Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जुलै 2026

    July 23, 2026

    मोबदला

    July 22, 2026

    आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची…

    July 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, July 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मोबदला
    ललित

    मोबदला

    दीपक तांबोळीBy दीपक तांबोळीJuly 22, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, दीपक तांबोळी, लेखक दीपक तांबोळी, रंग हळव्या मनाचे, अण्णांची शिरीषकडून सेवा, शिरीषचे भाऊ निर्मल आणि गुणवंत, स्वार्थी निर्मल, स्वार्थी गुणवंत, सून नेहाकडून अण्णांची सेवा, अण्णांचे कोट्यवधींचे शेअर्स, अण्णांचे शेअर्स शिरीषच्या नावे, शिरीषला कोट्यवधींचे शेअर्स,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    उत्तरार्ध

    घरात कुरबुरी वाढल्याने धाकटा मुलगा शिरीष आणि त्याची पत्नी नेहा वेगळे रहायला लागले. शिरीषचे भाऊ निर्मल आणि गुणवंत यांच्यासोबत अण्णा रहात होते. शेवटी ते त्यांनी बांधलेलं घर होतं. त्याचे ते मालक होते. पण नंतरच्या सहाच महिन्यांत दोन्ही मुलं आणि सुनांनी या मालकाचं जीवन आश्रितासारखं करून टाकलं. खाण्यापिण्याचे आबाळ आणि वेळेवर औषधं दिली न गेल्याने त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला. त्यांना पॅरेलिसीस झाल्यावर दोघा भावांनी त्यांना शिरीषच्या घरी आणून सोडले. अर्थात, शिरीष आणि नेहाला अगोदरच निर्मल आणि गुणवंत यांनी अण्णांच्या चालवलेल्या हेळसांडीबद्दल वाईट वाटत होतं. दोघांनीही आनंदाने अण्णांची जबाबदारी स्वीकारली.

    गेली सात वर्षं अण्णा पॅरेलिसीस होऊन पडले होते. पण दुर्दैवाने एक दिवस जीवलग मित्र वारल्याची बातमी पेपरमध्ये वाचली आणि अण्णांना जबरदस्त धक्का बसला. त्यातच ते गेले. निर्मल आणि गुणवंत हे  त्यांच्या अंत्यसंस्काराला परक्यासारखे आले. दिवसकार्यासाठी एक रुपयाही त्यांनी खर्च केला नाही.

    लगेच चौदाव्या दिवशी, दोघांनी अण्णांच्या मृत्युपत्राचा विषय काढला. वडिलांच्या मरणाचं दुःख नसणाऱ्यांना त्यांच्या प्रॉपर्टीची मात्र खूप काळजी होती, हे स्पष्ट दिसत होतं.

    “रणदिवे नावाचे वकील अण्णांचे मित्र होते. ते बऱ्याचदा घरी यायचे. अण्णांच्या अंत्यविधीलाही ते हजर होते. त्यांना विचारायला हवं…” शिरीष आठवून म्हणाला.

    “अरे, मग वाट कसली बघतोस? लाव त्यांना फोन ताबडतोब,” दोघंही भाऊ एकदमच ओरडले.

    शिरीषने डायरीतून वकिलाचा फोन नंबर शोधून त्यांना फोन लावला. त्यांच्याशी बोलून फोन ठेवत तो म्हणाला, “ते आपल्याकडेच यायला निघालेत. त्यांच्याकडे मृत्युपत्र आहे!”

    हे ऐकताच दोन्ही भाऊ आणि त्याच्या बायकांचे चेहरे प्रफुल्लित झाले

    वकील साहेब आले. सगळी मंडळी उत्सुकतेने त्यांच्याभोवती जमा झाली.

    “मृत्युपत्रात खास असं काही सांगण्यासारखं नाही,” असे सांगत वकील साहेबांनी मृत्युपत्र वाचायला सुरुवात केली, “निर्मल आणि गुणवंत ज्या बंगल्यात रहातात, तो बंगला त्यांच्याच नावे करण्यात आलाय. पुढे-मागे निर्मल आणि गुणवंत यांचं पटलं नाही तर तो बंगला विकून आलेली रक्कम दोघांनी वाटून घ्यायची आहे. सध्या या बंगल्याची किंमत एक कोटी रुपये आहे. शिरीष ज्या फ्लॅटमध्ये रहातोय, म्हणजे हाच फ्लॅट अण्णांनी शिरीषच्या नावे केलाय. सध्याच्या घडीला या फ्लॅटची किंमत पस्तीस लाख आहे. तसंच, मेडिकल एजन्सी ज्या जागेत आहे, तिची बाजारभावाने किंमत पंचवीस लाख आहे, तीसुद्धा शिरीषच्या नावे करण्यात आली आहे.”

