दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 17 सप्टेंबर 2026; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 26 भाद्रपद शके 1948; तिथि : षष्ठी 10:47; नक्षत्र : अनुराधा 19:52;
- योग : विष्कंभ 12:48; करण : गरज 23:51;
- सूर्य : सिंह; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:41;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
सूर्यषष्ठी
ज्येष्ठागौरी आवाहन सायं 07:52 पर्यंत
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
अमर चित्र कथेचे निर्माते अनंत पै
टीम अवांतर
अमर चित्र कथा, टिंकलचे निर्माते आणि अंकल पै म्हणून ओळखले जाणारे अनंत पै यांचा जन्म 17 सप्टेंबर 1929 रोजी ब्रिटिश भारतातील तत्कालीन मद्रास प्रेसिडेंसीमधील कारकाला येथे झाला. दुर्दैवाने ते दोन वर्षांचे असतानाच त्यांच्या आईवडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे त्यांच्या आईच्या वडिलांनी त्यांचे पालनपोषण केले. पै यांनी तत्कालीन बॉम्बे येथील माहीमच्या ओरिएंट स्कूलमध्ये शिक्षण घेतले. पुढे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (पूर्वीचे UDCT) येथे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि केमिकल इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षण घेतले. ते मुंबई विद्यापीठाचे दुहेरी पदवीधारक होते.
प्रकाशन आणि कॉमिक्सची आवड असलेल्या पै यांनी मुलांचे मासिक (मानव) सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अपयश आल्याने त्यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुस्तक विभागात कनिष्ठ कार्यकारी म्हणून कारकीर्द घडवली. टाइम्स ग्रुपने ‘मँड्रेक’ आणि ‘द फँटम’ सारख्या कॉमिक बुक मालिका प्रकाशित करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘इंद्रजाल कॉमिक्स’ ची सुरुवात केली, तेव्हा पै या घडामोडींच्या केंद्रस्थानी होते.
हेही वाचा – तुलना आणि मत्सर
भारतीय संस्कृती आणि इतिहासाला वाहिलेली कॉमिक बुक मालिका सुरू करण्याची कल्पना पै यांना फेब्रुवारी 1967 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या एका प्रश्नमंजूषा स्पर्धेतून सुचली. त्याच वर्षी त्यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’मधील नोकरी सोडली आणि इंडिया बुक हाऊसचे दिवंगत जी. एल. मीरचंदानी यांच्या मदतीने ‘अमर चित्र कथा’ ही कॉमिक-बुक मालिका सुरू केली. या मालिकेत पारंपरिक भारतीय लोककथा, हिंदू पौराणिक कथा आणि ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे सांगितली जात होती.
त्यावेळी अलाइड पब्लिशर्सपासून ते जैकोपर्यंतच्या बहुतेक प्रकाशकांनी ही संकल्पना नाकारली होती. त्यामुळे पै यांनी लेखक, संपादक आणि प्रकाशक अशा सर्व भूमिका स्वीकारल्या. ही मालिका भारतीय कॉमिक बुक क्षेत्रासाठी एक प्रकाशन मैलाचा दगड ठरली, जिच्या सुमारे 440 शीर्षकांच्या 86 दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या.
1969 मध्ये, पै यांनी ‘रंग रेखा फीचर्स’ या भारतातील पहिल्या कॉमिक आणि कार्टून सिंडिकेटची स्थापना केली. नोव्हेंबर 1980 मध्ये, त्यांनी याच सिंडिकेटअंतर्गत ‘टिंकल’ मासिकाची सुरूवात केली. हे कॉमिक-बुक म्हणजे लहान मुलांसाठीच्या लघुकथा, विनोद आणि शैक्षणिक लेखांचा एक संग्रह आहे. ‘टिंकल’नेही ‘अमर चित्र कथा’च्या यशाची पुनरावृत्ती केली , आणि जून 2017 पर्यंत या मासिकाचा 669 वा अंक प्रकाशित झाला होता. वरील उपक्रमांमध्ये पै यांचा सहभाग आणि वाचकांशी जुळलेले त्यांचे वैयक्तिक नाते यामुळे त्यांना “अंकल पै” ही उपाधी मिळाली.
