Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अफवा आणि सत्य

    August 4, 2026

    माणूस नावाचं रसायन!

    August 4, 2026

    Recipe : स्वादिष्ट खवा जिलेबी अर्थात मावा जिलेबी अन् ब्रोकोली- मटार पुलाव!

    August 4, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, August 4
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अफवा आणि सत्य
    ललित

    अफवा आणि सत्य

    ॲड. कृष्णा पाटीलBy ॲड. कृष्णा पाटीलAugust 4, 2026No Comments9 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, ॲड कृष्णा पाटील, लेखक कृष्णा पाटील, संदेशची कथा, संदेशवर खोटा आरोप, जमिनीच्या वादात संदेशवर गुन्हा, संदेशवर विनयभंगाचा गुन्हा, अफवा आणि सत्य, मित्र आणि शत्रू, संदेशचे तुरुंगातील दिवस, संपाबुवा संदेशच्या पाठीशी, संदेशच्या आईची तगमग
    फोटो सौजन्य - चॅटजीपीट
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पूर्वार्ध

    गावच्या चावडीसमोर पानगळ झालेलं जुनं लिंबाचं झाड शांतपणे उभं आहे. कधीकाळी नामा सावताने त्या झाडाला बांधून दिलेला काळा दगडी कोरीव कट्टा ऐसपैस पसरला आहे. भणाण वारा सुटला की, सगळा कट्टा वाळलेल्या पाल्यापाचोळ्याने भरून जातो. मग देवळापुढं कायम पडून असणारी वांझोटी, विधवा यलव्वा सकासकाळी तो कट्टा तुरकाट्याच्या खराट्याने लोटून चकचकीत करते. देवळाच्या बाजूला वडापावच्या दोन चाकी मोडक्या गाड्यावर पिठाळलेले दोन मोठाले भजी आणि एक मुठीएवढा शिळ्या पावाचा तुकडा तिला भिकाजी देतो. तेवढ्यावर तिचा अर्धा दिवस तरी सहज जातो. नंतर दिवसभर देवळात कोण दर्शनासाठी आला तर, चवली-पावली मिळते. कधी कुणीतरी घरातलं उरलंसुरलं जेवण पण देतं. ती कुणालाच नाही म्हणत नाही.

    यल्लवाने चकचकीत केलेल्या त्या कट्ट्यावर गावची जाणती माणसं घडीभर बसतात. पावसापाण्याची चर्चा करतात. बीबेवळ्याची चौकशी करतात. लागवडीची देणी-घेणी करतात. शेतीवाडीबद्दल बोलत राहतात. तेवढ्या वेळेत एकदा दोनदा पान-तंबाखू खातात. पुन्हा आपापल्या कामाला निघून जातात.

    गावातली चांडाळ माणसंही तिथंच येऊन बसतात. कोण तंबाखू हातात घेऊन मळत बसतो. कोण गाड्यावरच्या चहाचे घोट घेत बसतो.‌ कोण नक्षीदार चंचीतले पान खाऊन चघळत बसतो. हे सर्वजण एकमेकांची उणीदुणी काढत खिदळत राहतात. दुसऱ्याच्या आयुष्याचा पंचनामा करतात. आतासुद्धा जुन्या लिंबाखाली नेहमीप्रमाणे या चांडाळ लोकांची मैफल जमली आहे.

    “अरे, तो संदेश माने ना… तोच तो एमपीएससीवाला… त्याला पोलीस घेऊन गेले म्हणे!”

    “अहो, धूर उठतो म्हणजे आग असतेच!”

    “अरे, एवढा सज्जन होता तर, जेलमध्ये कसा गेला?”

    लखनने प्रश्न विचारला.

    दसरू हसला.

    “अरे बाबा, जगात कुणी दूधाने धुतलेले नसते!”

    पानगळ झालेलं झाड हे सर्व ऐकत असतं. त्या लिंबाच्या जीर्ण झाडाने या गावात जन्मलेल्या अनेक पिढ्या पाहिल्या आहेत. कोरडे दुष्काळ पाहिले आहेत. ओसंडणारे अक्राळविक्राळ पूर पाहिले आहेत. गावकऱ्यांचे एकमेकांवरील प्रेम पाहिलं आहे. काट्या-कुऱ्हाडीचे वैर पाहिलं आहे. पण माणसांना दुसऱ्यांच्या आयुष्याचा न्यायाधीश बनण्याचा जो छंद असतो, तो मात्र त्याला अजूनही समजला नव्हता.