    “याचा अर्थ शिरीषला अण्णांनी दहा लाख जास्त दिले आहेत,” निर्मल अस्वस्थ होऊन रागाने म्हणाला.

    वकील साहेबांनी त्याच्याकडे काही क्षण रागाने पाहिलं. मग म्हणाले, “अण्णांच्या तीस लाखांच्या मुदतठेवी तुम्ही दोघां भावांनी अण्णा आजारी असताना मोडल्या. शिरीषला त्याबद्दल का सांगितलं नाही? आणि त्या तीस लाखाचं तुम्ही काय केलं? त्याचं स्पष्टीकरण द्या अगोदर!”

    निर्मल चपापला. त्याने घाबरून गुणवंतकडे पाहिलं. गुणवंतने त्याला नजरेने शांत बसायची खुण केली.

    हेही वाचा – अण्णांचं मृत्युपत्र

    “तुमच्या कौटुंबिक भानगडीत मला पडायचं नाहीये. नाहीतर तुमची एक एक प्रकरणं उकरून काढायला मला वेळ लागणार नाही. मी तुमच्या वडिलांचा वकीलच नाही तर, चांगला मित्रही होतो, हे ध्यानात ठेवा. अण्णा तुमच्याकडे असताना तुम्ही त्यांचे काय हाल केले, हेही मला चांगलंच माहीत आहे. तेव्हा बोलताना सांभाळून बोला,” वकील साहेब रागात म्हणाले, तशा दोन्ही भावांनी माना खाली घातल्या.

    “बस, एवढंच होतं मृत्युपत्र,” वकील साहेबांनी ते शिरीषच्या हातात दिलं.

    “पण वकील साहेब अजून काही प्रॉपर्टी नव्हती का अण्णांकडे?” गुणवंतने विचारलं.

    “ते मला कसं माहीत असणार? तुम्ही शोधून काढा आणि मला सांगा. पण लक्षात ठेवा ते सापडलं तरी, तुम्हाला सहजासहजी काहीही मिळणार नाही. कदाचित, कोर्टाची पायरीही चढावी लागेल…” गुणवंतच्या बोलण्यातला लोभीपणा ओळखून वकील साहेबांनी सुनावले.

    वकील साहेब गेले. त्यांच्यापाठोपाठ निराश होऊन निर्मल आणि गुणवंत त्यांच्या बायका-मुलांसह निघून गेले.

    ते गेल्यावर शिरीष नेहाला म्हणाला, “चला बरं झालं. सगळं व्यवस्थित पार पडलं. वाटेहिश्शांच्या भानगडीही मिटल्या!”

    “ते ठीक आहे हो, पण तुम्हाला नाही वाटत, अण्णांनी आपल्याला त्यामानाने खूपच कमी दिलंय?”

    “त्या मानाने म्हणजे?”

    “म्हणजे आपण जे काही त्यांच्यासाठी केलं, त्याचा खूपच कमी मोबदला त्यांनी आपल्याला दिलाय…”

    शिरीष हसला

    “नेहा, अण्णांनी मला जन्म दिला, मला वाढवलं, शिकवलं, मोठं केलं, मेडिकल एजन्सी माझ्या नावावर केली… याचा तर त्यांनी कधी मोबदला मागितला नाही.”

