उत्तरार्ध
जुम्मन चाचा, अब्दुल आणि जगदाळे मास्तर हे तिघेही असेच एकटेपणाचा शाप घेऊन जगत असलेले समदुःखी. आपल्या रोजच्या नित्यक्रमाने बांधलेले. जगण्यासाठी आयुष्याशी झगडत रहाणे, हाच एकमेव नित्यक्रम होता त्यांचा. पण आजचा दिवस काही वेगळेच प्राक्तन घेऊन आला होता.
दुपारच्या जेवणापर्यंत सगळे नेहमीप्रमाणे सुरू होते. दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास अचानक एक घोळका वेशीकडे जाताना दिसला. थोड्या वेळाने अजून काही लोक पळत वेशीकडे जाताना दिसले. असेल काही तरी म्हणत चाचाने सुरुवातीला दुर्लक्ष केले. पण गर्दी वाढ़ायला लागली तसे चाचाने एकाला हटकले,
“क्या हुआ रे मारती? येवडी गर्दी कशापाय जमली रे?”
“पानी आ रा चिच्या. वडे (ओढे) में पानी आ रा भोत. वरल्या धरणाचं दरवाजं उगडल्यात जनू.”
“काय म्हणतो? तू व्हय फुडं. मैं आतोच तो हाटील बंद करको.”
चाचाने लगबगीने फळी लावली, हॉटेल बंद केले आणि वेशीकडे निघाला. नदीला पाणी येणे ही घटना गावाच्या दृष्टीने प्रचंड अपूर्वाईची होती. गेल्या दहा-बारा वर्षांत नदीतला भुताळीचा डोह सोडला तर, नदीला पाणी म्हणजे दिवास्वप्नच होते. जाता जाता अर्ध्या रस्त्यातच वेशीकडे निघालेले अब्दुल आणि जगदाळेमास्तर भेटले. तसा त्यांनाही आधार आल्यासारखा वाटला.
“अब्दुल मियाँ, कैकु पता नै पन उगाचच डर लग रा… सुब्बे से अँख्खी फडफडा रई होर अब ये पानी आ रा नदी में.”
“क्या चिच्या, ये खुशी का वखत है! सालों बाद वडे में पानी आरा, होर तुम रो रे फालतुच. क्या वो गुर्जी?”
“हो ना, ही तर आनंदाची गोष्ट आहे की जुम्मनचाचा.”
“अल्ला करे तुम्हारा कहा सच हो,” जुम्मनचाचानी सुस्कारा सोडला, पण का कोण जाणे छातीतली धाकधुक काही कमी होत नव्हती त्यांच्या. वेशीपलीकडे नदीतीरावर सगळा गाव लोटला होता. बारा महिने कोरडी असणारी नदी चक्क दुथडी भरून वाहात होती. खूश झालेली पोरंसोरं तशीच कपडयासकटच पाण्यात उड्या टाकत होती, डुंबत होती. काही जणांनी तर पुढची स्वप्नं सुद्धा पाहायला सुरुवात केली.
“औंदा पिकाला भरपूर पाणी मिळणार. सोनं पिकणार. मागच्या साली घराचं मागलं भिताड़ पलडं व्हतं, ते बांदून घियाचं या बारीला.”
“पाऊस नाही, पाणी नाही इथे. अचानक नदी कशी काय वाहती झाली?” जगदाळे गुरुजींना नवल वाटत होतं.
“क़ाय की, आपल्याला क़ाय कराचं ओ गुर्जी. पाणी आलं हेच बास की. ते बगा हंबीरकाका आलं, तेस्नी इच्यारा…” कुणीतरी गावकरी म्हणाला. सगळं गाव आनंदात न्हावून निघालं होतं.
हंबीरकाका आता ऐशीच्या घरात होते. गावातले सगळ्यात ज्येष्ठ. मान होता!
“तिकडं वरच्या बाजूला लै पाऊस झालाय गुर्जी. शिरपूरचं धरण टाकोटाक भरलंय बगा. म्हणून काही दरवाजे उघडून पाणी सोडलंय खाली. श्याणीसुरती माणसं म्हणत्यात यंदा सा मैने तरी पाणी राहील नदीला… देवच पावला हो, देव पावला.”
हेही वाचा – कहाणी जुम्मन चाचा आणि गावकऱ्यांची!
डोईवरच्या विरी गेलेल्या पटक्याच्या शेवाने डोळं पुसत हंबीरकाका खुशीनं बोलले आणि बिगीबिगी नदीकडे निघाले.
“ओsss जुम्मन, ओsss अब्दुल, गुर्जी… आव हिकडं. देव पावला वो, देव पावला.”
पवाराच्या म्हातारींनं त्रिकुटाला बघून हाकारायला सुरुवात केली, तसे तिघे तिकडे वळले.
“क्यां गे चच्ची, तू तो एकदम जवान लग री आज.”
नेहमीप्रमाणे अब्दुलने तिला चिडवलं. पण आज म्हातारी चिडली न्हाय. आज ती लैच खुश होती… खुदकन हसली. मिस्कील हसतच त्यांच्याकडे बघत म्हणाली…
“हायेच मी जवान अजून अब्दुल्या. तुज्यासारकी म्हातारी नाय जाले अजून. का रे जुम्मन, करतो का माज्याशी शादी?”
