दिप्ती चौधरी
मॅग्नोलिया एक राजस फुल! मला मॅग्नोलिया पहिल्यांदा दिसलं, ते श्रीनगरच्या शालिमार बागेत. वसंत ऋतूत फुलून आलेल्या श्रीनगरच्या शालिमार बागेत एका फुलाने माझे चित्त वेधले. हे फुल मी आधी कधीच कुठे बघितले नव्हते. खरेतर, पहिल्यांदाच इतके मोठे फुल मी बघत होते. नितळ हस्तिदंती रंगाचे, ओंजळीत मावणार नाही इतके मोठे हे सुरेख देखणे फुल! अगदी धुंद करणारा, मादक पण मंद सुगंध… आणि झाडही किती देखणे, गर्द हिरव्या रंगाची सुबक पाने, एका बाजूने अगदी तेल लावून तुकतुकीत केल्यासारखी चमकणारी आणि मागच्या बाजूला चॉकलेटी रंगाचे मखमली अस्तर असलेली. मॅग्नोलियाचे एकंदर रूपडे राजस देखणे तरीही अत्यंत सात्विक… पाहता क्षणीच त्या झाडाच्या आणि फुलाच्या मी प्रेमात पडले!
त्याचे नाव शोधले आणि कळले की, हे तर मॅग्नोलिया. भारताच्या इतर कुठल्याही भागात हे झाड कधी दृष्टीस पडले नव्हते. जरी थंड हवेच्या ठिकाणी वाढणारे झाड असले, तरीही सिक्कीम, दार्जिलिंग किंवा हिमाचल प्रदेशमध्येही हे झाड दिसले नव्हते, अगदी जम्मूतही मी ते झाड कुठे पाहिले नाही. पुन्हा ते झाड कुठे दृष्टीस पडले नाही, पण मनात मात्र राहून गेले.
काही वर्षांनी हे झाड पुन्हा मला दिसले, ते ह्यूस्टन टेक्सासमध्ये. अमेरिकेतील पहिलीच सकाळ, आमच्या नवीन घरी जाण्यासाठी उत्सुकतेने आम्ही आमच्या गल्लीत शिरलो आणि पहिल्याच घराच्या अंगणात उभी होती, मॅग्नोलियाची दोन मोठी झाडे. त्या नव्या प्रदेशात, नव्या जगात कोणीतरी आवडीचं जुनं मैत्र भेटल्यासारखे वाटले. उत्सुकता होती की, आमच्या घराच्या अंगणात ही झाडे आहेत का? पण आमच्या घराच्या अंगणात जरी नसली, तरी गल्लीत असलेल्या या झाडांचं मला कोण कौतुक वाटत होतं… आणि थंडी सरताच वसंत ऋतूमध्ये त्या झाडांचा बहर बघून मी पुन्हा नव्याने मॅग्नोलियाच्या प्रेमात पडले.
हेही वाचा – मनात बहरलेला गुलमोहर!
वर्षभराचा ह्यूस्टनमधला मुक्काम आटपून आम्ही जेव्हा ऑस्टिनला मुक्काम हलवायचे ठरवले, तेव्हा आम्हाला स्वतःचे घर विकत घ्यायचे असल्याने त्या घराची खूप उत्सुकता होती. तो काळ कोरोनानंतरचा लगेचचा असल्यामुळे अजूनही वर्क फ्रॉम होम जोरात चालले होते आणि उत्तरेकडील थंड आणि महागड्या अमेरिकेतील राज्यातून खूप जण गरम टेक्सासमध्ये स्थलांतरित होत होते… विशेष करून, ऑस्टिनमध्ये तर मालमत्ता बाजाराच्या किमती भलत्याच तेजीत चालल्या होत्या. बाजारभावापेक्षा पण कितीतरी जास्त बोली लावून घरे खरेदी-विक्री केली जात होती. दर आठवड्याला नवीन लिस्ट झालेली घरे बघून त्यातील आवडणारी आणि परवडणारी घरे बघण्यासाठी शनिवार-रविवारी ऑस्टिनला फेरी व्हायची. पण बाजार इतका तेजीत होता की, काही घरे सोमवार-मंगळवारी लिस्ट होऊन शनिवार-रविवारपर्यंत विकली गेलेली असायची किंवा त्यांच्या बोली अव्वाच्या सव्वा भावाने चढवून विकायला आली असायची. या अशा चढाओढीच्या बाजारात आपला निभाव कसा लागणार याची आम्हाला चिंता पडली होती.
अशाच एका शनिवारी दिवसभर दहा घरे बघून झाल्यानंतर एक घर बघायचे राहिले होते. आम्ही शॉर्टलिस्ट केलेल्या घरांपैकी त्याचा नंबर अगदी शेवटी होता. थकल्यामुळे आता हे घर बघायला जायचे की नाही, याबद्दल आम्ही विचार करत असतानाच आमची मालमत्ताविषयक मध्यस्थ आम्हाला म्हणाली, “अरे हे घर काही महिने झाले लिस्टेड आहे.” आता अशा चढाओढीच्या बाजारात हे घर इतके महिने विकले गेले नाही म्हणजे काहीतरी गडबड असेल, असा मला संशय आला. तेव्हा मला माझी मध्यस्थ म्हणाली, “अगं, असं असेलच असं नाही; कारण हे घर ओपन डोअरचे आहे आणि हे घर नवीन आहे म्हणजे चांगले असावे… आपण जाऊन बघूया.”
