Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सुधाकररावांचा सन्मान

    September 23, 2026

    सुमन आणि राधा…

    September 23, 2026

    पहिली आरती

    September 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, September 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सुधाकररावांचा सन्मान
    ललित

    सुधाकररावांचा सन्मान

    दीपक तांबोळीBy दीपक तांबोळीSeptember 23, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, दीपक तांबोळी, लेखक दीपक तांबोळी, बदल, पुस्तकाची प्रस्तावना, नवोदित लेखक चेतन शेलार, नवोदित कथालेखक चेतन शेलार, ज्येष्ठ साहित्यिक सुधाकरराव शिर्के, सुधाकरराव मालती शिर्के, कवयित्री आरती छाबरीया
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    उत्तरार्ध

    पांडुरंग माळी सरांच्या सांगण्यावरून चेतन शेलार प्रसिद्ध लेखक सुधाकरराव शिर्के यांच्याकडे आला होता. त्याने लिहिलेल्या कथांसाठी त्याला सुधाकररावांकडून प्रस्तावना हवी होती. पण सुधाकरराव नवोदितांच्या प्रस्ताव देत नसत. पण माळी सरांकडून चेतन आल्याने त्यांनी त्याच्या कथा ठेवून घेतल्या. पांडुरंग माळी त्यांचे बालपणीचे जिवलग मित्र.

    आठवडा उलटून गेला तरी सुधाकररावांनी चेतनच्या कथांकडे ढुंकूनही पाहिलं नाही. नवख्या लेखकाच्या कथा कचऱ्यात टाकायच्या लायकीच्याच असतात, असं त्यांना वाटत होतं. आठव्या दिवशी आलिशान गाडीतून छाबरीया इंडस्ट्रीजची चेअरमन आरती छाबरीया आली आणि तिने आपल्या नव्या कवितासंग्रहासाठी सुधाकरराव यांना प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली आणि 25 हजार रुपयांचा चेक त्यांनी मानधन म्हणून दिला. आपल्या मॅरेज ॲनिव्हर्सरीला ते पुस्तक प्रकाशित करण्याचा तिचा मानस होता. पुस्तक प्रकाशनाला मुख्यमंत्री येणार होते आणि त्यांच्या हस्ते सुधाकररावांचा सत्कार करण्याचे आमिषही तिने दाखविले.

    सुधाकररावांचा चेहरा आनंद आणि समाधानाने फुलला. त्यांनी लगेच प्रस्तावन देण्यास होकार दिला. रात्री जेवण झाल्यावर सुधाकररावांनी उत्सुकतेने ती कवितांची फाइल काढून एकेक कविता वाचायला सुरुवात केली. फक्त अर्ध्या तासात त्यांनी त्या 56 कविता वाचून पूर्ण केल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की, त्या सर्वच कविता रद्दीत फेकून देण्यासारख्या आहेत. त्यांना त्या बाईचा आणि स्वतःचाही संताप आला. अशा फालतू पुस्तकाला आपल्यासारख्या एका ‘पद्मश्री’ प्राप्त लेखकाने प्रस्तावना द्यावी, हे काही त्यांना पटेना. पण प्रश्न व्यवहाराचा होता. बाईंनी दोन पानाच्या प्रस्तावनेला पंचवीस हजार मोजून त्यांचा स्वाभिमान आणि त्यांची तत्वं विकत घेतली होती.

    त्यांनी नाईलाजाने लॅपटॉप पुढे ओढला. मोठ्या अनिच्छेने त्या रद्दी कवितांची आणि मोठी उद्योजिका असूनही कवीमन जपणाऱ्या आरती छाबरीयाची तारीफ करणारी प्रस्तावना त्यांनी तयार केली. झाल्या प्रकाराने सुधाकरराव स्वतःवरच नाराज होते. नवख्या लेखकांना आता कोणत्याही परिस्थितीत प्रस्तावना लिहून द्यायची नाही, हे त्यांनी ठरवून टाकलं!

    चार-पाच दिवसांनी पांडुरंग माळींचा फोन आला. चेतनच्या कथा वाचल्या की, नाही हे विचारत होते.

