सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय बारावा
ययापरी पाहीं। अर्जुना माझें ठाईं। संन्यासूनि नाहीं। करिती कर्में ॥78॥ आणीकही जे जे सर्व। कायिक वाचिक मानसिक भाव। तयां मीवांचूनि धांव। आनौती नाहीं ॥79॥ ऐसे जे मत्पर। उपासिती निरंतर। ध्यानमिषें घर। माझें झालें ॥80॥ जयांचिये आवडी। केली मजशीं कुळवाडी। भोग मोक्ष बापुडीं। त्यजिलीं कुळें ॥81॥ ऐसे अनन्ययोगें। विकले जीवें मनें आंगें। तयांचे कायि एक सांगें। जें सर्व मी करीं ॥82॥
तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्। भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥7॥
किंबहुना धनुर्धरा। जो मातेचिया ये उदरा। तो मातेचा सोयरा। केतुला पां ॥83॥ तेवीं मी तयां। जैसे असती तैसियां। कळिकाळ नोकोनियां। घेतला पटा ॥84॥ एऱ्हवीं तरी माझियां भक्तां। आणि संसाराची चिंता। काय समर्थाची कांता। कोरान्न मागे ॥85॥ तैसे ते माझें। कलत्र हें जाणिजे। कायिसेनिही न लाजें। तयांचेनि मी ॥86॥ जन्ममृत्यूचां लाटीं। झळंबती इया सृष्टी। तें देखोनियां पोटीं। ऐसें जाहलें॥87॥ भवसिंधूचेनि माजें। कवणासि धाकु नुपजे। येथ जरी कीं माझे। विहिती हन ॥88॥ म्हणोनि गा पांडवा। मूर्तीचा मेळावा। करूनि त्यांचिया गांवा। धांवतु आलों॥89॥
हेही वाचा – Dnyaneshwari : वांचूनि योगाचेनि बळें, अधिक कांहीं मिळे
अर्थ
अर्जुना याप्रमाणे ते मला कर्मे अर्पण करून कर्मे नाहीशी करतात ॥78॥ आणखी ज्या ज्या म्हणून काही शरीराच्या, वाणीच्या व मनाच्या क्रिया असतात, त्या सर्वांची प्रवृत्ति माझ्याशिवाय दुसरीकडे नसते. ॥79॥ असे जे माझ्या ठिकाणी गढून माझी निरंतर उपासना करतात व जे माझे निरंतर ध्यान करतात व त्या ध्यानाच्या निमित्ताने जे माझे घर झाले आहेत, ॥12-80॥ ज्यांच्या प्रेमाने माझ्याशी देवघेव केलेली असते व ऐहिक व पारत्रिक भोग व मोक्ष ही कुळे दीन आहेत असे समजून, ज्यांनी त्यांचा त्याग केलेला असतो. ॥12-81॥ याप्रमाणे एकनिष्ठ भक्तीने जीव, शरीर व मन यासह जे मला विकलेले असतात, त्यांचे काय एक मी करतो म्हणून सांगू? कारण सर्वच मी करतो. ॥12-82॥ माझ्या (सगुणस्वरूपाच्या) ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवले आहे अशा त्या (भक्तांचा) मी अल्प काळांत मृत्युरूप संसारसागरामधून उद्धार करणारा होतो ॥7॥ फार काय सांगावे? अर्जुना जो आईच्या पोटी जन्म घेतो, तो आईचा किती आवडता असतो बरे? ॥12-83॥ त्याप्रमाणे माझे भक्त जसे असतील त्या स्थितीत मी त्यांच्यावर प्रेम करतो व कळिकाळाचा पराभव करून त्यास मी आपल्या पदरात घेतो. ॥12-84॥ सहज विचार करून पाहिले तर (कोणीही) एकदा माझा भक्त म्हणून ठरला, मग त्यास संसाराच्या काळजीची गोष्ट कशाला? सांग. राजाच्या कुटुंबास भीक मागण्याचे कारण पडेल काय? ॥12-85॥ त्याप्रमाणे ते भक्त माझे कुटुंब आहेत असे समजावे. त्यांचे कोणतेही पडलेले काम करण्यात मला कमीपणा वाटत नाही. ॥12-86॥ जन्ममृत्यूच्या लाटांत हे जग गटांगळ्या खात असलेले पाहून माझ्या पोटात असा विचार आला. ॥12-87॥ संसारसागराच्या खवळण्याने कोणास भय उत्पन्न होणार नाही ? या योगाने (संसारसागराच्या क्षोभाने) माझे भक्त कदाचित् भितील. ॥12-88॥ म्हणून अर्जुना सगुणरूप धारण करून भक्तांच्या गावाला मी धावत आलो. ॥12-89॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : वळघलिया रणाची थाटी, आंगीं न लगतां काठी