‘ओपन डोअर’ ही कंपनी असल्यामुळे ती खरेदीदाराच्या मध्यस्थला जास्त कमिशन देत नाही आणि म्हणूनच सहसा मध्यस्थ ही घरे दाखवत नाहीत. पण आमची मध्यस्थ मात्र आम्हाला चांगलं घर मिळत असेल तर, तेच उत्तम म्हणून आम्हाला खेचून दाखवायला घेऊन गेली. घरासमोर उतरताच घराचा दर्शनी भाग तर आवडलाच, पण त्याहीपेक्षा माझं लक्ष वेधलं कोपऱ्यात उभ्या असलेल्या मॅग्नोलियाने. झाड अगदी मरतुकडे होते, पण अंगणात मॅग्नोलिया आहे, हाच जणू मला शुभ संकेत वाटला. घर बरेच महिने रिकामे असल्यामुळे पुढच्या मागच्या अंगणातील साऱ्याच झाडांची वाट लागली होती. पण आम्हा सर्वांचा जीव मात्र त्या मॅग्नोलियात अडकला होता.
राहायला आल्यानंतर आम्ही त्या मॅग्नोलियावरती खूप मेहनत घेतली. तीन बाजूंनी लोखंडी सळ्याना दोऱ्या बांधून त्या झाडाला आधार द्यायचा प्रयत्न केला होता. पण झाड मात्र अगदीच मरतुकडे होते जेमतेम काही पाने होती आणि कसेबसे तग धरून उभे होते. त्या झाडाला भरपूर पाणी खत घालूनही ते झाड हवे तसे जोम धरत नव्हते. झाडाच्या मुख्य बुंधाच टोकाशी तुटला होता. त्यामुळे ते झाड वरती वाढतच नव्हते. एकदा अशीच त्या झाडासमोर काय करावे असा विचार करत मी उभी असताना आमच्या शेजारची नव्वदी पार केलेली इरीन आजी माझ्याजवळ आली. कदाचित, माझी काळजी तिने ओळखली असावी, त्या झाडाच्या पानावर हात फिरवत मला म्हणाली, “अगं, इथे तुझ्या आधी जी रहात होती ना, तिला झाडापानांची खूप आवड होती. इकडे तिचं एक आवडतं झाड होतं, त्यामुळे जेव्हा ती हे घर सोडून गेली, तेव्हा तिने तिचा आवडतं झाडही मुळापासून उपटून नवीन घरी लावायला नेलं… आणि त्या जागी हे झाड ती खुपसून गेली”
अमेरिकेतील निवासी गृह संकुलांमध्ये सहसा नियम असतो की, तुमच्या अंगणात किती आणि कुठे मोठी झाडे असावी. त्यामुळे तिने जेव्हा तिचं आवडतं झाड नेलं, तेव्हा तिथे नियमाप्रमाणे कुठलं तरी मोठं, वाढलेलं झाड लावणं तिला भाग होतं, म्हणून तिने नर्सरीमधून हे एक मोठं झाड आणून लावले होते. पण हे घर तिच्यानंतर रिकामे राहिल्याने या झाडाची कुठलीच काळजी घेतली गेली नव्हती आणि मधेच आलेल्या हिमवादळाने त्याची पार रया घालवली होती. आजीलाही त्या झाडाबद्दल वाईट वाटत होते.
वसंत ऋतूत जेव्हा आजूबाजूचे मॅग्नोलिया फुलांनी बहरून जात होते, तेव्हा आमच्या मॅग्नोलियाला मात्र पहिल्या वर्षी जेमतेम एक खुरडलेलं फूल आले आणि नंतर दोन वर्षं तर एकही फुल आलेच नाही. दरवर्षी निगुतीने पाणी घालून खत घालूनही आमचा मॅग्नोलियाला नंतरही फक्त नवसा-सायसाची दोन-तीन फुले यायची. आम्हाला तीही फार अप्रूपाची होती. त्या निष्पर्ण मॅग्नोलियाच्या झाडाला आता छान पाने आणि फांद्या फुटल्या होत्या. त्याही मला इतक्या कौतुकाच्या होत्या की, मी त्यांना अजिबात कापत नव्हते. पण मागच्या वर्षी मात्र इरीन आजीने येऊन मला पुन्हा तिच्या खास अमेरिकन शैलीत सुनावले, “मी तुझ्या जागी असते ना, तर ही टाळा कडची, खालची पाने आणि फांद्या छाटून टाकल्या असत्या म्हणजे हे झाड वरती खूप छान वाढेल…” शेवटी मनावर दगड ठेवून मी मॅग्नोलियाची काही खालची पाने आणि फांद्या यांची छाटणी केली आणि इरीन आजीची मात्रा अगदी बरोबर लागू पडली! यावर्षी मात्र आमचा मॅग्नोलिया भरपूर कळ्यांनी बहरून गेला. आम्हा सर्वांचाच आनंद गगनात मावत नव्हता.
