दोन मैत्रिणींमधला संवाद…
पहिली – अगं फोटो बघितला का? आज किनाई माझ्या लेकाने मला पोळी करायला मदत केली.
दुसरी – हो का? वा मस्तच की!
पहिली – हो ना, अगं कणीक पण त्यानेच भिजवली आणि पोळी पण लाटली.
दुसरी – अरे वा… चला छान सुरुवात झाली म्हणजे…
0000
काही दिवसांनी…
दुसरी – काय गं काय चालले आहे?
पहिली – स्वयंपाकाशिवाय काय करणार दुसरे? दिवसभर नुसते खायलाच करावे लागते.
दुसरी – अगं पण मुलं करतात ना तुला मदत?
पहिली – कशाचे काय? सुरुवातीला केली मदत, आता काही नाही! त्यादिवशी तर मुलाने सांगितले की, ‘आता मला पोळी करता येते, परत नाही करणार!’
हेही वाचा – गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य
मैत्रिणींचे हे बोलणे ऐकल्यावर विचार आला की, खरंच असे असते का?
खरंच एकदा कणीक भिजवून पोळी केली की झाले का?
पोळीचा केवढा मोठा प्रवास आहे. सुरुवात होते गव्हापासून… साधारणपणे पहिल्यापासून एखादा गव्हाचा प्रकार प्रत्येक घरात ठरलेला असतो. तो आणून नंतर दळला जातो. ते पीठ पण काही वेळेस काहीसे जाड तर काही वेळेस एकदम बारीक दळले जाते. नंतर येते कणीक भिजवण्याची वेळ. काय करायचे आहे, त्यावर ती कणीक कशी भिजवायची, हे अवलंबून असते. पुरी करायची तर जरा घट्ट, पुरणपोळीसाठी सैलसर… एकदा का कणीक भिजवून झाली की, थोडावेळ झाकून ठेवायची असते. (पण नेहमी अशी ठेवायची नाही बरं का? पावसाळ्यात भिजवलेली कणीक लवकर सैलसर होते, त्यामुळे तेव्हा कणीक भिजवून ठेवायची नाही, असे मी लहानपणी ऐकले आहे.)
आता लाटायची पोळी. कुणाला घडीची पोळी आवडते तर कुणाला फुलके! त्याचवेळेस तवा पण गॅसवर ठेवायचा (गॅस चालू करायला विसरायचे नाही हं😀). तवा पण व्यवस्थित तापलेला असेल तर, पोळी छान भाजली जाते. नाहीतर तव्याला चिकटते. उलटली नाही तर, पोळी छान तव्याला चिकटून काळी पण होते.
या सगळ्यानंतर पोळी छान फुगली पाहिजे म्हणजे पोळी जमली.
(कितीही सुगरण स्वयंपाक करत असेल तरी, काही वेळेस तिची पण पोळी बिघडते. एखाद्या वेळेस मूड चांगला नसेल तर पोळी बिघडते बरं का!)
हेही वाचा – हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…
पोळीमध्ये पण किती प्रकार आहेत. साधी पोळी, घडीची पोळी, गुळाची, पुरणाची, खव्याची, सांज्याची, वेगवेगळे पराठे, वेगवेगळ्या पुऱ्या, एक ना अनेक… किती प्रकार! प्रत्येकाची पोळी करण्याची पद्धतही वेगवेगळी… आणि हो, वेगवेगळ्या सणांना वेगवेगळ्या प्रकारची पोळी करण्याची पण प्रथा आहे.
त्यामुळे खरंच एक दिवस पोळी केल्यावर मला पोळी आली, असे होईल का?
(शिळ्या पोळीचे पण अनेक प्रकार होतात बरं का😀!)