    सुधाकररावांनी ‘नाही’ सांगितल्यावर ते नाराज झाले. एक-दोन दिवसांत तरी प्रस्तावना तयार ठेव, अशी विनंती केली. त्यांच्या समाधानासाठी सुधाकररावांनी मनाविरुद्ध होकार दिला. दुपारी जेवण झाल्यावर टेबलवर केविलवाण्या अवस्थेत पडलेल्या त्या कथा पाहून त्यांनी त्या सहज वाचायला सुरुवात केली. पहिली कथा वाचली, दुसरी वाचली, तिसरी वाचली… म्हणता म्हणता सहा कथा वाचून झाल्या तरी त्यांना शुद्ध नव्हती. मालतीताईंनी चहासाठी जोरजोरात हाका मारल्या, तेव्हाच ते भानावर आले. भानावर येताच त्यांना पहिली जाणीव झाली की, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहताहेत. या कथांनी आपल्याला रडवलं, यावर त्यांचा विश्वास बसेना! “बापरे, काय अप्रतिम कथा आहेत या. त्या पंचवीशीच्या पोराने लिहिल्या आहेत, असं वाटतच नाही. कुठून आली इतक्या लहान वयात एवढी प्रगल्भता!” ते पुटपुटले.

    हेही वाचा – सायकल… अपराधीपणाच्या भावनेतून सुटका!

    दुसऱ्या दिवशी त्यांनी उरलेल्या दहा कथा न थांबता वाचून काढल्या. “अप्रतिम!” त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला. म्हणूनच पांडुरंगाने त्या पोराला आपल्याकडे पाठवलं, उगीचच आपण त्या पोरावर उखडलो… त्यांना छाबरीयाबाईंची आठवण झाली. त्या बाईंच्या सौंदर्यामुळे, तिने दिलेल्या पैशामुळे आणि एकंदरीतच राजदरबारी तिचं वजन पाहून आपण खोटी प्रस्तावना लिहून दिली, याचा त्यांना प्रचंड विषाद वाटला.

    या पोराला आता प्रस्तावना लिहून दिलीच पाहिजे, या विचाराने त्यांनी लॅपटॉप सुरू केला. काही वाक्यं लिहिली आणि एका विचाराने ते थबकले. “चेतनचं हे पुस्तक बाजारात आलं की, त्याला पुरस्कार मिळाल्याशिवाय रहाणार नाही. त्यातून आपली प्रस्तावना म्हणजे या कथासंग्रहाला भरपूर प्रसिद्धी मिळणार! एका नवख्या कथाकाराने नामवंत लेखकांना मागे टाकलं, असं तर होणार नाही? साहित्य अकादमीसारखा पुरस्कार जर मिळाला तर चेतनसारखा तरुण हवेतच उडेल. एका गावात राहून सगळे मानसन्मान त्यालाच मिळतील. कोणताही साहित्यविषयक कार्यक्रम असला की, त्यालाच बोलावलं जाईल. मग आपल्यासारख्या जुन्या साहित्यिकांना कोण विचारतंय?”

    या विचारासरशी ते अस्वस्थ झाले. त्यांनी लॅपटॉप बंद करून टाकला.

    “या जिल्ह्यात आपल्यासारखा नामांकित लेखक दुसरा कुणीच नाही. पुण्या-मुंबईकडचे मोठे लेखक त्याच्यासारख्या नवोदित लेखकाला प्रस्तावना देणं शक्यच नाही. आपण जर प्रस्तावना दिली नाही, तर तो कुठल्यातरी सामान्य लेखकाची प्रस्तावना घेईल. अर्थातच, पुस्तकाचा प्रभाव कमी होईल आणि पुरस्कारांची शक्यता देखील कमी होईल.”

    विचार करून सुधाकररावांना थकवा आला. कौतुकाची जागा आता मत्सराने घेतली होती. त्यांना स्वतःला वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी पहिला पुरस्कार मिळाला होता. तोपर्यंत त्यांचे सहा कथासंग्रह, अकरा काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते. चेतनच्या पहिल्याच पुस्तकाला पुरस्कार मिळू नये, कमीतकमी त्यात आपला हात असू नये, या विचारासरशी त्यांनी निर्णय घेतला… “बस! चेतनच्या पुस्तकाला प्रस्तावना द्यायची नाही. मग पांडुरंगाने कितीही आग्रह केला तरीही!”

    रात्री मालतीताईंसोबत जेवण करत असताना चेतनचा फोन आला.

    “सर झाली का प्रस्तावना लिहून?”

    “नाही चेतन… सॉरी! मला कथा आवडल्या नाहीत. म्हणून मी लिहिली नाही. तू उद्या येऊन तुझ्या कथा परत घेऊन जा.”

    क्षणभर शांतता पसरली. चेतनला त्यांचा निर्णय पचवणं अवघड झालं असावं. मग परत त्याचा आवाज ऐकू आला…

    “सर, तुमच्या परिचयाचे दुसरे लेखक असतील तर त्यांचं नाव सुचवाल?”

