इंद्रायणीच्या तीरी असलेल्या आळंदीची आज आठवण येत आहे. आळंदीचं माझ्या मनाशी वेगळंच नातं आहे… तिथे गेल्यानंतर रांगेत उभं असताना हरीपाठ म्हणायचा. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायचं. त्यांच्यामागे विठ्ठल रुक्मिणी आहेत. लांबून त्यांना नमस्कार करायचा. मग उजव्या हाताला निघायचं… ज्ञानेश्वर माऊली समाधीसाठी जिथून आत गेले, ती ही जागा आहे…आत जाताना गुरू निवृत्तीनाथांनी त्यांचा हात धरला असेल… सोपान, मुक्ताबाई बाजूला उभ्या असणार…
हे सगळं चित्र समोर उभ राहतं… किती विलक्षण आहे हे सगळं… तिथे डोकं टेकवलं की, पोटात गलबलून येत… डोळे भरून येतात… पाय रेंगाळतात… माऊली आत कसे गेले असतील? इतक्या लहान वयात त्यांना हे कसं साधलं असेल? जे काम करायला ते आले होते ते झालं आणि ते गेले…
अक्षरशः ज्ञानाच भांडार त्यांनी आपल्यासाठी दिलेलं आहे. प्रतिकूल परिस्थितीत, समाजाचे घाव सोसत! हे कसं लिहिलं असेल? त्यांचा सगळा जीवनपट आपल्या डोळ्यासमोर येतो…
इतकं अफाट ज्ञान त्यांना जन्मजात होतं. देव जगात आहे, हे त्यांच्या अभंगावरून मला नेहमी खरं वाटतं…. आई सारखं समजावून सांगणाऱ्या ज्ञानदेवांना म्हणूनच ‘माऊली’ म्हटलं जातं… त्यांचे काही अभंग तर अनाकलनीय आहेत. त्याचा गूढार्थ तर वेगळाच आहे… त्यांना काय सांगायचं असेल… असं काही वेळेस मनात येत. तो अर्थ थोडा समजतो, तेव्हा फार आनंद होतो. मन भरून येतं…
हेही वाचा – आठवण आषाढी वारीची
आळंदीला जाऊन नुसतं दर्शन घेऊन यायचं नाही. तिथल्या पायऱ्यांवर बसून शांतपणे विचार करायचा… माऊलींच्या प्रेमाने हृदय आपोआप भरून येते. मंदिरात असताना मन करूणेने भरलेले असते. त्या वातावरणाने भारलेले असते… तेवढे क्षण खरे असतात. त्या वेळेपुरता तरी जगाचा विसर आपल्याला पडलेला असतो.
मला तर वाटते, आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात असलेल्या निरागस शांत आणि खऱ्या मनाने ते माऊलींना भेटणं असतं… विश्वासाठी कल्याण मागणारे ज्ञानदेव…
अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक
हेही वाचा – वारी पंढरीची… जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते!
ते सांगतात, पंढरपूरला वारीला जाऊन माझे माहेर म्हणजे विठ्ठल त्याला मी आलिंगन देईन. जे भक्त विठ्ठलाला भेटले त्यांना विठ्ठलाने आपलेसे केले. लाखों वारकरी त्यांचे अभंग गाऊन, वाचून आनंदात मार्गक्रमण करत आहेत. अनेक संतांनी आपल्याला हा अनमोल ठेवा दिलेलाआहे. पुढच्या पिढ्या हे ज्ञान समजून घेत आहेत. त्याचा अभ्यास करत आहेत. वारीचे वेध लागले आहेत… म्हणून हे सगळे आज आठवले.
जाऊन या एकदा माऊलींच्या दर्शनाला आळंदीला….
त्या ज्ञानराज माऊलींना विनम्र अभिवादन.