    “अहो, मला तसं म्हणायचं नाहीये. तुमच्या दोन भावांच्या मानाने, असं मला म्हणायचं होतं. विचार करा. तुमच्या भावांनी अण्णांसाठी काय केलं? त्यांच्या तब्येतीची कधी काळजी घेतली नाही. त्यामुळेच अण्णांना पॅरेलिसीस झाला. त्यानंतर अण्णांना साधं सहा महिने त्यांनी घरात राहू दिलं नाही. लगेच आपल्या घरात आणून सोडलं. विचार करा, या सात वर्षांत आपण अण्णांसाठी काय नाही केलं? या सात वर्षांत कधीही आपण टूरला नाही गेलो… अण्णांना एकटं राहू द्यायचं नाही म्हणून आपण कधी जोडीने लग्नासमारंभाला गेलो नाही… अण्णांना त्रास होऊ नये म्हणून कधी नातेवाईकांना आपल्या घरी बोलावलं नाही…

    अण्णा चार वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तुमचे भाऊ परक्या माणसांसारखे भेटायला यायचे. कधी त्यांनी विचारलं की, ‘शिरीष किती बिल झालं? आम्ही काही मदत करू का तुला?’ अण्णांच्या आजारपणात किती रात्री तुम्ही आणि मी जागून काढल्या आहेत. मान्य आहे की, ते आपलं कर्तव्य होतं. पण मग तुमच्या भावांची, वहिनींचीही काही कर्तव्यं नव्हती का? अण्णांनी केवळ तुम्हालाच नाही, तर तुमच्या भावांनाही जन्म दिलाय, त्यांनाही शिकवलं, मोठं केलंय… मग त्यांचीही काही जबाबदारी नाही का?

    तुम्ही पाहिलंच असेल की, अण्णा वारले पण अंत्यविधीपासून तेराव्यापर्यंतच सगळा खर्च आपल्यालाच करावा लागला. इस्टेटीत वाटा हवा, पण बापाला मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागलेल्या खर्चात वाटा नको, ही कोणती पद्धत? निर्मल आणि गुणवंतने अण्णांचे हाल केले तरीही अण्णांनी इस्टेटीत त्यांना समान वाटा दिला, त्याचं मला वाईट वाटत नाही. पण आपण केलेल्या त्यागाचा, सेवेचा, खर्चाचा अण्णांनी आपल्याला काय मोबदला दिला सांगा?”

    शिरीष नि:शब्द होऊन ऐकत होता. नेहाचा एक एक शब्द त्याचं काळीज चिरून जात होता. काय चुकीचं बोलत होती ती? आजवर तिने जे पाहिलं, अनुभवलं तेच तिच्या तोंडून बाहेर पडत होतं. शिरीषला ते पटत होतं, त्यामुळे काय उत्तर द्यावं, ते त्याला कळेना. काहीतरी बोलावं म्हणून तो म्हणाला,

    “तुझं म्हणणं बरोबर आहे गं, पण आपल्याला एक्स्ट्रा देण्यासारखं अण्णांकडे काही असायला हवं ना? जे होतं, ते त्यांनी वाटून दिलं. कदाचित निर्मलदादा, गुणवंत दादा आणि त्यांच्या बायका खूप कमी पगारावर नोकऱ्या करतात, हाही मुद्दा अण्णांनी लक्षात घेतला असावा.”

    नेहा क्षणभर काहीच बोलली नाही. मग उसासा टाकून म्हणाली, “तसं असू शकतं. पण मन काही मानत नाही हेच खरं…”

    रात्री बराच वेळपर्यंत शिरीषला झोप लागली नाही. नेहाचे शब्द आठवून तो वारंवार बेचैन होत होता.

    दुसऱ्या दिवशी तो मेडिकल एजन्सीमध्ये गेला खरा, पण जेव्हा जेव्हा कामातून फुरसत व्हायची तेव्हा तेव्हा नेहाचं बोलणं त्याला आठवायचं आणि तो मग भूतकाळात जायचा. त्या सात वर्षांत अण्णांच्या आजारपणामुळे आलेल्या अडचणी, काही बरेवाईट प्रसंग त्याला आठवू लागायचे आणि मग तो अस्वस्थ व्हायचा… अण्णांनी खरंच आपल्यावर अन्याय केला, ही भावना त्याच्यात दृढ होऊ लागली. आपल्या तुलनेत आपल्या स्वार्थी आणि लोभी भावांना अण्णांनी भरभरून दिलं, याचं त्याला दुःख होऊ लागलं. आठवडाभर त्याला या विचारांमुळे काम सुचत नव्हतं. कितीही झटकून टाकायचा प्रयत्न केला तरीही, ते विचार पुन्हा पुन्हा त्याच्या मनाला चिकटून बसायचे. अर्थात, आता करण्यासारखं त्याच्या हातात तरी काय होतं?