1989 मध्ये, पुन्हा याच सिंडिकेटमार्फत, पै यांनी ‘चिंपू कॉमिक्स’ सुरू केले, ज्यात ‘रामू अँड शामू’ , ‘कपिश’ , ‘लिटल राजी’ आणि ‘फॅक्ट फँटसी’ यांसारख्या त्यांच्या स्वतःच्या कामांचा समावेश होता. मात्र हा उपक्रम ‘अमर चित्र कथा’ आणि ‘टिंकल’च्या यशाची पुनरावृत्ती करण्यात अयशस्वी ठरला. त्यामुळे त्याचे प्रकाशन थांबवण्यात आले. पै 2000 पर्यंत रंग रेखा फीचर्सचे व्यवस्थापकीय संचालक होते. नंतर त्यांनी हैदराबाद -स्थित कलर चिप्स नावाच्या ॲनिमेशन स्टुडिओला ते विकले.
कॉमिक्स व्यतिरिक्त, पै हे व्यक्तिमत्व विकासाचे विशेषज्ञ देखील होते. त्यांनी ऑगस्ट 1978 मध्ये पार्थ इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची स्थापना केली , जिथे मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी पत्रव्यवहाराद्वारे व्यक्तिमत्व विकासाचे वर्ग चालवले जात होते.
19 फेब्रुवारी 2011 रोजी (त्यांच्या मृत्यूच्या सहा दिवस आधी) नवी दिल्ली येथे पहिल्या भारतीय कॉमिक कन्व्हेन्शनमध्ये चाचा चौधरीचे निर्माते प्राण यांच्या हस्ते पै यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय उत्तर प्रदेश बाल कल्याण संस्थेचा कर्पूरचंद पुरस्कार, हैदराबाद येथील युधवीर स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार, कर्नाटकच्या मणिपाल येथील डॉ. टी. एम. ए. पै स्मृती पुरस्कार, मुंबई विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान विभागाचा प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार, इलिनॉय, यूएसएचा मिलेनियम कोकणी संमेलन पुरस्कार, राजा राममोहन रॉय लायब्ररी फाउंडेशनचा पुरस्कार, प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार, विश्व सारस्वत सन्मान सारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. 24 फेब्रुवारी 2011 रोजी अनंत पै यांचे निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – आज मन थोडे अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. भावनेच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय नंतर समस्या निर्माण करू शकतो, म्हणून मोठे निर्णय घेताना शांतपणे विचार करून मगच पुढे जाणे महत्त्वाचे आहे. संततीशी संबंधित बाबी सामान्य राहतील, तर व्यावसायिकांना चांगले परिणाम बघायला मिळतील. मानसिक शांती टिकविण्यासाठी ध्यानधारणा करणे फायदेशीर ठरेल.
वृषभ – आज कौटुंबिक गोष्टींविषयी थोडी अस्वस्थता जाणवू शकते. जमीन, घर किंवा वाहन खरेदी करण्याच्या योजनेत काही अडथळे येऊ शकतात. स्वतःच्या आणि आईच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसायाची परिस्थिती स्थिर राहील, मात्र कामगारांच्या समस्यांमुळे चिंता कायम राहू शकते. सकाळी उठून फिरायला जाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
मिथुन – आज तुमच्यातील धैर्य आणि शौर्य हे गुण तुम्हाला पुढे घेऊन जायला मदत करतील, परंतु अतिउत्साह हानीकारकही ठरू शकतो. एखादे ध्येय गाठण्याच्या नादात स्वतःवर जास्त ताण घेऊ नका. नाक, कान किंवा घशाशी संबंधित समस्या त्रासदायक ठरू शकतात. वैवाहिक जीवन आणि संततीच्या संदर्भात आजचा दिवस अत्यंत सकारात्मक असेल, तसेच व्यवसायातही लाभाची चिन्हे आहेत. सकाळी काही काळ ध्यान करा, यामुळे मानसिक ताण कमी होईल.
कर्क – आज आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे शहाणपणाचे ठरेल. आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीपासून दूर राहणेच उत्तम आहे, कारण त्यात नुकसानीचा धोका आहे. जर तुम्हाला तोंड किंवा दातांसंबंधी काही समस्या असतील, तर निष्काळजीपणा करू नका. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. वैवाहिक जीवन आणि संततीच्या बाबतीत सकारात्मक परिस्थिती निर्माण होईल, तसेच व्यवसायातही नफा मिळू शकतो.
