माझं माहेर विदर्भातील अकोला! अकोल्याला स्वतःचा एक वेगळा असा खाद्यसंस्कृतीचा वारसा आहे. स्त्री वयाने कितीही मोठी झाली तरी, माहेरच्या आठवणी तिच्या कायम स्मरणात असतात, त्याला मीदेखील अपवाद नाही. आमच्या अकोल्याला भाज्या खूपच छान मिळतात. पालक, मेथी, आंबटचुका अशा ताज्या हिरव्या पालेभाज्यांच्या जुड्या पाहिल्या की, माणूस मोहात पडणारच ना? रसरशीत लालचुटुक टोमॅटो, काटेरी गुलाबीसर वांगी, हिरवी आणि जांभळी वांगी, भरताची मोठी पण मऊ-लुसलुशीत ठसठशीत वांगी, कोवळी-लुसलुशीत घोसाळी (ज्याला आम्ही गिलके म्हणतो), शिरी दोडके, पांढरेशुभ्र आणि हिरवीगार पाने असलेले कोवळे मुळे, तांबडा भोपळा (काशीफळ), वाल, चवळी, गवारीच्या कोवळ्या हिरव्या शेंगा… इतक्या ताज्या भाज्या पाहून मला काय घ्यावं अन् काय नको असं होतं. अकोल्याला जायचं असेल तर मी घरातला फ्रीज रिकामा करूनच जाते; म्हणजे तिकडून परतताना मोठ्या पिशवीभर भाज्या आणल्या की, आठ-दहा दिवसांची बेगमी पूर्ण!
यावेळीही तसंच झालं. भाचीच्या मंगळागौरीच्या निमित्ताने सात-आठ दिवस छान माहेरपण भोगून झालं. निघताना पिशवी भरून भाज्या घेतल्या, त्यात ‘हिरव्या मुगाच्या शेंगा’ हे एक नवीन ॲडिशन होतं! मुगाची एक अन् एक दाणेदार भरलेली शेंग पाहून राहवलंच नाही. मुगाच्या शेंगा विकणारा एक 14-15 वर्षांचा लहानसा मुलगा ढीगभर शेंगा घेऊन बसला होता. त्याच्याकडे दुसरी कुठलीचं भाजी नव्हती. त्याला मी शेंगांचा भाव विचारल्यावर तो म्हणाला, “एक किलो 80 रुपयाला, अन् अर्धा किलो 50 रुपयाला!” त्याचा हा अजब व्यवहार मला फारसा पटला नाही, म्हणून मी सरळ 100 रुपयांच्या शेंगा मागितल्या. त्यानेही खूश होऊन सव्वा किलोच्या आसपास शेंगा पदरात टाकल्या. मग काय, आनंदी आनंदच!
शेंगामधील हे दाणे काढायला थोडे कष्ट पडतात, पण मुगाच्या दाण्यांची चविष्ट आमटी खायची म्हटल्यावर तेवढे कष्ट तर करायलाच हवेत. नागपूरला आल्यावर शेंगा सोलण्याचे सोपस्कार पार पाडले. हिरव्या वाटणाचा मसाला लावून मुगाच्या दाण्यांची खमंग आमटी केली आणि सोबतीला त्याच दाण्यांचा झणझणीत ठेचा! तोंडी लावायला टोमॅटो-काकडी आणि सोबत ज्वारीची गरमागरम भाकरी… अहाहा, क्या कहना!! स्वर्गसुख याहून दुसरं काय असणार?
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल लबाड वांगी किंवा फसवी वांगी!
हिरवे मुगाचे दाणे, हिरवी मिर्ची, कोथिंबीर सगळंच हिरव्या रंगाचं असल्याने आमटीला रंगही काय सुरेख हिरवागार आला होता! One of my favourite dishes! आता त्याची रेसिपी पाहूयात.
