वातानुकूलित सिटीबस स्टॉपवर थांबली. मागच्या दरवाजातून राज, हा अतिशय रुबाबदार तरुण, बसमध्ये चढला. साधारणतः सहा फूट उंच, गोरापान वर्ण, आकर्षक पोशाख आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व!
नियमांना धाब्यावर बसवण्याचा हक्क असल्याच्या तोऱ्यात पुढच्या दरवाजातून दोन सुंदर तरुणी बसमध्ये चढल्या. एकीचा गोरा वर्ण, मध्यम उंची, सडपातळ बांधा, डार्क निळा स्लीव्हलेस टी-शर्ट, ॲश कलरची जीन्स, सुंदर गॉगल आणि ब्रँडेड शूज, तर दुसरीचे लांब मोकळे केस, फॅशनेबल पंजाबी ड्रेस, गव्हाळ वर्ण, इम्पोर्टेड गॉगल आणि हाय हिल्स.
त्या सौंदर्यवतींना बघताच राजची विकेट पडली. योगायोगाने किंवा जाणीवपूर्वक प्रयत्न करून, त्याला त्यांच्या मागची सीट मिळाली. गप्पा मारण्यात दोघी मग्न होत्या. राज मन लावून आणि कान टवकारून त्यांचे बोलणे ऐकत होता. त्यांच्या बोलण्यातून राजला समजले की, त्या साठे कॉलेजला शिकत होत्या. शोल्डर कटवाली ‘नेहा’ नि लांब केसवाली ‘रीना’… दोघी अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी.
हेही वाचा – मुलगा राज रातोरात बदलल्याने सदानंद आणि सावित्रीबाई विचारात पडले…
गप्पांच्या नादात त्या तिकीट घ्यायला पूर्णपणे विसरल्याचे राजच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही.
बसमध्ये तिकीट चेकर चढल्याची जाणीवही दोघींना झाली नाही. “मॅडम, तिकीट दाखवा…” तिकीट चेकर जवळजवळ ओरडूनच म्हणाल्याने त्या गप्पांच्या दुनियेतून वास्तवात आल्या. आपण तिकीट न काढल्याची जाणीव दोघींनाही झाली आणि त्यांची विकेट पडली.
“सुशिक्षित आणि मोठ्या घरातल्या दिसतात, परंतु विनातिकीट प्रवास करतात,” साहेबांनी टकळी चालू केली. त्यांचा दोघींचा चांगलाच पाणउतारा करण्याचा इरादा होता. “नेहा आणि रीना, विसरलात का? तुमची तिकिटे राजजवळ, म्हणजे माझ्याजवळ आहेत…” पटकन उठून राजने साहेबांना तिकिटे दाखविली. आता मात्र साहेबांचीच विकेट पडली. नेहा आणि रीनासाठी हा सुखद धक्का होता. अतिशय कृतज्ञतेने दोघींनी राजचे आभार मानले.
साठे कॉलेजच्या बसस्टॉपवर नेहा आणि रीना उतरल्या. त्यांच्या मागोमाग राजदेखील उतरला. नेहाने सहज मागे वळून बघितले. राज त्यांच्याच मागे येत होता. नेहाला ते खटकले. तिने ठरविले की, राजला सांगायचे, “मित्रा, तू मदत केलीस, थँक्स; परंतु आमचा पाठलाग मात्र करू नकोस.”
नेहा राजकडे जायला निघाली, तेवढ्यात राजने स्कूटीवरून येणाऱ्या एका मुलीकडे लिफ्ट मागितली आणि तो तिच्याबरोबर निघून गेला. आता मात्र नेहाचीच विकेट पडली.
दोघी कॉलेजमध्ये पोहोचल्या. क्लास चालू व्हायला थोडा वेळ होता, म्हणून त्या बाहेर थांबल्या होत्या. तेवढ्यात नेहाचे लक्ष लांबवर उभ्या असलेल्या राजकडे गेले. “हा पुन्हा इथे?” नेहाच्या कपाळावर आठ्या उमटल्या.
हेही वाचा – कालाय तस्मै नमः
“आमचा पाठलाग अगदी कॉलेजपर्यंत. आय कॅनॉट टॉलररेट धिस…” दोघीही तरातरा राजजवळ पोहोचल्या. राजजवळ उभा असलेला कॉलेजचा शिपाई नेहाला म्हणाला, “नेहा मॅडम, हे तुमचे मराठीचे नवीन प्रोफेसर राज मराठे… यांना तुमच्या क्लासला यायचे आहे, प्लीज त्यांना घेऊन जा.”
