मेष
- राशी स्वामी मंगळ तृतीय स्थानात आहे. एखादे पराक्रमी काम नोकरदारांकडून होईल. त्याबद्दल तुमचे कौतुक होईल. पण शिस्त देखील पाळा. कामाचे नियोजन उत्तम करा. आधीच्या ओळखीतून व्यावसायिक वर्गाची कामे होतील. कोर्टविषयक बाबींमध्ये यश मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. महिलांनी फसवणुकीपासून सावध रहावे. दुखापत होणार नाही, याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी; गाडी हळू चालवा.
वृषभ
- राशी स्वामी शुक्र पंचम स्थानात आहे. नोकरदारांना संततीसंबंधी चांगल्या बातम्या मिळतील. बुद्धिजीवी लोकांना प्रसिद्धी मिळू शकेल. व्यावसायिक वर्गाला मानसिक त्रास संभवतो. मनाविरुद्ध घटना घडतील. पण अशा परिस्थितीत वाद घालू नका. शांततेत प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा. महिलांना आई-वडिलांबद्दल चिंता राहील. विद्यार्थी कला आणि क्रीडा क्षेत्रात चमकतील.
मिथुन
- राशी स्वामी बुध द्वितीय स्थानात गुरू आणि रवीबरोबर आहे. नोकरदारांची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. नवीन गुंतवणूक करू शकाल. नवीन वाहन देखील खरेदी करू शकाल. व्यापार वाढण्यासाठी व्यावसायिक वर्गाला कर्जमंजुरी मिळेल. कामासाठी लांबचा प्रवास करण्याचे टाळा. भागीदार आणि सहकाऱ्यांशी आपुलकीने वागा. महिलांनी मौल्यवान दागिने सांभाळावेत. कुठल्याही गोष्टीचा दिखावा करू नका. विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमधून नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
कर्क
- सध्या गुरू, बुध आणि रवी तुमच्या राशीत आहेत. नोकरदारांच्या दृष्टीने अनुकूल आठवडा आहे. जबाबदारीने जास्त काम करावे लागेल. वरिष्ठ सहकार्य करतील. व्यावसायिक वर्गाचे उत्पन्न चांगले राहील. आर्थिकदृष्ट्या खर्च कमी होईल. बचत चांगली झाल्याने नवीन गुंतवणूक करू शकाल. महिलांना मानसिक समाधान मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकेल, ज्येष्ठ लोकांचे मार्गदर्शन मिळेल.
सिंह
- राशी स्वामी तुमच्या व्ययस्थानी आहे, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरदारांनी कामाकडे लक्ष द्यावे. इतरांवर अवलंबून राहू नका. अडचणी येतील, पण त्यावर मात करू शकाल. व्यावसायिक वर्गाने फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू नये. राजकीय वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्याला मदत करू शकाल. कोणालाही सल्ला देण्याचे महिलांनी टाळावे. योगाभ्यास करा. विद्यार्थ्यांनी वादविवाद टाळावेत, बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.
हेही वाचा – ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!
कन्या
- राशी स्वामी बुध कर्क राशीत म्हणजे तुमच्या लाभस्थानात आहे. नोकरदारांनी कामे काळजीपूर्वक करावीत. कामे कमी झाली तरी चालतील, पण चुका टाळाव्यात. चिडचिड होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाच्या मनासारख्या गोष्टी होणार नाहीत, त्यामुळे वाद होतील. प्रश्न समजून घेतल्यावर त्याबाबत बोलावे. महिलांनी कामाशिवाय इतर गोष्टींना प्राधान्य देऊ नये. विद्यार्थ्यांनी अभ्यासात दुर्लक्ष करू नये. मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे लक्षात असू द्या.
