नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
शूटिंग दरम्यान मला अजून एक मुलगा मिळाला… बरोबर वाचलंत मिळाला. भेटला किंवा सापडला नाही. कारण एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीमध्ये गेल्या 43 वर्षांत मला साधारण 200-250 मुलं मिळाली. ती मुले ‘माझी मुले’ आणि मी ‘त्यांची आई’ झाले. कोणी मला आई, माई, मां, मम्मा, मम्मी, अम्मी, आवड्या त्यांना हवे तशी हाक मारतात. बरं कसं आहे ना, ती मुलं करिअर करण्यासाठी मुंबईत आलेली आहेत. प्रत्येक वेळी काही त्रास झाला, आनंद झाला, काही हवे- नको असेल, दुखलं खुपलं तर लगेच कोणी आपल्या घरी सांगू शकत नाहीत… शेअर करू शकत नाहीत… पण कोणाशी तरी बोलायला हवं असतं. तेव्हा त्यांच्यासाठी मी असते! ती मुले मला फोन करतात… माझ्याशी बोलतात. त्यांनाही बरं वाटतं, मलाही बरं वाटतं.
एक मुलगी हिंदी भाषिक होती. ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी नेहमी भांडून मला फोन करायची. “ए मां देख कैसा लड़ता है, वो मेरे साथ।” मी आपली त्यांची भांडणं सोडवायचे. एकदा तिला बोलले सुद्धा की, “तुझ्या आईला सांग ना, तो भांडतो ते तुझ्याशी… ती काहीतरी निर्णय घेईल.” तसं ती म्हणाली की, “नको.. मीच भडक डोक्याची आहे. मीच त्याच्याशी भांडत असते. माझ्या मांला कळलं तर ती धोपटेल मला.” आज त्यांचं लग्न होऊन एक बाळ पण आहे.
हेही वाचा – बोलीभाषेतली नाती अन् मी!
अजून एक मुलगा आहे. मुंबईत राहतो. क्राइम सीरियलमध्ये कितीतरी एपिसोडमध्ये त्याने माझ्या मुलाचा रोल केलाय. एकदा सेटवर बराच वेळ होता. आम्ही दोघे खूप गप्पा मारत होतो. तेव्हा तो बोलला की, “कोणे एके काळी, जेव्हा तो नवीन होता, छोटे छोटे रोल करायचा, त्या ठिकाणी मी सुद्धा असले की, तो मॉनिटरवर बसून माझं काम बघत शिकायचा प्रयत्न करायचा.” हा त्याचा विनय. त्याला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. पण आम्ही दोघे हळूहळू आई आणि मुलगा असा रोल करता करता, आमच्यात आई-मुलाचं नातं कसं विणलं गेलं ते कळलंच नाही. ही जी माझी 200-250 मुले आहेत ना, आम्ही कोणीही एकमेकांशी सतत संपर्कात नसतो. पण तरीही बांधलेले आहोत.
मधल्या काळात काही दिवस तो मुलगा अगदीच गायब होता. साधारणपणे होत असतं असं. पण अचानक बातमी आली की, त्याला पक्षाघात झाला होता. खूप प्रयत्नाने तो आता थोडा बरा होतोय. औषधं, व्यायाम, डाएट, बायको, मुलगी, कुटुंब आणि मित्रांचं प्रेम याने तो एवढ्या मोठ्या आजारातून बाहेर पडला. बोलण्यात थोडा अडथळा येत होता. पुन्हा कामासाठी सज्ज झाला. एका मोठ्या सीरियलमध्ये एक चांगला रोल मिळाला. सभोवती त्याची परिस्थिती माहीत असणारे मित्र होते. त्याला मदत करत कॉन्फिडन्स देत होते…
त्यात दुसरं संकट आलं. त्याचा अपघात झाला. वाचला बेटा. आता सगळेच सरसावले त्याच्या मदतीला. ठणठणीत नाही, पण बऱ्यापैकी ठीक झालाय. अलीकडेच एका पार्टीमध्ये भेटला होता. बोलताना थोडा अडखळत होता. पण व्यवस्थित होता. आमचं नाचणं, गप्पा मारणं सुरू होतं. मला भूक लागली. मी आपलं माझं ताट भरलं. वरण, भात, सलॅड आणि जेवत होते. हा आला, “आई, पटकन एक घास भरव.” थोड्या वेळाने परत आला… “भरव.” असे चार-पाच घास वरण भात खाल्ला आणि म्हणाला, “आज तुझ्या हाताने जेवलो. पोट भरलं माझं.” आम्ही दोघेही जरा अश्रूळलो! (म्हणजे emotional झालो. मराठी भाषेत असा कोणताही शब्द नाहीये. हा शब्द म्हणजे माझा आगाऊपणा आहे.)
हेही वाचा – तो आला, तो बोलला… पण…
“मी निघते,” म्हणत चार वेळा त्याच्या समोर पुन्हा पुन्हा काही ना काही कारणाने जातच होते. त्याने घड्याळ बघितलं आणि ओरडलाच… “अगं वाजले किती. घरी कधी पोहोचणार? एक काम कर, तू आता दादरला चल माझ्या घरी. उद्या सकाळी उठून जा तुझ्या घरी. मी काही एवढ्या रात्री तुला एकटीला जाऊच देत नसतो.”
मी म्हटलं, “अरे, काळजी नको करूस. माझा एक मुलगा मला स्टेशनला सोडणार आणि दुसरा पार विरार स्टेशनपर्यंत सोबत असेल. विरार येण्याआधी मी माझ्या रिक्षावाल्याला कॉल करेन तो मला safely माझ्या घरी सोडेल…” तसा तो शांत झाला. I am blessed. मी कुठेही काम करू देत. माझ्या अवती-भवती मला जपणारे लोक खूप असतात… स्वामीकृपा.