आता मात्र नेहा आणि रीना, दोघींचीही विकेट पडली.
क्लास सुरू करताना राजने त्याची ओळख करून दिली. राज बी.ए. आणि एम.ए.चा गोल्ड मेडलिस्ट होता, हे ऐकून परत एकदा नेहा आणि रीनाची विकेट पडली.
राजचे प्रभावी व्यक्तिमत्त्व, दमदार आवाज, शिकविण्याची पद्धत, आत्मविश्वास आणि वैचारिक प्रगल्भता पाहून पहिल्याच तासाला वर्गातील समस्त मुलींची विकेट पडली.
कॉलेज संपल्यावर नेहा आणि रीना बसने घरी यायला निघाल्या, तेवढ्यात नेहाच्या बाबांचा फोन आला… “नेहा, तुझ्यासाठी एक खूप छान स्थळ शोधलेय. मुलगा प्राध्यापक असून बी.ए. आणि एम.ए.ला गोल्ड मेडल मिळाले आहे.”
“बाबा, त्यांचे नाव राज मराठे आहे का?”
“हो, पण नेहा, तुला कसे कळले? तू ओळखतेस का त्यांना?” असे विचारताना नेहाच्या बाबांची विकेट पडली.
राज सरांचे नाव ऐकून रीनाच्या चेहऱ्यावर उमटलेले प्रश्नचिन्ह बघून, “माझे बाबा राजच्या स्थळाचा विचार करताहेत,” नेहाने स्पष्टीकरण दिले. रीनाचा पडलेला चेहरा स्पष्टपणे दर्शवत होता की, रीनाची विकेट पडली होती.
घरी येताच आई-बाबांशी अगदी प्रेमाने आणि सलगीने बोलत नेहाने सांगितले, “मला राजचे स्थळ पसंत आहे.” आता मात्र आई आणि बाबा दोघांचीही विकेट पडली.
नेहाने सकाळपासूनचा सर्व वृत्तांत आई-बाबांना सांगितल्यामुळे सगळ्यांचे राजबद्दलचे मत खूप चांगले झाले. तेवढ्यात नेहाच्या बाबांचा फोन वाजला.
“सर, तुमच्या मुलीचे प्रोफाइल मी ‘अनुरूप’मध्ये बघितले. मला प्रोफाइल आवडले आहे. मी तिच्याशी बोलू शकतो का?” बाबांनी फोन नेहाकडे दिला.
राजवर फिदा असणाऱ्या नेहाला आता कुणाही विवाहेच्छुकाशी बोलायचे नव्हते. नाईलाजानेच तिने फोन घेतला. “ऑडिओ कॉल नको, व्हिडीओ कॉल करा,” नेहाने स्पष्टपणे सांगितले. व्हिडीओ कॉलवर एकमेकांना बघताच नेहाची आणि पलीकडून बोलणाऱ्या तरुणाचीही विकेट पडली. तो दुसरा-तिसरा कुणी नव्हता, तर प्रोफेसर राज मराठेच होता.
दिवसभर राजची विकेट काढण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या नेहाला प्रथमच राजची विकेट काढता आली होती. “सर, तुम्ही मला पसंत आहात,” असे सांगत नेहाने राजची पुन्हा एकदा विकेट काढली, अगदी क्लीन बोल्ड करत.
नेहा राज सरांशी लग्न करणार, ही बातमी संपूर्ण कॉलेजमध्ये पसरली. “कॉलेज क्वीन” नेहावर जीव टाकणाऱ्या अनेक तरुणांची आणि “राजबिंड्या” राजवर फिदा असणाऱ्या सर्व तरुणींची विकेट एकाच वेळी पडली.
हे सर्व मुंबईत नव्हे, तर पुण्यात घडले हे समजल्यावर समस्त पुणेकर युवकांची विकेट पडली.
आणि ही कथा वाचकांना चक्क आवडली, हे समजल्यावर लेखक म्हणून माझीच विकेट पडली.
बघा तर खरं, तुमची विकेट शाबूत आहे की पडलीय?


