दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 12 जुलै 2025, वार : शनिवार
भारतीय सौर : 21 आषाढ शके 1947, तिथि : द्वितीया 25:46, नक्षत्र : उत्तराषाढा 06:35
योग : विष्कंभ 19:30, करण : तैतिल 14:00
सूर्य : मिथुन, चंद्र : मकर, सूर्योदय : 06:07, सूर्यास्त : 19:19
पक्ष : कृष्ण, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. भविष्यात काय करू शकता, हे जगाला दाखवायला घाबरू नका. पैशांच्या बाबतीत मेष जातक भाग्यवान असतील. तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगसाधना करा.
वृषभ – खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. दिवस उत्साहाने भरलेला असेल. वरिष्ठांशी वाद घालणे टाळणे चांगले. कामाचे ओझे वाढू शकते. मात्र, आर्थिक स्थिती मजबूत राहील.
मिथुन – दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी येणारा तणाव टाळण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक ठिकाणी तोंड बंद ठेवले तर, अनेक वाद टाळता येतील. जोडीदाराजवळ भावना व्यक्त केल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. आर्थिक बाजू स्थिर राहील.
कर्क – कर्क राशीच्या जातकांसाठी दिवस उत्तम असेल. अविवाहितांच्या आयुष्यात एखाद्या नव्या व्यक्तीचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्य आणि करिअर यात योग्य ते संतुलन ठेवा. चारित्र्य हे तुमची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.
सिंह – दिवस संमिश्र घटनांनी भरलेला असेल. गैरसमजूतीमुळे जोडीदाराशी वादाचा प्रसंग निर्माण होईल. रागावर नियंत्रण ठेवणे चांगले. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आर्थिक पाठबळ द्यावे लागू शकते, त्यामुळे खिशावर मोठा ताण येईल.
कन्या – संपत्तीची भर पडण्याचा योग जुळून येईल. आरोग्य चांगले राहील मात्र बाहेरचे अन्न खाणे टाळा. दिवस फायदेशीर ठरेल. एखादा नवीन प्रकल्प हाती घेता येईल, ज्यामुळे आर्थिक लाभ होईल. आत्मविश्वास वाढेल.
हेही वाचा – प्रसिद्धी मिळविण्याचा शॉर्टकट
तुळ – स्वतःवर लक्ष केंद्रित करा. तणावमुक्त राहण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम करा. आर्थिक स्थिती डळमळीत राहील. एखाद्या कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. कामाचा दबाव जास्त वाटत असेल तर, थोडा वेळ विश्रांती घेणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल.
वृश्चिक – व्यावसायिकांसाठी दिवस फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देखील मिळतील. जोडीदारासोबत दिवस व्यतीत करणे आवश्यक आहे. आयुष्याकडे सकारात्मक पद्धतीने पहा.
धनु – आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. खर्च करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आर्थिक स्थितीवर लक्ष केंद्रित करा. धनु राशीचे जातक संध्याकाळी जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवतील.
मकर – आर्थिक फायद्याचा दिवस आहे. मात्र त्याचबरोबर खर्चही वाढतील. जास्त ताण घेऊ नका आणि कामाचा ताण घरी आणू नका. काही जातकांसाठी हा दिवस खास असणार आहे. व्यावसायिकांच्या दृष्टीने अत्यंत व्यग्र दिवस असेल.
कुंभ – करिअरच्या दृष्टीने एखादी चांगली बातमी मिळू शकते. दिवस थोडा संमिश्र असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अनावश्यक तणाव टाळा. जोडीदाराला वेळ देणे महत्त्वाचे ठरेल. जंक फूड खाणे टाळले तर प्रकृतीच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल.
मीन – अत्यंत उत्तम दिवस असेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून प्रेरणा मिळेल, ज्यामुळे उत्पादनक्षमता वाढेल. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. बाहेरचे अन्न खाणे टाळा.
हेही वाचा – रिसेप्शन… आयुष्यातील ‘गोल्ड स्पॉट’
दिनविशेष
इतिसहाससंशोधक वि. का. राजवाडे
टीम अवांतर
इतिहास, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण यासारख्या बहुविध विषयांवर व्यासंगपूर्ण संशोधन आणि लेखन केलेले एक इतिहाससंशोधक वि. का. तथा विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म 12 जुलै 1864 रोजी झाला. सुरुवातीला त्यांनी प्रपंच चालावा, यासाठी नोकरी केली. मात्र पत्नीच्या अकाली निधनानंतर त्यांनी आयुष्यभर नोकरी न करता इतिहास संशोधनासाठी वाहून घेतले. संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही ऐतिहासिक साधनांच्या तसेच प्राचीन साहित्याच्या शोधात ते सतत हिंडत राहिले. प्राचीन अवशेष तपासत, जुनी कागदपत्रे धुंडाळत असतानाच, त्यांचे लेखनकार्यही अव्याहतपणे सुरू होते. ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या नावाने त्यांनी तब्बल 22 खंडांचे संपादन करून नंतर ते प्रसिद्ध केले. याशिवाय राधामाधवविलासचंपू आणि महिकावतीची बखर, ज्ञानेश्वरीची फार जुनी हस्तलिखित पोथी, निङ्त विचार, सुबंतविचार, संस्कृत भाषेचा उलगडा, महाराष्ट्राचा वसाहतकाल असे काही त्यांनी संपादिलेले आणि लिहिलेले ग्रंथ नंतरच्या काळात प्रसिद्ध झाले. राजवाड्यांची ‘इतिहासमीमांसाही’ खूप गाजली. लेखनाव्यतिरिक्त 1910 साली पुण्याच्या प्रसिद्ध भारत इतिहास संशोधक मंडळाची त्यांनी स्थापना केली. शिवाय समाजशास्त्र मंडळ, आरोग्यमंडळ अशा संस्थाही त्यांनी उभ्या केल्या. रेल्वे प्रवासी संघटनाही त्यांनी उभी केली होती. राजवाडे यांनी आयुष्यभर प्रचंड व्यासंग केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी आपले सर्व संशोधन आणि चिंतन फक्त मराठी भाषेतूनच व्यक्त केले. कीर्ति, संपत्ती, अधिकार या कशाचाच मोह न बाळगत एकनिष्ठ वृत्तीने ज्ञानोपासना करण्याचा ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला. अशा या अभ्यासकाचे 31 डिसेंबर 1926 रोजी निधन झाले.