सिंह – आज तुम्हाला थोडे चिंताग्रस्त आणि अस्वस्थ वाटू शकते. शांत राहण्याचा आणि क्षुल्लक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. दिलासादायक बाब म्हणजे संततीच्या शिक्षण विषयक बाबींमध्ये परिस्थिती अनुकूल राहील. व्यवसायातही उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात. सरकारी क्षेत्राशी संबंधित कोणतेही काम फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. सकाळी सूर्यनमस्कार घालणे फायदेशीर ठरेल.
कन्या – आज अनावश्यक खर्चामुळे चिंता वाढू शकते, त्यामुळे गरजा आणि इच्छा यांमधील फरक समजून घेऊन मगच पैसे खर्च करा. डोकेदुखी आणि डोळ्यांच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. अज्ञात भीती किंवा मानसिक दबावाचाही तुमच्या मनावर परिणाम होऊ शकतो. जोडीदार आणि संततीशी संबंधित बाबींमध्ये हळूहळू सुधारणा होईल. व्यवसायातही चांगल्या गतीने प्रगती होईल.
तुळ – आज आर्थिक परिस्थितीला नवीन वळण मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रवास थोडा थकवणारा किंवा तणावपूर्ण असू शकतो, परंतु त्यातून महत्त्वपूर्ण लाभही मिळू शकतात. जोडीदार आणि संततीशी संबंधित बाबी सामान्य राहतील. व्यवसायात चांगले परिणाम बघायला मिळतील. नामस्मरण किंवा ध्यानधारणा यातून सकारात्मक परिणाम मिळतील.
वृश्चिक – आज, न्यायालयीन खटले किंवा कायदेशीर बाबींशी संबंधित प्रकरणे गुंतागुंतीची राहू शकतात. या प्रकरणांमध्ये जलद आणि स्पष्ट विजय मिळण्याची आशा कमी आहे, त्यामुळे संयम बाळगणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवन, संतती आणि व्यवसायाच्या बाबतीत दिवस संमिश्र राहील. कोणताही घाईचा निर्णय घेणे टाळा. प्राणायाम करणे आज फायदेशीर ठरेल.
हेही वाचा – वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य
धनु – प्रवास करताना आज विशेष काळजी घ्या, कारण त्रास किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणतेही महत्त्वाचे कार्य सुरू करण्यासाठी केवळ नशिबावर अवलंबून राहणे अयोग्य ठरेल. मान-सन्मानाची चिंता किंवा अपमानाची भीती तुमच्या मनात चिंता निर्माण करू शकते. आरोग्य सामान्य राहील. जोडीदार आणि संततीसंबंधीच्या बाबींमध्ये सकारात्मक बातमी मिळेल. जोडीदाराला नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे.
मकर – आज परिस्थिती तुमच्या बाजूने नाही, त्यामुळे धोका पत्करण्याऐवजी शहाणपणाने पुढे जाणे उत्तम राहील. कोणतीही मोठी गुंतवणूक, वाद किंवा घाईचे निर्णय घेणे टाळा. तुमच्या प्रियजनांचा आणि संततीचा पाठिंबा तुम्हाला मानसिक शांती देईल. व्यवसाय सुरळीतपणे सुरू राहील. शारीरिक आरोग्यासाठी बाहेरील खाणेपिणे टाळणे उत्तम.
कुंभ – आज जोडीदाराच्या आरोग्याबद्दल काळजी वाटू शकते, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. वैवाहिक जीवन आणि संतती संबंधीच्या बाबी समाधानकारक राहतील. संततीला एखाद्या उत्तम कंपनीकडून नोकरीची ऑफर येईल. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. व्यवसायाची परिस्थितीही चांगली राहू शकते. नोकरदारांना मात्र कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. योगासनांचा नियमित अभ्यास फायदेशीर ठरेल.
मीन – आजचा दिवस थोडा तणावपूर्ण असू शकतो. आरोग्य, प्रेम आणि संततीशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला चढ-उतार अनुभवायला मिळू शकतात. स्वतःचे मन शांत ठेवणे आणि छोट्या गोष्टींना विनाकारण गंभीर स्वरूप न देणे उत्तम राहील. सध्या तरी व्यवसायाची परिस्थिती सामान्य असेल. सकाळी सूर्यनमस्कार घालणे किंवा चालायला जाणे हा उत्तम व्यायाम ठरेल.