फुलांनी फुलायला सुरुवात केली आणि नेमकीच कामानिमित्त बाहेरगावी राहणारी माझी लेक सुट्टीसाठी म्हणून घरी आली. मॅग्नोलियाचा बहर पाहायला मिळणार म्हणून आम्ही आणि तीही खूप खूश होतो. घरातल्या एकाच खोलीच्या खिडकीतून हा मॅग्नोलिया दिसतो आणि ती खिडकी म्हणजे माझ्या मुलीच्या खोलीची असल्याने हिचे त्या मॅग्नोलियावरती नेहमीच बारीक लक्ष असे. घरी पोहोचल्याबरोबर आत शिरण्याआधीच, पहिले तिने झाडाभोवती गोल गोल फिरून कळ्या आणि फुले मोजली. खुशीत येऊन मी तिला म्हटले, “चला शेवटी आपला मॅग्नोलियाही आता बहरला!” चेहरा गंभीर करून ती थोडीशी हसली आणि मला म्हणाली, “आई, तुला माहीत आहे, मी जेव्हा जेव्हा खिडकीतून हा मॅग्नोलिया बघायचे, तेव्हा तेव्हा जणू तो मला आपलेच रूपक वाटायचा. नवीन जागी नवीन मातीत रुजण्याचा, स्थिरावण्याचा संघर्ष करणारा मॅग्नोलिया.”
वडिलांच्या नोकरीनिमित्त दर वर्षादोन वर्षात शाळा बदलत जीवन घालवलेल्या माझ्या मुलीइतका नवीन जागी स्थिरवण्याचा संघर्ष कुणाला माहीत असणार? आता तर ती देशही बदलून वेगळ्या भूमीत आली होती… आणि एक वर्ष ह्यूस्टनच्या युनिव्हर्सिटीत स्थिरावता स्थिरावताच, तिने ऑस्टिनच्या युनिव्हर्सिटीत स्थलांतर केले होते. ज्या संघर्षातून तो मॅग्नोलिया जात होता, त्याच संघर्षातून आम्ही सारेच जणू जात होतो… त्यातही विशेषतः, ती! नवीन जागी, नवीन मातीत रुजण्याचा स्थिरावण्याचा आपले अस्तित्व टिकवण्याचा संघर्ष!!
म्हणूनच पाच वर्षांनी जेव्हा आमचा मॅग्नोलिया फुलांनी डवरला, तेव्हा आम्हा सर्वांनाच त्याचा प्रचंड अभिमान आणि आनंद वाटला. मुख्य बुंधा तुटल्याने ते झाड उंच जाऊ शकत नव्हते, पण तळातून एक फांदी जोमाने वर झेपावली आहे आणि तीच आता मुख्य खोड असल्यासारखी तुटलेल्या शेंड्याच्या वर गेली आहे! पण तरीही वयाच्या मानाने आमचे झाड सुबक ठेंगणे याच सदरात मोडेल!
रस्त्यावरून जाणारे काही जण या बुटक्या झाडाकडे कौतुकाने बघत. ज्यांच्याकडे मॅग्नोलियासारखे सुंदर झाड परसात नव्हते, ते थोडे आसुयेनेही बघत असतील… ज्यांच्याकडे याहूनही सुंदर आणि मोठे झाड असेल, ते कदाचित, यात काय एवढे मोठे म्हणून कुत्सितपणेही हसत असतील. काहीजण उगीचच त्या झाडातील उणेही शोधत असतील. ज्याची जशी धारणा, नजर तसे त्याचे त्या झाडाबद्दल मूल्यमापन असेल. पण ते बरोबर असेलच का?
हेही वाचा – रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…
पण यापैकी कुणालाही त्या मॅग्नोलियाचा संघर्ष माहीत नाही. नर्सरीतील अतिशय निगुतीने कित्येक वर्षे कुंडीत वाढवले गेलेलं रोपटे अचानक वाळवंटातल्या उघड्या आकाशाखाली आणून दुर्लक्षित झाले. टेक्सासच्या अतिशय विषम हवामानात त्याची कुणीही काळजी घेतली नव्हती. अत्यंत कोरड्या आणि तापलेल्या उन्हाळ्यात त्याला कोणी पाणी घातले नव्हते, की हिमवादळात संरक्षण दिले नव्हते. त्या प्रतिकूल परिस्थितीत झगडताना त्याची तगमग कुणाला दिसली नव्हती. नवीन जागी, नवीन मातीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी दिलेला लढा कोणी पाहिला नव्हता… आणि म्हणूनच या सर्वांवर मात करून हा बहरलेला मॅग्नोलिया आम्हा सर्वांसाठीच हळवा विषय आहे. भविष्यात आम्ही या घरात असो किंवा नसो पण हा मॅग्नोलिया मात्र दरवर्षी असाच बहरत राहो. इतरांनी त्याचे मूल्यमापन कसेही केले तरी आमचा मॅग्नोलिया खरा लढवय्या आहे!


