अनघाला चित्र काढायला लहानपणापासून खूप आवडत असे. अगदी लहान असताना शाळेतही वहीच्या शेवटच्या पानावर ती झाडे काढायची, चेहरे काढायची, नदीकाठची मंदिरे काढायची. इतर मुलांना सुट्टी मिळाली की, खेळायला धावायचे. अनघा मात्र एखाद्या झाडाखाली बसून त्याच्या फांद्यांमधून पडणारा प्रकाश पाहत राहायची. तिचे शिक्षक म्हणत, “ही मुलगी मोठी चित्रकार होईल, तिला चित्रकाराच्या नजरेने जगाकडे पाहता येते.”
काळ पुढे गेला. अनघाने चित्रकलेचे शिक्षण घेतले. प्रदर्शनांत तिची चित्रे लागली. काही चित्रे विकलीही गेली. तिला फार मोठी प्रसिद्धी मिळाली नव्हती, पण तिच्या कामात प्रामाणिकपणा होता. रंगांशी तिचे नाते होते आणि प्रत्येक वेळी नवे चित्र काढताना तिला विलक्षण आनंद मिळत असे.
त्याच वर्गात रेवती नावाची तिची मैत्रीण होती. रेवती बरी चित्रकार होती. तिची शैली वेगळी होती, पण ती अधिक धाडसी रंग वापरत असे. लोकांशी मिसळण्यात ती पुढे होती. प्रदर्शनांची माहिती तिला पटकन मिळे. आपले काम लोकांपर्यंत पोहोचवणे, तिला उत्तम जमत असे. काही वर्षांनी रेवतीचे एक मोठे प्रदर्शन झाले… वृत्तपत्रांत तिच्या मुलाखती आल्या. तिच्या चित्रांना मोठी किंमत मिळाली… पुरस्कार मिळाला. दूरचित्रवाणीवर कार्यक्रम झाला… अनघाने सुरुवातीला मनापासून आनंद व्यक्त केला. तिने रेवतीला फोन करून अभिनंदनही केले.पण त्या रात्री तिला झोप आली नाही.
मनात आलं, ‘आम्ही दोघी एकाच वर्गात होतो. ती कधीच माझी बरोबरी करू शकली नाही. पण ती आज एवढी पुढे गेली आणि मी कुठे आहे?’
दुसऱ्या दिवशी तोच प्रश्न आणखी थोडा मोठा झाला.
‘कदाचित, ती माझ्यापेक्षा खूपच प्रतिभावान आहे.’
तिसऱ्या दिवशी मन म्हणाले, ‘आपण उगीचच इतकी वर्षे चित्रे काढत राहिलो, दिवस आणि कामही वाया गेले…’ आणि काही दिवसांनी त्या प्रश्नाने निर्णयाचे रूप घेतले.
‘माझ्यात विशेष असं काही नाही, जसं मला आजवर वाटत होतं.’
ही तुलना मोठी युक्ती करत असते. ती प्रथम दुसऱ्याकडे पाहायला लावते आणि नंतर स्वतःकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकते. रेवतीचे यश हे वास्तव होते. पण ‘म्हणून अनघा अपयशी आहे’ हे वास्तव नव्हते. तो अनघाच्या मनाने काढलेला निष्कर्ष होता.
मात्र एके दिवशी अनघाने चित्रफलक आवरून ठेवला. रंगांच्या बाटल्या बंद केल्या. ब्रश एका पेटीत ठेवले.
आईने विचारले, “आजचे चित्र पूर्ण झाले का?”
अनघा म्हणाली, “नाही. आता चित्रे काढायचीच नाहीत.”
आई आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिली…
“का?”
“कारण चित्रात वेळ दवडण्यात काही अर्थ उरलेला नाही.”
हेही वाचा – स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती
“कालपर्यंत ज्यात तुला एवढा आनंद मिळत होता, त्याचा आज अचानक अर्थ कसा संपला?”
अनघा चिडून म्हणाली, “आई, प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजावून सांगता येत नाही.”
