Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चांगली बोहनी…

    July 9, 2026

    पावसाळा

    July 8, 2026

    गोष्ट सरोजताई अन् समीराची!

    July 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, July 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » चांगली बोहनी…
    ललित

    चांगली बोहनी…

    दीपक तांबोळीBy दीपक तांबोळीJuly 9, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, सीमाच्या पापडांची बोहनी, सीमावरील आपत्ती, सीमाच्या पतीचे आजारपण, चांगली बोहनी, पापडाची बोहनी, वाईट बोहनी, शांताबाईचा सीमाला सल्ला, शांताबाईची सीमाला मदत, शांताबाईमुळे सीमाची भरभराट, सीमा गृहउद्योग, सीमाच्या प्रगतीचे श्रेय शांताबाईला,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “अगं आशा, परवा आपलं बोलणं झालं होतं बघ माझ्या पापडाच्या बिझनेसबद्दल… येऊ का तुझ्याकडे पापड घेऊन?” सीमाने फोनवर आशाला विचारलं.

    “अगं ये ना! त्यात काय विचारायचं? ये. मी घरीच आहे,” आशा म्हणाली.

    सीमाने मुलीला स्कूटी काढायला सांगितली. घाईघाईने तिने मुगाच्या आणि उडदाच्या पापडाचे एक एक किलोचे पाच सहा पॅक एका पिशवीत घेतले. आशाच्या भरपूर ओळखी होत्या. ती तिच्या मैत्रीणींना विचारून आपले हे सगळे पापड खरेदी करेल, अशी सीमाला खात्री होती; म्हणून पिशवीचं वजन जास्त होत असतानाही तिने अजून एक किलोचा एक पॅक पिशवीत टाकला. आशा एक नंबरची भटकभवानी होती. ती घरी सापडणं मोठं मुश्कील! आज ती घरी होती. आज आपलं नशीब जोरदार आहे, असं सीमाला वाटून गेलं.

    “ये ये बैस…” दार उघडत आशा म्हणाली. सीमा आणि तिची मुलगी बसल्यावर तिने विचारलं,

    “काय गं कशी आहे तुझ्या मिस्टरांची तब्येत? पॅरॅलिसिसचाच अटॅक आला होता ना? काही बोलता येतं का गं त्यांना?”

    “नाही गं. उजवा हात आणि पाय अजूनही निर्जीवच आहेत. बोलायचा प्रयत्न करतात, पण जमत नाही. डॉक्टर म्हणतात, वर्ष तरी लागेल त्यांना ठीक व्हायला…” सीमा उदास होत म्हणाली.

    “नोकरीही गेली म्हणे त्यांची?”

    “हो ना! प्रायव्हेट नोकरीचं असंच असतं. थोडीफार मदत केली त्यांच्या मालकांनी पण ती आयुष्यभर थोडीच पुरणार आहे. म्हणून हा पापडाचा व्यवसाय सुरू केलाय. शेवटी संसार तर चालवावाच लागणार ना?”

    “हो, खरंय बाई… बरं बैस, मी पाणी आणते.”

    ती आत गेली. येताना पेढे आणि पाण्याचे ग्लास घेऊन आली.

    “पेढे कशाबद्दल?” सीमाने विचारलं.

    “अगं प्रीतिने गाण्याची स्पर्धा जिंकली आणि विशेष म्हणजे, टीव्हीवरच्या एका स्पर्धेसाठीही तिची निवड झाली. तू बघ तिथेही ती जिंकणार! अगं, प्रीति बाहेर ये गं. मावशीला एखादं गाणं म्हणून दाखव…”

    “अगं राहू दे आशा, मला घाई आहे.”

    “अगं ऐक तर खरं… बघ तिचा आवाज किती गोड आहे.”

    प्रीति बाहेर आली आणि आईच्या आग्रहास्तव इच्छा नसतानाही तिने आढेवेढे घेत गाणं म्हणायला लागली. गाणं संपवून ती आत गेली तरी, आशाचं आपल्या लेकीचंच कौतुक सुरू होतं. सीमाने अस्वस्थ होऊन शेवटी विचारलं,

    “आशा तुला किती देऊ पापड? आणि मुगाचे हवेत की उडदाचे?”

