हस्तस्य भूषणं दानं
सत्यं कण्ठस्य भूषणम् ।
श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं
भूषणै: किं प्रयोजनम्।।
दान करणे हे हाताचे भूषण आहे. सत्य बोलणे हे कंठाचे भूषण आहे. शास्त्र ऐकणे हे कानाचे भूषण आहे. मग इतर अलंकारांची काय गरज आहे?
खरंच दानाचे किती महत्त्व आहे! माणूस हा परोपकारी वृत्तीचा आहे. त्याला नेहमीच दुसऱ्याच्या कामी / उपयोगी येण्याची सवय असते. अगदी लहानपणापासूनच मुलांना आपल्या जवळील वस्तू वाटून घेण्याची सवय लावली जाते. कळत नकळत आपण अनेक गोष्टी दुसऱ्यांना देत असतो. त्यामध्ये काही वेळेस ती गोष्ट परत मिळावी, अशी इच्छा असते तर, काही वेळेस असे काही वाटत नाही.
समोरच्या व्यक्तीला एखादी गोष्ट हवी आहे आणि त्यासाठी तो खूप दु:खी असेल आणि ती गोष्ट आपण त्याला कोणताही अहंभाव न ठेवता दिली तर, ते पण दानामध्ये मोडते. म्हणजेच एकमेकांना नि:स्वार्थी भावनेने केलेली मदत ही दानाची पहिली पायरीच असते. जसजसे मोठे होत जातो, तसे ‘मदत’ हा शब्द दानाबरोबर जोडला जातो.
हेही वाचा – गोफ… सुखद आठवणींचा!
आता थोडे पुढच्या पायरीवर म्हणजे दानाबद्दल विचार करू. आपल्या ग्रंथांमध्ये दानाबद्दल बरेच लिहून ठेवले आहे.
अद्रोह: सर्वभुतेषु कर्मणा मनसा गिरा।
अनुग्रहश्च दानं च एष धर्म: सनातन:।।
अर्थात, कोणत्याही जीवाचा मत्सर करू नये. सर्वांवर कृपा करावी आणि सर्वांनाही चांगल्या गोष्टींचे दान द्यावे, हाच सत्पुरुषांचा सनातन धर्म सांगितला आहे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये सतराव्या अध्यायामध्ये देखील दानाबद्दल सांगितले आहे. त्यामध्ये निरपेक्ष वृत्तीने केलेले दान सात्विक दान, परतफेडीच्या आपेक्षेने केलेले दान राजसिक दान तर अपात्र व्यक्तीला अनादरासहित दिलेले तामसिक दान म्हटले आहे.
धन किंवा स्थूल वस्तूचे दान करणारी व्यक्ती ही दानी समजली जाते. ज्ञानाचे दान करणारी व्यक्ती महादानी, तर गुण आणि शक्तीचे दान करणारी व्यक्ती वरदानी समजली जाते. यामध्ये अन्नदान, जलदान, वस्रदान, रक्तदान, भूदान, गोदान, नेत्रदान, देहदान, अर्थदान, विद्यादान, श्रमदान, समयदान असे अनेक प्रकार येतात. (कन्यादान पण महत्त्वाचे आहे.)
कोणतेही कार्य करताना दान करण्याची आपली परंपरा आहे. प्रत्येक सणासाठी, कार्यासाठी कोणत्या गोष्टी दान करायच्या, याबाबत पण काही गोष्टी ठरलेल्या आहेत. दान देताना दान घेणाऱ्याने ‘धन्यवाद’ म्हणावे, असे अपेक्षित नसते. असे म्हणतात की, दान करताना त्याचा गाजावाजा करू नये. एका हाताचे दुसऱ्या हाताला पण समजले नाही पाहिजे, असे दान हवे. (दान देताना त्या व्यक्तीला त्याची खरचं गरज आहे का, हे पण बघितले पाहिजे.) समोरच्याकडे ती गोष्ट नाही म्हणून तर आपण आपल्याकडील ती गोष्ट त्याला देत असतो. त्यामुळे दान देणाऱ्याने आणि घेणाऱ्याने त्याचे महत्त्व समजले पाहिजे. दान घेणारा हा गरजू आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्याच्या भावनेला धक्का पोहोचणार नाही, याची पण काळजी घेतली पाहिजे.