आई गप्प बसली.
काही महिन्यांनी अनघा आपल्या गुरूंना भेटायला गेली. आता त्यांचे वय झाले होते. ते आता फारसे शिकवत नसत. घराच्या मागच्या अंगणात एक मोठे आंब्याचे झाड होते. त्याखाली ते खुर्चीत बसत असत.
अनघाला पाहताच ते म्हणाले, “किती दिवसांनी आलीस! नवे कोणते मौल्यवान चित्र मला दाखवायला आणले आहेस?”
अनघा हसलीही नाही… “गुरुजी मी चित्र काढणे बंद केलेय.”
गुरुजी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले. मग अगदी सहजपणे म्हणाले, “बरं.”
ते ‘बरं’ ऐकून अनघाला धक्काच बसला. तिला वाटले होते ते म्हणतील, ‘असे कसे? तुझ्यात किती श्रेष्ठ प्रतिभा आहे! पुन्हा सुरू कर.’ पण त्यांनी फक्त ‘बरं’ म्हटले.
थोड्या वेळ जावू देत त्यांनी विचारले, “का बरं बंद केलेस?”
“मला वाटते, समाजाने कदर करावी, असे माझ्या चित्रात विशेष काही नसावे.”
“हे तुला कधी समजले?”
मग अनघाने रेवतीची गोष्ट सांगितली. तिचे प्रदर्शन, पुरस्कार, प्रसिद्धी, तिच्या एकेका चित्रांची किंमत, सगळे सांगितले.
गुरुजी शांतपणे ऐकत राहिले. मग त्यांनी समोरच्या आंब्याकडे बोट दाखवले… “हा आंबा पाहतेस?”
“हो.”
“त्याच्या बाजूला नारळाचे झाड आहे. आंब्याने कधी नारळाच्या झाडाकडे पाहून दुःखी व्हावे का, की मी एवढा उंच का नाही?”
अनघा क्षीण हसली.
गुरुजी पुढे म्हणाले, “…आणि नारळाने आंब्याकडे पाहून म्हणावे का, माझ्या फांद्यांवर अशी डेरेदार सावली का नाही?”
अनघा गप्प झाली.
गुरुजी म्हणाले, “निसर्गात तुलना नाही. प्रत्येक जीव स्वतःचे स्वरूप पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तुलना हा मुख्यतः माणसाच्या मनाचा उद्योग आहे.” दारी गुलाब असताना त्याला मोगऱ्याचा सुगंध का नाही, असा विचार करत बसतो आणि शेवटी आपल्याच गुलाबाला पाणी घालायचे विसरतो.
अनघाने विचारले, “पण गुरुजी, कोणी आपल्यापेक्षा पुढे गेले आहे, हे दिसत असेल तर?”
“दिसू दे!”
“वाईट वाटणार नाही?”
“वाटेल.”
“मग?”
“वाईट वाटणे हा गुन्हा नाही. त्या वाईट वाटण्याने तुला काय मिळाले, हे महत्त्वाचे आहे. रेवतीच्या यशामुळे तू स्वतःला अधिक विकसित केले असतेस, तर तीच तुलना तुझी शिक्षक झाली असती. पण तिच्या यशामुळे तू स्वतःलाच नाकारलेस, तर हीच तुलना विष झालेली असावी.”
किती सोपे वाक्य!
आपल्या आयुष्यात कितीतरी वेळा नकळत आपण या विषाचा घोट घेत राहतो. कुणीतरी आपल्यापेक्षा सुंदर आहे. कुणीतरी अधिक श्रीमंत आहे. कुणीतरी अधिक बुद्धिमान आहे. कुणाच्या मुलांनी अधिक यश मिळवले. कुणाला अधिक प्रतिष्ठा मिळाली. कुणाचे पुस्तक अधिक विकले गेले. कुणाला अधिक लोक ऐकतात… आणि मग दुसऱ्याची प्राप्ती हळूहळू आपल्या न्यूनतेचा पुरावा बनू लागते.