साहित्य
- ताजे हिरवे मुगाच्या शेंगांचे दाणे – 1 ते दीड कप
- पाणी – आवश्यकतेनुसार
- तेल – 1 पळीभर
- मोहरी – 1 लहान चमचा
- जिरे – 1 लहान चमचा
- हिंग – 1 लहान चमचा
- हळद – अर्धा लहान चमचा
- मीठ – चवीनुसार
- गोडा मसाला – 1 चमचा
- धणे – जिरेपुड – 1 चमचा
- कढीपत्ता – सात-आठ पाने
हिरव्या वाटणासाठी साहित्य
- हिरव्या मिरच्या – 5 ते 6 (आवडीनुसार कमी-जास्त)
- लसूण पाकळ्या – 5 ते 6
- आले – 1 इंच तुकडा
- जिरे – 1 लहान चमचा
- ताजी कोथिंबीर –मूठभर
हेही वाचा – Recipe : पालक आणि कांद्याच्या पातीचे रायते
कृती
- हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, आले, जिरे आणि भरपूर कोथिंबीर एकत्र करून मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर थोडे पाणी घालून बारीक पेस्ट (वाटण) करून घ्या. आवडत असल्यास यात एक चमचाभर खसखस टाकू शकता.
- सोलेले ताजे हिरवे मुगाचे दाणे मिक्सरमध्ये पाणी न घालता फक्त 2 ते 3 सेकंद ‘पल्स’ (Pulse) मोडवर फिरवून त्यांची जाडसर भरड (कणी) काढून घ्या. दाणे पूर्ण बारीक पेस्ट न करता थोडे रवाळ ठेवायचे आहेत.
- एका कढईत किंवा पातेल्यात दोन मोठे चमचे तेल गरम करा.
- तेलात मोहरी टाका; मोहरी छान तडतडल्यावर जिरे, हिंग आणि हळद घाला. नंतर कढीपत्त्याची पाने टाका आणि आता तयार केलेले हिरवे वाटण तेलात घालून मध्यम आचेवर दोन मिनिटे छान खमंग परतून घ्या, जेणेकरून लसूण आणि आल्याचा कच्चा वास निघून जाईल.
- एक चमचा गोडा मसाला आणि एकेक चमचा धणे/ जिरेपूड टाकून या परतलेल्या मसाल्यामध्ये मुगाच्या दाण्यांची जाडसर भरड घाला आणि एक ते दोन मिनिटे मसाल्यासोबत परतून त्याच्या गाठी मोडून सर्व मिश्रण एकसारखे करा.
- नंतर त्यात गरजेनुसार (सुमारे दोन ते अडीच कप) गरम पाणी घाला. आमटी फार घट्ट किंवा फार पातळ न ठेवता मध्यम रस्सा ठेवावा.
- चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्या.
- आमटीला मध्यम आचेवर छान उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर आच मंद करा आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे दाण्याची भरड मऊ होईपर्यंत शिजू द्या. हे दाणे पटकन शिजतात.
- आमटी छान खळखळून उकळली की, गॅस बंद करावा.
- हिरव्या वाटणामुळे आमटीला सुंदर हिरवा रंग येतो आणि खमंग सुगंध सगळीकडे दरवळला की, भूकही खवळून येते.
मग अशा गरमागरम, झणझणीत हिरव्या मुगाच्या दाण्यांची आमटी ज्वारीची मस्तपैकी पोपडा सुटलेली भाकरी तसेच ठेचा, कांदा, लिंबू, मुळा-मेथीचा खुडा / घोळाणा याच्याबरोबर आस्वाद घ्यायचा. तर, भातासोबत ताटामध्ये ही आमटी वाढून आनंद घ्यायचा. भाकरीचा कुस्करा करून त्यावर ही आमटी घेऊन त्याचा काला करायचा… या साध्याच परंतु तितक्याच रुचकर जेवणावर यथेच्छ आडवा हात मारायचा.