    हेही वाचा – अल्लड हर्षा अन् तिच्या मैत्रिणी

    “काय किलो आहेत?”

    “दोनशे रुपये.”

    “बापरे दोनशे? अगं कोपऱ्यावरच्या किराणा दुकानात सव्वाशे रुपयात मिळतात आणि पापडही एकदम मस्त आहेत!”

    “आशा, आपण डाळी चांगल्या वापरतो आणि अजून लहान प्रमाणात आपण व्यवसाय सुरू केलाय. ऑर्डर्स मिळत गेल्या, क्वांटिटी वाढली की, आपलेही भाव कमी होतील. सध्या तरी फक्त पंचवीस रुपये प्रॉफिट कमावणार आहे मी एका किलोवर…”

    “बरं, मला पाहू दे घरात किती आहेत ते, मग सांगते तुला…”

    आशा उठून आत गेली. मग बाहेर येऊन म्हणाली,

    “अगं, एक किलोचा पॅक जसाचा तसा पडलाय. तो संपला की, कळवते तुला.”

    सीमाचा चेहरा पडला. उदास होऊन ती म्हणाली, “तुझ्या मैत्रीणी खूप आहेत, त्यांना विचार ना!”

    “अगं सगळ्या त्या दुकानातूनच पापड घेतात. तरीही मी सगळ्यांना विचारून तुला उद्या-परवा कळवते.”

    नाराज होऊन सीमा तिच्या घरून निघाली. परतताना रस्त्यावर तिला ते दुकान दिसलं. गाडी थांबवून ती दुकानात शिरली. सव्वाशे रुपये किलोच्या पापडाची चौकशी केली. दुकानदार हसून म्हणाला,

    “अहो ताई, डाळी किती महाग झाल्यात. सव्वाशे रुपयात कसे मिळतील पापड? ब्रँडेड पापडाची किंमत पाहिलीय तुम्ही? जवळजवळ साडेतीनशे रुपये किलो आहे.”

    सीमाला आशाचा राग आला. आशाला पापड घ्यायचेच नव्हते. फक्त मुलीचं कौतुक करण्यासाठीच तिने तिला बोलावून घेतलं होतं, हे तिला समजलं.

    सीमा दिवसभर आपल्या मैत्रिणींकडे, ओळखीच्या लोकांकडे फिरत होती… कुणीही तिचे पापड घेतले नाहीत. संध्याकाळी ती पापडांनी भरलेली पिशवी जशीच्या तशी घेऊन घरी परतली, तेव्हा खुप निराश आणि थकलेली होती. जो दिवस चांगला वाटत होता, तो अखेर खूपच वाईट गेला होता. असंच जर राहिलं तर, संसाराचं कसं होईल, याची तिला काळजी वाटून गेली.

    सकाळी तिने पाच-सहा ठिकाणी फोन करून विचारलं, पण कुणीही पापड घ्यायला तयार नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून तिच्या दोन्ही मुली निराश झाल्या होत्या. पापड बनवण्यात लागलेली प्रचंड मेहनत त्यांना आठवत होती.

    0000

    दुसऱ्या दिवशी सकाळचे दहा वाजले. दारावर थाप पडली. कुणी पापडाची मागणी करायला आलं तर नाही ना, या विचाराने सीमाने घाईघाईने दार उघडलं. पाहिलं तर बाहेर नेहमीची डाळ्या-फुटाणेवाली उभी होती. तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

    “शांताबाई आज काही नको. सध्या पैशांची अडचण आहे.”

    “ताई थोडंसंच घ्या पण बोहनी करा, सकाळपासून बोहनीच नाही झाली.”

    सीमाचा नाईलाज झाला.

    “बरं ठीक आहे. फुटाणे दे वीस-पंचवीस रुपयांचे.”

    शांताबाई आत येऊन बसली.

    “लई काळजीत दिसता ताई. काई वंगाळ तर नाही झालं?”

