पहाटेचा कोवळा प्रकाश बागेच्या पापण्यांवर अलगद विसावला आणि एकेक फूल जागं झालं. पानांच्या टोकांवर विसावलेले दवबिंदू उजळून निघाले. रात्रभर स्वप्न मिटून राहिलेल्या कळ्यांनी आकाशाकडं प्रसन्न होऊन पाहिलं. मातीच्या ओलसर गंधात नव्या क्षणांची चाहूल मिसळली…
रोजच्यासारखा मी पाण्याची झारी घेऊन बागेत आलो. झाडांच्या मुळाशी पाणी हळूवार फवारत, वेलींना सावरत आणि कोवळ्या पानांवरून हात फिरवत मी पुढं चाललो होतो. या बागेतलं प्रत्येक झाड माझ्या ओळखीचं होतं. कोणत्या रोपट्याला ऊन सोसत नाही, कोणती वेल आधार शोधते, कोणत्या पानाला अळी त्रास देतेय, आणि कोणती कळी उमलण्यासाठी पहाटेची वाट पाहतेय… हे मला तिच्याकडं पाहताच कळत असे. झाडांची भाषा मला समजते. ती शब्दांत ऐकू येत नाही, पण श्वासांना जाणवते. त्यांच्या रंगांतून, वाकलेल्या फांद्यांतून आणि मिटलेल्या पानांतून समजून घ्यावी लागते. इतकी वर्षं या बागेत राहून मी ती थोडीफार शिकून घेतली होती. फुलंच शिकवतात त्यांची भाषा, फक्त आपण फुलांचे होणं गरजेचं!
बागेच्या एका शांत कोपऱ्यात ते फूल उमललं होतं. पहाटेच्या आकाशानं आपली गुलाबी प्रकाशाची ओंजळ खाली धरावी आणि त्या ओंजळीतून काही रंग अलगद हिरव्या देठावर सांडावेत, तसं ते दिसत होतं. त्याच्या नाजूक पाकळ्यांच्या कडांवर दवबिंदूंचे कण कण थबकले होते. मधोमध परागाची सोनेरी पखरण झाली होती. कित्येक दिवसांपासून मी या कळीच्या उमलण्याची वाट पाहत होतो. तिच्या मुळाशी लालसर माती भरली होती. भोवतीचं रानगवत काढलं होतं. वाऱ्याचा धक्का लागू नये म्हणून तिच्याजवळ आधार रोवला होता…
आज मात्र त्या फुलाच्या रंगात काही वेगळंच दिसत होतं. मी त्याच्या मुळाशी पाणी घालण्यासाठी खाली वाकलो. झारीतून पाण्याची धार हलक्या पावसासारखी मातीवर उतरली. ओल्या मातीचा सुगंध क्षणात हवेत पसरला. रोजच अशी पाण्याची आणि माझी चाहूल लागताच ते फूल माझ्याकडं वळत असे. वाऱ्यावर हलकेच डोलून आपला आनंद व्यक्त करत असे. पण आज त्याचं माझ्याकडं लक्षच नव्हतं. त्याची नजर बागेच्या वरून भिरभिरत येणाऱ्या एका सुंदर फुलपाखरावर खिळली होती.
हेही वाचा – तुलना आणि मत्सर
मी झारी खाली ठेवली आणि दोन पावलं मागं सरकलो. ते फुलपाखरू म्हणजे रंगांनी लिहिलेली एक जिवंत कविता होती. त्याच्या पंखांवर निळ्या आकाशाचा तुकडा उमटला होता. पंखांच्या कडांना सोनेरी वेलबुट्टी लाभली होती. जांभळ्या रंगाची दोन नाजूक वर्तुळं त्याच्या सौंदर्याला गूढपणा देत होती. सूर्यकिरण पंखांवर पडले की, रंग उजळून उठत. क्षणभर वाटे, आकाशातला एखादा इंद्रधनुष्याचा तुकडा वाऱ्यावरून खाली उतरला असावा!
