भाग – 11
मामीसह उमा थोडं चालण्यासाठी घराबाहेर पडली. रस्त्यात वंदना भेटली. तिच्याबरोबर तीन वर्षांची मुलगी शरयू होती. वंदनाचे अनुभव ऐकून उमा अस्वस्थ झाली. शरयूचा जन्म झाला, त्यावेळी वंदनाला बघायला अगर भेटायला सासरचे कुणीही आले नव्हते. आले ते थेट बारशालाच. तिचा नवराही आठ दिवसांनंतर आला होता!
“असं कसं वंदू? तुझ्या नवऱ्याला जाणीव नाही का आपल्या बायकोची? लग्नाच्या वेळी जे विधी केले जातात ती वचने जपण्याचे काम फक्त स्त्रीचेच आहे का?”
“उमा, लग्नाच्या वेळी किंवा त्यानंतरचे काही दिवस आपल्याभोवती भिरभिरत फिरणारा नवरा पाहून आपण सुखावतो, पण नवऱ्याची खरी ओळख अशा प्रसंगी होते. कुठल्याही स्त्रीला जर नवऱ्याचा पाठिंबा असेल तर ती सगळ्या जगाशी लढू शकते, पण तोच जर उदासीन असेल तर ती घरातही आपले स्थान निर्माण करू शकत नाही गं. तिथे ती पालापाचोळा ठरते.”
“खरं आहे गं वंदू तू म्हणतेस ते… यासाठी बाईने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे.”
“अगं, ही शरयू झाली आणि मी नाही तिला सांभाळणार असे सासूबाईंनी सांगितले. त्यामुळे मला नोकरी सोडावी लागली. नवऱ्याशी बोलले तर त्याला काहीच फरक पडत नव्हता माझ्या नोकरी सोडण्याचा.”
“बरं, आता तब्येतीची काळजी घे. किती काळवंडली आहेस! काळजी करू नकोस, सगळे व्यवस्थित होईल.”
“मुलगा झाला तर… वंशाला दिवा मिळाला तरच मी पुन्हा तिथे जायचेय.”
“असे काही नाही गं. सासुबाई बोलल्या म्हणजे लगेच तसेच करतील असे नाही ना! नवरा काही बोलत नसेल, आईविरुद्द कसे बोलायचे म्हणून, पण त्यालाही खटकत असेल आईचे वागणे मनातून. फार विचार करू नकोस याचा. तब्येतीकडे लक्ष दे. शरयूकडे लक्ष दे. सगळे चांगले होईल.”
हेही वाचा – उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!
तिचा निरोप घेऊन उमा माघारी परतली. परतताना ती गप्प झालीय हे लक्षात येऊन मामीने तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा चेहरा कोमेजला होता.
दोघी घरी आल्या तर आई शेतातून परत आली होती. बाबांनी तिच्यासाठी कोंबडा कापला होता. त्याचा स्वयंपाक बनवणे आईने सुरू केले होते. उमाचा कसनुसा झालेला चेहरा पाहून तिने काळजीने विचारले,
” काय झालं गं? चेहरा का इतका उतरलाय?”
“काही नाही गं, दमले.”
“मग कशाला चालायचं एवढं? व्हय गं, तुला पण कळलं नाही का?” ती मामीकडे बघून दटावली.
“वन्स, तिला वंदू भेटली होती. दोघींच्या गप्पा रंगल्या होत्या. आम्ही काय लांब गेलो नव्हतो, इथंच कोपऱ्यापर्यंत गेलो होतो.”
मामीने आपली बाजू सावरली.
हेही वाचा – उमानं ऐकली वंदनाची व्यथा
“अगं, मग मैतरणीला घरी घेऊन यायचं नाहीस का? दोघीजणी सोबत जेवला असता. थांब, मीच सुशीला जाऊन सांगते, वंदूला इकडचं जेवायला पाठव म्हणून.” असे म्हणत आई बाहेर पडली सुद्धा. वंदूच्या बोलण्यातून अजून बाहेर न पडलेली उमा आईकडे फक्त पाहात राहिली…
बालपणी आपण आणि वंदू जेव्हा भातुकली खेळायचो, तेव्हा खोटं खोटं लग्न व्हायचं. त्या नवऱ्याला सतराशे साठ प्रश्न विचारून घाईला आणायचो. तीच वंदू आता तिच्या खऱ्या आयुष्यात मात्र मूग गिळून गप्प बसली आहे. अन्याय करणाराइतकाच अन्याय सहन करणारा पण दोषी असतो, हे वंदूला माहीत असूनही वंदू अशी का वागतेय? खरंच लग्न झालं, एक मूल झालं की, आयुष्याची सगळी समीकरणे बदलतात?
आपण दुसऱ्यावर अवलंबून असणे आणि त्यासोबतच आपल्या बाळासाठी मुकाट्याने सहन करणे हे एक आईच करू शकते, असे उलटसुलट विचार उमाच्या मनात उमटत होते.