    “काय सांगू तुला! सगळं वाईटच वाईट सुरू आहे. यांना लकवा झाला. त्याच्यामुळे नोकरी गेली. होते नव्हते ते पैसे संपत आलेत. नातेवाईकही मदत थोडीशीच करतात, पण त्या मदतीचा गाजावाजाच फार करतात. संसार कसा चालवावा, तेच समजत नाहीये.”

    शांताबाईने तिच्या गालाला हात लावत म्हटलं,

    “लई वंगाळ झालं वं ताई. पण तो देव हाये समदं येवस्थित करीन. तुमी धीर सोडू नका. माह्या घरचा माणूस तीन लेकराईले माह्या पदरात सोडून गेला तवा म्याबी अशीच रडायचे, पर त्या देवानेच पोटापाण्याची येवस्था केली. आता पोरं धंद्यापाण्याला लागली की, मी सुटली…”

    “काय तो देव व्यवस्थित करणार आहे? पापडाचा व्यवसाय सुरू करावं म्हंटलं तर, एवढ्या मेहनतीने पापड केले, पण काल एकही पापड विकला गेला नाही.”

    “अवो ताई तुमची बोहनी चांगली झाली नशीन…”

    तिने तसं म्हंटल्यावर सीमा चमकली. खरंच तर होतं. धंद्याची सुरुवातच आशाने वाईट केली होती!

    “बोहनी चांगली झाली ना की, पुरा दिस चांगला जातो बघा!” शांताबाई बोलत होती, “आता एक काम करा तुमचे पापड मले द्या. म्या करते तुमची बोहनी!”

    सीमाचा आपल्या कानावर विश्वास बसेना. तिने घाईघाईने मुलीला पापडाचा एक पॅक आणायला सांगितला. मुलीने तो आणल्यावर शांताबाई म्हणाली,

    “ताई एवढे नको पापड. मले अर्धा किलोच द्या. अजून धंदा सुरू नाय झाला.”

    सीमाने अर्ध्या किलोचा पॅक आणायला सांगितला.

    “किती द्याचे याचे?”

    “शंभर रुपये.”

    शांताबाईने एका रुमालात गुंडाळलेले शंभर रुपये काढून दिले.

    “आता तुमची बोहनी झाली. बघा आता माल कसा खपतो ते. दुकानांवर विचारलं का ताई?”

    “नाही.”

    “मंग दुकानांवर जा… त्यांना पापड दाखवा. ते कमिशन मागतीन… मागू द्या. आपलाही तर धंदा चालाया पाहिजे आणि हां मले अजून साताठ अर्धा किलोचे पाकिटं द्या. म्या बघते काई विकल्या गेले तर. उद्या तुम्हाला पैसे आणून देते.”

    सीमा खूश झाली. तिने आठ अर्धा किलोचे पॅक तिला आणून दिले.

    “बरं ताई. येते म्या. काई घाबरू नका. तो देव सगळं ठीक करीन…”

    ती गेली आणि सीमाला कालपासून आलेली निराशा बरीच कमी झाली. कोणीतरी मदतीला आहे, या कल्पनेने तिला आता उभारी वाटू लागली. तिने पटकन आपल्या मैत्रीणींची, ओळखीच्या व्यक्तींची यादी बनवली. आसपासच्या दुकानांचा मनातल्या मनात सर्व्हे केला. मग एका पिशवीत बरेच पापड भरले आणि ती मुलीला घेऊन निघाली.

    संध्याकाळी ती परतली तेव्हा तिचे सगळे पापड विकले गेले होते. हे खरं होतं की, काही जणांनी पैसे दिले नव्हते, पण काही हरकत नव्हती; ते पैसे कुठं पळून जाणार नव्हते. शांताबाई खरंच म्हणत होती. बोहनी चांगली व्हायला पाहिजे म्हणजे दिवस एकदम चांगला जातो.

    दुसऱ्या दिवशी सकाळीच शांताबाई घरी आली. आठ पॅकचे आठशे रुपये तिने काढून दिले. सीमाचा आनंद गगनात मावेनासा झाला.

    “धन्यवाद शांताबाई. तू खूप मोठं काम केलंस माझं!”

    “अवो ताई सुकसुके धन्यवाद नका देऊ. कमिशन काढा माह्यं.”

