चातुर्मास सुरू झाला आहे. आता सणवार सुरू होतील. आपली जीवन पद्धती या हिंदू संस्कृतीनुसार सुरू असते. संस्कृती म्हणजे काय तर, माझ्या मते – आपल्या श्रद्धा, मूल्य, ज्ञान, रीतीरीवाज यांनी परिपूर्ण अशी आपली जगण्याची पद्धत! ती अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर, त्याचा सर्वांगीण विचार करून आपल्या पूर्वजांनी ठरवली आहे. अगदी रोजच्या जेवणाचाही त्यात समावेश आहे. तद्नुसार, ऋतुमान आणि शरीरशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी हे पदार्थ ठरवले आहेत. प्रथा, उपवास म्हणून दैनंदिन आहारात बदल करून ते पदार्थ केले जातात. त्यावेळी हा पोषक आहार आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’ हे कितीतरी वर्षांपूर्वीच आपल्याला सांगून ठेवलेल आहे. निरामय आरोग्यासाठी हा आहार आहे.
आपल्या संस्कृतीत अनेक सणवार, व्रतवैकल्यं आहेत, जी भौतिकतेत गुंतलेले मन बाहेर काढण्यासाठी असतात. आपली धर्म संस्कृती ही मानसिक, शारीरिक आणि आरोग्यशास्त्र जपणारी अशी आहे. त्याची एक चौकट पूर्वजांनी घालून दिलेली आहे. गंमत अशी आहे की, ती चौकट त्रासदायक न वाटता सहज कशी होईल, याचाही विचार त्यांनी केलेला आहे. घरातच भक्तीचा आनंद घेत सण साजरे करता येतात. म्हणून इतकी शतके झाली तरी आपली धर्म संस्कृती अबाधित आहे.
आता तर उलट इतरांना त्यापासून प्रेरणा मिळत आहे. काही सण आपण आपल्या कुटुंबात साजरे करतो, शिवाय, सार्वजनिक पण करतो! त्यातून एक प्रकारचे समाजप्रबोधन होत आहे. मात्र, त्यातला मूळ गाभा, त्याचा अर्थ समजून घेऊन आपण विवेकाने सण साजरे केले पाहिजेत. गाय, वासरू, बैल, नाग, गरुड, उंदीर यांची पूजा करून आपण सर्वांचा मान राखतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञ असतो, कृतीतून ते व्यक्त करतो.
हेही वाचा – ते दोघे…
वनस्पती शास्त्राचा अभ्यास पूर्वजांनी केलेला होता. त्यामुळे दाराशी तुळस लावली जाते. वडाच्या झाडाची पूजा केली जाते. बेलाचे पान देवाला वाहिले जाते. त्यांचे उपयोगी गुण आपल्याला माहीत आहेत. सहज आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो. त्यांचे महत्त्व आपल्याला समजते. यातून वृक्ष संवर्धन केले पाहिजे, हे ध्यानात येते.
हळदी-कुंकू हे कुटुंब, नातेवाईक आणि त्याच्याबरोबरच समाज एकत्र बांधून ठेवण्यासाठी केलेली सुंदर प्रथा आहे. त्यामुळे आपापसात माया, प्रेम आणि स्नेहबंध निर्माण होतात. आसपासच्या लोकांच्या ओळखी होतात. वेळप्रसंगी मदतीला हेच लोक धावून येतात. आपला एकोपा वाढवण्यासाठी ही प्रथा आपण चालू ठेवूया. सध्याच्या परिस्थितीत याची फार गरज आहे.
श्लोक, आरत्या, प्रार्थना यामुळे पाठांतराची सवय होते. आरती करताना टाळ आणि घंटा वाजवली तर, त्याचा नाद जोश निर्माण करतो. वातावरणात सकारात्मक लहरी उमटतात. घरात अल्हाददायक, पवित्र असे वातावरण तयार होते. सहजपणे आपण म्हणतो,
“किती छान वाटले आज!”
तीच ही अंतरंगाला जाणवणारी शक्ती… अस्वस्थ मनाला शांत करणारी…
हेही वाचा – पावसाळा
आरती झाली की, प्रसाद येतो. प्रसाद आणि नैवेद्य या संकल्पनेमुळे संयम बाळगायला हवा, हे लहानपणापासून आपोआप मनावर बिंबले जाते. आरतीनंतर प्रसाद मिळणार, हे माहीत असते. त्यामुळे समोर लाडू, पेढे असले तरी लहान मुलं त्याला हात लावत नाहीत.
खरंतर, अजून खूप गोष्टींबद्दल लिहिता येईल. पण लेख मोठा होईल म्हणून लिहित नाही. तुम्ही सुज्ञ आहात… तुमचा तुम्ही विचार करून, समजून घ्याल हे मला माहीत आहे.
असा हा पावित्र्य, मांगल्य जपणारा आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा आपण होईल तितका जतन करू. त्याचे महत्त्व पुढच्या पिढीला सांगू. आता मनःपूर्वक घ्या चातुर्मासाचा आनंद…


