अध्याय तेरावा
जो संपत्तीमाजी असतां । ऐसा गमे पांडुसुता । जैसा कां वाटे जातां । साक्षी ठेविला ॥597॥ किंबहुना पुंसा । पांजरियामाजीं जैसा । वेदाज्ञेसी तैसा । बिहूनि असे ॥598॥ एऱ्हवीं दारागृहपुत्रीं । नाहीं जया मैत्री । तो जाण पां धात्री । ज्ञानासि गा ॥599॥ महासिंधू जैसे । ग्रीष्मवर्षीं सरिसे । इष्टानिष्ट तैसें । जयाचां ठायीं ॥600॥ कां तिन्ही काळ होतां । त्रिधा नव्हे सविता । तैसा सुखदुःखीं चित्ता । भेदु नाहीं ॥601॥ जेथ नभाचेनि पाडें । समत्वा उणें न पडे । तेथेचि ज्ञान रोकडें । वोळख तूं ॥602॥
मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी । विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥10॥
आणि मीवांचूनि कांहीं । आणीक गोमटें नाहीं । ऐसा निश्चयोचि तिहीं । जयाचां केला ॥603॥ शरीर वाचा मानस । पियाली कृतनिश्चयाचा कोश । एक मीवांचूनि वास । न पाहती आन ॥604॥ किंबहुना निकट निज । जयाचें जाहलें मज । तेणें आपणयां आम्हां सेज । एकी केली ॥605॥ रिगतां वल्लभांपुढें । नाहीं आंगीं जीवीं सांकडें । तिये कांतेचेनि पाडें । एकसरला जो ॥606॥ मिळोनि मिळतचि असे । समुद्रीं गंगाजळ जैसें । मी होऊनि मज तैसें । सर्वस्वें भजती ॥607॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे
अर्थ
अर्जुना, वाटेने जात असता काही घडलेल्या गोष्टींविषयी, एखादा ठेवलेला साक्षीदार, ती गोष्ट पाहूनही त्याविषयी, जसा अनासक्त असतो, तसा तो सर्व ऐश्वर्यात नांदत असूनही तो अनासक्त असल्याचे दिसते. ॥597॥ फार काय सांगावे? राघू जसा पिंजर्यात असतो, तसा जो वेदाज्ञेला भिऊन संसारात असतो. ॥598॥ एरवी ज्याचे स्त्रीपुत्रगृहादिकांवर प्रेम नसते, तो पुरुष ज्ञानाला आधार आहे असे समज. ॥599॥ आणि महासागर जसे उन्हाळ्यात व पावसाळ्यात सारखेच भरलेले असतात, त्याप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी प्रिय-अप्रिय गोष्टी सारख्या असतात ॥600॥ अथवा सकाळ, दुपार व संध्याकाळ या तीन काळी सूर्य जसा तीन प्रकारचा होत नाही त्याप्रमाणे सुखाचे अथवा दु:खाचे प्रसंग त्यांच्या अंगावर येऊन आदळले, तरी त्याचे अंत:करण सुखी अथवा दु:खी असे वेगवेगळ्या अवस्थेने बदलले जात नाही ॥601॥ कोणत्याही ऋतूच्या येण्याजाण्याने आकाशात जसा काहीच फेरबदल होत नाही त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय अथवा अप्रिय वस्तूंच्या हानीने अथवा लाभामुळे चित्ताच्या समतेला कमीपणा येत नाही, अर्जुना त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत ज्ञान आहे, असे तू समज. ॥602॥
आणि माझ्या ठिकाणी अनन्यपूर्ण अव्यभिचारिणी अशी भक्ती, एकांत प्रदेशामध्ये राहणे (व अर्थात) जनांच्या समुदायांमध्ये (राहण्याची) खंती ॥10॥
आणि माझ्याशिवाय दुसरे काहीच चांगले नाही, असा ज्याच्या तिघांनी (कायेने, वाचेने व मनाने) निश्चयच केलेला आहे ॥603॥ ज्याचे शरीर, वाचा, वाचा व मन ह्या तिघांनी वरीलप्रमाणे प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली आहे आणि एक माझ्यावाचून आणखी कशाची इच्छा ते करीत नाहीत ॥604॥ फार काय सांगावे! ज्याचे अंत:करण माझ्याशी अगदी जखडून राहिले आहे, त्याने आपले व आमचे एक अंथरुण केले आहे. (माझ्या स्वरूपी अनुरक्ततेने तल्लीन होऊन गेला आहे). ॥605॥ पतीकडे जातांना पतिव्रता स्त्रीला शरीराने व अंत:करणाने जसा संकोच वाटत नाही, त्याप्रमाणे जो मला एकनिष्ठेने अनुसरला आहे ॥606॥ गंगेचे उदक समुद्रात मिळून जसे आणखी एकसारखे मिळतच असते, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी ऐक्य झाले असताही, जे सर्व प्रकारांनी माझे भजन करीत असतात. ॥607॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : सापाच्या तोंडीं, पडली जे उंडी