तुळ
- राशी स्वामी शुक्र कन्या राशीत आहे. नोकरदारांवर कामाचा ताण राहील. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. कामाचे नियोजन करा. कोणाकडून उधारी घेऊ नका. व्यावसायिक वर्गाला हा आठवडा मंदीचा जाणवेल. लक्षात ठेवा, असे दिवस कायम नसतात, त्यामुळे खचून जाऊ नका. प्रयत्न करत रहा. महिलांनी कुठलाही निर्णय घेताना घरातील लोकांना विश्वासात घ्यावे. आरोग्याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी कोणावरही अवलंबून राहू नये. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत.
वृश्चिक
- राशी स्वामी मंगळ मिथुन राशीत अष्टमात आहे. नोकरदारांच्या बाबतीत कामाचा ताण खूप असेल. सहकारी आणि वरिष्ठ अपेक्षित मदत करणार नाहीत. आर्थिक व्यवहार करताना सांभाळून करा. व्यावसायिक वर्गाने महत्त्वाचे निर्णय घाईत घेण्याचे टाळावेत. व्यवस्थित माहिती नसेल तर, त्या गोष्टी करू नका किंवा बोलू नका. भागीदार किंवा सहकारी यांचे म्हणणे ऐकून मग निर्णय घ्यावेत. महिलांनी कोणाचीही मध्यस्थी करू नये. विद्यार्थी मित्र-मैत्रिणींबरोबर चांगला वेळ घालवतील.
धनु
- राशी स्वामी गुरू कर्क राशीत अष्टमात आहे. नोकरदारांनी खर्च कमी करावेत. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल. वरिष्ठ आणि सहकारी मदत करतील. तुम्हीही इतरांना मदत करू शकाल. धार्मिक स्थळाचे दर्शन होईल. व्यावसायिक वर्गाला महत्त्वाचे निर्णय घेता येतील. जुनी येणी वसूल होतील. आर्थिक बाजू उत्तम राहील. महिलांनी इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये. तसेच, आरोग्याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी आधी स्वतःचे काम पूर्ण करावे, मगच इतरांना मदत करावी.
मकर
- राशी स्वामी शनी, मीन राशीत तृतीय स्थानात वक्री आहे. नोकरदारांची अडकलेली कामे आता पूर्ण होतील. जे काम हाती घ्याल ते पूर्ण करू शकाल. इतरांच्या मार्गदर्शनाचा फायदा होईल. नवीन व्यापारासाठी व्यावसायिक वर्गाला प्रस्ताव येतील. चांगले आर्थिक लाभ होतील. समाजमाध्यमांतून प्रसिद्धी मिळेल. महिलांना धार्मिक कार्यक्रमात भाग घेता येईल. त्यातून मानसिक समाधान मिळेल. विद्यार्थ्यांचे तांत्रिक अडचणींमुळे अडकलेले काम आता पूर्ण होऊ शकेल.
कुंभ
- राशी स्वामी शनी मीन राशीत धनस्थानात आहे. नोकरदारांना कामात यश मिळेल. आर्थिक बाजू उत्तम राहील. तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. व्यावसायिक वर्गाची भरभराट होईल. नवीन करारांवर सही करू शकाल. मानसिक ताण जाईल. नवीन कल्पना अमलात आणू शकाल. महिलांचे कामाचे व्याप कमी होतील. स्वतःसाठी वेळ काढता येईल. विद्यार्थ्यांनी उद्याचे काम आजच करावे; आनंदी रहाल.
हेही वाचा – व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन
मीन
- राशी स्वामी गुरू कर्क राशीत पंचम स्थानात आहे. नोकरदारांना संततीकडून आनंदाच्या बातम्या समजतील. कामातील बदल स्वीकारावे लागतील. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही. व्यावसायिक वर्गाचे आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. नवीन प्रस्ताव येतील, त्यांचा अभ्यास करूनच ते स्वीकारायचे की नाही, हे ठरवा. समाजसेवेची आवड राहील. महिलांना जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांना ज्येष्ठ शिक्षक आणि घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन मिळेल.