    संध्याकाळी सूर्य मावळतीला झुकला की, ती मैफलही विरघळून जाते. दगडीकट्टा पुन्हा रिकामा होतो. लावारिस माणसासारखा गपचिप पडून राहतो. वाऱ्याने लिंबाची पानं सळसळत राहतात. जणू तो म्हातारा लिंब स्वतःशीच म्हणत असतो, “ज्यांच्या आयुष्याचा पालापाचोळा झालाय, अशीच माणसे दुसऱ्यांच्या आयुष्याचा पंचनामा लिहायला बसतात. काही कारण नसलं तरी अफवा उठवतात. त्यांना आयुष्यात दुसरं कामच नाही.”

    गावात अफवांचं पीक उठलंय. तोंडाला येईल ते, कोण काय पण बरळतंय. कुणाच्या तोंडाला हात लावायचा? ते नेहमी म्हणायचे, ‘वाऱ्याला तोंड द्यायचं नसतं. वाऱ्याला पाठ द्यायची असते. तोंड दिलं तर, तोंडातून वारा जाऊन पोट फुगून फुटू शकतं. पाठीवर वारा पडला तर वारा निघून जातो. आपण शाबूत राहतो.’

    फसफस् आवाज आल्यावर सुनीता तंद्रीतून जागी झाली. पाठीमागे वळून बघते तर, चुलीवर दूध ऊतू गेलं होतं. तिने पटकन चुलीतला जाळ कमी केला. दुधाचं पातेलं उतरवून खाली ठेवलं. तशाही अवस्थेत तिला वाटलं, दूध ऊतू जाणं हे चांगलेच की! एकुलत्या एका पोरावर नको तो प्रसंग आलाय. याला तोंड कसं द्यायचं, याचा मार्ग तरी सापडेल…

    हेही वाचा – सुटका सावकारी पाशातून…

    पुन्हा तिचे काटकुळे पाय हलू लागले. उषा कंपनीची शिलाई मशीन खडखडू लागली. झंपरच्या हिरव्या कपड्याला टाके पडू लागले. तयार झालेले रंगीबेरंगी झंपर दोरीवर लोंबकळत होते. सगळ्या घरभर रंगीत चिटुऱ्या कपड्यांचा चुरा पडला होता. आता थोड्याच वेळात अंधारून यायला लागलं की, ती काम बंद करून घरात दिवाबत्ती करणार होती. मग जमलं तर, एखादी भाकरी थापणार होती. एवढ्यातच दारात चपलांचा आवाज आला. तिने मशीन बंद करून वर पाहिलं, तर दारात संपाबुवा आला होता.

    “संदेशला जामीन पटलाय पण तो आज बाहेर येणार नाही. कोर्टाची वेळ संपल्यामुळे तो आता उद्याच येईल. तू काय लय विचार करू नको,” पायातल्या चपला काढून संपाबुवा बोलत आत आला. आत येऊन तो ‘हुश्श्श’ करून कोपऱ्यातल्या खाटीवर बसला.

    पाण्याचा तांब्या देता देता सुनीता म्हणाली, “काय काय झालं कोर्टात? आपल्या वकिलांनी आपली बाजू मांडली का?”

    संपाबुवाने पाण्याचे चार घोट घेतले. खांद्यावरच्या टॉवेलने तोंड पुसले. तांब्या बाजूला ठेवत, टोपी सरळ करत तो म्हणाला, “खोटी केस दाखल केली आहे, हे कोर्टाला पटलं. आपल्या वकिलांनी चांगली बाजू मांडली. चुलत चुलत्याचा आणि आमचा जमिनीचा वाद आहे. तो दहा-बारा वर्षे चालू आहे. संदेशच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले आहे. संदेश आणि आई दोघेच घरात असतात. संदेश एमपीएससीच्या परीक्षेला बसला आहे. आत्ताची त्याची शेवटची परीक्षा आहे. चुलत चुलत्याला हेच पाहवत नव्हतं. म्हणून त्याने मुलीला पुढे करून विनयभंगाची खोटी केस दाखल केली आहे. कोर्टाने सर्व कागदपत्रांची पडताळणी केली. पुरावा पहिला आणि जामीन मंजूर केला.”

