भाग – 13
सासुबाईंच्या सांगण्यावरून महेशराव आले असल्याचे उमाला समजले आणि म्हणून उमा फुरंगटून बसली. आईने कोंबडी वडे बनवले होते. आता तर काय तिचे लाडके जावईबापू आले होते, त्यामुळे तिची लगबग वाढली होती. तर, वंदू आणि उमा तिच्या खोलीत जाऊन गप्पा मारत बसल्या होत्या. वंदू तिला म्हणाली,
“बघ, दाजी तुझ्यासाठी धावतपळत इथवर आले. तुझ्यावर किती माया आहे त्यांची.”
“माझ्यासाठी नाही आले ते, त्यांच्या आईने सांगितले की, तिची तब्येत कशी आहे ते बघून ये म्हणून आलेत.”
“तू जरा चक्रमच आहेस उमा. हे नुसते सांगायचे असते. त्यांनी सांगितले आणि तू लगेच विश्वास ठेवलास? जरा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं असतंस, तरी तुला समजलं असतं की, ते तुझ्यासाठी आलेत.”
“बरं बरं! तू माझी मैत्रीण आहेस, हे विसरू नकोस. आली मोठी त्यांची वकिली करायला. मला माहीत आहे त्यांचा स्वभाव. मी काय आज ओळखते का त्यांना?”
हेही वाचा – सर्वकाही बाळासाठी!
“तरीही मी हे मान्य करणार नाही की, ते केवळ आईच्या सांगण्यावरून आले आहेत. तुझी काळजी त्यांनाही वाटतेय.”
“मी इकडे येताना कुठे गेली होती ही काळजी? मी एक प्रश्न विचारला तर रागावून तोंड फिरवून झोपले होते.”
“बरं बाई! आईसाठी आलेत, मान्य. तू इतकी का रागावली आहेस? त्यांनी आईचे ऐकायचे नाही, असे तुझे म्हणणे आहे का?”
“नाही. मी तसे का म्हणेन? बायकोचे म्हणणे पण ऐकून घ्यावे. कधीतरी त्यावरही विचार करावा. कायमच बायकोने काही सांगितले की, कानाआड करू नये, एवढेच मला वाटते,” उमा म्हणाली.
“तू आत्ता दोन वर्षे झाली त्यांच्या आयुष्यात आली आहेस. आई तुझ्या जन्माच्या आधीपासून त्यांच्या आयुष्यात आहे. मग तुझे ऐकायला त्यांना वेळ लागणारच. आपणही थोडी वाट पहायला हवी. उगाचच चिडून भांडणच होते, त्याऐवजी थोडे समजुतीने वागावे,” वंदू समजुतीच्या स्वरात म्हणाली.
“तुला असे वाटते का, की मी भांडत असेन? तसे असते तर मगाशी जेव्हा त्यांनी सांगितले की, आईने सांगितले म्हणून आलोय, तेव्हाच मी त्यांना काहीतरी बोलले असते. बोलून दाखवत नसले तरी, माझ्या मनाला त्रास होतो. तुझ्याजवळ मन मोकळे केले एवढेच. इतर वेळी मनातच राहतात अशा गोष्टी,” उमा म्हणाली.
“नशीब, माझ्या सासूसारखी तरी नाही तुझी सासू. तुझी किती काळजी करतात त्या, म्हणून दाजींना पाठवले त्यांनी.”
“हो, काळजी घेतात, पण मुलगी झाली, तर अशीच काळजी घेतील का? अशी शंका वारंवार मनात डोकावते माझ्या. दिवस गेल्यापासून कायम त्यांच्या तोंडात घराण्याचा वंशज पोटात वाढतोय, काळजी घेतली पाहिजे, असेच ऐकतेय मी. मुलगी झाल्यावर तुझ्या सासूसारखे बोलल्या नाहीत म्हणजे मिळवले,” उमाने आपल्या मनातील खंत व्यक्त केली.
“असे काही होणार नाही. तू उगाचच काळजी करतेस. त्यांना स्वतःला मुली आहेतच की!” वंदू म्हणाली.
“बघूया. वेळ आल्यावरच काय ते समजेल,” उमा म्हणाली आणि तेवढ्यात आई जेवायला बोलवायला आली.
आईने बाबांना आणि जावईबापूंना जेवायला वाढले होते. त्यांचे जेवण झाल्यावर ती उमाला बोलवायला आली होती. तिने दादा, उमा आणि वंदूला जेवायला वाढले. आईच्या हातचे कालवण तिला फार आवडले. जेवण झाल्यावर शरयू एकटीच आजीजवळ आहे म्हणून वंदू लगेच परत गेली.
जेवण झाल्यावर आईने सांगितले, “जावईबापूंना आतल्या खोलीत झोपूदेत. तुम्ही दोघं तिथं झोपा. आम्ही सगळे पुढच्या खोलीत झोपतो.”
“नको. दादाला झोपूदे त्यांच्यासोबत. आपण सगळे इथे झोपूया. मला मामींबरोबर गप्पा मारायच्या आहेत. त्यांची भेट खूप दिवसांनी झालीय,” उमा म्हणाली.
“बरं, त्यांच्यासाठी पाण्याचा तांब्या भरून खोलीत ठेव. त्यांना अंगावर काय पांघरूण पायजे असतील ती तर दे जा.”
उमाने पाण्याचा तांब्या भरून घेतला आणि ती आत गेली.
“का रागावली आहेस?” ती एकटी सापडताच महेशरावांनी तिला विचारले.
“मी कुठे रागावलेय?” उमा म्हणाली.
“समजते मला.”
“मग का रागावले आहे, तेही समजले असेलच,” उमा असे म्हणाली आणि महेशरावांनी तिला प्रेमाने आपल्या बाहुपाशात घेतले.
“अशा अवस्थेत जास्त रागावू नये. त्याचा परिणाम बाळावर होतो. बाळ पण तुझ्यासारखेच चिडके, रागीट व्हावे, असे तुला वाटते का?” हे महेशरावांचे म्हणणे ऐकून ती अधिकच रागावली, पण ती काही बोलायच्या आत महेशरावांनी तिचे ओठच बंद केले.


