नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
वाजत गाजत बाप्पा आले… दीड दिवसांचे माघारी गेले… गौराई आल्या… पाच दिवसांचे बाप्पा गावाला गेले… यंदा गौरी-गणपती सहा दिवस होते. सहाव्या दिवशी बाप्पा आपल्या आईसोबत कैलासावर निघून गेले. सातव्या दिवसाचे पण गेले… आणि अनंत चतुर्दशीला ‘पुढल्या वर्षी लवकर’ येण्याचं आश्वासन देऊन बाप्पा त्यांच्या घरी गेले सुद्धा. बाप्पाचे मखर, संपूर्ण घर कसं ओकंबोकं झालं!
लहानपणीचा एक प्रघात होता. आमच्या घरचे बाप्पा गेले की, दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावर कपडे बदलून चहा पिऊन पटापट अभ्यास उरकायचा. जेवून तयार व्हायचं आणि सार्वजनिक गणपती बघायला निघायचं. सगळ्या खेतवाड्यांचे, कुंभार वाड्याचा, कॉटन ग्रीन, भायखळा, लालबागचे सार्वजनिक गणपती बघायला निघायचं… आणि टॅक्सी काय, बसने सुद्धा घरचे न्यायचे नाहीत. अगदी तंगडतोड… सुरुवातीला थोड बरं वाटायचं, नंतर मात्र खूप राग यायचा सगळ्यांचा! असं वाटायचं की, यांची हौस होतेय आणि आमची फरफट!! कितीतरी चाळकऱ्यांचे झुंबडच्या झुंबड ट्रकमधून देवदर्शनासाठी यायचे.
हेही वाचा – जीएसबी गणपतीची भव्यता अन्…
मंडपात चलतचित्र देखावे असायचे. ऐतिहासिक, पौराणिक किंवा राजकीय परिस्थितीवर बेतलेले. मंडळांमध्ये चढाओढ असायची, देखाव्यासाठी! अलीकडे बरीच मंडळं जिवंत देखावे करतात. कलाकार लोकांना ॲक्टिंग करायला लावतात, असं मी ऐकलंय. मी काही जिवंत देखावे अजून तरी पाहिले नाहीयेत. आमच्या गिरगावात मुगभाटात भुताच्या चाळीत एक इंची गणपती म्हणजे केवढे मोठे आकर्षण. माझ्या भावाच्या मित्राचे वडील कामतेकर ती मूर्ती बनवायचे. प्रचंड लाइन लागायची तो बाप्पा बघायला! पण आता मात्र त्या दिवसांची आठवण येते… नाही म्हणायला खूप मज्जा असायची तेव्हा. लहान होतो, दमायचो, थकायचो. दुसऱ्या दिवशी शाळेत पण जायचं असायचं…
हेही वाचा – शूटिंगच्या सेटवरील भाज्यांचं करतात काय?
सार्वजनिक गणपती आजही अगदी जोर-शोरमध्ये बसवले जातात. पण माझ्या लहानपणीची मज्जा नाही राहिली… मी तरी कुठे लहान राहिलीय? आता फक्त चढाओढ आणि धंदेवाईक वातावरण वाढलंय. काही मंडळ मात्र बाप्पाला येणाऱ्या पैशांनी समाजसेवा करतात. चांगले उपक्रम राबवतात. गल्लाभरू सोहोळा करण्यापेक्षा सेवाभावी कार्यक्रम राबवावेत. तर, बाप्पा पण खरोखर प्रसन्न होईल!
गणपती बाप्पा मोरया… पुढल्या वर्षी लवकर या…
गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला…