    आठ-दहा दिवसांनी रविवारी तो नाश्ता करत असताना रणदिवे वकिलांचा फोन आला…

    “शिरीष, घरी आहेस का? यायचं होतं जरा बोलायला!”

    “हो या ना… काका काही विशेष काम?” त्याने विचारलं.

    “अरे,, काही नाही… जरा बोलायचं होतं. मी आलो की, सांगतो सर्व…”

    “या या, मी घरीच आहे.”

    शिरीषच्या पोटात खड्डा पडला. निर्मल आणि गुणवंतने वकिलाला भेटून काही गडबड तर केली नसेल ना? दोघांच्या बायका चांगल्याच कारस्थानी आहेत, हे त्याला माहीत होतं.

    अर्ध्या तासातच वकील साहेब घरी आले. शिरीषने नेहाला त्यांच्यासाठी चहा ठेवायला सांगितलं.

    “काका, निर्मल आणि गुणवंत दादालाही बोलावून घेऊ का?”

    “नाही नाही, हे फक्त तुझ्यासाठी आहे.”

    त्यांनी बॅगेतून फाइल काढून ती उघडली. शिरीषचं ह्रदय धडधडू लागलं…

    “तुला माहीतच असेल की, अण्णांना शेअर मार्केटचा फार नाद होता आणि ते नेहमी शेअर्सची उलाढाल करीत असत.”

    “हो, पण एकदा शेअर बाजार कोसळला, तेव्हा त्यांचं खूप नुकसान झालं होतं. आईला हे कळल्यावर तिचं अण्णांशी जोरदार भांडण झालं होतं. त्या दिवसापासून अण्णांनी शेअर बाजाराचा नाद सोडला होता…”

    वकील साहेब हसले,

    “नाही; त्यांनी ट्रेडिंग बंद केलं, पण इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर्स विकत घेणं बंद केलं नाही.”

    “अच्छा! पण या सगळ्याचा आता काय संबंध?”

    “तुला कल्पना नसेल, पण अण्णांनी जवळपास पंचवीस लाखांचे शेअर्स घेतले होते. त्यांचा शेअरब्रोकर माझा पुतण्याच असल्याने मला ही गोष्ट कळली. तीन महिन्यांपूर्वी अण्णांना भेटायला मी तुमच्या घरी आलो होतो. तू घरी नव्हतास आणि नेहा तुझ्या मुलीचा अभ्यास घेत होती. मी अण्णांना या शेअर्सबद्दल सांगितलं आणि त्यांची विल्हेवाट कशी करायची, ते विचारलं, तेव्हा अण्णांनी ते शेअर्स एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करायला सांगितले. मात्र, त्यांनी अट टाकली की, ही गोष्ट तुझ्या दोन्ही भावांना कळवू नये आणि त्यांच्या मृत्यूनंतर एकवीस दिवसांनी त्याबद्दल फक्त तुला सांगावं. तुझे भाऊ स्वार्थी आणि हलकट आहेत. त्यांना या शेअर्सबद्दल कळलं तर, ते त्यात हिस्सा तर मागतीलच… नाही दिला तर कोर्टकचेऱ्याही करायला कमी करणार नाहीत, अशी त्यांना भीती वाटत होती.”

    “पण ती व्यक्ती आहे तरी कोण, जिच्या नावावर शेअर्स ट्रान्सफर करायला सांगितलेत?” नेहाने चहाचा कप त्यांच्यासमोर ठेवत विचारलं

    वकील साहेब क्षणभर शांत बसले. मग म्हणाले,

    “अण्णांनी ते सगळे शेअर्स शिरीषच्या नावे केले आहेत!”

    “काय? माझ्या नावावर?” आश्चर्याचा धक्का बसून शिरीषने विचारलं.

    “हो! पण शिरीष आनंदाची बातमी पुढेच आहे. या सर्व शेअर्सची आजची मार्केट व्हॅल्यू आम्ही काढली, ती जवळजवळ अडीच कोटींच्या आसपास आहे…”

    हेही  वाचा – एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?