    “खूप लेखक पडले आहेत. माळी सरांना विचार ते सांगतील.”

    “ठीक आहे सर. उद्या मी मुंबईला जातोय. परवा येऊन कलेक्ट करतो सर…”

    “ओके…” म्हणून त्यांनी फोन ठेवला, तेव्हा मालतीताई त्यांच्याकडे आश्चर्याने पहात होत्या.

    “काय म्हणालात? तुम्हाला त्या कथा आवडल्या नाहीत? अहो, काल दुपारी तुम्ही जेव्हा चहाला आलात, तेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. नक्कीच तुम्ही त्या चेतनच्या कथा वाचूनच रडला होतात, अशी माझी खात्री होती. कारण, त्या कथा मी सुद्धा वाचल्या आणि माझीही स्थिती तुमच्यासारखीच झाली. फारच सुंदर, अप्रतिम कथा आहेत आणि तुम्ही म्हणता त्या आवडल्या नाहीत, कमाल आहे!”

    “मालती तू फक्त वाचक आहेस, मी साहित्यिक आहे. कोणत्याही पुस्तकाला प्रस्तावना द्यायला मला शंभर वेळा विचार करावा लागतो.”

    “हो? मग त्या छाबरीयाबाईंच्या पुस्तकाला प्रस्तावना देताना तुम्ही एकदाही विचार केलेला दिसत नाही.”

    “म्हणजे?”

    “कसल्या फालतू कविता होत्या त्या! मी वाचल्या होत्या. मला तर वाटलं होतं, तुम्ही पंचवीस हजाराचा चेकही परत करून प्रस्तावना द्यायला नकार द्याल. तुम्ही तर एका झटक्यात प्रस्तावना लिहून दिलीत. चेतन तुम्हाला पैसे देणार नाही म्हणून तुम्ही त्याला ‘नाही’ सांगितलं का?”

    “नाही तसं नाही. चेतनची तीन-चार पुस्तकं असती तर, विचार केला असता,” सुधाकरराव खालच्या स्वरात म्हणाले. मालतीताईंची नजर ते टाळत होते.

    “समजलं मला, तुम्ही का नाही म्हणताय ते! चेतनसारख्या नवख्या आणि तरुण लेखकाच्या पुस्तकाला मोठमोठे अवॉर्ड्स मिळाले तर, तुमची किंमत कमी होईल असंच ना?”

    सुधाकरराव चूप बसले. मालतीताईंनी त्यांचा वीक पॉइंट बरोबर हेरला होता.

    हेही वाचा – थ्रिल… आयुष्याला कलाटणी देणारं!

    “अहो, तुम्हाला काय मिळायचं राहिलंय? पुरस्कारांनी कपाटं भरली आहेत. अनेक साहित्य संमेलनात तुमचा गौरव झालाय… आणि इथे माणसाच्या जीवनाची शाश्वती नाही. नियतीच्या एका फटक्यात होत्याचं नव्हतं होऊन जातं. तिथे मी मोठा, माझे मानसन्मान महत्त्वाचे, असं करून कसं चालेल? अनेक मोठे साहित्यिक आले आणि काळाच्या पडद्याआड गेले. काय मागे राहिलं, तर फक्त त्यांच्या आठवणी! या मधूर आठवणींसाठी लागते ती तुमची चांगली वर्तणूक आणि नम्रपणा. गेल्या काही वर्षांपासून मी पहातेय, तुम्ही फार गर्विष्ठ झाले आहात. माझ्यासारखा महान मीच, अशी तुमची समजूत झालीये. आता गरज आहे ती चेतनसारख्या तरुण लेखकांना प्रोत्साहित करण्याची. त्यांना मार्गदर्शन करण्याची. पुढेमागे जर त्याला पुरस्कार मिळालेच, तर ते पुरस्कार तुम्हाला अर्पण करायला तो मागेपुढे पहाणार नाही. त्यावेळी तुम्हाला मिळणारा सन्मान नेहमीच्या सन्मानापेक्षा कितीतरी पट मोठा असेल. बघा विचार करा…”

    सुधाकरराव काही बोलले नाहीत. उठून त्यांनी हात धुतला आणि टीव्ही बघायला बैठकीत गेले.

    दोन दिवसांनी चेतन कथा परत न्यायला आला. मालतीताई तिथेच पुस्तक वाचत बसल्या होत्या. चेतनला त्यांनी बसायला सांगितलं. त्याचा उदास चेहरा पाहून त्यांच्या ह्रदयात कालवाकालव झाली. सुधाकरराव उठले, आतल्या खोलीत जाऊन त्यांनी त्याच्या कथांची फाइल आणली.