    आपले वकील म्हणालेत, “उच्च न्यायालयात मी याचिका दाखल करतो आणि हा खटलाच रद्द करून टाकतो. तुम्ही काही काळजी करू नका.”

    सुनीताने भिंतीवरच्या उमरावांच्या पिवळ्या पडलेल्या फोटोकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही गेला आणि घर बकाल झालं. लेकरू उघड्यावर पडलं. माझ्या आयुष्यात उन्हाळा आला. उघड्या आभाळातून पोकळ ढग पांगावत तशी जवळची माणसं पांगली. दावणीचं जनावर देशोधडीला लागल्यावर दावं लुळं होऊन पडतं तसं घर निपचित पडलं. ना जवळचा, ना लांबचा, ना पावना, ना गोतावळा सगळ्यांनीच अंतर ठेवलं. आता कुठं पोराच्या जीवावर कवळी पालवी फुटायला लागलीय… तवर या चुलत्याने हे कांड सुरू केलंय.

    संपाबुवा उठला आणि तिच्या खांद्यावर थोपटत तिला म्हणाला, “सख्खा नसलो तरी, मी तुझा मावस भाऊ आहे. तू काय बी काळजी करू नकोस. तुझ्या आणि संदेशच्या पाठीमागे मी शेवटपर्यंत आहे.”

    संपाबुवा निघून जाताना तिला गलबलून आलं. तो दिसायचा बंद होईपर्यंत ती चौकटीला धरून तशीच उभी होती. आता बाहेर अंधार दाटू लागला होता.

    उमरावांच्या फोटोपुढच्या निरंजनची वात मोठी करताना ती उगाचच भूतकाळात गेली. एक लेकरू वट्यात टाकून हा बाबा निघून गेला. कसा का असेना, पण कुंकवाला आधार हुता. रोज प्यायचा, पण कधी अंगाला हात लावला नाही, हीच मेहरबानी म्हणायची. जबाबदारी तर काहीच आणि कधीच घेतली नाही, म्हणून तर मधनच डाव मोडून निघून गेला. आता लांबच्या लांब आयुष्याचा असा टप्पा पार करत असताना दमछाक व्हायला लागली आहे. नाही म्हणायला या कवळ्या देठाचा आधार आहे म्हणून इथपर्यंत निभवलं गेलंय.

    फोटो समोरून ती मागे फिरली. आता बराच उशीर झाला होता. जेवणाची वेळ तर टळूनच गेली होती. तिचा हात भाकरीच्या बुटीकडे गेला. पण बुटीला हात न लावता ती माघारी फिरली.‌ रांजणातलं तांब्याभर पाणी घटाघटा पीली. तिथेच अंथरूण टाकलं. दाराला कडी लावून ती तशीच आडवी झाली. एकुलता एक पोरगा तुरुंगात पडलाय. कसा घास जाईल पोटात? ती नुसती तळमळत पडून राहिली. किती वेळ? तिचं तिलाच समजलं नाही.

    दार खडखड वाजल्यानंतर ती खडबडून जागी झाली. सकाळचे अकरा वाजले होते. डोळे चोळत उठून तिने दाराची कडी काढली. संदेशला घेऊन संपाबुवा आला होता. विस्कटलेली केसं, वाढलेली दाढी, शिळा पडलेला चेहरा, चुरगळून टाकलेल्या फुलासारखा संदेश दिसत होता. तिला भडभडून आलं. ती तशीच लगबीगीने आत गेली. भाकरीचा एक तुकडा आणि पाणी घेऊन बाहेर आली. पाण्याचं चार शितूडं शिंपडून तिने भाकरीचा तुकडा संदेशवरून ओवाळून टाकला. संदेश आणि संपाबुवा दोघेही आत येऊन बसले.

    नामुष्कीची विटलेली कळा घरभर पसरली होती. निर्जीव भिंती जिवंत होऊन प्रत्येक दगड दात इचकत आहे, असं वाटत होतं. कशाची परीक्षा आणि कशाचं करियर? सगळंच बेचव आणि दिशाहीन भरकटलं होतं. सुनीता म्हणाली, “बाळा, लोक काय म्हणतील आता?” संदेशने आईकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांत दुःख होते. पण चेहऱ्यावर शांतता होती. तो हळूच म्हणाला, “आई, लोक काय म्हणतात, यापेक्षा आपण काय जाणतो, हे महत्त्वाचं आहे.” आई काही बोलली नाही. कारण आईला माहीत होतं. तिचा मुलगा खोटं बोलत नाही.

