अध्याय तेरावा
तरी जयाची प्रीति पुरी । गुंतली देखसी घरीं । नवगंधकेसरीं । भ्रमरी जैशी ॥781॥ साकरेचिया राशी । बैसली नुडे माशी । तैसेनि स्त्रीचित्त आवेशीं । जयाचें मन ॥782॥ ठेला बेडूक कुंडीं । मशक गुंतला शेंबुडीं । ढोरु सबुडबुडीं । रुतला पंकीं ॥783॥ तैसें घरींहूनि निघणें । नाहीं जीवितें मरणें । जया साप होऊनि असणें । भाटीं तियें ॥784॥ प्रियोत्तमाचां कंठीं । प्रमदा घे आटी । तैशी जीवेंसी कोंपटी । धरूनि ठाके ॥785॥ मधुरसोदोशें । मधुकर जचे जैसें । गृहसंगोपन तैसें । करी जो गा ॥786॥ म्हातारपणीं जालें । माणिक एक विपायिलें । तयाचें कां जेतुलें । मातापितरां ॥787॥ तेतुलेनि पाडें पार्था । घरीं जया प्रेम आस्था । आणि स्त्रीवांचूनि सर्वथा । जाणेना जो ॥788॥ महापुरुषाचें चित्त । जालिया वस्तुगत । ठाके व्यवहारजात । जयापरी ॥789॥ तैसा स्त्रीदेहीं जो जीवें । पडोनिया सर्वभावें । कोण मी काय करावें । कांहीं नेणे ॥790॥ हानि लाज न देखे । परापवादु नाइके । जयाचीं इंद्रियें एकमुखें । स्त्रिया केलीं ॥791॥ चित्त आराधी स्त्रीयेचें । स्त्रीयेचेनि छंदें नाचे । माकड गारुडियाचें । जैसें होय ॥792॥ आपणपेंही शिणवी । इष्टमित्र दुरावी । मग कवडाचि वाढवी । लोभी जैसा ॥793॥ तैसा दानपुण्यें खांची । गोत्रकुटुंबा वंची । परी गारी भरी स्त्रियेची । उणी हों नेदी ॥794॥ पूजिती दैवतें जोगावी । गुरूतें बोलें झकवी । मायबापां दावी । निदारपण ॥795॥ स्त्रियेचां तरी विखीं । भोगुसंपत्ती अनेकीं । आणी वस्तु निकी । जे जे देखे ॥796॥ प्रेमाथिलेनि भक्तें । जैसेनि भजिजे कुळदैवतें । तैसा एकाग्रचित्तें । स्त्री जो उपासी ॥797॥ साच आणि चोख । तें स्त्रियेसीचि अशेख । येरांविषयीं जोगावणूक । तेही नाहीं ॥798॥ इयेतें हन कोणी देखैल । इयेसी वेखासें जाईल । तरि युगचि बुडैल । ऐसें जया ॥799॥ नायटेयां भेण । न मोडिजे नागांची आण । तैसी पाळी उणखुण । स्त्रीयेची जो ॥800॥ किंबहुना धनंजया । स्त्रीचि सर्वस्व जया । आणि तियेचिया जालिया- । लागीं प्रेम ॥801॥ आणिकही जें समस्त । तेथिंचें संपत्तिजात । तें जीवाहूनी आप्त । मानी जो गां ॥802॥ तो अज्ञानासी मूळ । अज्ञाना तेणे बळ । हें असो केवळ । तो तेंचि रूप ॥803॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कडाडीं लोटला गाडा, शिखरौनि सुटला धोंडा
अर्थ
तर ताज्या, सुवासिक कमळाच्या केसरांत जशी भ्रमरी गुंतून राहते, त्याप्रमाणे घराच्या ठिकाणी ज्याची पूर्ण प्रीती गुंतलेली पाहाशील ॥781॥ साखरेच्या राशीवर बसलेली माशी जशी उडत नाही (अथवा) त्याचप्रमाणे जसे एखाद्याचे मन स्त्रीच्या चित्ताला धरून बसते, (तेथून हलत नाही), ॥782॥ बेडूक जसा पाण्याच्या कुंडात राहिलेला असतो अथवा चिलट जसे शेंबडात गुंतलेले असते अथवा गुरूं जसे चिखलात पूर्णपणे फसते, ॥783॥ त्याप्रमाणे जिवंतपणी अथवा मेल्यावर जो घरातून बाहेर पडत नाही व जो (मेल्यावर) त्या जागेत सर्प होऊन असतो ॥784॥ नवर्याच्या गळ्याला जशी तरुण स्त्री मिठी घालते, त्याप्रमाणे जो आपल्या जीवाशी झोपडीला धरून रहातो ॥785॥ पुष्पातील मध मिळण्याच्या हेतूने मधमाशी जशी श्रम करते तशा श्रमांनी जो घराची जोपासना करतो. ॥786॥ म्हातारपणी झालेल्या एकुलत्या एक पुत्ररत्नाचे, त्याचे आईबापास जितके प्रेम असते, ॥787॥ अर्जुना, तितक्या मानाने ज्याला घराची आस्था व प्रेम असते आणि जो स्त्रीवाचून दुसरे काही मुळीच जाणत नाही ॥788॥ ब्रह्मनिष्ठांचे अंत:करण, ब्रह्मस्वरूपी निमग्न झाले असतां त्याचे सर्व जसे व्यापार बंद पडतात, ॥789॥ त्याप्रमाणे स्त्रीच्या शरीराच्या ठिकाणी, जो जीवाने व सर्व भावांनी आसक्त असतो व मी कोण व माझे कर्तव्य काय, हे काही जो जाणत नाही ॥790॥ जो नुकसान, लाज पाहात नाही, दुसर्यांनी केलेल्या आपल्या निंदेकडे लक्ष देत नाही, ज्याच्या सर्व इंद्रियांची धाव एका स्त्रीविषयाकडेच असते ॥791॥ ज्याप्रमाणे गारुड्याचे माकड गारुड्याच्या छंदाप्रमाणे वागणारे असते, तसा जो स्त्रीच्या चित्ताचे आराधन करतो व जो स्त्रीच्या छंदाने नाचतो, ॥792॥ ज्याप्रमाणे एखादा लोभी पुरुष आपल्यालाही शिणवतो व इष्टमित्रांस दूर करतो आणि मग द्रव्यच वाढवितो ॥793॥ त्याप्रमाणे (स्त्रीची भर करण्याकरता) जो दान व पुण्य करण्याचे कमी करतो, तो कुटुंबातील माणसांना फसवतो, परंतु स्त्रीची खाच भरीत असतो, त्यात कमी पडू देत नाही. ॥794॥ पूजिल्या जाणार्या देवतांची (बिगार टाकल्याप्रमाणे) गंधफूल वाहून जेमतेम पूजा करतो, गुरूला ठकवितो आणि आईबापांना दैन्य दाखवितो. ॥795॥ तथापि स्त्रीसाठी मात्र भोगांची अनेक ऐश्वर्ये (साधने) व जी जी म्हणून चांगली वस्तु दिसेल ती ती आणतो ॥796॥ प्रेमळ भक्ताने जसे कुलदैवतेला भजावे, त्याप्रमाणे जो स्त्रीची उपासना एकाग्र चित्ताने करतो ॥797॥ जे खरे व चांगले असेल, ते सर्व स्त्रीला देतो व कुटुंबातील इतर माणसांची नुसती जोगवणूक(देहरक्षण) देखील करीत नाही, ॥798॥ हिला कोणी (वाकड्या दृष्टीने) पाहील हिच्याशी कोणी विरुद्ध वागेल, तर युगान्तच होईल असे ज्याला वाटते, ॥799॥ ज्याप्रमाणे नायट्याच्या भयाने देवीची शपथ मोडत नाहीत, त्याप्रमाणे जो स्त्रीचे मनोगत पाळतो ॥800॥ अर्जुना, फार काय सांगावे! ज्याचे सर्वस्व काय ते एक स्त्रीच असते आणि तिच्यापासून झालेल्या (मुला) वर ज्याचे प्रेम असते ॥801॥ अरे तिची जी आणखीही चीजवस्तु असेल ती जो जीवापेक्षा अत्यंत जवळची मानतो ॥802॥ तो पुरुष अज्ञानाचे मूळ आहे. अज्ञानाला त्याच्या योगाने बळ असते. हे बोलणे राहू दे. तो अज्ञानाची मूर्तीच आहे ॥803॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : न धरावा तो संगु, न लागावें तेथ लागु