आज त्याच्या भिरभिरण्यातलं वेगळेपण जाणवत होतं. त्याच्या प्रत्येक गिरकीत अनिवार उत्सुकता होती. प्रत्येक झेपेत आनंदानं उसळी मारल्याचा भास होत होता. त्याच्या पंखांतून पाकळी पाकळीवर आनंद सांडत होता. पंखांची प्रत्येक हालचाल फुलाला मिठीत घेण्यासाठी आतुर झाली होती. मनातली अधीरता लपता लपत नव्हती… ते कधी उंच झेप घेई, कधी फुलाच्या अगदी जवळ येई आणि पुन्हा दूर जाई. एखाद्या लाजऱ्या प्रियकरानं भेटीसाठी यावं आणि आपल्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी धैर्य गोळा करीत फेऱ्या घालाव्यात, तसं ते फुलाभोवती भिरभिरत होतं. फूल त्याच्या येण्याची चाहूल ओळखून होतं. त्याच्या पाकळ्यांवरचा गुलाबी रंग हळूहळू गडद होऊ लागला. आतापर्यंत एकमेकींना बिलगून बसलेल्या पाकळ्या सावकाश खुलू लागल्या. फुलाच्या गालांवर लाज उतरली… त्याचा बदलणारा रंग सारं काही सांगत होता.
वाऱ्याची एक मंद झुळूक आली. फूल अलगद डोललं. त्या डोलण्यात नेहमीचा सहजपणा नव्हता. त्यात एक आमंत्रण होतं. एक मूक हाक होती… जणू ते फुलपाखराला सांगत होतं, इतका वेळ माझ्याभोवती फिरत राहू नकोस. आता जवळ ये. आज मी तुझ्यासाठीच उमलले आहे.
फुलपाखरानं फुलाभोवती एक छान गिरकी घेतली… मग दुसरी… तिसऱ्या गिरकीनंतर ते क्षणभर हवेत स्थिर राहिलं. त्याचे पंख लयीत उघडत होते आणि मिटत होते. फूल त्याच्याकडं एकटक पाहत होतं. त्या क्षणी बागेतील बाकीची सारी फुलं जणू ते विसरून गेले. पक्ष्यांची किलबिल दूरवर होऊ लागली. पानांची सळसळ मंदावल्यासारखी वाटली. सूर्यकिरणंही त्या भेटीला पाहून नेहमीपेक्षा अलगद स्थिरावले.
आता फुलपाखरू हळूच खाली उतरलं. त्याचे नाजूक पाय फुलाच्या पाकळ्यांवर टेकले. त्या पहिल्या स्पर्शानं फुलाच्या अंगातून एक गोड शिरशिरी गेली. त्याची पाकळी पाकळी धुंद होऊन मोहरली. पाकळ्यांच्या आत दडलेला सुगंध मुक्त झाला आणि बागभर पसरला. पराग आनंदानं थरथरू लागला. फुलाचा गुलाबी रंग अधिकच गहिरा झाला. आपल्या गालांवर पसरलेली लाली कुणाला दिसू नये म्हणून फूल क्षणभर स्वतःतच मिटू लागलं. फुलपाखरानं पंखांची हलकी सावली त्याच्यावर धरली आणि फूल पुन्हा खुललं.
ते मूकपणे एकमेकांकडं पाहत होते. फुलपाखराचा स्पर्श फुलाच्या पाकळ्यांवरून फिरत होता. फुलाचा सुगंध फुलपाखराच्या पंखांत भिनत जात होता. शब्दही कुठंतरी दूर झाले. फुलाच्या प्रत्येक डोलण्यात एक कबुली होती. फुलपाखराच्या प्रत्येक स्पर्शात याचं उत्तर होतं… फूल जणू म्हणत होतं, तू आलास आणि मला माझ्या उमलण्याचा, जगण्याचा अर्थ समजला.
फुलपाखरू त्याच्या पंखांच्या लयीत सांगत होतं, तुझ्यापर्यंत येण्यासाठीच मला हे रंग मिळालेत.
मी त्यांच्याकडं पाहात राहिलो. माझ्या हातातली झारी खाली ठेवली… अजून पाणी घालायचं होतं… उरलेली झाडं मी कधी विसरलो ते समजलंच नाही! मी त्या झाडाच्या सावलीत बसलो होतो. मी कोऱ्या कागदावर काही ओळी लिहिल्या. फुलाच्या लाजण्यावर एक कविता जन्माला आली. फुलपाखराच्या भिरभिरण्यावर दुसरी… त्यांच्या पहिल्या स्पर्शावर लिहिताना तर माझे शब्दही सुगंधित झाले.
फुलपाखरू मधूनच आकाशात उंच उसळी मारी. आनंदाला पंख फुटले की, तो असाच उडत असेल… दोन-चार गिरक्या घेऊन ते पुन्हा फुलाजवळ येई. ते दूर गेले की, फूल मान उंचावून त्याची वाट पाहात राही. ते परतताना दिसले की, ते पुन्हा पाकळी पाकळी उमलू लागे. फुलपाखरू त्याच्या गालांवर पंख टेकवी. फूल आपल्या सुगंधानं त्याला कवेत घेई.
