावली असेल म्हणून इकडे तिकडे फिरून शोध घेतला, पण स्कूटी काही गावेना… वॉचमनला विचारलं, तेव्हा तो म्हणाला, “मॅडम गाडी घेऊन गेल्या, पण येताना चालतच आल्या.”
मला दिसली संधी… आपदा में अवसर! मी जवळच असलेल्या दवाखान्याशी गेलो आणि आमची स्कूटी दिसली तिथे, अपेक्षेप्रमाणेच. ती घेऊन मी गेलो, ब्राह्मण सभेत पुस्तक बदलायला. तिथूनच तिला फोन केला आणि विचारलं, “स्कूटी कुठाय? दिसली नाही मला कुठे… तुला फोन केला होता लगेच, पण तू उचलला नाहीस, मग मी आपला चालत आलो पुस्तक बदलायला.”
“म्हणजे काय, सोसायटीत नाही स्कूटी? मग कुठे गेली?”
मी म्हणालो, “तूच नेली होतीस ना, मला काय विचारतेस?”
आता तिला आठवलं, “मी दवाखान्यातून चालत आले मैत्रिणीबरोबर. मी बघून येते पटकन, तिथेच असणार, नक्कीच!”
मनाशीच हसत मी तिला म्हणालो, “जा लवकर बघून ये, आहे का तिथे ते…”
गेली बिचारी धावत पळत आणि तिथून मला फोन…
“अरे, नाहीये तिथे. मला वाटतं मी तिथेच ठेवली होती, पण आता काही आठवतच नाहीये मला. कळेनासंच झालंय रे काही, किती वेंधळी मी. डोकं आहे का खोकं माझं…” इत्यादी इत्यादी!
मनात म्हटलं, ‘अब आया ना, उंट पहाडके नीचे?’ स्वतःच मान्य केलं म्हणून ठीक आहे.
मला विचारलं, “आता काय करायचं रे?”
“आरटीओवाल्यांनी नेली असेल उचलून, नाहीतर गेली असेल चोरीला!” मी आणखी पीळ भरला.
आता मात्र फोनमधून हुंदक्यांचा आवाज यायला लागला… “सगळं माझ्यामुळे होतंय. गाडी गेली, तर नवीन घ्यायला लाखभर तरी पडतील.”
मी पण थोडा अभिनय केला… “जाऊदे गं, तू काही मुद्दाम नाही केलंस. मागे नाही का एकदा मंगळसूत्र हरवून आलीस कुठेतरी, तेव्हा केलं की नाही आपण नवीन? तसंच हे… घेऊ आपण नवी गाडी. नको रडूस!”
“नाही, तू लगेच ये. आपण शोधू स्कूटी, नाहीतर पोलिसांत तक्रार करू… कष्टाचा पैसा आहे आपला, नक्की मिळेल आपली गाडी.”
मला फुटणाऱ्या उकळ्या कशातरी आवरत, मी गांभीर्याचा आव आणून म्हणालो, “थांब तिथेच. आलोच रिक्षा करून.”
हसतहसत स्कूटी सुरू केली आणि निघालो. दवाखान्याजवळ पोहोचल्यावर ती दिसली. दोन्ही हातात गच्च डोकं धरून, अश्रू ढाळत बसलेली माझी बायको!
थेट तिच्यासमोर नेऊन उभी केली गाडी आणि जोरात हॉर्न वाजवला. तिच्याच स्कूटीवर मला बघून आश्चर्याचा धक्का तिला आणि मग प्रश्नांची सरबत्ती… हसणाऱ्या मला बघून, तिला सगळा उलगडा झाला आणि मग अश्रू ढाळणाऱ्या तिचं, चंडिकेत रूपांतर झालं!
हेही वाचा – एका केरसुणीची कहाणी…
नेहेमीच्या, शेलक्या विशेषणांचा भडिमार झाला आणि “किती घाबरवलंस मला, मला तर काही सुचतच नव्हतं रे,” म्हणत परत अश्रुपात सुरू झाला… “नको करूस अशी जीवघेणी थट्टा परत, माझी शपथ आहे तुला…” म्हणत, “आज शिक्षा आहे तुला, मला रडवलंस म्हणून! माझा स्वयंपाक नाही झालेला अजून या भानगडीत. बाहेर ने आता जेवायला मला.”
मी काय, तयारच होतो, न केलेल्या अन्यायाचं परिमार्जन करायला!
बाहेर जाऊन मनसोक्त खादाडी करून आलो, पण मी एक वेंधळा तर तू सात वेंधळी, हे तिच्यापर्यंत पोहोचवण्यात मात्र मी नक्कीच यशस्वी झालो होतो, नाही का?