    सीमा एकदम चूप झाली. शांताबाई इतकी कमर्शियल असेल असं तिला वाटलं नव्हतं… पण हरकत नाही, दुकानदारांना तर आपण कमिशन देतच आहोत ना! मग ही तर गरीब बाई… हिला दिलं तर काय बिघडलं?

    “किती द्यायचं कमिशन शांताबाई?” तिने विचारलं तशी शांताबाई हसू लागली. हसता हसता म्हणाली,

    “मागल्या महिन्यात तुमी मला अद्रकची चहा करुन देलती प्युअर दुधाची. तीच पाजा आता. लई आवडली व्हती मले.”

    “तो तर पाजेन गं. पण कमिशन किती देऊ?”

    “अवो ताई, तेच तर कमिशन हाये!” शांताबाई जोरजोरात हसू लागली. सीमाला एकदम हायसंही वाटलं आणि शांताबाईच्या निरागसपणाबद्दल हसूही आलं.

    “असं होय? आता करून आणते चहा.”

    ती किचनमध्ये गेली आणि पटकन पाणी आणि चहा घेऊन आली. शांताबाईने बशीत चहा ओतला आणि फुरफुर करून पिऊ लागली. सीमाला ते पाहून हसू आलं. शांताबाईचं कौतुकही वाटलं. सकाळी जवळपासच्या कुठल्याशा खेड्यातून शांताबाई एसटीने शहरात यायची. डाळ्या, फुटाणे, शेंगदाणे, लाह्यांनी गच्च भरलेलं जड टोपलं घेऊन दिवसभर कॉलन्याकॉलन्यातून फिरायची. त्या टोपलीतच दोन भाकऱ्या, चटणी आणि पाण्याची बाटली असायची. दुपारी झाडाच्या सावलीत किंवा एखाद्या बंगल्याच्या अंगणात जेवण उरकायचं. संध्याकाळपर्यंत जी कमाई होईल ती घेऊन एसटीने परत घरी जायचं… असा तिचा दिनक्रम. एकदा तिला अनवाणी फिरताना पाहून सीमाने तिला चप्पल घेऊन दिली, तेव्हापासून सीमाची आणि तिची मैत्री वाढली.

    “लई मस्त!” चहाचा कप खाली ठेवत शांताबाई म्हणाली “ताई, तुमचं कमिशन मले लई आवडलं. बरं आणा पापड. आजबी तुमची बोहनी म्याच करून देते.”

    सीमाने अर्ध्या किलोचं पाकीट आणून दिल्यावर शांताबाई तिला शंभर रुपये देऊ लागली तसं सीमाने तिला थांबवलं.

    “राहू दे शांताबाई. त्या शंभर रुपयाचे मला खारे शेंगदाणे देऊन टाक म्हणजे तुझीही बोहनी होऊन जाईल.”

    शांताबाई एकदम खूश झाली.

    “ताई पापड लई मस्त आहे तुमचे. म्या काल खाऊन पाह्यले. आज मले दहा पाकीटं द्या. लोकाईले आवडले तर लई चांगला धंदा चालीन तुमचा.”

    “देव करो तुझ्या तोंडात साखर पडो…”

    हळूहळू सीमाचा व्यवसाय जोर धरू लागला. शांताबाई तिला मार्केटिंगचं शिक्षण देत होतीच. उत्पादनापेक्षाही मालाचं मार्केटिंग खूप महत्त्वाचं असतं, हे सीमाच्या लक्षात येऊ लागलं. हळूहळू शहरातले बहुतांशी दुकानदार सीमाचेच पापड विक्रीसाठी ठेवू लागले. मग सीमाने सुपरशॉप्समध्येही प्रवेश केला.