    संपाबुवा पुढं सरकला. सुनीताकडे पाहून म्हणाला, “वेळ काय? बोलतीस काय? तुझं तुला तरी कळतंय का? संकटात एकमेकांना आधार द्यावा. पायात साप सोडू नयेत. तुम्ही दोघेही आता शांत रहा. संयम ठेवा. सर्व काही ठीक होईल.‌ आजचं काळं ढगही उद्या नक्की निघून जातील. प्रत्येक रात्रीनंतर नवी सकाळ येतेच की! प्रत्येक जखम वेळेनुसार भरून निघते. आज परिस्थिती कठीण असेल कदाचित, पण उद्याचं पान बदलेल निश्चित. कधीकधी वेळ परीक्षा घेत असते. पण तीच वेळ यशाची भेटही देत असते. मनात आशेचा छोटासा दिवा जळू द्या. अंधार कितीही असला तरी त्या दिव्याला विझू देऊ नका. आज जे अश्रू आहेत ते उद्या हसू बनतील, आजचे संघर्ष उद्या अभिमान बनतील. फक्त स्वतःवरचा विश्वास कधी हरवू नका, परिस्थितीसमोर कधी झुकू नका…” सर्वजण शांत झाले. थोडा वेळ असाच गेला.

    संदेश म्हणाला, “आई, कारागृहात मला एक वृद्ध माणूस भेटला. दिनकर काका त्यांचे नाव. पांढरे केस. सुरकुतलेला चेहरा. डोळ्यात विलक्षण तेज. तो वृद्ध शांतपणे बसलेला असायचा. जणू काही तुरुंगात नसून आश्रमात बसला आहे, अशा अविर्भावात. एके दिवशी मी विचारले, “काका, तुमच्यावर कोणता गुन्हा आहे?” वृद्ध हसला.

    “बाळा, प्रत्येक कैदी दोन शिक्षा भोगतो. एक न्यायालय देते आणि दुसरी समाज देतो.” मी गप्प बसलो. वृद्ध पुढे म्हणाला, “पहिली शिक्षा संपते. दुसरी कधीच संपत नाही. ती आपणास स्वतःच संपवावी लागते.””

    काही दिवसांनी आम्हा दोघांची मैत्री झाली.

    एक दिवस मी माझ्या मनातील वेदना त्यांच्यापुढे ओतल्या. “काका, मला एक सांगा… मी निर्दोष आहे, हे मला माहीत आहे. ज्यांनी गुन्हा दाखल केला त्यांनाही माहीत आहे. पण गावाला ते कसं कळणार?”

    वृद्ध मोठ्याने हसला. थोडा वेळ हसतच राहिला. नंतर म्हणाला, “अरे वेड्या! गावाला सत्य कधी हवं असतं?”

    “म्हणजे?”

    “गावाला कथा हवी असते… तीही रंगवून सांगितलेली. सत्य फार साधं असतं. अफवा रंगीत असतात…” मी शांत झालो.

    वृद्धाने खिशातून एक छोटासा दगड काढला.

    “हा दगड पाहतोस?”

    “हो.”

    “आता हा मी तलावात टाकला तर?”

    “पाणी ढवळेल.”

    “आणि थोड्या वेळाने?”

    “शांत होईल.”

    वृद्ध म्हणाला, “हेच आयुष्य आहे. लोकांची बदनामी म्हणजे तलावात पडलेला दगड. काही काळ लाटा उठतात. पण पाणी कायम ढवळलेलं राहत नाही.”

    हेही वाचा – सोन्याचा हिशेब ऐकून जजही चक्रावले!

    संदेश शांत झाला. त्याने आईकडे पाहिले. आता सुनीताचा चेहरा थोडा उजळला होता. नाही म्हटलं तरी, तिचा आत्मविश्वास काही अंशी वाढला होता. ती चहा करण्यासाठी उठून आत गेली.

