किसको सुनाएं हाले-दिले जोर ए, अदा,
आवारगी मै हमने जमाने की सैर की।
काबे में जा के भूल गया राह दैर की,
ईमान बच गया, मेरे मौला ने खैर की।
बारावीत असेन बहुदा तेव्हा. नुकतंच उर्दूचं वेड लागलं होतं. सोलापूरातल्या सिद्धेश्वर मंदिरापाशी असलेल्या पीरबाबाच्या दर्ग्यात बंदगी अदा करणार्या मौलवीसाहेबांकडून जमेल तसे उर्दू शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू होता. तशाच एकदा कुठल्या तरी डाळ–तांदूळ बांधून आलेल्या पुडीच्या कागदावर वरील ओळी वाचनात आल्या आणि मी थोडा चकितच झालो. ज्या कुणी शायराने हे लिहिलं होतं, “कमाल की उमदा चीज लिखी थी, फिर भी दुसरा शेर मुझे हैरत में डाल रहा था…”
‘काबे में जा के भूल गया राह दैर की’ इथपर्यंत ठीक होतं, पण ‘ईमान बच गया, मेरे मौला ने खैर की’ या ओळी मला गोंधळात टाकत होत्या. मी थेट मौलवीसाहेबांना गाठलं…
“चचाजान, मैं समझ नहीं पा रहा हूं, इतना उमदा कलाम लिखने वाला शख्स आखीर में इस तरहा, क्यों शिकायत कर रहा है? काबा जाकर मंदिर की, गिरिजाघर की राह भूल जाना मैं समझ सकता हूं, लेकिन ‘मंदिर या गिरजाघर में जाकर किसी का ईमान खराब हो जाये’ ये बात मुझ से हजम नहीं हो रही हैं…”
हेही वाचा – नूतन… मौनाचा संवाद!
मौलवीसाहब हसले आणि हसून म्हणाले, “बेटेजी, जशी तुमची मराठी आहे ना, तशीच उर्दूही आहे. तुम्ही काढाल तितके अर्थ निघतात शब्दांतून… और यहां तो लिखने वाला एक बहोत ही उमदा शायर है। या ओळींचा अर्थ शब्दशः घेऊ नकोस रे! मंदिर किंवा गिरीजाघर हे इथे कवीने मूर्तीपूजा किंवा कर्मकांडाचे प्रतीक म्हणून वापरले आहे, तर ‘काबा’ हे ‘निराकार परमेशाचे’ स्वरूप म्हणून वापरले आहे. आता इथे लिहिणारा मुस्लीम आहे, त्यामुळे त्याने आपल्याला हवी तशी लिबर्टी घेतलीय एवढंच. त्याच्या जागी एखादा इतर धर्मीय शायर असता तर कदाचित शब्द वेगळे असते. पण जर अर्थच काढायचा झाला तर, सरसकट अर्थ असा आहे की, जेव्हा निराकार स्वरूपातील ईश्वराच्या पायावर लीन झालो, तेव्हा मला कर्मकांडातला, अवडंबरातला फोलपणा कळून चुकला. बरं झालं, नाहीतर भलतीकडेच भरकटत गेलो असतो.”
“वाह, है कौन ये शायर? कोण, आहे तरी कोण हा शायर?”
