नीलिमा खडतकर
भातासाठी साहित्य
- तांदूळ (कुठलेही जुने तांदूळ घ्यावेत, भात फडफडीत हवा) – एक कप
मुटक्यांसाठी साहित्य
- मटकी – पाव कप
- चवळी – पाव कप
- सालीची मूगडाळ – पाव कप
- लाल तिखट – एक टीस्पून
- धणे-जिरे पूड – एक टीस्पून
- हळद – एक टीस्पून
- हिरवी मिरची-आलं पेस्ट – एक टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- कोथिंबीर – मूठभर (बारीक चिरलेली)
- दही – दोन टीस्पून
कढीसाठी साहित्य
- ताक – एक कप (थोडे आंबट)
- बेसन – दोन टीस्पून
- फोडणीसाठी – मोहरी, जिरे, मेथी दाणे, कढीपत्ता, लाल मिरची, हळद, हिंग, तेल
हेही वाचा – Recipe : चटपटीत व्हेजिटेबल्स-सोया पॅटिस आणि खाकरा भेळ!
मुटके बनविण्याची कृती
- मटकी, चवळी, सालीची मूगडाळ मंद आचेवर दोन मिनिटे वेगवेगळे परतून घ्यावे (परतून घेतल्याने मुटके पचायला जड जात नाही).
- थंड झाल्यावर मिक्सरमधून जाडसर पीठ (भरड) तयार करा.
- एका भांड्यात सगळी पिठं एकत्र करा.
- त्यात एक टेबलस्पून तेल, दोन टीस्पून दही, लाल तिखट, धणे जिरे पूड, हळद, हिरवी मिरची-आलं पेस्ट, मीठ घालून कोमट पाण्यात भिजवून घट्ट गोळा करून घ्या.
- नंतर त्याचे छोटे गोळे करून मूठीमध्ये दाबून मुटके तयार करा.
- आता गॅसवर पातेले ठेवून त्यात अर्धे टीस्पून तेल घाला. तेल गरम झालेकी अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून मीठ आणि दीड कप पाणी घाला.
- पाण्यला उकळी आल्यावर त्यात तयार मुटके सोडा आणि मध्यम आचेवर 20 ते 25 मिनिटे छान शिजू द्या.
- सर्व पाणी आटल्यावर झाले मुटके तयार.
कढी बनविण्याची कृती
- प्रथम ताकात बेसन छान मिसळून घ्या.
- नंतर गॅसवर पातेले ठेवून त्यात तेल घाला. तेल गरम झाले की, त्यात मोहरी, जिरे, मेथी दाणे, हिरवी मिरची-लसूण पेस्ट, कढीपत्ता, हळद, हिंग याची खमंग फोडणी करून घ्या.
- आता त्यामध्ये बेसन घातलेले ताक घाला आणि चवीनुसार मीठ घालून 5 मिनिटे मंद गॅसवर कढी उकळू द्या
- वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
हेही वाचा – Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे
सर्व्हिंग
- नेहमीप्रमाणे फडफडीत भात करून घ्या.
- तडका पॅनमध्ये दोन टीस्पून तेल घाला; त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, लाल मिरची आणि लसणाचे उभे काप घालून खमंग फोडणी करून घ्या.
- सर्व्ह करताना प्लेटमध्ये आधी भात वाढा, त्यावर तयार मुटके घाला, वरून चुरचुरीत फोडणी घाला आणि सोबत कढी द्या.
- खूप मस्त झणझणीत असा बेत होतो.
टिप
- मुटके भातावर न वाढता कढीत टाकून सुद्धा खाऊ शकतो.
- मुटकेचे साहित्य आवडीप्रमाणे बदलू किंवा प्रमाण कमी जास्त करू शकतो.


