अध्याय तेरावा
न बुझावितां मतें । न फिटे आक्षेपाचें लागतें । तें व्याख्यान जी तुमतें । जोडूनि नेदी ॥327॥ आणि माझें तंव आघवें । ग्रथन येणेचि भावें । जे तुम्हीं संतीं होआवें । सन्मुख सदां ॥328॥ एऱ्हवीं तरी साचोकारें । तुम्ही गीतार्थाचे सोइरे । जाणोनि गीता एकसरें । धरिली मियां ॥329॥ जें आपुलें सर्वस्व द्याल । मग इयेतें सोडवुनि न्याल । म्हणोनि ग्रंथु नव्हे बोल । साचचि हे ॥330॥ कां सर्स्वाचा लोभु धरा । बोलीचा अव्हेरु करा । तरि गीते मज अवधारा । एकचि गती ॥331॥ किंबहुना मज । तुमचिया कृपा काज । तियेलागीं व्याज । ग्रंथाचें केलें ॥332॥ तरि तुम्हां रसिकांजोगें । व्याख्यान शोधावें लागे । म्हणूनि मतांगें । बोलों ठेलां ॥333॥ तंव कथे पसरु जाहला । श्लोकार्थु दूरी गेला । कीजो क्षमा या बोला । अपत्या मज ॥334॥ आणि घांसाआंतिल हरळु । फेडितां लागे वेळु । ते दूषण नव्हें खडळु । सांडावा कीं ॥335॥ कां संवचोरा चुकवितां । दिवस लागलिया माता । कोपावें कीं जीविता । जिताणें कीजे ॥336॥ परि यावरील हें नव्हे । तुम्हीं साहिलें तेंचि बरवें । आतां अवधारिजो देवें । बोलिलें ऐसें ॥337॥ म्हणे उन्मेखसुलोचना । सावध होईं अर्जुना । करूं तुज ज्ञाना । वोळखी आतां ॥338॥ तरि ज्ञान गा तें एथें । वोळख तूं निरुतें । आक्रोशेंवीण जेथें । क्षमा असे ॥339॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : समुद्रीं दाटे भरितें, तैं समुद्रचि भरी तरियांते
अर्थ
निरनिराळ्या मतांचे निराकरण न करता जर व्याख्यान केले, तर त्या व्याख्यानात आक्षेपांचा संबंध दूर होणार नाही. (त्यामधे शंकेच्या पुष्कळ जागा राहतील) व महाराज तसले व्याख्यान मला तुमची प्राप्ती होऊ देणार नाही. ॥327॥ आणि माझे ग्रंथ रचणे तर याच हेतूने आहे की, तुम्ही संतांनी नेहेमी (प्रसन्न होऊन) समोर असावे. ॥328॥ एऱ्हवी तुम्ही खरोखर गीतार्थाचे चाहाते आहात, असे समजून मी गीतेचा आश्रय केला, तिला जीवासारखी प्रिय मानून तिचे व्याख्यान करू लागलो. ॥329॥ जी आपली सर्व मालमत्ता (पूर्ण कृपा) आहे ती द्याल व हिला (गीतेला) सोडवून न्याल, म्हणून गीता हा खरोखर ग्रंथ नव्हे, तर माझ्याजवळ तुमचे हे तारण आहे. ॥330॥ अथवा, तुम्ही आपल्या सर्वस्वाचा लोभ धराल व तारणाचा अव्हेर कराल, तर गीतेची व माझी एकच गति आहे, असे समजा. ॥331॥ फार काय सांगावे! मला तुमच्या कृपेशी काम आहे व त्या कृपेकरिता मी हे ग्रंथाचे निमित्त केले. ॥332॥ तरी तुम्ही जे रसिक, त्या तुम्हांयोग्य व्याख्यान योजावे लागले, म्हणून माझ्याकडून अन्य मतांची चर्चा झाली. ॥333॥ तो व्याख्यानाचा विस्तार झाला, श्लोकांचा अर्थ एकीकडे राहिला, या माझ्या बोलण्याबद्दल मला लेकराला आपण क्षमा करावी. ॥334॥ आणि (जेवीत असतांना) घासातील खडा काढतांना वेळ लागतो, तर जेवणाराला तो घासातील खडा काढण्याला वेळ लागला व आपले जेवण आटोपण्य़ास उशीर केला तर त्यात जेवणाराचा दोष नाही, कारण घासातील खडे वगैरे कचरा काढून टाकलाच पाहिजे. ॥335॥ अथवा सोबतीच्या संभावित चोराला चुकवून आल्यामुळे, घरी येण्य़ास मुलाला जास्त दिवस लागले, तर आईने मुलावर रागवावे किंवा तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावर मीठमोहर्या वगैरे ओवाळून त्याची दृष्ट काढावी? ॥336॥ परंतु हे माझे बोलणे वरच्यासारखे (शाबासकी देण्यासारखे) नाही, तर माझे बोलणे पाल्हाळाचे होते व ते तुम्ही सहन केले, हे म्हणणेच बरे. तर आता महाराज, ऐका, देव असे बोलले. ॥337॥ भगवान म्हणतात, हे ज्ञानरूपी उत्तमदृष्टी असणार्या अर्जुना, आता तुला ज्ञानाचा परिचय करून देतो, तू इकडे लक्ष दे. ॥338॥ तर जेथे सहज (चरफडल्याशिवाय) क्षमा असेल तेथे ज्ञान आहे, हे तू पक्के ओळख. ॥339॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : काइसा वासु कापुरा, मंद जेथ अवधारा