ते ऐकलं आणि अब्दुल थेट चालीस-पैतालीस वर्षांपूर्वीच्या काळात जाऊन पोचला. जुम्मनचिच्याची बायको वारली तेव्हा अब्दुल सतरा-अठरा वर्षाचा होता. जुम्मनचिच्याचं घर मारूतीच्या पारामागच्या पवारवस्तीला लागून होतं. रंगा पवाराची विधवा पोरगी यशोदा पस्तिशीतल्या जुम्मनवर जीव जडवून बसली होती. जुम्मनलाही ती आवडायची, पण…
यशोदा तशी फाटक्या तोंडाची आणि बिनधास्त, तर जुम्मन अतिशय साधा, सरळ माणूस. त्यात हंबीरकाकाचे डोंगराएवढे उपकार त्याच्या डोक्यावर. त्या काळात गावाने हा हिन्दू-मुस्लिम जोडा कधीच मान्य केला नसता, हे जुम्मन आणि यशोदा दोघेही ओळखून होते. जुम्मनने थोडे धाडस दाखवले असते, तर यशोदा सगळ्या गावाशी लढली असती. पण…
हे दोघेही आपली प्रेमभावना मनातल्या मनात दाबून जगत राहिले. त्यामुळेच गावात मागे काहीही राहिलेले नसूनसुद्धा जुम्मनने गाव सोडला नव्हता. यशोदेच्या बापाने एक दोन वेळा तिचा पाट लावायचा प्रयत्न केला होता पण यशोदाने ठाम नकार दिला. जबरदस्ती केली तर घर सोडायची धमकी दिली. आणि तशीच जुम्मनच्या समोरच एकटी जगत राहिली. कधी ना कधी जुम्मन लग्नाला तयार होइल या आशेवर.
आज पुन्हा सत्तरी ओलांडलेली यशोदा, पंचाहत्तरीच्या जुम्मनला विचारत होती, “माझ्याशी शादी करतोस का?”
“यशोदे, तू सच्ची शादी करना चाहती मेरेसे अभीभी? सच्ची? चल, काय व्हायचं ते होऊ दे, आज निकाह कर ही लेते है. जिंदगीत एवडी एकच आरजू बाकीय. निदान मरताना तरी सुखाने मरू.”
अब्दुलने आ वासून चिच्याकडे पाहिलं. आपण नक्की काय ऐकलं, ते त्याला कळेना.
“ऐसे क्या देख रहा अब्दुलमियाँ, दिलसे बोल रा मई. समदी जिंदगी अशीच घालवली. आता काय व्हायचं ते होऊ दे. यशोदा, चल आजीच हंबीरकाका और गाव पंचायतसे बात करते. उनो माने तो ठीक, नै तो सबकुछ छोड को कहीं और चले जैंगे.”
अब्दुलने म्हातारीकडे बघितलं. म्हातारी दगडावर बसून जुम्मनचिच्याकडे एकटक बघत होती. त्या म्हाताऱ्या डोळ्यात एक वेगळीच आनंदी चमक होती. नदीला लाभलेलं जीवन जणू या दोन म्हाताऱ्या जीवांना तारुण्य देऊन गेलं होतं.
बराच वेळ झाला तरी म्हातारी तशीच बघतेय म्हटल्यावर, अब्दुलला अजून चिडवण्याची लहर आली…
“म्हातारे, मी तुझा करवला होणार बरका. चिच्याचा कान पिळायला कुणी तरी पाहिजेच की,” असे म्हणत त्याने गंमतीने जुम्मनचिच्याचा कान धरला. तसा चाचा उभ्यानेच त्याच्या अंगावर कोसळला.
हेही वाचा – सलग 131 डॉट बॉल्स…
“चिच्या, क्या हुवा?” घाबऱ्या स्वरात अब्दुलने विचारलं.
चाचाने हळूच डोळे उघडले, क्षीण स्वरात उद्गारला…
“गयी रे उनो, मेरे को बुलाके अकेलीच निकल गयी आग्गे. जाना पडेगा मेर को भी. सारी जिंदगी अकेलीच जी उनो मेरे वास्ते. अब तो साथ देने दे उसका…” आणि चिच्याने डोळे मिटले.
अब्दुलने भरल्या डोळ्याने चिच्याला खाली ठेवत म्हाताऱ्या यशोदेकडे पाहिले. ती अजूनही तशीच बघत होती. आनंदी, समाधानी डोळ्यांनी. अब्दुलने हलक्या हाताने तिचे डोळे मिटले.
या अफाट जगात मनुष्यप्राणी किती क्षुद्र आहे, याची त्याला पुन्हा एकदा जाणीव झाली होती. नदीचे पाणी वाढतच होते. निसर्गाचे ते आनंदी रूप पाहात अब्दुलने आकाशातल्या अल्लाकडे बघत दोन्ही हात उंचावले आणि गेल्या जीवांसाठी त्याची करुणा भाकत आपल्या डोळ्यातल्या आसवांना वाट करून दिली.