साधना येथे मनाला दिशा देते.
परस्य सिद्धिं दृष्ट्वैव
स्वमूल्यं न विनाशयेत्।
स्वमार्गे यः स्थितो नित्यं
स एव लभते श्रियम्॥
– गीताव्रत साधना
दुसऱ्याचे यश पाहून स्वतःचे मूल्य कमी करू नये. जो आपल्या मार्गावर जागरूकपणे चालत राहतो, त्याच्यासमोर त्याच्या स्वरूपाला अनुरूप अशी समृद्धी उलगडत जाते. दुसऱ्याचे यश पाहून आनंद होणे ही सुंदर अवस्था आहे. पण ते प्रत्येक वेळी सहज शक्य होतेच असे नाही. कधी मनात ईर्षा जागते. ती आली म्हणून स्वतःला वाईट माणूस समजू नये. ईर्षेकडे थोडे बारकाईने पाहिले तर तिच्यामध्येही एक संदेश असतो.
‘मलाही काहीतरी हवे आहे.’
‘मलाही मान्यता हवी आहे.’
‘माझ्यातील एखादी क्षमता वापरली जात नाही.’
‘मी मागे पडत आहे, असे मला वाटते.’
ईर्षेला दाबले तर ती कटुता बनू शकते. पण तिचे शांतपणे निरीक्षण केले तर, ती आपली अपूर्ण इच्छा आणि मार्गही दाखवू शकते.
मनाला आपण विचारावे, “मला त्या माणसाचा द्वेष आहे का, की त्याच्याकडे असलेली एखादी सुंदर गोष्ट मलाही आवश्यक वाटते आहे?”
हा प्रश्न अत्यंत प्रामाणिकपणे विचारला की, मनाचा बराच गुंता सुटू लागतो.
अनघाने गुरुजींना विचारले, “म्हणजे मला रेवतीशी तुलना करायचीच नाही?”
गुरुजी म्हणाले, “तुलना जरूर कर! पण दोन गोष्टींसाठी कर.”
“कोणत्या?”
“प्रेरणेसाठी आणि नवे शिकण्यासाठी.”
“आणि बाकी?”
“बाकी स्वतःशीच तुलना कर.”
“म्हणजे?”
“कालची अनघा आणि आजची अनघा. गेल्या वर्षी तुला जे जमत नव्हते, ते आज जमते का? तुझ्या रंगांमध्ये अधिक खोली आली का? तू अधिक संवेदनशील झालीस का? तुझ्या चित्रातून तुझे स्वतःचे काही दिसते आहे का? हे विचार.”
अनघाच्या डोळ्यांत पाणी आले.
ती हळू आवाजात म्हणाली, “मी रेवतीकडे पाहता पाहता माझी चित्रे पाहायचीच बंद केली.”
गुरुजी म्हणाले, “…आणि म्हणूनच तुला चित्रकला सोडावीशी वाटली. चित्रकला तुला सोडणार नाही. तू फक्त स्वतःच्या नजरेतून दूर गेली होतीस.”
हे केवळ चित्रकलेच्या बाबतीत झाले असे नाही. कितीतरी माणसे स्वतःच्या आयुष्यापासून याच प्रकारे दूर जातात. एखाद्या विद्यार्थ्याला नव्वद गुण मिळतात. त्याला आनंद व्हायला हवा. पण मित्राला पंच्याण्णव मिळाले म्हणून तो दुःखी होतो. एखाद्या कुटुंबाकडे सुंदर घर आहे. पण नातेवाइकाने अधिक मोठे घर घेतले की, स्वतःचे घर छोटे वाटू लागते. एखाद्या लेखकाला हजारो वाचक आहेत. पण दुसऱ्याला अधिक प्रसिद्धी मिळाली की, त्याला आपल्या लेखणीवरच संशय निर्माण होतो…
एका श्रेष्ठ आनंदाची किती विचित्र प्रकारे हत्या आहे ही!
आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद घेण्याऐवजी, दुसऱ्याकडे जे अधिक आहे त्याच्या तुलनेत आपण आपले सुख कमी करून घेतो. भगवद्गीतेतील स्वधर्माची संकल्पना इथे खूप मोलाची ठरेल. प्रत्येक मनुष्याची प्रकृती, क्षमता, जीवनस्थिती आणि यात्रा वेगवेगळी आहे. म्हणून दुसऱ्याचा मार्ग आपल्या आयुष्याचा मापदंड होऊ शकत नाही.
गुरुजींनी सांगितले तसे, एक बीज आंब्याचे आहे. दुसरे वडाचे. तिसरे चाफ्याचे. पण चाफ्याने स्वतःला वड बनवण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे स्वतःचे फूलच उमलणार नाही.
साधनेला हेच सांगायचे आहे.
स्वभावबीजमादाय
जीवनं पुष्पितं भवेत्।
पररूपानुकारेण
स्वरूपं न प्रकाशते॥
– गीताव्रत साधना
प्रत्येक मनुष्य आपल्या स्वभावाचे एक स्वतंत्र बीज घेऊन जन्माला येतो. त्या बीजाचा योग्य विकास झाला तर जीवन फुलते. दुसऱ्याचे रूप सतत अनुकरण करत राहिलो, तर स्वतःचे स्वरूप पूर्ण प्रकाशात येत नाही.
याचा अर्थ महत्त्वाकांक्षा सोडायची नाही. उलट खऱ्या महत्त्वाकांक्षेची सुरुवात येथे होते. इतरांना मागे टाकण्याची धडपड म्हणजे महत्त्वाकांक्षा नव्हे. कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक विकसित होण्याची इच्छा म्हणजे खरी वाढ.
आपण आपल्या मुलांनाही नकळत तुलना शिकवतो… “पाहिलेस का, त्याला किती गुण मिळाले?”
“ती मुलगी किती छान बोलते!”
“त्याचा पगार पाहा.”
“त्यांच्या मुलाने किती प्रगती केली!”
ही वाक्ये प्रेरणा देतील असे आपल्याला वाटते. काही वेळा ती प्रेरणा देतातही. पण वारंवार सहन न झालेली तुलना मनात स्वतःला छाटणारे गुप्त शस्त्र तयार करत राहते.
‘मी जसा आहे तसा असणे काही कामाचे नाही.’
खरंतर या वाक्यापासून अनेक समस्या जन्म घेतात.
“माझे सगळे मित्र माझ्यापेक्षा पुढे गेले,” तर लगेच त्याला, “असे काही नसते,” असे सांगण्यात अर्थ नाही. त्याला विचारावे, “पुढे म्हणजे नेमके कुठे? पैशात? पदात? प्रसिद्धीत? शिक्षणात?” आणि मग दुसरा प्रश्न विचारावा, “तुला प्रत्यक्षात काय हवे होते आणि सध्या काय हवे आहे?” कधी या एका प्रश्नाने मनाचा मार्ग बदलेल. कारण अनेकदा आपण ज्या शर्यतीत धावत असतो, तिचे अंतिम ठिकाण आपल्याला हवेच असते, असे नाही.
अनघाने काही दिवसांनी पुन्हा ब्रश हातात घेतला. नैराश्य मनात होतेच! पण हळूहळू रंगांशी तिचे जुने नाते पुन्हा जुळू लागले. तिने आईच्या सांगण्यावरून गुरुजींचे चित्र रेखाटले… आणि एके दिवशी थकलेले असतानाही चक्क गुरुजी आधार घेत घेत घरी आले. बराच वेळ ते काही बोलले नाहीत. चहा पाणी झाले.
अनघाने अस्वस्थ होऊन विचारले, “कसे आहात गुरुजी?”
गुरुजी म्हणाले, “मला तुझ्या चित्रात पुन्हा तू दिसायला हवी आहेस. ती विनंती करायला घरी आलोय.”
