नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
मी एकदा एक ऑडिशनला गेले होते. शाळेच्या मुख्याध्यापिकेचा रोल होता. कॉटनची लाइट कलरची साडी नीटसं नेसलेली, केसांचा अंबाडा, एका हातात घड्याळ, मरून रंगाची टिकली, सिंगल लाइन मंगळसूत्र, डोळ्यावर चष्मा आणि माफक मेकअप… अशा पेहरावात मी स्वतःला आरशात बघितलं… ‘वा! धड नीट शिक्षण झालं असतं तर मुख्याध्यापिका म्हणून नक्कीच शोभले असते.
ऑडिशनच्या जागी पोहोचले. उच्च विद्याविभूषित तरुण मुले आणि मुली माझ्या वयाच्या कितीतरी अभिनेत्रींची ऑडिशन घेण्यासाठी अवतरले होते. त्यातला एक महाभाग माझ्यापाशी आला आणि म्हणाला, “मॅडम, आप प्रिन्सिपल का ऑडिशन देने आये हो. मंगलसूत्र और बिंदी हटा दो.”
हेही वाचा – मानो या ना मानो…
मी विचारलं “का?” तर म्हणे – “प्रिन्सिपल तर हे सगळं नाही घालत. बहुतांश मुख्याध्यापिका विधवा असतात.” आता ही अक्कल हा कुठून शिकून आला असेल देव जाणे! या मुलाला काय बोलावं, कसं समजवावं? सोडून दिलं…
ऑडिशन दिली, पण काम होणार नाही, हे माहीत होतं. रिक्षात बसले घरी यायला निघाले. आठवली माझी शाळा… चंदा रामजी गर्ल्स हाय स्कूल. सी. पी. टँक, गिरगाव… माझी शाळा, माझ्या मैत्रिणी, शिक्षिका… आणि प्रिन्सिपल श्रीमती गुणवंती बेन मेहता. शांत चेहरा. कांजी केलेली स्वच्छ सफेद साडी किंवा आकाशी, ग्रे, पीच अशा फिक्कट रंगाच्या साड्या, मॅचिंग ब्लाऊज, एका हातात सोन्याच्या दोन बांगड्या, दुसऱ्या हातात घड्याळ. कानात छोट्याशा कुड्या, गळ्यात कधीतरी मोत्यांचा सर. काय दिसायच्या!
हेही वाचा – पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…
मी त्यांना कधीही रागावलेलं किंवा मोठ्या आवाजात बोलताना कधीच ऐकलं नाही. त्यांना बघून भीती वाटायची पण आदरयुक्त. आजच्या नवशिक्या मुलांना काय कळणार शाळेच्या प्रिंसिपल कशा असतात, कशा दिसतात?
मी ऑडिशनमध्ये का होईना, स्कूल प्रिन्सिपल या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आठवतात तुमच्या तुमच्या प्रिन्सिपल? नाव आणि वागणुकीसकट?
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