साऱ्या बागेला विसरून त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली होती.
सूर्य वर चढला. दुपारच्या उन्हाची धार वाढली. पानांच्या सावल्या लहान झाल्या. फुलपाखराच्या पंखांवर उन्हाचा सोनेरी रंग उतरला. फूल त्याच्याकडं पाहातच राहिलं. एरवी उन्हानं कोमेजणाऱ्या पाकळ्यांत आज वेगळाच टवटवीतपणा होता. प्रेमाची सावली लाभली की, उन्हाची तीव्रताही मऊ होत असावी.
आज मला घरी जाण्याची इच्छाच होत नव्हती. या भेटीचा एकही क्षणही माझ्या नजरेतून निसटू नये, असं वाटत होतं. कारण काही क्षण पुन्हा येतात, पण पहिल्या भेटीची कोवळी थरथर पुन्हा सापडत नाही. पहिल्या स्पर्शावेळी फुलाच्या पाकळ्यांवर उमटलेली लाज दुसऱ्या स्पर्शात अधिक गहिरी होते, पण तिचं पहिलं निरागस रूप काळ आपल्या ओंजळीत घेऊन निघून जातो.
दुपार उतरणीला लागली. सूर्य पश्चिमेकडं झुकला. बागेवरचा प्रकाश मऊ झाला. सावल्या लांबू लागल्या. परतीच्या वाटेवर निघालेले पक्षी आकाशातून उंच शुभ्ररेषा काढत गेले. फुलपाखरू अजूनही फुलाभोवतीच नाचत होतं. आता त्याच्या नृत्यात दिवसभराचा थकवा होता, पण त्या थकव्याहून अधिक प्रेम होतं. फूलही थकलं होतं. तरी फुलपाखरू जवळ आलं की त्याच्या पाकळ्या नव्यानं उमलत. हळूहळू संध्याकाळ बागेत उतरली.
आकाशातला केशरी रंग जांभळा झाला. पश्चिमेकडचा प्रकाश मंद मावळू लागला. वाऱ्यात रातराणीचा मंद सुगंध मिसळला. दिवसाचा गोंगाट निवत गेला. बागेवर शांततेची मऊ चादर पसरली.
मग आकाशात चंद्र आला. चंद्राचा शुभ्र प्रकाश बागेवर सांडला आणि त्या दोघांच्या प्रेमाला एक वेगळंच सौंदर्य लाभलं. फुलाच्या गुलाबी पाकळ्यांवर चांदीची झळाळी आली. फुलपाखराच्या पंखांवरचे रंग अधिक गूढ झाले. दिवसभर सूर्याच्या साक्षीनं फुललेलं प्रेम आता चंद्राच्या शांत नजरेसमोर उभं होतं.
हेही वाचा – ललिताची गीता
मी मनात म्हटलं, आज चंद्रालाही या दोघांचा हेवा वाटत असेल. फुलपाखरानं अचानक आकाशाकडं पाहिलं. त्याच्या पंखांची लय बदलली. आनंदानं उडणारे पंख आता अस्वस्थपणे हलू लागले. रात्रीचा गारवा वाढत होता. अंधार बागेभोवती जमू लागला होता. दूर कुठंतरी त्याचा निवारा त्याला बोलावत असावा. फुलाला ती बदललेली हालचाल लगेच जाणवली. त्याच्या पाकळ्यांवरची प्रसन्नता मंदावली. दिवसभर ताठ उभी राहिलेली दांडी हलकेच वाकली. फूल फुलपाखराकडं अधिक झुकलं. आपल्या सुगंधाची सारी शक्ती एकवटून त्यानं त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला…
आणखी थोडा वेळ थांब. चंद्राला आज आकाशातच थांबू दे. रात्र येईल, पहाट होईल, पण तू असा दूर जाऊ नकोस.
फुलानं ओठ उघडले नाहीत, तरी त्याची प्रत्येक पाकळी हेच सांगत होती.
फुलपाखरू पुन्हा एकदा फुलावर उतरलं. त्या शेवटच्या भेटीत त्याच्या स्पर्शाला एक हळवी थरथर होती. त्यानं आपले पंख अलगद फुलाच्या गालांवर टेकवले. फूल त्याच्या अधिक जवळ सरकलं. त्या क्षणी ते दोघं एकमेकांना धरून ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. काळ मात्र त्यांच्या हातात थांबत नव्हता.
