आज आंघोळीला जात असताना फोन आला. समोरच्याशी बोलून नंतर फोन बाथरूममध्येच विसरलो. चष्माही बाथरूममध्येच राहिला. बाहेर आल्यावर थोड्या वेळाने लक्षात आले, तोपर्यंत लहान भाऊ अतुल आंघोळीला गेला होता. त्याला अंघोळीला खूप वेळ लागतो. (त्यामुळे तो माझ्यापेक्षा खूप गोरा आहे! ते जाऊ द्या…)
तर सांगायचे असे की, आता तो 20-25 मिनिटे बाहेर येणार नाही… म्हणून काय करावे? हा प्रश्न पडला. एरवी मी रिकामा असलो तर मोबाइल पाहतो किंवा टीव्ही. पण आता मोबाइल बाथरूममध्ये… टीव्ही बघावा तर चष्माही बाथरूममध्ये… करणार काय?
मग स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला. वाढत्या वजनामुळे सकाळचा नाश्ता बंद केला आहे. पण आज टाइमपास करायचा होता, मोबाइल मिळेपर्यंत… मग प्लेट भरून चिवडा, 8-10 बिस्किटे, 1 सफरचंद आणि दिवाळीच्या फराळातली शिल्लक शेव होती, ती घेतली. दोन घास पोटात टाकत नाही, तोपर्यंत सौभाग्यवती प्रकटल्या आणि ओरडायला लागल्या…
“नाश्ता बंद केला आहे ना सकाळचा? चार आठ दिवसही पाळू शकत नाही पथ्य… सतत मेलं खाण्याकडे लक्ष!”
“अगं पण, आता वेळ होता रिकामा. चष्माही बाथरूममध्ये विसरलो… त्यामुळे टीव्ही, मोबाइल पाहता येत नाही म्हणून थोडंसं खातोय…”
“हे थोडंसं आहे? …आणि थोडा वेळ रिकामा होता तर देवाजवळ बसून शांतपणे देवाचे नाव घ्यावे, प्रार्थना करावी, ध्यानधारणा करावी… ते नाही सुचत! खाण्याचे बरे सुचते?”
हेही वाचा – कृष्ण होणे एवढेही कठीण नाही…
“हे बघ तू मला आता शांतपणे खाऊ दे, नाहीतर तुझ्या अशा बोलण्याने ते अंगी लागणार नाही,” मी खातखात काडी लावली… आणि नंतर शब्दांच्या तडतड्या ऐकत बसलो. अजूनही लड्या फुटल्या असत्या, पण तोपर्यंत अतुल माझा चष्मा आणि मोबाइल घेऊन आला.
“दादा, तुझा मोबाइल…”
“थँक यू.”
ऑफिसला पोहचलो नाही, तोपर्यंत अतुलचा फोन आला.
“दादा, आता माझी मोटरसायकल जुनी झाली, नवीन घेऊन देना?”
“कसली जुनी झाली? दोन अडीच वर्षे तर झाली तिला घेऊन. आता दोन वर्षे तर काढायची आहेत कॉलेजची. तेवढे काढून घे… गावातल्या गावात कशाला पाहिजे नवीन मोटरसायकल?”
“पण दादा…”
“आता नंतर बोलू. मला ऑफिसचे काम करूदे.”
“थांब दादा… फोन ठेऊ नको. ही पूजा कोण?”
माझ्या हातातला मोबाइल पडता पडता राहिला!
“कोण? मला माहीत नाही.”
“तीच रे… तुमच्या ऑफिसामधली… जिच्याबरोबर तू आज डिनरला जाणार आहे. मीटिंगच्या नावाखाली!”
“पण.. पण तुला कसे कळले?”
“तुझ्या फोनमुळे! तुमचे चॅटिंग वाचले मी…”
“नालायक… तुला बघतो घरी आल्यावर.”
“मला नंतर बघ. आधी मी वहिनीला घेऊन हॉटेल ‘ड्रीमलॅण्ड’ला येतो. तू, मी, वहिनी आणि पूजा सगळे सोबत डिनर करू!”
काही क्षण शांततेत…
“बरं… कोणती मोटरसायकल घ्यायची आहे तुला नवी?” मी राग गिळत विचारले.
“मी आता डीलरकडे जातो आणि बघतो. जुनी देऊन नवी घेतो. वरचे काय लाखभर रुपये लागतील ते तू दे.”
“एवढे?”
“तूर्तास एवढे पुरे. नवीन गाडी घरी आणली की, वहिनीकडून पूजा करून घेऊ, समजलं? ठेवतो फोन.”
हेही वाचा – बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…
मी घाम पुसून खुर्चीत बसलो. तेवढ्यात पूजाचा मेसेज आला…
“डार्लिंग, आजचे डिनरचे लक्षात आहे ना?”
खरंतर, डिनर कॅन्सल करावे, असे खूप वाटत होते, पण पूजाला ऐनवेळी काय कारण सांगू? शिवाय कॅन्सल केले तरी, लाख रुपयाचा भुर्दंड चुकणार नव्हता!
मी तिला मेसेज केला,
“हनी… कसे विसरेन? तुझा सहवास माझ्यासाठी लाखमोलाचा…”
तर ते असो…