    आज या गोष्टीला एक वर्ष होऊन गेलं. सीमाने आता भर बाजारात एक दुकान भाड्याने घेतलंय. “सीमा गृहउद्योग” ही पाटी त्यावर दिमाखात झळकतेय. पापडांसोबतच लोणची वेफर्स, सरबतं, चिवडा यांची विक्री तिथे होते. सोबतच शांताबाईचे फुटाणे, खारे शेंगदाणे, डाळ्या, मुरमुरे, लाह्या तिथे विक्रीला असतात. सीमाला आता फुरसत नसते. घरावर तिने मोठा हॉल बांधून घेतलाय. त्यात वर्षभर काहीनाकाही पदार्थांची निर्मिती होत असते. पंधरा महिला तिथं काम करत असतात.

    सीमाच्या आग्रहाखातर शांताबाईने आता घरोघरी डाळ्याफुटाणे विकणं बंद केलंय. सीमाच्या त्या छोट्या कारखान्यात ती मॅनेजरचं काम करते. लवकरच तिच्या मदतीने सीमा फरसाण, नमकीनचं उत्पादन सुरू करणार आहे. चांगल्या उपचारांमुळे सीमाचा नवरा पूर्ण बरा झालाय. दुकानात तोच बसतो. सीमा या प्रगतीचं श्रेय शांताबाईला तर देतेच, पण तिच्या मुलाला मालवाहतुकीची छोटी गाडी घेऊन द्यायलाही सीमाने भरघोस आर्थिक मदत केलीये. शांताबाईंचे डाळे-फुटाणे आणि सीमाच्या उत्पादनाची विक्री तोही घरोघरी करत असतो.

    हेही वाचा – अल्लड हर्षा अन् जगण्यातील जिवंतपणा!

    सीमाने शांताबाईचं तत्व आजही पाळलंय. दिवसाच्या विक्रीची सुरुवात अशाच ठिकाणाहून करायची जिथे त्वरित पैसे मिळतील. अर्थात, बोहनी चांगली झाली पाहिजे. यशस्वी उद्योजिकेचा पुरस्कार जेव्हा सीमाला मिळाला तेव्हा मंचावर शांताबाईला बोलावून तो पुरस्कार तिने शांताबाईला अर्पण केला.

    चारचौघात जेव्हा सीमा शांताबाईचं कौतुक करते, तेव्हा शांताबाई तिला म्हणते,

    “अवो ताई, ते सुकंसुकं कौतीक बंद करा. मले माह्यं कमीशन द्या…”

    सीमा हसते… ते कमिशन आता तिला चांगलंच माहीत झालंय. आलं घातलेला प्युअर दुधाचा एक कप चहा!

    Avatar photo
    दीपक तांबोळी

    निवृत्त रेल्वे अभियंता. 2018पासून लेखनास सुरुवात केली. आतापर्यंत 6 कथासंग्रह आणि 1 संपादित कथासंग्रह प्रकाशित. 8वा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्य संस्थांचे 35 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

    Related Posts

    पावसाळा

    July 8, 2026 ललित

    गोष्ट सरोजताई अन् समीराची!

    July 8, 2026 ललित

    राज यांची निवृत्ती अन्…

    July 7, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पावसाळा

    By नीता चंद्रकांत कुलकर्णीJuly 8, 2026

    भुरभूर… भुरभूर पाऊस सुरू झाला. मी लगेच गॅलरीत गेले. समोरच्या घरातली छोटी मुलं बाहेर येऊन…

    गोष्ट सरोजताई अन् समीराची!

    July 8, 2026

    राज यांची निवृत्ती अन्…

    July 7, 2026

    संकर्षण… पिता-पुत्राच्या प्रेमळ नात्याची सुरुवात…

    July 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    चांगली बोहनी…

    July 9, 2026

    पावसाळा

    July 8, 2026

    गोष्ट सरोजताई अन् समीराची!

    July 8, 2026

    गुंतागुंतीचा माणूस…

    July 8, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : रथांगांचा मेळावा, जेवीं रथु म्हणिजे पांडवा 

    July 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 जुलै 2026

    July 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 353
    • अवांतर 193
    • आरोग्य 128
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 481
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 231
    • मैत्रीण 24
    • ललित 767
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    चांगली बोहनी…

    July 9, 2026

    पावसाळा

    July 8, 2026

    गोष्ट सरोजताई अन् समीराची!

    July 8, 2026
    Most Popular

    नूतन… मौनाचा संवाद!

    July 5, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.