    संपाबुवाकडे पाहात संदेशने विचारले,

    “मामा, अब्रू म्हणजे नेमकं काय?” मामाने डोळे मिटले. काही क्षण शांतता पसरली. मग संपाबुवा म्हणाला,

    “स्वतःच्या मनात राहणारी गोष्ट म्हणजे अब्रू. लोकांच्या तोंडात राहणारी गोष्ट म्हणजे प्रतिष्ठा…” संदेश विचारात पडला.

    मामा पुढे म्हणाला, “रात्री झोपताना स्वतःच्या डोळ्यांत डोळे घालून पाहता आलं, तर अब्रू शाबूत असते.” संदेश खूप अस्वस्थ झाला होता.

    “मामा, ज्यांना मी मित्र समजलो, तेच लोक आज माझी बदनामी करत आहेत…”

    मामा हसला.

    “मित्र?”

    “हो.”

    “मग ते मित्र नव्हते.”

    “म्हणजे?”

    “जो तुमच्या संकटात तुमच्या बाजूला उभा राहत नाही, तो फक्त ओळखीचा माणूस असतो.” थोडा वेळ असाच गेला. मामा पुन्हा म्हणाला,

    “आणखी एक गोष्ट सांगू का? बाळा, शत्रूंपासून सावध राहायला जग शिकवतं. पण मित्रांच्या रूपातील शत्रूंपासून सावध राहायला अनुभव शिकवतो.”

    संदेशच्या डोळ्यात अश्रू आले.

    “पण मामा, माझ्याच लोकांनी माझ्याशी गद्दारी केली.”

    मामा म्हणाला,

    “गद्दारांवर राग करू नकोस.”

    “का?”

    “कारण त्यांनी तुला माणसं ओळखायला शिकवलं.”

    घरी जाताना संपाबुवा चालता चालता विचार करत होता. कसं होणार या पोरांचं? गावातल्या अफवा आणि गावातली भावकी याला अभ्यास करू देतील का? अभ्यासाचं राहू दे, इथले लोक त्याला शांतपणे जगू तरी देतील का? कोण काय वाटेल ते बोलत राहतो. ते बोललेलं कानावर आलं की काळजात खड्डा पडतो. कोण म्हणतो, विनयभंग आणि बलात्कार एकच की… तुझ्या घराची सगळी आबरू गेली. आता तू अधिकारी जरी झालास तरी, तुझ्या जिंदगीत काय अर्थ राहिला? कोण म्हणतंय, अरे तुला फक्त जामीन मिळाला, पण पुढे ते दोन वकील लावणार आहेत आणि तुला कसल्याही परिस्थितीत शिक्षा होणार आहे. त्यामुळे सावध राहा!

    क्रमश:
    ॲड. कृष्णा पाटील

    मोबाइल – 9372241368

    Related Posts

    माणूस नावाचं रसायन!

    August 4, 2026 ललित

    सार्थक

    August 3, 2026 ललित

    Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक

    August 2, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माणूस नावाचं रसायन!

    By सुरेखा मोंडकरAugust 4, 2026

    आजूबाजूला गुलमोहराचे, सोनमोहराचे घनदाट वृक्ष! त्यावर मधुमालती आणि विविध रंगाच्या बोगनव्हिलाच्या फुलांची दाटी. मध्यभागी सळसळ…

    सार्थक

    August 3, 2026

    Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक

    August 2, 2026

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अफवा आणि सत्य

    August 4, 2026

    माणूस नावाचं रसायन!

    August 4, 2026

    Recipe : स्वादिष्ट खवा जिलेबी अर्थात मावा जिलेबी अन् ब्रोकोली- मटार पुलाव!

    August 4, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : विकल्प जेणें जेणें उपजे, नाथिली विकृति निपजे

    August 4, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 ऑगस्ट 2026

    August 4, 2026

    सेल्फी अन् विकतचं दुखणं!

    August 3, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 383
    • अवांतर 200
    • आरोग्य 135
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 519
    • फिल्मी 61
    • फूड काॅर्नर 245
    • मैत्रीण 24
    • ललित 827
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अफवा आणि सत्य

    August 4, 2026

    माणूस नावाचं रसायन!

    August 4, 2026

    Recipe : स्वादिष्ट खवा जिलेबी अर्थात मावा जिलेबी अन् ब्रोकोली- मटार पुलाव!

    August 4, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.