तिला त्या दिवशी कळले की, कलाकाराचे सर्वांत मोठे यश पुरस्कारात नसते. आपल्या निर्मितीत स्वतःची अस्सल छाप उमटण्यात असते.
आपले तसेच झाले आहे. शेवटी आपण कुणासारखे झालो, हा प्रश्न नसतो. आपण जे होऊ शकत होतो, त्याच्या किती जवळ गेलो, हा प्रश्न महत्त्वाचा असतो.
साधना सांगते,
नान्येन मापयेदात्मानं
नान्यभाग्येन खिद्यते।
स्ववृद्धिं पश्यतो नित्यं
शान्तिर्हृदि प्रवर्धते॥
– गीताव्रत साधना
स्वतःचे मूल्य दुसऱ्याच्या मापाने मोजू नये आणि आपल्या भाग्यामुळे स्वतःला दुःखीही करू नये. जो स्वतःच्या कलात्मक वाढीकडे लक्ष ठेवेल, त्याच्या हृदयातील शांतता वाढत जाते.
रात्री झोपण्यापूर्वी सहज एकदा कधीतरी असा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायला हरकत नाही, “आजवर मी कुणाशी तुलना केलीय, बरं ठीक, पण आज मी कुणाशी तुलना किंवा कुणाचा मत्सर माझ्याच नकळत करत नाहीये ना?”
पण त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारावा, “त्या तुलनेने मला आणखी उन्नत, आदर्श, गुणसंपन्न केले का? तुलनेने मला काय शिकवले, काय दिले?”
चुकून मनात आलेल्या ईर्षेची लाज बाळगू नये. कारण ती परिपूर्ण होण्याची सुप्त इच्छा असू शकते आणि परिपूर्णतेचे आपल्या व्याख्या नेहमी बदलत राहतात… मला शत्रूची उत्तम कृती, उत्तम विचार, उत्तम पद्धती या प्रेरणा देणाऱ्या ठराव्यात. प्रेरणा मिळाली, तर त्या प्रेरणेचा उपयोग कृतीसाठी करावा…
हेही वाचा – अहंकाराचे समूळ उच्चाटन करणारे सत्यज्ञान
जर मन म्हणाले, “मी इतरांपेक्षा मागे पडलो आहे,” तर त्याला प्रेमाने विचारावे, “आपली कोणती शर्यत सुरू आहे?” आपले उद्दिष्ट वेगळे असते. मग आपण असे नवीन काहीतरी पाहतो की, ते आपल्याला करावेसे वाटते. ते आपल्याला जमलेले नसते, कारण त्याचा आपण कधी विचारच केलेला नसतो.
जीवन खरंतर एकच शर्यत नाही. प्रत्येक माणूस आपली स्वतंत्र यात्रा करीत असतो. कुणाची पहाट लवकर होते, कुणाचा सूर्य थोडा उशिरा उगवतो. कुणाचे फूल वसंतात उमलते, कुणाचे भर पावसात. पण उशिरा उमलणारे फूल कमी सुंदर नसते. म्हणून दुसऱ्याच्या आकाशाकडे पाहताना त्याचा प्रकाश जरूर पाहावा, पण त्या प्रकाशात स्वतःचा दिवा विझवू नये!
स्वतःचे आकाश वेगळे आहे. स्वतःचा ऋतू वेगळा आहे. स्वतःचा मार्ग वेगळा आहे… आणि त्या मार्गावर चालणाऱ्या मनाला दररोज एवढेच सांगावे, “मला इतरांचे अनुकरण करायचे नाही मला रेवती व्हायचे नाही. मला माझ्या अनघातील सर्वोत्तम रूपापर्यंत पोहोचायचे आहे.”
कदाचित, तुलना कशी असावी हे मनाला समजण्याचा हा आरंभ असेल. कदाचित, न्यूनगंडातून मुक्त होण्याची ही पहिली पायरी असेल… आणि कदाचित स्वतःशी, स्वतःच्या मनाशी मैत्री करण्याची ही आणखी एक सुंदर साधना असेल.
कृष्णार्पणमस्तु।