    “या तुझ्या कथा आणि ही प्रस्तावना!” सोबत दोन टाईप केलेले कागद त्याला देत ते म्हणाले.

    “प्रस्तावना?” चेतनने चमकून त्यांच्याकडे पाहिलं… “सर, तुम्ही तर नाही म्हणाला होतात ना?”

    मालतीताईही त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागल्या. सुधाकररावांनी स्मित केलं आणि म्हणाले,

    “चांगली की, वाईट ते तरी बघ!”

    चेतन परत धास्तावला. त्याने ती प्रस्तावना वाचायला सुरुवात केली. जसजसा वाचत गेला तसतसा त्याचा चेहरा आनंदाने खुलत गेला. वाचून संपवल्यावर तो हर्षातिरेकाने ओरडला,

    “सर! धन्यवाद सर… खूप छान प्रस्तावना दिलीत…” आणि एकदम उठून त्याने त्यांचे पाय धरले. त्यांनी त्याला उचलून जवळ घेतलं.

    “अरे, मी तुझी गंमत करत होतो. फार अप्रतिम कथा आहेत तुझ्या! वाचताना सारखे डोळे भरून येत होते. कुठून शिकलास इतकं सुरेख लिहायला?”

    “सर, तुमची पुस्तकं वाचूनच मला प्रेरणा मिळत गेली.”

    मालतीताई आणि सुधाकररावांनी एकमेकांकडे पाहिलं. मालतीताई बरोबरच म्हणत होत्या. कुणाला सन्मान दिला की, त्याचं श्रेय आपल्यालाच मिळतं.

    “कुठे देणार आहेस पुस्तक प्रकाशनाला?” मालतीताईंनी चेतनला विचारलं.

    “इथेच बघूया. पुण्या-मुंबईकडचे प्रकाशक तर काही तयार होणार नाहीत.”

    “त्याची काळजी नको चेतन,” सुधाकरराव मधेच म्हणाले, “मी मुंबईच्या एका प्रसिद्ध प्रकाशकाला तुझ्या कथा ईमेलने अगोदरच पाठवून दिल्या आहेत. माझी प्रस्तावना आहे म्हटल्यावर तो लगेच तयार झाला. एका महिन्यात मिळेल आपल्याला पुस्तक.”

    “सर तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही.”

    “नकोच मानू… अशाच सुंदर सुंदर कथा लिहित जा.”

    मग मालतीताईंकडे पहात ते म्हणाले, “अहो, जरा चहा करा ना. उगवत्या साहित्यिकांचं स्वागत करायला नको का?”

    मालतीताईंनी समाधानाने नवऱ्याकडे पाहिलं. सुधाकररावात झालेला बदल त्यांना सुखावून गेला.

    (ही कथा माझ्या ‘रंग हळव्या मनाचे’ या पुस्तकातील आहे.)
    Avatar photo
    दीपक तांबोळी

    निवृत्त रेल्वे अभियंता. 2018पासून लेखनास सुरुवात केली. आतापर्यंत 6 कथासंग्रह आणि 1 संपादित कथासंग्रह प्रकाशित. 8वा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्य संस्थांचे 35 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

    Related Posts

    सुमन आणि राधा…

    September 23, 2026 ललित

    पहिली आरती

    September 23, 2026 ललित

    बिस्किटं… दोन कोटींची!

    September 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सुमन आणि राधा…

    By डॉ. विवेक वैद्यSeptember 23, 2026

    पूर्वार्ध मी मुंबईत विंग्ज (Wings) या खासगी हॉस्पिटलला आरएमओ (निवासी वैद्यकीय अधिकारी) म्हणून लागलो. कामाचा…

    पहिली आरती

    September 23, 2026

    बिस्किटं… दोन कोटींची!

    September 22, 2026

    टिपिकल

    September 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सुधाकररावांचा सन्मान

    September 23, 2026

    सुमन आणि राधा…

    September 23, 2026

    पहिली आरती

    September 23, 2026

    वास्तुशास्त्र आणि नवीन घर निवडण्याचे महत्त्वाचे नियम

    September 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : स्नेहाचिया भरोवरी, आंबुथिला दीपु घे थोरी

    September 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 सप्टेंबर 2026

    September 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 445
    • अवांतर 214
    • आरोग्य 149
    • पंचांग आणि भविष्य 595
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 941
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सुधाकररावांचा सन्मान

    September 23, 2026

    सुमन आणि राधा…

    September 23, 2026

    पहिली आरती

    September 23, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.