    “ओ माय गॉड! अडीच कोटी!” शिरीषचे डोळे विस्फारले. नेहाही आ वासून वकिलांकडे पाहात राहिली.

    “आता हे तू ठरव की, हे शेअर्स विकून टाकायचे की, राहू द्यायचे…” वकील शिरीषला म्हणाले आणि त्यांनी फाइल मधून शेअर सर्टिफिकेट्स काढून शिरीषकडे दिले.

    “ते ठीक आहे काका, पण या शेअर्समुळे काही लीगल प्रॉब्लेम्स तर येणार नाहीत ना? अण्णांच्या या निर्णयाला माझ्या भावांनी कोर्टात आव्हान दिलं तर?” शिरीषने काळजीने विचारलं.

    “तशी शक्यता फार कमी आहे. कारण तीन महिन्यांपूर्वीच आणि शेवटचं मृत्युपत्र बनवण्याच्या आतच ते शेअर्स कायदेशीररीत्या तुझ्या नावावर ट्रान्सफर करण्यात आले होते आणि तू जरा आता हुशार हो. तुझ्या भावांनी अण्णांना कशी वागणूक दिली ते बघ. त्या मानाने अण्णांनी त्यांना भरपूर काही दिलं आहे. आता जस्ट सेलिब्रेट! अरे हो, एक गोष्ट सांगायचीच राहिली.”

    “कोणती?”

    “अण्णांनी तुला विनंती केली आहे की, त्यांच्या वाढदिवसाला आणि श्राद्धाला वृद्धाश्रमातील सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तू जेवण द्यावंस.”

    “जरूर देईन काका.”

    वकील साहेब निघाले. त्यांना निरोप देऊन घरात येता येता शिरीषची नजर अण्णांच्या फोटोवर गेली आणि त्याला गलबलून आलं. भरल्या डोळ्यांनी आणि गहिवरल्या स्वरात तो नेहाला म्हणाला,

    “तू म्हणत होतीस ना, आपल्या सेवेचा अण्णांनी काय मोबदला दिला म्हणून? बघ त्यांनी असा मोबदला दिलाय की, आयुष्यभर आपल्याला कसलीच कमतरता भासणार नाही.”

    नेहाच्याही डोळ्यात त्यावेळी अश्रूंनी गर्दी केली होती. पण त्याचसोबत अण्णांनी आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त मोबदला दिलाय याचंही समाधान तिच्या चेहऱ्यावर विलसत होतं.

    (ही कथा माझ्या ‘रंग हळव्या मनाचे’ या पुस्तकातील आहे.)

    Avatar photo
    दीपक तांबोळी

    निवृत्त रेल्वे अभियंता. 2018पासून लेखनास सुरुवात केली. आतापर्यंत 6 कथासंग्रह आणि 1 संपादित कथासंग्रह प्रकाशित. 8वा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्य संस्थांचे 35 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

    Related Posts

    कौतुकाचे दोन शब्द

    July 22, 2026 ललित

    अंतर्मनातील विठ्ठल

    July 21, 2026 ललित

    मैत्री

    July 21, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    कौतुकाचे दोन शब्द

    By सुधीर करंदीकरJuly 22, 2026

    आपल्याला मदत करणाऱ्यांना ‘अभिवादन’ करण्यात किंवा त्यांना ‘धन्यवाद’ देण्यात आपण (म्हणजे बरेच जण) नेहमीच चिक्कूपणा…

    अंतर्मनातील विठ्ठल

    July 21, 2026

    मैत्री

    July 21, 2026

    वाकडं बोट

    July 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जुलै 2026

    July 23, 2026

    मोबदला

    July 22, 2026

    आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची…

    July 22, 2026

    कौतुकाचे दोन शब्द

    July 22, 2026

    झोपेशिवाय माणूस कदाचित जिवंत राहू शकतो, पण…

    July 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : काइसा वासु कापुरा, मंद जेथ अवधारा

    July 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 368
    • अवांतर 199
    • आरोग्य 132
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 501
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 240
    • मैत्रीण 24
    • ललित 795
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जुलै 2026

    July 23, 2026

    मोबदला

    July 22, 2026

    आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची…

    July 22, 2026
    Most Popular

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – बाल्यावस्थेतील आरोग्य, शिक्षण

    July 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.