फुलपाखरानं पंख उघडले आणि ते हवेत झेपावलं. फुलाभोवती एक गिरकी घेतली. पुन्हा खाली येईल, असं क्षणभर वाटलं. फुलानं आशेनं मान उंचावली. फुलपाखरू हवेतच थबकलं. त्याच्या पंखांची हालचालही क्षणभर थांबली. त्यालाही दूर जाणं जड झालं होतं. मग त्यानं सावकाश दिशा बदलली आणि चंद्राच्या प्रकाशातून उंच कुठंतरी दूर निघून गेलं.
फूल एकटक त्याच्याकडं पाहत राहिलं. ते सुंदर रंगीत पंख आधी लहान होत गेले. मग चंद्रप्रकाशात एखाद्या बिंदूसारखे चमकले. पुढच्या क्षणी ते अंधारात विरून गेले. फुलाची उंचावलेली मान खाली आली. एका पाकळीवर ओलाव्याचा थेंब जमा झाला. तो सावकाश कडेपर्यंत आला आणि खाली ओघळला. त्यामागून दुसरा थेंब आला… मग तिसरा…
रात्रीचं दव लवकर पडलं होतं की, फुलाच्या डोळ्यांतले अश्रू पाकळ्यांवर उतरले होते, हे मला समजलं नाही. फूल रडत राहिलं. दिवसभर आनंदानं खुललेल्या पाकळ्या एकमेकींजवळ येऊ लागल्या. त्यांचा रंग फिकट झाला. देठावरचा ताठपणा हरवला. फुलाची मान हळूहळू झुकली. ते मान टाकून झोपी गेलं.
मी त्याच्या जवळ उभा होतो. त्याला काहीतरी सांगावं, अशी इच्छा झाली. उद्या ते फुलपाखरू पुन्हा येईल, असं सांगून त्याला धीर द्यावा, असं वाटलं. पण उद्याचं आश्वासन देण्याइतका उद्या माझ्या हातात कुठं होता. फुलपाखरं पंखांची दिशा स्वतः निवडतात. फुलं मात्र मुळांशी बांधलेली असतात. त्यांना वाट पाहता येते. पण शोधायला काही केल्या निघता येत नाही.
मी शांतपणे खाली वाकलो. दिवसभर लिहिलेल्या कविता गोळा केल्या. काही कागद वाऱ्यानं दूर उडून गेले होते. काहींवर माझ्याच डोळ्यातल्या धुक्याचे थेंब पडले होते. एका कागदावर फुलाच्या लाजण्याची कविता होती… दुसऱ्यावर फुलपाखराच्या नृत्याची… तिसऱ्यावर त्यांच्या पहिल्या स्पर्शाची… शेवटची कविता अपुरी राहिली होती. तिच्या अखेरच्या ओळीवर शाई पसरली होती.
मी त्या सगळ्या कविता एकत्र केल्या. त्यांचं एक गाठोडं बांधलं आणि पाठीवर टाकलं.
बागेच्या दारापर्यंत गेलो. पाऊल बाहेर ठेवण्याआधी पुन्हा एकदा मागं वळून पाहिलं. चंद्रप्रकाशात ते फूल एकटं उभं होतं. त्यानं त्याची मान आत ओढली होती. पाकळ्या मिटल्या होत्या. तरी त्याच्या भोवती दिवसभराच्या भेटीचा सुगंध दरवळत होता. फुलपाखराच्या पंखांचा स्पर्श अजूनही त्याच्या पाकळ्यांत जिवंत असावा.
कदाचित उद्या पहाटे ते पुन्हा उमलेल. उमलेल की नाही कोण जाणे? पण उद्याही ते कदाचित आकाशाकडं पाहत त्या रंगीत पंखांची वाट पाहील… कदाचित फुलपाखरूही रात्रभर एखाद्या पानाआड विसावून याच फुलाचं स्वप्न पाहील.
मी परतीच्या वाटेवर चालू लागलो. प्रत्येक पावलागणिक पाठीवरचं कवितांचं गाठोड्याचं ओझं जाणवत होतं आणि मन अधिक जड होत होतं. कारण त्या रात्री मी बागेतून एकटा परतत नव्हतो. माझ्यासोबत फुलाचा सुगंध होता, फुलपाखराच्या पंखांची थरथर होती, मात्र अपुऱ्या भेटीची हुरहूर होती. क्रूरपणा इतकाच की, मागं चंद्राच्या हळव्या प्रकाशात मी एका प्रेमात पडलेल्या फुलाला एकटं सोडून आलो होतो.
चंद्र जपेल ना त्याला?