“बेटेजान, ये बात तो आजतक कोई दिल पर हाथ रख के बता नहीं पाया, क्योंकी कुछ लोग मानते हैं कि, ये एक ‘शायर’ का कलाम हैं, जहां कुछ लोग यह भी मानते है कि, ये एक ‘शायरा’ की नज्म हैं! लेकिन जहां तक मैं जानता हूं और मानता हूं, इस शायरा का असलीयत में कोई वजूद नहीं हैं. लेकिन शायर मियाँ ने जिस तरह से इस किरदार को शख्सियत दी हैं कि शायरी के दीवाने इस किरदार को भी सच मानते हैं! वे आज भी मानते हैं कि…
‘हां… उमराव जान असल में हुआ करती थी और ये उन्ही की नज्म के कुछ शेर हैं!’ ‘उमराव जान’ की गझलों में ‘अदा’ उनका तखल्लुस हुआ करता था’,
मगर जहाँ तक मैं जानता हूं ‘उमराव जान’ ‘मिर्जा मोहम्मद हादी रुस्वा’ साहब का सबसे खुबसूरत और ताकतवर शाहकार है! और जहाँ तक मेरा खयाल हैं, यह लाइनें भी मिर्झा हादी रुस्वासाहब की ही लिखी हुयी हैं. यह अलग बात हैं कि, उमराव के चाहने वाले आज भी इसे ‘उमराव जान’ की नज़्मही मानते हैं…”
मी चाट पडलो. मी स्वतः ‘उमराव जान’ दोन-तीन वेळा पाहिला होता. त्यातली गाणी पुन्हा-पुन्हा वेड्यासारखी ऐकली होती. खरेतर, मी देखील तोपर्यंत असेच समजत होतो की, ‘उमराव जान’ हे पात्र सत्यकथेवरच आधारीत आहे. खरं खोटं मिर्जा हादीसाहेबच जाणोत, पण एवढी अर्थपूर्ण शायरी करणारा हा माणूस किती ग्रेट असेल!
असो, फेसबुकवर पोस्ट केलेलं ‘उमराव जान’मधलं एक गाणं पाहिल्यानंतर हे सर्व आठवलं…
जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती हैं हमें….
जिन्दगी जब भी तेरी बज्म में लाती हैं हमें
ये जमीं चाँद से बेहतर नजर आती हैं हमें
सूर्ख फूलों से महक उठाती हैं दिल की राहें
दिन ढले यूँ तेरी आवाज बुलाती हैं हमें
याद तेरी कभी दस्तक, कभी सरगोशी से
रात के पिछले पहर रोज जगाती हैं हमें
हर मुलाक़ात का अंजाम जुदाई क्यों हैं
अब तो हर वक्त यही बात सताती हैं हमें
‘शहरयार’ साहेबांच्या लेखणीतून उतरलेले जादुई शब्द, त्याला खय्यामसाहेबांचा वेड लावणारा स्वरसाज. अजून काय हवं हो रसिकाला? शायर म्हणतो की – जिंदगी, हे आयुष्य जेव्हा जेव्हा मला तुझ्या सहवासाचा लाभ मिळवून देतं, म्हणजेच जेव्हा जेव्हा मी तुझ्या सहवासात असतो तेव्हा ही धरती मला चंद्रापेक्षाही सुखकर वाटायला लागते!
हेही वाचा – पल भर में ये क्या हो गया…
या ओळी वाचल्या की मला राहून राहून ‘मोमीन’साहेबांची आठवण यायला लागते, ते म्हणतात…
“तुम मेरे पास होते हो गोया जब, कोई दूसरा नहीं होता…”
तसं तर ‘उमराव’ची सगळी गाणी अफाटच होती. मुळातच ‘शहरयार आणि खय्याम’ या दोन अल्लाहच्या माणसांनी या चित्रपटाच्या संगीताला खूप वरच्या स्थानावर नेऊन ठेवलं होतं, त्यात रेखाचं मादक सौंदर्य, अप्रतीम अदाकारी आणि आशाबाईंचे खुळावून टाकणारे स्वर! ‘उमराव जान’च्या संगीताने सगळे विक्रम तोडले नसते तरच नवल.
पण हे गाणं गायलं होतं मखमली आवाजाच्या ‘तलत अझीज’ने आणि तो कुठेही निराश करत नाही हे गाणे ऐकताना!
‘सोने पें सुहागा’ म्हणजे हे गाणं ऐकताना, खासकरून पाहताना, ‘दो घडी वो जो पास आ बैठे’ पाहतानाचा अनुभव अजिबात येत नाही. उलट रेखाच्या चेहर्यावरचं मोहात पाडणारं लावण्य डोळे भरून पाहात राहावं, की देखण्या फारुख शेखच्या बोलक्या चेहर्यावरचे झरझर बदलत जाणारे भाव टिपत राहावं, हेच कळत नाही.