आज मरणोत्तर आपल्या अवयवांचे दान करता येते. तेव्हा ते कोणाचे आहे आणि कोणाला दिले आहे, हे सुद्धा समजत नाही. किती छान विचार आहे हा!
दान देण्यामध्ये कर्ण, राजा हरिश्चंद्र, शिबीराजा, श्रीयाळ राजा, राजा हर्षवर्धन यांचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो. अध्यात्मामध्ये पण व्यक्तीने पुण्य मिळवण्यासाठी दान करायचे का? दानाचा व्यक्तीच्या सुप्त मनाशी काही संबंध आहे का? यातून सुप्त मनाशी संवाद होतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. आपण नि:स्वार्थी भावनेने कोणत्याही गोष्टींचे दान केले, तर एक समाधान आपल्याला मिळत असते. आपण कोणाच्या तरी उपयोगी आलो याबद्दल आनंद असतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य यामधून मिळते.
या सगळ्या विचारामुळे दानाबद्दल एक वेगळीच दृष्टी मिळते. म्हणजेच, आपण त्याकडे वेगळ्या नजरेने बघू लागतो. हीच दृष्टी महत्त्वाचे काम करते. विचार करायला लावते. काय बरोबर काय चूक, हे आपल्या समोर येते. त्यानुसार आपण कुठे, कशाचे, कोणाला दान करायचे याचा विचार करतो. म्हणजे, दृष्टी महत्त्वाची हो ना?
हा दृष्टी शब्द पण किती वेगवेगळे अर्थ सांगतो. नजर, रोख, कल ही त्याचीच रूपं. एखाद्याची नजर चांगली नाही, पदरचं खावे पण नजरचे नको, त्याची दृष्ट लागली, त्याचा रोख त्याच गोष्टी कडे होता, त्याचा कल कुठे आहे अजून समजतच नाही अशी अनेक वाक्ये रोज आपल्या कानावर पडत असतात…
हेही वाचा – आठवणींचे कपाट!
आता तुम्ही म्हणाल सुरुवात दानाने केली, आता मधेच दृष्टी बद्दल बोलत आहे. नक्की काय म्हणायचे आहे? तर सांगते… फक्त डोळ्यांशी त्याला जोडू नये. एखाद्याला वेगवेगळ्या गोष्टींकडे कसे बघायचे, याची दृष्टी दिली पाहिजे आणि हे देताना दानाची भावना मनात असावी. म्हणजेच, त्याला कसे बघायचे, हे सांगितल्यावर तो आपल्याला धन्यवाद म्हणणार नाही, हे ठरवूनच काम केले पाहिजे. आज समाजात अशी दृष्टी देणाऱ्यांची पण कमी नाही आणि ते घेणाऱ्यांची पण कमी नाही. फक्त गरज आहे सत्पात्राची! ज्याला ज्याची गरज आहे, त्याला ते योग्य व्यक्तीकडून मिळावे. योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळावे म्हणजेच दान मिळावे…
मध्यंतरी एक व्हिडीओ बघितला होता, त्यामध्ये हृदयदानानंतर ज्याने दान केले, त्याच्या आवडती व्यक्ती, ज्याने घेतले आहे त्याच्या जवळ आली तर, त्याचे हृदय चांगल्या प्रकारे धडधडते. मग हे सगळ्याच अवयवांच्या बाबतीत होऊ शकते ना? मग आपण पण सगळीकडे बघण्याची चांगली दृष्टी ठेवली. तसेच इतरांना पण समजावले तर, दृष्टीदानानंतर चांगली नजर, चांगली दृष्टी घेणाऱ्याला मिळेल.
कदाचित असाच काहीसा विचार करून संतांनी “हेची दान देगा देवा” असे म्हटले असावे.
यद्यन्तश्चक्षुरन्धं स्यात्|
नेत्राभ्यां किं प्रयोजनम्
दृष्टिदानमतः कार्यं-
ज्ञानाञ्जनयुतं महत्||


