“दिदी मुझे माफ कर दो. आजतक मैंने आप के साथ जो बरताव किया, उसके लिए मै बहुत शर्मिन्दा हूं.”
कनिका आज सकाळी सकाळी घरी येऊन मला घट्ट बिलगून म्हणाली. तिच्या या अचानक वागण्याचा मला धक्का बसला. पण तरीही, ती काही गोष्टी उशिरा का होईना समजून गेली, याचं मला समाधान देखील वाटले. काही गोष्टी समजायला तसा योग जुळून यावा लागतो, असं म्हणतात… ते कनिकाच्या बाबतीत खरं ठरलं होतं.
तिला जरा थोपटून शांत केलं आणि जवळच्या खुर्चीवर बसवून मी म्हणाले “कनिका मी फार मोठं काही केलं नाहीये. मी फक्त माझा शेजारधर्म पाळला.”
“दिदी मैं भी अभी कोशिश करूंगी आपकी तरह बरताव करने की…” असं म्हणून माझ्या सासू-सासऱ्यांना नमस्कार करून कनिका आमच्या घराचा दरवाजा उघडून बाहेर पडली.
0000
तसं बघायला गेलं तर कनिका आमची शेजारीण. शेखरला ऑफिसतर्फे मोठा फ्लॅट मिळाला म्हणून खरंतर आम्ही या टोलेजंग इमारतीमध्ये रहायला आलोय काही वर्षांसाठी. आमच्या मजल्यावर एकूण चार फ्लॅट्स. त्यातील दोन कनिकाचे होते. उरलेल्या फ्लॅटमध्ये एक ख्रिश्चन आजी-आजोबा रहायचे. तेही मध्यमवर्गीय असल्याने आणि मुंबईमध्ये बरीच वर्षे वास्तव्य असल्याने छानपैकी मराठी बोलायचे. अधूनमधून आमचं बोलणं व्हायचं. पण कनिका माहेरची श्रीमंत घराण्यातील. पैशाचा बडेजाव तिच्या वागण्याबोलण्यात दिसायचा. तिच्या दृष्टीने आम्ही मध्यमवर्गीय असल्याने तिने स्वतःहूनच आमच्या घराला लांब ठेवले होते. राकेश म्हणजे कनिकाचा नवरा चांगला होता, पण बायकोच्या तालावर नाचणारा होता. राकेश आणि कनिकाला दोन मुले होती. मोठी रोशनी सातवीत आणि धाकटा धीरज तिसरीत होता. स्वतः कनिका परदेशी बँकेत वरिष्ठ अधिकारी होती. राकेशचे आई-वडील देखील त्यांच्या सोबत रहायचे.
हेही वाचा – विचार, संस्कार अन् जीवनमूल्यांचं कुंपण…
पण सगळेच दिवस सारखे नसतात. एका क्षणात ते कुटुंब कोलमडून पडले, कनिकाला झालेल्या भीषण अपघातामुळे! कनिका तिची गाडी घेऊन रोज ऑफिसला जायची. एक दिवस उशिराने घरी येताना, तिचा गाडीवरचा ताबा सुटला आणि पलीकडच्या रस्त्यावर विजेच्या खांबावर तिची गाडी प्रचंड वेगाने जाऊन आदळली. कनिका हॉस्पिटलमध्ये जवळपास तीन महिने मृत्यूशी झुंज देत होती.
या काळात मी आणि शेखरने शेजारधर्म पाळत तिच्या कुटुंबीयांना काही कमी पडू दिले नाही. रोजचा ब्रेकफास्ट, राकेशचा डबा, दोन्ही मुलांच्या शाळा, शाळेचे डबे, युनिफॉर्म, रोजचा अभ्यास, कनिकाच्या सासू-सासऱ्यांचं सगळं हवं नको ते बघणं… सगळी कामं मी आणि शेखर आनंदाने करत होतो. आम्ही मुद्दामच राकेशला त्याची नोकरी सांभाळून उरलेला वेळ कनिका सोबत घालवायचा आग्रह केला होता.
रोशनी तशी मोठी असल्याने समजूतदार होती. माझी तारेवरची कसरत ती रोज बघत होती. आंटी म्हणून मला कधीकधी येऊन बिलगायची आईची आठवण आल्यावर! रोशनी आणि धीरजला हसतखेळत ठेवण्याचे शिवधनुष्य मी बऱ्यापैकी पेलले होते.
हेही वाचा – पैलतीर… नकारात्मक अन् सकारात्मक!
तीन महिने कसे गेले समजलेच नाही. मला क्षणभर विश्रांती मिळत नव्हती. पण वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करून मी मानसिक ताकद वाढवत होते. रात्री कधी एकदा झोपते, असं व्हायचं मला. अखेर कनिका घरी आली आणि हळूहळू त्यांच्या घराची गाडी रुळावर आली.
0000
…आणि आज सकाळी अचानक कनिका आमच्या घरी थोडावेळ येऊन इतके दिवस मनात साठलेलं मळभ दूर करून गेली.
ती गेल्यावर मी हात जोडून देवाला म्हणाले, “देवा, अरे माझ्या आई-आप्पांनी लहानपणी आमच्या मनांत चांगल्या विचारांचा आणि संस्कारांचा जो पारिजातक लावला होता, त्याच झाडाची माणुसकीची फुले गेले तीन महिने कनिकाच्या घरात पडत होती. मी फक्त निमित्तमात्र होते. तू तर सर्व जाणतोसच. या सर्व काळात जशी तुझी कृपादृष्टी माझ्या कुटुंबावर होती, तशीच ती यापुढेही कायम राहू दे, एवढीच माझी विनंती आहे तुला! अशीच माणुसकीची फुले यापुढेही जिथे गरज आहे तिथे भरभरून पडो, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.”
आज खूप दिवसांनी मी वेगळंच समाधान अनुभवत होते.
टीप : ऐकीव घटनेवर आधारीत आहे ही कथा आहे.


